कोणतही शिवकाव्य येथे शोधा

औरंगाबाद जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
औरंगाबाद जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

वेताळवाडी गड / वसईचा किल्ला


किल्ल्याची ऊंची: १९०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा
श्रेणी: मध्यम
जिल्हा: औरंगाबाद
तालुका: सोयगाव
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात वेताळगड उर्फ वसईचा किल्ला या नावाचा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शाबूत आहेत. त्यामुळे हा किल्ला पहातांना एक परीपुर्ण किल्ला पाहील्याचे समाधान मिळते. वेताळगड जवळच्या डोंगरात असलेली रुद्रेश्वर लेणीही पहाण्यासारखी आहेत.
पहाण्याची ठिकाणे: वेताळगड किल्ल्याच्या एका बाजूला हळदा घाट रस्ता झाल्यामुळे या मार्गाने आपण जवळ जवळ किल्ल्याच्या प्रवेशव्दारात पोहोचतो. प्रथम दोन भव्य बुरुज आपले स्वागत करतात. त्यांच्या मागे या या दोन बुरुजां पेक्षा उंच व भव्य बुरुज आहे. त्याला नक्षीदार सज्जा आहे. दरवाजा पर्यंत पोहोचलेल्या शत्रूवर थेट हल्ला करण्यासाठी या बुरुजाची रचना केलेली आहे. दोन बुरुजांमधून फरसबंदी केलेली वाट काटकोनात वळून उत्तराभिमुख प्रवेशव्दाराकडे जाते. या प्रवेशव्दाराचे तोंड जंजाळा किल्ल्याकडे असल्यामुळे याला “जंजाळा दरवाजा” म्हणत असावेत. दरवाजाची उंची २० फूट असून त्याच्या दोन बाजूस शरभ शिल्प कोरलेली आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. दरवाजाच्या वर जाण्यासाठी जीना आहे. या जीन्याने वर गेल्यावर दरवाजाच्या छतावर एक चौकोनी खाच केलेली आहे. त्यातून उतरणारा जीना आपल्याला एका मोठ्या खोलीत घेऊन जातो. दरवाजावर उभे राहील्यावर आपल्याला लांबवर पसरलेली तटबंदी, त्या खालचा हळदा घाट व सर्वात खाली वेताळवाडी धरण पहायला मिळते. तर वरच्या बाजूला बालेकिल्ल्याची तटबंदी पहायला मिळते.प्रवेशव्दारावरून खाली उतरून उजव्या बाजूला थोडेसे वर चढल्यावर एक कोरडे खांब टाके लागते. ते पाहून पुन्हा दरवाजापाशी येऊन तटबंदी उजव्या हाताला ठेऊन चालू लागल्यावर उजव्या बाजूस भव्य बुरुजात जाण्याचा प्रवेश मार्ग दिसतो. पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वटवाघळे असल्यामुळे आत शिरता येत नाही. थोड पुढे गेल्यावर आपण तटबंदीतील पूर्व टोकाच्या बुरुजापाशी पोहोचतो. येथून दरी उजव्या हाताला ठेऊन चढत गेल्यावर आपण ५ मिनिटात बालेकिल्ल्यावर पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या पूर्व बुरुजाजवळ एक छोटी घुमट असलेली इमारत आहे. या इमारतीच्या छ्ताला एक झरोका आहे. येथून तटबंदीवर चढून मधल्या बुरुजापर्यंत चालत जावे. मधल्या बुरुजावरून खाली उतरून सरळ चालत गेल्यावर आपल्याला जमिनीत बांधलेले तेल तुपाचे टाक पहायला मिळत. या टाक्याच्या बाजूला धान्य कोठाराची इमारत आहे. या इमारतीच्या समोर एक भग्न इमारत आहे. पुढे गेल्याव्रर नमाजगीर नावाची इमारत (मस्जिद) आहे. त्याच्या भिंतीवर निजामाचे चिन्ह व त्याखाली क्रॉस कोरलेला आहे. नमाजगीरच्या उजव्या बाजूला कोरीव दगड बसवलेली कबर आहे. नमाजगीरच्या समोर तलाव आहे.किल्ल्याच्या उत्तर टोकावर बारदरी नावाची २ कमान असलेली इमारत दुरुन नजरेत भरते. या इमारतीकडे जातांना डाव्या बाजूला एक इमारत आहे. बारादरी ही किल्ल्याच्या उत्तर टोकाला आहे. या इमारतीत २ कमानींच्या दोन रांगा आहेत. राजघराण्यातील लोकांना उन्हाळ्यात हवा खाण्यासाठी अशी इमारत देवगिरी किल्ल्यावरही बांधलेली आहे. बारादरीतून खालच्या बाजूस किल्ल्याचा मुख्य दरवाजा व त्याखालील वेताळवाडी गाव दिसते.