कोणतही शिवकाव्य येथे शोधा

भंडारा जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भंडारा जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सहानगड / सांगडी किल्ला

sangadi
भंडारा जिल्ह्यातील साकोली हे तालुक्याचे ठिकाण असून ते पुरातन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याला सहानगड हे उपनाव आहे, स्थानिक बोली भाषेत सां म्हणजे लहान आणि गडी म्हणजे किल्ला या शब्दफोडीने सांगडी हे किल्ल्याचे नाव पडले.
वैनगंगेच्या काठावर असलेले हे ठिकाण बौध्द धर्मीयांचे महत्त्वाचे क्षेत्र आहे. तिथे बौध्दकाळातील स्तूप आहे. कर्हाडा आणि बालसमुद्र या नावाचे दोन तलावही आहेत. सिंधपुरी बौद्धविहार हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. येथील सांगडी किल्ला, चांदपूरचा तलावही प्रसिद्ध आहेत.
सांगडी गावात प्रसिद्ध पुरातन मंदिरे आहेत त्यात २१ हनुमान मंदिरे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर आणि रामदास स्वामींचा मठ पाहण्यासारखा आहे.
माहिती साभार: रोशन शहारे आणि सुरज खेडकर.

चांदपूर किल्ला


भंडारा जिल्ह्याचे अस्तित्व ११व्या शतकातदेखील होते याची नोंद रतनपूर (जि. बिलासपूर) येथील उत्खननात सापडलेल्या शिलालेखावरती आहे. महानुभव पंथाच्या लीलाचरित्र या पवित्र अशा ग्रंथात भंडारा जिल्ह्याचा संदर्भ अनेकदा आलेला आढळतो. उत्तम निसर्गसंपदा लाभलेला हा जिल्हा १७४३ पर्यंत गवळी राजवटीखाली होता. गवळी राजवटीत बांधलेला किल्ला भंडारा शहरातच आहे. त्याकाळी बांधलेला खांब तलाव आजही टिकून आहे. भंडारा जिल्हा अधिकृतरीत्या १८२१ मध्ये अस्तित्वात आल्याची नोंद इतिहासात आढळते. त्यानंतर १८५३ पर्यंत येथे मराठेशाही होती.
मराठेशाहीच्या वारसदारा-अभावी भंडारा जिल्हा १८५३ मध्ये इंग्रजांच्या हाती गेला. पूर्व महाराष्ट्रातील (विदर्भातील) या जिल्ह्याचे १९९९ मध्ये विभाजन करण्यात आले व नवा गोंदिया जिल्हा निर्माण करण्यात आला.

