लासूर हे जळगाव जिल्हातील चोपडें तालुक्यांतील एक गांव हे चोपडयापासून ८ मैलांवर आहे. लोकसंख्या सुमारे २००० सांप्रत, लासूर गावी सध्या विशेष काही नसून फक्त कुडाच्या झोपडया व अस्ताव्यस्त बांधलेली लहान पडकी घरे मात्र दृष्टीस पडतात. परंतु तेथील किल्ल्याचा अवशेष, एक उत्तम विहीर व एक मशीद ही मात्र गत वैभवाची साक्ष देण्याकरिता केवळ जीव मुठीत धरून अद्याप कशीतरी उभी आहेत. कर्नाटकी लोकांचा उपद्रव या प्रांताला असह्म झाला होता तेव्हा गुलझारखान ठोके याने किल्ला बांधून वर अरबांची शिबंदी ठेविली. त्यांना वेळच्या वेळेला पगार मिळेना म्हणून त्यांनी गुलजार व त्याचा मुलगा यांना मारण्याचा बेत केला. अलफखान नावाचा गुलजारचा दुसरा मुलगा निसटून निंबाळकराच्या आश्रयास गेला. तिकडून निंबाळकराने दिलेले भाडोत्री कर्नाटकी लोक घेऊन तो लासूरला आला कर्नाटकी लोकांनी अरबांना फन्ना उडविला. परंतु निंबाळकरांच्या सांगण्यावरून ते किल्ला वेढून बसले. अलफखान फार निराश झाला. त्यानें भिल्लांच्या मदतीने हल्ला केला. शेवटी १०००० रूपये निंबाळकरांना द्यावे व ते दिल्यावर निंबाळकरांनी किल्ला सोडावा असे ठरले. ही रक्कम इंग्रंजांनी देऊन किल्ल्यावर इंग्रज (घोडेस्वार) ठेवले. ठोके घराण्यांतील एक मनुष्य लासूरचा मुख्य असून आसपासचा प्रदेश व डोंगरपट्टी त्याच्या नजरेत असे.
कोणतही शिवकाव्य येथे शोधा
जळगाव जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
जळगाव जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
लासूर किल्ला
लासूर हे जळगाव जिल्हातील चोपडें तालुक्यांतील एक गांव हे चोपडयापासून ८ मैलांवर आहे. लोकसंख्या सुमारे २००० सांप्रत, लासूर गावी सध्या विशेष काही नसून फक्त कुडाच्या झोपडया व अस्ताव्यस्त बांधलेली लहान पडकी घरे मात्र दृष्टीस पडतात. परंतु तेथील किल्ल्याचा अवशेष, एक उत्तम विहीर व एक मशीद ही मात्र गत वैभवाची साक्ष देण्याकरिता केवळ जीव मुठीत धरून अद्याप कशीतरी उभी आहेत. कर्नाटकी लोकांचा उपद्रव या प्रांताला असह्म झाला होता तेव्हा गुलझारखान ठोके याने किल्ला बांधून वर अरबांची शिबंदी ठेविली. त्यांना वेळच्या वेळेला पगार मिळेना म्हणून त्यांनी गुलजार व त्याचा मुलगा यांना मारण्याचा बेत केला. अलफखान नावाचा गुलजारचा दुसरा मुलगा निसटून निंबाळकराच्या आश्रयास गेला. तिकडून निंबाळकराने दिलेले भाडोत्री कर्नाटकी लोक घेऊन तो लासूरला आला कर्नाटकी लोकांनी अरबांना फन्ना उडविला. परंतु निंबाळकरांच्या सांगण्यावरून ते किल्ला वेढून बसले. अलफखान फार निराश झाला. त्यानें भिल्लांच्या मदतीने हल्ला केला. शेवटी १०००० रूपये निंबाळकरांना द्यावे व ते दिल्यावर निंबाळकरांनी किल्ला सोडावा असे ठरले. ही रक्कम इंग्रंजांनी देऊन किल्ल्यावर इंग्रज (घोडेस्वार) ठेवले. ठोके घराण्यांतील एक मनुष्य लासूरचा मुख्य असून आसपासचा प्रदेश व डोंगरपट्टी त्याच्या नजरेत असे.