किल्ल्याच्या मुख्या दरवाजाकडे जाण्यासाठी बारादरी पासून थोडे मागे येऊन खाली उतरावे पुढे ही वाट बारादरी खालून उतरत खाली जाते. येथे एक बुजलेले टाके आहे. त्याच्या बाजूला ६ फूट १० इंच लांबीची तोफ पडलेली आहे. उजव्या बाजूच्या तटबंदीत चोर दरवाजा आहे. दोन बुरुजात बसवलेले किल्लाचे मुख्य प्रवेशव्दार उत्तराभिमुख आहे. प्रवेशव्दार २० फूट उंच असून त्याच्या दोनही बाजूला शरभ शिल्प कोरलेली आहेत. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. दुसरे प्रवेशव्दार पश्चिमाभिमुख आहे. हे प्रवेशव्दार पाहीले की आपली गड फेरी पूर्ण होते. येथून २० मिनिटात आपण वेताळवाडी गावात पोहोचतो.
रुद्रेश्वर लेणी: वेताळवाडीच्या पूर्वेला असलेल्या डोंगरात रुद्रेश्वर लेणी आहेत. ही हिंदू (ब्राम्हणी) लेणी असून यात नरसिंह, गणेश, भैरव व सप्तमातृका यांची शिल्पे आहेत. याशिवाय लेण्यात शिवलिंग व नंदी आहे. वेताळवाडीतून रुद्रेश्वर लेण्यांपर्यंत जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
पोहोचण्याच्या वाटा: स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून २ मार्गांनी जंजाळा गडावर जाता येते.औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडच्या पुढे १४ किमीवर गोळेगाव आहे. गोळेगावच्या अलिकडे डाव्याबाजूस उंडणगावाकडे जाणारा फाटा फूटतो. येथून उंडणगाव ५ किमीवर आहे. उंडणगावहुन १२ किमीवर हळदा गाव आहे. हळदा गावापुढे घाट सुरु होतो. या घाटातच हळद्यापासून ३ किमी अंतरावर वेताळवाडी किल्ला आहे. घाट चढल्या पासूनच वेताळवाडी किल्ला दिसू लागतो. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ न उतरता किल्लासुरु होतो तेथे उतरावे. इथून पायवाट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाते.औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव ते वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावातून किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.स्वत:चे वहान नसल्यास / गडा खालील जरंडी व वेताळवाडी गावातून पायी गड चढण्यासाठी औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे. सोयगाव – वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.
राहाण्याची सोय: गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय: जेवणाची सोय गडावर नाही, सोयगावातील हॉटेलांत होऊ शकते.
पाण्याची सोय: गडावर पिण्यायोग्य पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ:वेताळवाडी गावातून गडावर जाण्यासाठी ४५ मिनीटे तर हळदा घाट रस्त्यावरून गडावर जाण्यासाठी १० मिनीटे लागतात.सूचनास्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून पहाटे निघून जंजाळा किल्ला , घटोत्कच लेणी, वेताळगड व रुद्रेश्वर लेणी एका दिवसात पहाता येतात.vetalwadi

जंजाळा / वैशागड / तलतमचा किल्ला


किल्ल्याची ऊंची: ३००० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा
श्रेणी: मध्यम
जिल्हा: औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात वैशागड उर्फ जंजाळा उर्फ तलतमचा किल्ला या नावाचा विस्ताराने प्रचंड असलेला किल्ला आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे जंजाळा गावाच्या दिशेने हा भूदुर्ग आहे तर इतर तीन बाजूने हा किल्ला डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याचा विस्तार त्यावरील अवशेष, ३ तलाव पहाता या किल्ल्यावर पूर्वी मोठ्या प्रमाणात वस्ती असावी. या किल्ल्या जवळील डोंगरात असलेले घटोत्कच लेण आहे. त्यावरून या भागाचे ऎतिहासिक महत्व सिध्द होते.