अंबागड


विदर्भाच्या उत्तरसीमेवर सातपुड्याच्या पर्वतरांगा पुर्वपश्चिम अशा पसरलेल्या आहेत. या रांगांच्या दक्षिणेकडे विदर्भातील एक जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्यातून जाणार्या सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडील टेकड्या या गायमुखच्या टेकड्या अथवा अंबागडाच्या टेकड्या म्हणून ओळखल्या जातात. या टेकड्यामध्ये बलदंड असा अंबागड नावाचा वनदुर्ग आहे. अंबागडाचा वनदुर्ग हा भंडारा जिल्ह्यामधील तुमसर तालुक्यात आहे. अंबागडाच्या पायथ्यापासून गायमुख हे स्थळ जवळ आहे. गायमुखचे देवस्थान हे भंडार्यात प्रसिद्ध असून अनेक भावीकांचा राबता या परिसरामध्ये असतो. भंडारा हे जिल्ह्याचे ठिकाण असून ते मुंबई-कोलकता या राष्ट्रीय महामार्गावर आहे. तसेच भंडारा हे रेल्वेमार्गानेही जोडले गेले आहे. भंडार्याहून अंबागडाला जाणे सोयीचे आहे. हा मार्ग तुमसरमधून जातो. तुमसरच्या पुढे गोबरवाहीकडे निघाल्यावर मिटेवानीकडून अंबागडाकडे जाता येते. अंबागडाकडे येण्यासाठी अजून एक मार्ग आहे. नागपूरकडून रामटेक, कांद्री, गायमुख मार्गेही अंबागडाचा पायथा गाठता येतो.
अंबागडाच्या पुर्व पायथ्याला हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिराचे नव्यानेच नुतनीकरण करण्यात आले आहे. मंदिराजवळूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे. गडावर जाणारा हा मार्ग गडाच्या पुर्वेकडून असून या संपुर्ण मार्गावरील पायर्या नव्यानेच बांधून काढलेल्या आहेत. या पायर्यांच्या मार्गाने वीस-पंचवीस मिनिटांत आपण गडाच्या महादरवाजाजवळ पोहोचतो. दोन बलदंड बुरुजांमध्ये दरवाजा लपवलेला असून तो उत्तराभिमुख आहे. यातील डावीकडील बुरुज ढासळत चाललेला दिसतो. दरवाजातून आत आल्यावर पहारेकर्यांच्या रहाण्याच्या खोल्या दिसतात. याच्या आतल्या बाजूने दरवाजाच्या वर जाण्याचा मार्ग आहे. वरच्या बाजूला एक मनोरा आहे. येथून किल्ल्याच्या परिसरातील दृष्य दिसते.
किल्ल्याची तटबंदी अनेक ठिकाणी ढासळलेली असल्यामुळे तटबंदीवरून फेरी मारता येत नाही. तटबंदीमध्ये असलेल्या बुरुजावर तोफा ठेवण्याचे उंचवटे आहेत. काही उंचवटे चांगल्या स्थितीमध्ये आहेत. गडाचा आकार लंबगोलाकृती असून आटोपशीर आहे. मधल्या पठारावर तीन-चार मजली बांधकाम केलेले आहे. ते जागोजाग ढासळलेले आहे. या ढासळलेल्या बांधकामामध्ये राजनिवास तसेच अधिकारी यांची निवास व्यवस्था असल्याचे दिसते. किल्ल्याची रुंदी कमी असल्यामुळे उत्तरेकडे असलेल्या तटबंदीवरच बांधकाम केलेले असून त्याला जंग्या जागोजाग केलेल्या दिसतात. या महालाच्या बांधकामामध्ये अनेक ठिकाणी संरक्षणासाठी केलेली व्यवस्था आढळते. या बांधकामामध्ये एक तळघरही आहे. त्यात उतरण्यासाठी काही पायर्या असून या जागेला अंधार कोठडी असे म्हणतात. येथून पुढे चालत गेल्यावर आपण पश्चिम टोकावर पोहोचतो. गडावर झाडी झाडोर्याचे मोठे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे अनेक वास्तू ढासळलेल्या दिसतात.
गडाला पुर्ण फेरी मारण्यासाठी आपल्याला तास दीडतासाचा अवधी पुरतो. या फेरीमध्ये घोड्याची पागा, अंबरखाना पाण्याचे टाके, भुलभुलैया सारखे निवासातील रस्ते पहाता येतात. गौंड राजवटीतील अनेक वैशिष्ठे या किल्ल्यामध्ये दिसतात. गौंड राजांनी बांधलेला अंबागड पुढे नागपूरकर भोसल्यांच्या ताब्यात आला. पुढे तो इंग्रजांनी ताब्यात घेतला. संरक्षण सिद्धतेबरोबर या किल्ल्याचा वापर नामांकित कैदी ठेवण्यासाठी झाल्याचे दिसून येते. गडावरील बांधकामाची दुरुस्ती व देखभाल योग्यरितीने केल्यास तसेच माहीतीचे फलक जागेजाग लावल्यास पर्यटकांना निश्चित उपयुक्त ठरेल. काही माफक सुविधा उपलब्ध झाल्यास अंबागडाचा गोडवा चिरकाल स्मरणात राहील यात शंका नाही.ambagad