चौगावचा किल्ला
उंची: ६६० मीटर
डोंगररांग: सातपुडा
जिल्हा: जळगाव
उत्तर महाराष्ट्रातील जळगावचा परिसर म्हणजे पूर्वीच्या खानदेशाचाच एक भाग होय. १९६० साली हा भूभाग ‘जळगाव जिल्हा’ म्हणून घोषित करण्यात आला. जळगाव जिल्हा पूर्वीपासून तिथल्या केळीबद्दल, सोन्याच्या बाजारपेठेबद्दल, तर अलीकडे तेथे भंवरलाल जैन उद्योग समूहाने अत्यंत कल्पकतेने उभारलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी केंद्राबद्दल प्रसिद्धीस पावला आहे. अशा या जळगाव जिल्ह्य़ात प्राचीन वैभवसंपन्न राजघराण्यांचा वारसा सांगणारे काही गडकोट आहेत व ते आवर्जून पाहाण्यासारखे आहेत, यावर कोणाचाही चटकन् विश्वास बसणार नाही. अशा या गडकिल्ल्यांच्या दृष्टीने फारशा ऐकिवात नसलेल्या जळगाव जिल्ह्य़ात महाराष्ट्र – मध्यप्रदेश सीमारेषेवर चौगावचा किल्ला उभा आहे. प्राचीन काळापासून दक्षिणेतून मध्यप्रदेशात (नेमाडात) जाणाऱ्या भिराम घाट या डोंगरी भागावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेल्या चौगावच्या किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण असेच होते. त्याचबरोबर, उत्तर-मध्य प्रांतातून दक्षिणेतील सुरत, भडोच बंदरातून भारताबाहेर निर्यात होणाऱ्या मालासाठी बाजारपेठ म्हणूनही चौगावचे महत्त्व होते. असा हा प्राचीन काळाशी धागेदोरे जोडणारा चौगावचा किल्ला समुद्रसपाटीपासून ६६० मीटर उंचीवर उभा असून तो चौगाव गावापासून उत्तरेला असणाऱ्या सातपुडा डोंगररांगेत विराजमान झाला आहे.चौगाव किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास प्रथम जळगावला पोहोचावे लागते. जळगावहून चोपडा मार्गे किल्ल्याजवळच्या चौगावला आपण पोहोचायचे. जे दुर्गप्रेमी पारोळ्याचा भुईकोट पाहून इकडे येऊ इच्छितात ते पाटोळा-अंमळनेर-लासूर मार्ग चौगाव गाठू शकतात. लासूर पासून चौगाव फक्त ३ कि. मी. अंतरावर आहे. चौगावातून साधारण ४ कि. मी. ची पायपीट केल्यानंतर आपण गडाशेजारच्या महादेव मंदिराजवळ येऊन पोहोचतो. गाव पार केल्यानंतर एका तलावाच्या काठाकाठाने या मंदिरापर्यंत येणारा मार्ग अगदी धोपट असल्यामुळे आपण कोठेही न चुकता सहजपणे मंदिरापर्यंत येऊन पोहोचतो. या ठिकाणी तीन ओढय़ांच्या प्रवाहांचा संगम झाल्यामुळे यास ‘त्रिवेणी संगम’ म्हणून ओळखले जाते. येथे काही वर्षांपूर्वी बांधलेले सुंदर असे प्रशस्त महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराभोवतीच्या जंगलात भरपूर सरपण व ओढय़ाला नेहमी थंडगार पाणी असल्यामुळे हे मंदिर दुर्गभटक्यांना पथाऱ्या पसरायला योग्य आहे. त्रिवेणी संगमावरील या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग व नंदी सभोवार असणारे खांब व त्यावर तोललेल्या कमानी जुन्या मंदिर परंपरेला साजेल अशाच आहेत. या मंदिराच्या सभोवार अनेक दगड – विटांचे चौथरे असून इतिहासकाळात या जागेस ‘बडा बाजार’ नावाने ओळखले जात असे.