इतिहास: घटोत्कच लेण्यातील शिलालेखात अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. वाकटाक नरेशाचा मंत्री वराहदेव याने ही लेणी इ.सनाच्या ५ व्या शतकात खोदवली अशी माहिती दिलेली आहे. जंजाळा गावाचे पूरातन नाव जिंजाला होते.इ.स.१५५३ मध्ये अहमदनगरच्या बुर्हान निजामशहाने हा गड जिंकून घेतला. त्यानंतर इ.स.१६३१ मध्ये शहाजहानने हा किल्ला जिंकला.पहाण्याची ठिकाणेजंजाळा किल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. त्यापैकी एक वाट जरंडी या किल्ल्याच्या पायथ्याकडून गडाच्या पश्चिमेकडील प्रवेशव्दारातून गडावर येते. दुसरी वाट वेताळवाडी धरणा जवळून गडाच्या वेताळगड प्रवेशव्दारातून गडावर येते. तिसरी वाट जंजाळा गावातून बैलगाडीच्या रस्त्याने गडावर येते. खाली जी माहिती दिली आहे ती, जंजाळा गावाच्या बाजूने गडावर जातांना दिसणार्या अवशेषांची आहे.जंजाळा गावातून बैलगाडीच्या रस्त्याने अर्ध्या तासात गडाच्या दक्षिणेकडील तटबंदीपाशी पोहोचतो. सध्या तटबंदी फोडून किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. तटबंदीच्या बाहेर शेतात ८ फूटी तोफ पडलेली आहे. ती पाहून गडात प्रवेश करावा. गडाची तटबंदी आजही शाबूत आहे. उजव्या बाजूला (पूर्वेकडे) तटबंदीत एक छोटा (चोर) दरवाजा दिसतो. या दरवाजातून दूरवर वेताळवाडी किल्ला व धरण दिसत. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला पूर्वाभिमुख दरवाजा आहे. दरवाजा २० फूट उंच असून त्याची कमान शाबूत आहे. दरवाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. देवड्यांपासून ते दरवाजाच्या बाहेरपर्यंत फरसबंदी केलेली आहे. दरवाजाच्या बाहेर काही कोरीव काम , नक्षीकाम केलेले दगड पडलेले आहेत. हा दरवाजा पाहून पुन्हा मुळ पायवाटेवर येऊन थोडे पुढे गेल्यावर एक बांधीव तलाव पहायला मिळतो. आज तलावाचा बंधारा अनेक ठिकाणी कोसळल्यामुळे त्यात पाणी कमी प्रमाणात साठते. तलाव ओलांडून पुढे गेल्यावर डाव्या बाजूस उत्तरांभिमुख जरंडी दरवाजा आहे. गडाच्या पश्चिमेकडील जरंडी या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावातून येणारी वाट या प्रवेशव्दारातून गडावर येते.या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला दोन ओळींचे दोन फारसी लिपितील शिलालेख कोरलेले आहेत.जरंडी दरवाजा पाहून पुढे गेल्यावर एक कमान दिसते. या कमानी भोवती पूर्वी तटबंदी होती. या तटबंदीच्या आत महत्वाच्या / खाशांच्या इमारती होत्या. या कमानीच्या बाजूने पुढे गेल्यावर दोन बुरुज दिसतात. यापैकी पहिल्या बुरुजाच्या खाली अनेक दगड विखरून पडलेले आहेत. त्यात शरभाच शिल्प कोरलेला दगड दोन भागात तुटलेला पहायला मिळतो. दगडाच्या एका तुकड्यावर शरभाच डोक व धड कोरलेले असून पाय व नख्या दुसर्या तुकड्यावर कोरलेले दिसतात. या शरभ शिल्पाच्या पूर्वेला (पायवाटेच्या उजव्या बाजूस) दुसरे शरभ शिल्प पडलेले दिसते. दोन बुरुजांच्या मध्ये सय्यद -अल -कबीर काद्री या पीराची कबर आहे. त्या कबरी समोर तीन ओळींचे दोन फारसी लिपितील शिलालेख कोरलेले दगड ठेवलेले आहेत. या दर्ग्या मागे तलाव असून त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.