पवनी किल्ला


भंडारा जिल्ह्यात पवनी तालुका असलेला पवनीचा प्रसिद्ध किल्ला, भंडाऱ्या पासून ४७ आणि नागपूर पासून ८२ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या तीन बाजूनी टेकड्या आणि एका बाजूने वैनगंगा नदी वाहते. गावात शिरतानाच आपले स्वागत करतो तो पवन राजाचा किल्ला. त्यावरूनच पवनी हे गावाचं नाव पडलं आहे. गावात जाणारा मुख्य रस्ता ह्या किल्ल्याच्या दरवाजातूनच जातो. हा किल्ला अजूनही बराच सुस्थितीत आहे. किल्ल्याची एक भिंत आणि तिच्या पायथ्याशी असलेला तलाव गावात प्रवेश करतानाच लक्ष वेधून घेतात.
ऐतिहासिक
पवनी हे हीनयान पंथाचे आराधना केंद्र होते. अशोकाच्या काळात ते वैभवशाली बनले. सम्राट अशोकाचे येथे काही काळ वास्तव्य होते. त्याने मुलगी संघमित्रा हिला येथूनच श्रीलंकेला पाठवले, असे इतिहास सांगतो. दुसऱ्या उत्खननात इ.स. पूर्व पहिल्या शतकातला क्षत्रपकुमार रूपीअम्माचा स्तंभलेख (सध्या नागपूरच्या वस्तुसंग्रहालयात आहे.) आढळला. रूपीअम्मा हा कुषाणाचा क्षत्रप होता. त्याला सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णीने पराभूत केले. या विजयानंतर त्याने नाशिक येथील गुहालेखात ‘वेनाटक स्वामी’ असे स्वत:ला संबोधले आहे. १९९४ मध्ये भारतीय पुराणवस्तू संशोधन विभागाचे डॉ. अमरेंद्रनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन झाले. यात इ.स.पूर्व १५०० पर्यंतचा इतिहास उपलब्ध करणारे सोन्याचे अलंकार, तांब्याची भांडी, पायऱ्यांच्या विहिरी, केशविन्यास करणारी महिलेची मूर्ती, अरब देशाशी व्यापार झाल्याचे स्पष्ट करणाऱ्या वस्तू आढळल्या. डॉ. मिराशी यांना हरदोला टेकडीच्या पश्चिमेस उत्खननात राजा भगदत्त यांचा शिलालेख मिळाला. उत्खनन काळात या प्रतिनिधीने डॉ. अमरेंद्रनाथ यांची भेट घेतली असताना ते म्हणाले होते, ‘इतका प्राचीन, सुरक्षित, अभंग किल्ला महाराष्ट्रात नाही.’ उत्खननात मिळालेले ‘अरेबियन पत्थर’ पवनीचा समुद्रमार्गाने अरब देशांशी व्यापार तर, हाडांपासून बनवलेल्या सुया, २३०० वर्षांपूर्वी वीणकामात हे क्षेत्र अग्रणी होते, हे दर्शवतात. पवनीचा ऐतिहासिक वारसा जपायचा असेल तर नवीन बांधकाम पवनी किल्ल्याच्या बाहेर करावे असेही त्यांनी सुचवले होते.
पवनीवर मौर्य, शुंग, सातवाहन, सिथियन, पुन्हा सातवाहन, वाकाटक, मुसलमान धर्मीय, गोंड राजे, भोसले आणि अखेर इंग्रजांनी राज्य केले. या काळातच यादवांचे राज्य इ.स. १३१८ मध्ये लयाला गेल्यावर देवगढच्या गवळी राजांनी सत्ता प्रस्थापित केली. यानंतर चांद्याच्या गोंड राजांनी हा प्रदेश जिंकला. इ.स. १७३९ मध्ये नागपूरच्या रघुजी भोसल्यांनी पवनीचा प्रदेश वलीशाह या गोंड राजाचा पराभव करून जिंकला. त्यांनी तुळजोरामपंत या सरदाराला पवनीत बंदोबस्ताकरिता ठेवले. त्यांचे वंशज तुळाणकर पवनीत आजही आहेत. वयोवृद्ध वामन नागोराव तुळाणकर म्हणाले, ‘आज पवनी गाव अनेक दृष्टीने शापित दिसत असले तरी ईश्वराचा त्याच्यावर वरदहस्त आहे.’ राजवटी बदलत गेल्या तरी पवनीत आर्थिक सुबत्ता होती. इ.स. १८१८ च्या काळात पेंढाऱ्यांनी पवनीवर तीन आक्रमणे केली. दोनदा पवनीकरांनी पराभव स्वीकारला. तिसऱ्यांदा मात्र एकजूट करून लोकांनी पेंढाऱ्यांना पिटाळून लावले. पुढे २५ सप्टेंबर १८१८ ला मेजर विल्सन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश फौजांनी भोसल्यांचा पाडाव करून पवनी हस्तगत केली. भंडारा जिल्ह्य़ात पवनी मोठे गाव असल्यामुळे १८६७ मध्ये पवनीला जिल्ह्य़ात नगरपालिकेचा पहिला मान मिळाला. १८६० च्या जनगणनेनुसार पवनीची लोकसंख्या ६० हजार होती. आज ती सुमारे ३० हजार आहे. लोकसंख्या इतरत्र वाढत असताना ती कमी होणारे पवनी हे अपवादात्मक शहर म्हणता येईल.pavani