आपण मंदिर परिसर पाहून शेजारील ओढा पार करून मळलेल्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर आपण एका पठारावर येऊन पोहोचतो. येथे समोरच आपणास खुरटय़ा झाडी – झुडूपाने व्यापलेला चौकोनी आकाराचा चौगावचा किल्ला दिसतो. या किल्ल्याच्या आसपास अनेक छोटे – मोठे डोंगर असून त्यांना काली टेकडी, लेभागा डोंगर, बांदरा डोंगर व धाकला चिपाटय़ा डोंगर म्हणून ओळखले जाते. येथील पठारावरून दक्षिण बाजूच्या नाळेने जाणारा मार्ग आपणास गडासमीप घेऊन जातो. चौगावचा किल्ला जरी उंचीने थोडका असला तरी याचा अंतिम कातळटप्पा सभोवार २० फुटांचा ताशीव असाच आहे. त्रिवेणी संगम मंदिरापासून चालायला सुरुवात केल्यानंतर साधारण तासाभरात आपण गडाच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वाराच्या सामोरे येऊन पोहोचतो. सुबक घडीव अशा आयताकृती दगडात बांधलेले हे प्रवेशद्वार आजही उत्तम स्थितीत उभे असून त्याच्या माथ्याची कमान फारच सुंदर आहे.या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर चौगाव किल्ल्याचा झाडीभरला माथा आपणास दिसतो. गडप्रवेश केल्याकेल्या समोरच एक कोरडा तलाव असून तो पार करून आपण पुढे गेल्यावर डाव्या हातास ‘झेंडा बुरूज’ लागतो. या बुरूजा भोवतीची तटबंदी आजही उत्तम स्थितीत उभी असून येथेच आसपास भिंती शाबूत असलेली शिबंदीची घरटी आपणास दिसतात. ही घरटी पाहून पुढे गेल्यावर एका झाडाखाली कोरीव सुघड दगड एकत्र करून रचलेले दुर्गा देवीचे मंदिर पाहायला मिळते. या छोटय़ा मंदिरात देवीचा मूळ तांदळा व अलीकडे बसविलेल्या दुर्गेच्या दोन मूर्ती असून मंदिर परिसरात अनेक इतस्तत: पडलेले कोरीव दगड आपणास दिसतात. या दगडावरून येथील इतिहासकाळातील मंदिर काही और असणार याची आपणास थोडीफार कल्पना येते. या मंदिराच्या पुढेच थोडे खालच्या बाजूस झाडीभरल्या भागात कातळकोरीव टाक्यांचा समूह असून या टाक्यातील पाणी गडचढाईचा थकवा घालविणारे आहे. या टाकीसमूहाच्या मधोमध कातळभिंती असून त्यावरून आपण इकडे-तिकडे वावरू शकतो. या टाक्याला लागूनच चार कमानीयुक्त गुहालेणी आहेत. पण त्याही टाक्यातील पाण्याने भरून गेल्या असल्यामुळे ही लेणी बाहेरून डोकावूनच आपणास पाहावी लागतात. चौगाव किल्ल्यावरील टाक्यांच्या आसपास मोठ-मोठे वृक्ष असल्यामुळे त्यांच्या शीतल सावलीत आपण थंडगार पाण्याच्या सोबतीने घरून आणलेल्या शिदोरीचा आस्वाद घेऊ शकतो.