दर्गा पाहून झाल्यावर त्याला वळसा घालून डावीकडे जावे. ही पायवाट दर्ग्या मागिल इमारतींकडे जाते. प्रथम एक मोठी खिडकी व घुमट असलेली इमारत दिसते. त्याच्या बाजूला असलेल्या बुरुजावर शरभाच शिल्प कोरलेल आहे. खिडकीतून वास्तूत प्रवेश करून उजव्या बाजूस काही अंतर दाट झाडीतून (गचपणातून) चालत गेल्यावर अनेक कमानी असलेला राणी महाल पहायला मिळतो. त्याच्या समोर ४ इमारतींचे अवशेष दिसतात. राणी महालाच्या पुढे एका उंचवट्यावर तीन कमानींची मस्जिद आहे. मस्जिदी समोर एकापुढे एक असलेले दोन तलाव पहायला मिळतात.मस्जिदीच्या उंचवट्यावरून खाली उतरून तलावाला वळसा घालून पूर्वेकडे चालत गेल्यावर ५ मिनिटात आपण पूर्वाभिमुख वेताळवाडीगड दरवाजापाशी पोहोचतो. दरवाजा २० फूट उंच असून त्याची कमान उध्वस्त झालेली आहे. दरवाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. देवड्यांपासून ते दरवाजाच्या बाहेरपर्यंत फरसबंदी केलेली आहे. दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस कोरीव काम , केलेले आहे. या दरवाजातून उतरणारी वाट वेताळवाडी धरणा जवळून वेताळवाडी गावात जाते. या दरवाच्या बाहेरून जंजाळा किल्ल्याच्या उत्तरेकडील माचीला असलेली लांबलचक तटबंदी दिसते. तसेच या तटबंदीत असलेला चोर दरवाजाही पहायला मिळतो. येथून दोन तलावांच्या मधल्या वाटेने जंजाळा गावाकडे जाता येते. येथे आपली गड फेरी पूर्ण होते.घटोत्कच लेणी: जंजाळा गाव व किल्ला यांच्या मधे ही लेणी आहेत. हि बौध्द लेणी आहेत. या लेण्यातील दर्शनी दालन प्रशस्त असून त्याला २० खांब आहेत. मधल्या दोन व कोपर्यातील दोन खांबांचा आकार व त्यावरील नक्षी इतरांपेक्षा वेगळी आहे. दालनाच्या डाव्या बाजूला बुध्दमूर्ती व शिलालेख आहे. त्यात अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. वाकटाक नरेशाचा मंत्री वराहदेव याने ही लेणी इ.सनाच्या ५ व्या शतकात खोदवली अशी माहिती दिलेली आहे. गाभार्यात बुध्दाची आसनस्थ मूर्ती आहे.आसनाखाली हरणे व मधे धर्मचक्र आहे.अंभई गावात प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे.जंजाळा किल्ला पहाण्यासाठी २ ते ३ तास लागतात. तेथून घटोत्कच लेणी पाऊण तासांवर आहेत. लेणी पहाण्यास अर्धा तास व लेणी पाहून जंजाळा गावात जाण्यास पाऊण तास लागतो.
गडावर पोहोचण्याच्या वाटा: स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून जंजाळा गडावर जाण्यासाठी.औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे. सिल्लोडच्या पुढे १४ किमीवर गोळेगाव आहे. गोळेगावच्या अलिकडे डाव्याबाजूस उंडणगावाकडे जाणारा फाटा फूटतो. येथून उंडणगाव ५ किमीवर आहे. उंडणगावहुन दोन रस्ते फूटतात. एक हळदा मार्गे वेताळवाडीगड – वेताळवाडी – सोयगाव असा जातो. तर दुसरा रस्ता १२ किमी वरील अंभई गावात जातो. अंभईहून १० किमीवर जंजाळा गाव आहे. गावाच्या मागे ३ किमीवर जंजाळा किल्ला आहे.स्वत:चे वहान नसल्यास / गडा खालील जरंडी व वेताळवाडी गावातून पायी गड चढण्यासाठी१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे.अ) सोयगाव – जरंडी अंतर ९ किमी आहे. जरंडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.जरंडी गावाच्या पूर्वेला जंजाळा किल्ल्याची एक डोंगरसोंड उतरलेली आहे. त्यावरून २ तासात गडावर जाता येते.ब) सोयगाव – वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी ते धरण अंतर २ किमी आहे. वेताळवाडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत. वेताळवाडी धरणच्या पश्चिमेला जंजाळा किल्ल्याची एक डोंगरसोंड उतरलेली आहे. त्यावरून २ तासात गडावर जाता येते.वरील दोन्ही मार्गांसाठी गावातून वाटाडा घ्यावा.