गडावरील हा टाकीसमूह पाहून आपण एक चढ चढून उत्तरेकडील उंचवटय़ावर बांधलेल्या राजप्रसादाच्या इमारतीजवळ पोहोचायचे. येथील वाडय़ास या भागातील लोक ‘गवळी राजांचा राजप्रासाद’ म्हणून ओळखतात. चौगाव किल्ल्यावरील या वाडय़ाच्या सभोवती असलेल्या २०-२५ फूट उंचीच्या दगड व चुन्याच्या मदतीने बांधलेल्या भिंती आजही उत्तम स्थितीत उभ्या आहेत. विशेष करून या भिंतीच्या माथ्यावर दोन टप्प्यात केलेले विटांचे नक्षीकाम फारच सुंदर असून असे काम इतरत्र कोणत्याही किल्ल्यावर पाहायला मिळत नाही. त्यामुळे चौगाव किल्ल्यावरील हे राजप्रासादाचे विटांचे नक्षीकाम आपल्यासाठी संस्मरणीय ठरते. पूर्व बाजूने प्रवेशद्वार असलेल्या या वाडय़ाच्या आत गेल्यावर समोरच एक भिंत असून तिला वळसा मारून आत प्रवेश केल्यावर या वाडय़ाची भव्यता आपल्या नजरेत भरते. या वाडय़ाच्या आत सध्या मात्र सागवानाच्या झाडांची गर्दी झाल्यामुळे त्यांचा पालापाचोळा तुडवत आत आपणास फिरावे लागते. या वाडय़ाच्या आतील बाजूस अनेक दालने, देवळ्या व कोनाडे आजही आपले अस्तित्व टिकवून असून हा सर्व परिसर पाहिल्यानंतर गड नांदता असताना या राजप्रासादाचा डामडौल किती न्यारा असेल याचे चित्रच आपल्यासमोर उभे राहते.या वाडय़ासमोरील मोकळ्या जागेत सहा फूट लांबीच्या चार ऐतिहासिक तोफा १९७७ साली सापडल्या. सध्या त्या चोपडा तहसीलदार कचेरीच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत. या राजप्रासादाच्या पलीकडेच आणखीन एक छोटय़ा वाडय़ाचे अवशेष आहेत. याशिवाय गडाच्या या उत्तरेस थोडं खालच्या बाजूस गडाचे दुसरे प्रवेशद्वार असून त्याचा सर्व परिसर मात्र झाडीने झाकोळून गेला आहे. चौगाव किल्ल्याच्या पूर्व बाजूचा भूभाग मात्र कोणतेही ऐतिहासिक बांधकाम विरहित असून आपण थोडक्या वेळात या भागाची सहज चक्कर मारून गडाची दोन तासाभराची गडफेरी पूर्ण करून आल्यावाटेने दक्षिण दरवाज्यातून गड उतरायचा.चौगाव किल्ल्याच्या इतिहासावर नजर टाकल्यास या किल्ल्यावरील कातळकोरीव टाकी व त्यांच्या शेजारील लेणीसदृश गुहा पाहता या किल्ल्याची उभारणी प्राचीन काळात झाली असणार याची आपणास खात्री पटते. या किल्ल्यावरील राजप्रासादांना गवळीराजांचा प्रासाद म्हणून ओळखले जाते. जळगाव परिसरातील किल्ल्यांवर साधारणपणे राष्ट्रकूट यादव व त्यांचे मांडलिक निकुंभ यांची सत्ता होती. यावरून हाही गड याच राजसत्तेच्या ताब्यात असणार असे आपणास अनुमान काढता येते.असा हा चौगावचा किल्ला जळगाव जिल्ह्य़ातील आवर्जून पाहावा अशा किल्ल्यांपैकी एक असून दुर्गप्रेमीना थोडा लांबचा प्रवास करायला लागला तरी हरकत नाही, इतका हा किल्ला सुंदर आहे. तसेच जळगाव जिल्हा म्हणजे थोडा शुष्क, दुष्काळदृश, कमी झाडी असणारा भूभाग म्हणून ओळखला जात असला तरी चौगावचा किल्ला मात्र बऱ्यापैकी हिरवीगार झाडी – झुडूपे व बाराही महिने शिगोशिग थंडगार पाण्याने भरलेली टाकी आपल्या अंगाखांद्यावर बाळगून आहे.त्यामुळे याला भेट देणाऱ्या दुर्गप्रेमींना तो ‘वाळवंटातील ओअॅसिस’ प्रमाणे भासला नाही तरच नवल.
कन्हेरगड
किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग
किल्ल्याची उंची: ६६० मीटर
चढाई श्रेणी: मधम
जिल्हा: जळगाव
महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगांवपासून ४० किलोमीटर अंतरावर कन्हेरगड हा किल्ला आहे.इतिहासदुर्गाची उभारणी आठव्या शतकात झाली. येथे यादव सम्राट आणि त्यांच्या मांडलिकांचे राज्य होते. शके ११५०(इ.स.१२२८)मधील आषाढी अमावास्या व सूर्यग्रहण असलेल्या दिवशी पाटणादेवीचे मंदिर जनतेसाठी खुले केल्याचा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे. या मंदिराच्या परिसरात भारतीय गणितज्ञ भास्कराचार्यांनी शून्याची संकल्पना मांडली आणि गणितशास्त्राची खऱ्या अर्थाने प्रगती सुरू झाली.चाळीसगांव हे तालुक्याचे ठिकाण मध्य रेल्वेच्या मुंबई-नासिक रोड-भुसावळ मार्गावर मनमाडनंतर येते. चाळीसगांव बसस्थानकावरून दर तासाला पाटणादेवी या १८ कि.मी वरील पर्यटनस्थळासाठी एसटी असते. पहिली एस्टी सकाळी साडेसात वाजता. बसने पाटणादेवी स्थानकाच्या दीड किमी अलीकडे महादेव मंदिर या थांब्यावर उतरावे. डाव्या हाताच्या खडकाळ पायवाटेने दहा मिनिटात मंदिर येते. मंदिराच्या मागून मळवाटेने पंधरा मिनिटे चालल्यावर एक सिमेंटमध्ये बांधलेली मेघडंबरी येते. तेथून डाव्या हाताने जाणाऱ्या पायवाटेने कन्हेरगडचा डोंगर चढायला सुरुवात करावी. वाटेत दगडी पायऱ्याही लागतात. पुढे दहा मिनिटात पायवाट उजवीकडे वळते आणि आपण नागार्जुन गुफांपाशी पोचतो. उजवीकडे वळलो नसतो तर कड्याचा कोपरा लागला असता. त्या कोपऱ्यापाशी वळल्यावर पुढे उजवीकडे वळणाऱ्या वाटेवर शृंगारचौरी लेणी आणि डावीकडे वळणाऱ्या वाटेवरचा दगडी कातळ चढला की कन्हेरगडाची माची लागते. तिथून पुढे जात राहिले की गडाच्या माथ्यावर पोचता येते.पाहण्यासारखी ठिकाणेहेमाडपंती महादेव मंदिर: उंच चौथऱ्यावर काळ्या दगडांनी बांधलेल्या ह्या पूर्वेकडे तोंड असलेल्या सुंदर मंदिराच्या चारी बाजूने अनेक मूर्ती कोरल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाज्यावर गणेशपट्टी, आणि सप्तमातृका आहेत. मंदिराचा सभामंडप आणि तेथील एक शिलालेख पहाण्यासारखा आहे. हे मंदिर भारतीय पुरातत्त्वखात्याने संरक्षित म्हणून जाहीर केले आहे.मेघडंबरीनागार्जुन गुंफा(नागार्जुन कोठी): या गुंफा इसवी सनाच्या नवव्या शतकात कोरलेल्या आहेत. येथे तीन दालने, नक्षीकाम केलेले खांब, इंद्राची प्रतिमा, महावीराची एक व अन्य तीर्थंकरांच्या मूर्ती आणि त्यांच्यावर चवरी ढाळणाऱ्या सेवकाची एक मूर्ती आहे.सीतेची न्हाणी लेणी: लेण्यांची ओवरी १८ फूट रुंदीची असून दोन्ही बाजूला साधे खांब आहेत. येथे प्रभू रामचंद्र येऊन गेले होते असे लोक मानतात.शृंगारचौरी(शृंगारचावडी) लेणी: ही अकराव्या शतकातली हिंदू पद्धतीची लेणी आहेत. लेणी पाच खांबांवर उभी असून आत काही शृंगारिक चित्रे कोरलेली आहेत.गौताळा अभयारण्य, पाटणादेवीचे चंडिका मंदिर, जवळच असलेले भास्कराचार्य निसर्ग शिक्षण केंद्र व तिथला भास्करार्यांचा उल्लेख असलेला शिलालेख. मंदिराच्या पिछाडीस दोन तासांच्या चढाईवर पितळखोरे लेणी आहेत. या लेण्यांपासून वरच्या वर कन्नडमार्गे औरंगाबादला जाता येते.इतर सोयीपाटणादेवी मंदिराच्या परिसरात रहाण्यासाठी वनखात्याची कुटिरे आणि चहा-फराळासाठी खाद्यालये आहेत. सर्व लेणी, पुरातन मंदिरे आणि आसपासची एकूणएक ठिकाणे पहायची असतील तर पाटणादेवीला दोन दिवसांचा मुक्काम करावा लागतो.
पारोळा किल्ला
किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
जिल्हा: जळगाव
पारोळा किल्ला हा झाशीच्या राणीचा किल्ला असून झाशीच्या राणीचे हे माहेर आहे. शहराच्या सुरुवातीला झाशीच्या राणीचा व शिवाजी महाराजांचा सुदर् असा पुतळा आहे. शहराच्या जवळच विचखेडे नावाचे छोटेसे शहर आहे.सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात पारोळा भुईकोट बांधण्यात आला. हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात सुंदर व मोठा भुईकोट आहे. या भुईकोटला बाहेरच्या बाजूने जरी अतिक्रमणाचा विळखा पडला असला, तरी पुरातत्व खात्याने केलेल्या डागडूजीमुळे किल्ला सुस्थीतीत आहे. मुख्य किल्ला व बालेकिल्ला अशा दोन भागात असणार्या या किल्ल्यात भूईकोटची सर्व वैशिष्ट्ये पाहायला मिळतात.इतिहासइ.स. १७२७ मध्ये जहागिरदार हरी सदाशिव दामोदर याने हा किल्ला बांधला याची लांबी १५७.५ मीटर व रुंदी १३०.५ मीटर आहे.इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी या भागावर सत्ता प्रस्थापित केली, पण किल्ला जहागिरदारांच्या ताब्यात ठेवला. इ.स. १८२१ मध्ये पारोळ्यात इंग्रजाविरुध्द बंड झाले, त्यावेळी कॅप्टन ब्रिग्र याला ठार मारण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला होता. याचा ठपका लालभाऊ झाशीकर यांच्यावर ठेवून पारोळा किल्ला झाशीकर यांच्याकडून इंग्रजांनी हस्तगत केला.इ.स. १८५७ च्या उठावात झाशीच्या राणीला मदत केलेच्या आरोपावरुन इंग्रजांनी जहागिरदारांची सर्व संपत्ती जप्त केली.पहाण्याची ठिकाणेगडाच्या उत्तराभिमुख प्रवेशद्वाराने आपण गडात प्रवेश करतो. आत आल्यावर दोन्हीबाजूंना पहारेकर्यांसाठी देवड्या दिसतात; तर समोर १५ फूट उंच तटबंदी दिसते. इथून काटकोनात वळल्यावर गडाचे दुसरे प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच बालेकिल्ल्याचा भक्कम चौकोनी बुरुज त्यात असलेल्या खिडक्या, झरोके, जंग्या आपल्याला दिसतात. या बुरुजाखाली गणपतीचे मंदिर व विहीर आहे.प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने किल्ला पाहाण्यास सुरुवात करावी. डाव्या हाताला एकामागोमाग उभ्या असलेल्या पण पडझड झालेल्या कमानी दिसतात. एकेकाळी त्र्यांच्यावर फांजी बांधलेली असावी. या कमानीं जवळच एक चौकोनी विहीर आहे. कमानीकडून पुढे आल्यावर तटबंदीवर चढण्यासाठी जिना आहे. या पूर्वेकडील तटबंदीच्या बाजूस तलाव आहे. (पारोळाकरांनी या तलावाच्या सर्व बाजूंनी अतिक्रमण केल्यामुळे व तलावात केरकचरा टाकल्यामुळे त्याची शोभा गेली आहे) या तलावात उतरण्यासाठी तटबंदीखाली दोन ठिकाणी चोर दरवाजे आहेत. तसेच दरवाजे तलावाच्या विरुध्द बाजूस पारोळा गावात आहेत. पूर्वेच्या तटबंदी समोर महादेवाचे छोटे मंदिर आहे. या मंदिराजवळ भूयार असून ते ८ कि. मी. वरील नागेश्वर मंदीरात उघडते असा स्थानिकांचा दावा आहे. मंदिराच्या पुढे किल्लेदाराच्या दुमजली वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या मागे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला एक विहीर आहे.बालेकिल्ल्याला चार बाजूला चार गोलाकार २५ फूटी भव्य बुरुज आहेत. या बुरुजांच्या मध्ये चार चौकानी बुरुज आहेत बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे पश्चिमेला असलेल्या चोर दरवाजाने बालेकिल्ल्यावर प्रवेश करावा लागतो. बालेकिल्ल्यावर दक्षिणेकडील तटबंदीला लागुन ३ घरांचे अवशेष दिसतात. त्या किल्ल्यावरील कचेर्या असाव्यात. बालेकिल्ल्यात असलेल्या दोन विहीरीतील पाणी हौदात ओतून ते या कचेर्यांपर्यंत खेळवण्यात आले होते, ते चर आजही पाहायला मिळतात. या कचेर्यांच्या समोर सुशोभित केलेला हौद व कारंजे होते, त्र्यांचे अवशेष पहायला मिळतात. कचेर्यांच्या भिंतीत जंग्र्यांची रचना केलेली आहे. कचेर्यांच्या बाजूला असलेल्या पूर्वेकडील बुरुजात दारुकोठार आहे. या कोठारालाही सर्व बाजूंनी जंग्या आहेत.गडाच्या तटबंदीला फिरण्यासाठी फांजी आहे व तटबंदीत जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे. तटबंदी भोवती दगडांनी बांधलेला १० फूट x १० फूट खंदक आहे. पूर्वेकडील बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. पूर्वीच्याकाळी प्रवेशद्वारासमोर उचलता येणारा लाकडी पूल होता.
पोहोचण्याच्या वाटा: पारोळा हे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर रस्त्याने देशाशी जोडलेल आहे. पारोळा जरी जळगाव जिल्ह्यात असले तरी ते धुळे शहरापासून जवळ आहे. धुळे – जळगाव रस्त्यावर धुळ्यापासून पारोळा ३५ किमीवर आहे. अंमळनेर पासून पारोळा २२ किमीवर आहे. पारोळा गावातील बाजारात दुकानांच्या रांगेमध्ये किल्ल्याचे प्रवेशव्दार आहे.
राहाण्याची सोय: गडावर राहण्याची सोय नाही, पारोळा गावात होऊ शकते.
जेवणाची सोय: जेवणाची सोय नाही, पारोळा गावात होऊ शकते.
पाण्याची सोय: गडावर पाण्याची सोय नाही.सूचनाधुळ्याहून – अंमळनेर – (२१ किमी) पारोळा – (८ किमी) बहादरपूर हे किल्ले एका दिवसात पाहाता येतात.
अंमळनेरचा किल्ला
प्रकार: भुईकोट
चढाईची श्रेणी: सोपी
जवळचे गाव: अंमळनेर, पारोळा, जळगाव
अंमळनेर हे बोरी नदीकाठी वसलेले जळगाव जिल्ह्यातील मोठे शहर आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी नगरदूर्ग होता; म्हणजे शहराला तटबंदी व बुरुज बांधून संरक्षित केलेले होते. या शहराच्या एकाबाजूस बोरी नदीचे पात्र असल्यामुळे नैसर्गिक संरक्षण होते. ते भक्कम करण्यासाठी नदीच्या बाजूस ही तटबंदी व बुरुज बांधण्यात आले होते. शहराच्या उरलेल्या तीन बाजूस ३ दरवाजे व २० फुटी तटबंदी होती.इतिहासअंमळनेर हा नगरदूर्ग कोणी व कधी बांधला याचा इतिहास उपलब्ध नाही. इस १८१८ मध्ये हा किल्ला पेशव्यांचा प्रतिनिधी माधवराव यांच्या ताब्यात होता. पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे माधवरावाने किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात देण्याचे ठरविले, पण किल्ल्याचा जमादार अली व त्याच्या हाताखालची अरब फलटण यांनी या गोष्टीला विरोध केला. ब्रिटीश कर्नल हस्कीन्सन मालेगावहून भिल्ल बटालीयन घेऊन अंमळनेरवर चालून आला. त्याने नदीच्या पूर्वेकडून किल्ल्यांवर तोफांचा मारा केला. अली जमादार व त्याच्या सैन्याने प्रयन्तांची शर्त केली. पण ब्रिटीशांनी चारही बाजूंनी त्यांची कोंडी केली होती. दक्षिणेकडील बहादरपूर किल्ल्यावरुन येणारी रसद (व दारुगोळा) ब्रिटीशांनी तो ताब्यात घेतल्यामुळे बंद झाली त्यामुळे अली जमादार व त्याच्या सैन्याने नदीच्या पात्रातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयन्त केला, पण ते सर्वजण इंग्रजांचे कैदी बनले.
पहाण्याची ठिकाणे: अंमळनेर हा नगरदूर्ग होता. आता या शहराची वाढ झाल्यामुळे मुळच्या किल्ल्यावर त्याने अतिक्रमण केले आहे. अंमळनेर शहरातच किल्ल्याचा २० फूट उंच बुलंद दरवाजा व त्याबाजूचे भक्कम बुरुज उभे आहेत. या दरवाजाखालून जाणारा रस्ता बोरी नदी काठावरील संत सखाराम महाराजांच्या समाधी मंदीराकडे जातो. या बाजूने बोरी नदीच्या पात्रात उतरल्यावर किल्ल्याची तटबंदी व त्यावर स्थानिकांनी चढवलेली घरे दृष्टीस पडतात. उजव्या हाताला एक बुरुज दिसतो. नदीवरुन प्रवेशद्वाराकडे परत येताना रस्त्यात देशमुखांचे लाकडी नक्षीकाम असलेले सुंदर दुमजली घर आहे.
पोहोचण्याच्या वाटा: अंमळनेर हे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर रस्त्याने व रेल्वेमार्गाने देशाशी जोडलेल आहे.
बहादरपूर किल्ला
उंची: ५० फूट
प्रकार: भुईकोट
चढाईची श्रेणी: अत्यंत सोपी
जवळचे गाव अमळनेर,पारोळा,जळगाव
बहादरपूर किल्ला जळगाव जिल्ह्यातील पारोळा व अंमळनेर या शहरांच्या मध्ये बोरी नदीच्या काठावर बहादरपूर किल्ला उभा आहे. १५व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याचे अंदाजे ४० फूट उंच बुलंद व बलाढ्य बुरुज आजही काळाशी झुंज देत उभे आहेत. इतके बुलंद व सुंदर बुरुज फारच कमी ठिकाणी पाहायला मिळतात. पण स्थानिक लोकांच्या अनास्थेमुळे किल्ल्याची अवस्था दिवसेंदिवस फारच वाइट होत आहे.
इतिहास: इ.स. १५९६ मध्ये बहादुरखान सूरी याने हा किल्ला बांधला. इ.स. १७५१ मध्ये नानासाहेब पेशवे व गायकवाड यांच्यात बहादरपूर येथे बोरी नदीच्या तीरावर लढाइ झाली. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला पेशव्यांकडून जिंकून घेतला.
पहाण्याची ठिकाणे : गडाला बोरी नदीच्या बाजूने दोन भक्कम बुरुज व तटबंदी आहे. त्यातील एक बुरुज अंदाजे ४० फूट उंच आहे. नदीच्या पात्रापासून तटबंदीची उंची २० फुट आहे. दुसर्या बुरुजाचा तटबंदी पर्यंतचा भाग शाबुत आहे. या बुरुजाजवळ एक कबर आहे. किल्ल्यावरील फारशी/अरबीतील शिलालेख ग्रामपंचायतीत आहे. गडाचा गावाच्या बाजूला असलेला भाग अतिक्रमणामुळे उध्वस्त झालेला आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
१) बहादरपूर, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात येते. पारोळ्या पासून बहादूरपूर ८ किमी अंतरावर आहे. पारोळा अंमळनेर रस्त्यावर बहादरपूर फाटा आहे.
२) धुळे – जळगाव रस्त्यावर मोंढाणे गावाजवळ बहादरपूरला जाणारा फाटा आहे. तेथून बहादरपूर १० किमी अंतरावर आहे.
राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही. आपण स्वत:च करावी.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)