राहाण्याची सोय: गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय: जेवणाची सोय गडावर नाही सोयगावातील हॉटेलांत होऊ शकते.
पाण्याची सोय: गडावरील दर्ग्या जवळील तलावातील पाणी पिण्यायोग्य आहे. तरीही पाणी बरोबर बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ:
१) जंजाळा गावातून ३० मिनीटे लागतात
२) जरंडी गावातून २ तासात गडावर जाता येते.
३) वेताळवाडी गावातून ३ तासात गडावर जाता येते.सूचना जंजाळा किल्ला, घटोत्कच लेणी, वेताळगड व रुद्रेश्वर लेणी एका दिवसात पहाता येतात.janjala_vaishagad

सुतोंडा / नायगावचा किल्ला


किल्ल्याची ऊंची : ३०००
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा सातमाळ
श्रेणी: मध्यम
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सुतोंडा उर्फ नायगावचा किल्ला या नावाचा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शाबूत आहेत. या किल्ल्याच वैशिष्ट्य म्हणजे कातळात कोरून काढलेले प्रवेशव्दार आणि किल्ल्यावर असलेली पाण्याची २५ हून अधिक टाकी. सुतोंडा किल्ल्याच्या डोंगरात असलेल जोगवा मागणारीच लेणही पहाण्यासारख आहे.पहाण्याची ठिकाणेनायगाव गावात एका झाडाखाली विष्णूची सुंदर मूर्ती ठेवलेली आहे. गावाबाहेर असलेल्या हनुमानाच्या मंदिरात अनेक प्राचीन मूर्त्या ठेवलेल्या आहेत. किल्ल्याकडे जातांना शेतात एक डोक तुटलेल्या नंदीची मूर्ती ठेवलेली आहे. पुढे आईमाईच्या टेकाडाला वळसा घालून आपण किल्ल्याकडे जातो. या टेकाडावर आईमाईची घुमटी आहे. त्याच्या समोर बळी दिले जातात. किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर वरच्या बाजूला चोर दरवाजा दिसतो. पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी २ मार्ग आहेत. पहिल्या मार्गाने आपण चोर दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करतो. हा मार्ग खड्या चढणीचा आहे. दुसरा मार्ग किल्ल्याला वळसा घालून किल्ल्याच्या मागच्या बाजूस जातो. हा मार्ग सोपा आहे. या मार्गाने आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारात पोहोचतो. हे प्रवेशव्दार मोठ्या खुबीने बनविलेले आहे. येथे डोंगर उतारावरचा कातळ खोदून अंदाजे ५० फूट लांब , २० फूट रूंद व २० फूट उंच खाच (खिंड) बनवलेली आहे. या ठिकाणचा अंदाजे १७०० टन वजनाचा दगड फोडून किल्ल्याच्या बांधकामात वापरण्यात आला असावा. शत्रूला फसविण्यासाठी ही मानव निर्मित खाच (खिंड) कातळात बनविण्यात आली होती. या खाचेच्या (खिंडीच्या) दोन्हीं बाजूंना उंचावर बुरुज व तटबंदी होती, तर तिसर्या बाजूला खोल दरी. अरुंद पायर्यांवरुन शत्रु ह्या खिंडीत आल्यावर दोन्ही बुरुजांवरुन त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. समोरच्या बाजूला खोल दरी व मागिल बाजूस असलेल्या अरुंद पायर्यांमुळे शत्रुची या ठिकाणी (खाचेत) कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असत.खिंडीच्या डोंगराकडील भागात कातळ कोरुन १२ फूट उंच पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार बनविलेले आहे. प्रवेशव्दाराच्या वरच्या बाजूस जेथे कातळ संपतो तेथे तटबंदी बांधलेली आहे. तटबंदीत डाव्या बाजूला शरभ शिल्प कोरलेले आहे, तर उजव्या बाजूच्या कोपर्यात तोफेसाठी गोल छिद्र (झरोका) ठेवलेल आहे. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस दरवाजाच्या व अडसराच्या खाचा कोरलेल्या पहायला मिळतात. दरवाजातून आत गेल्यावर कातळात कोरलेला भूयारी मार्ग काटकोनात वळतो. येथे पहारेकर्यांसाठी कट्टे आहेत. भूयारातून बाहेर पडून फरसबंदी मार्गाने पुढे जाऊन डाव्या बाजूला वळून वर चढून गेल्यावर आपण खिंडीच्या वरच्या बाजूला येतो. येथून या मानव निर्मित खिंडीचा किल्ल्याच्या संरक्षणासाठी कसा उपयोग केलेला आहे याचा अंदाज येतो.थोडेसे चढून गेल्यावर किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार लागते. हे पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार उध्वस्त झालेले असून त्याच्या बाजूची तटबंदी अजून टिकून आहे. प्रवेशव्दारातून आत गेल्यावर २ पाण्याची भव्य पण सुकलेली टाकी पहायला मिळतात. त्यांच्या बाजूने वर चढून गेल्यावर स्वच्छ व गार पाण्याने भरलेल प्रचंड मोठ खांब टाक पहायला मिळत. १३ तुटलेले खांब असलेल्या या टाक्याच्या डाव्या बाजूच्या कोपर्यात एक दगडात कोरलेली खिडकी बसवलेली आहे. टाक पाहून पुढे जातांना वाटेत उजव्या बाजूला आणखी दोन फुटलेली मोठी टाकं पहायला मिळतात. डाव्या बाजूला एक सुकलेल टाक व त्याच्या मागे काही अंतरावर तटबंदी व बुरुज पहायला मिळतात. येथून पायवाट उजवीकडे वळून वर चढते तेथे २ पीराच्या कबरी पहायला मिळतात. पीराच्या डाव्या बाजूला मशिदीची पडकी इरत आहे. तर उजव्या बाजूला कातळात खोदलेल्या २० – २५ टाक्यांच संकूल आहे. यात विविध प्रकारची, आकाराची टाकं पहायला मिळतात. या टाक्यांना वळसा घालून वर चढल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो. येथे तटबंदी व वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. ते पाहून पुन्हा टाक्यांच्या संकूलातील शेवटच्या टाक्यापाशी येऊन (पूर्वेला) खाली उतरावे. येथे २ प्रशस्त टाकं पहायला मिळतात. यातील एक खांब टाकं असून त्यात ८ खांब आहेत. या टाक्यांच्या पुढे चालत जाऊन डोंगराला वळसा घालून मशिदीच्या खालच्या बाजूस यावे. येथे चोर दरवाजा आहे. चोर नायगाव कडे तोंड करून आहे. या दरवाजातून १५ मिनीटात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता येते.जोगवा मागणारीच लेण: चोर दरवाजातून किल्ला उतरायला सुरुवात करावी साधारणपणे अर्धा किल्ला उतरल्यावर उजव्या बाजूची पायवाट पकडावी व तटबंदीला समांतर चालत रहावे. चोर दरवाजापासून दुसर्या बुरुजाखाली कातळात खोदलेली दोन लेणी पहायला मिळतात. स्थानिक लोक याला जोगवा मागणारीच लेण किंवा जोगणा मांगीणीच घर या नावाने ओळखतात. हे जैन लेण आहे. यातील पहील्या लेण्याला दोन दालन असून बाहेरच्या पडवीला दोन खांब आहेत. पहिल्या दालनाच्या व्दारपट्टीवर महावीरांची प्रतिमा कोरलेली आहे, पण ती आता बरीच पुसट झालेली आहे. पहील्या दालना मध्ये उजव्या बाजूला मांडीवर मुल असलेल्या स्त्रीची २.५ फूट उंच मुर्ती आहे. त्याच्या वरच्या बाजूला भिंतीवर महावीरांची प्रतिमा कोरलेली आहे. डाव्या बाजूला गंधर्वाची २ फूट उंचीची मूर्ती भिंतीतच कोरलेली आहे. आतील दुसरे दालन चौकोनी आहे. त्यात कोणतेही कोरीव काम किंवा मुर्ती नाही. पहील्या लेण्यापासून थोड पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या प्राचीन पायर्या दिसतात. या पायर्यांनी वर गेल्यावर दगडात कोरलेल दुसर लेण पहायला मिळत. लेण्याच्या दर्शनी भागात दोन खांब कोरलेले आहे. आत बसण्यासाठी भिंती लगत दगडी बाक कोरलेले आहेत. लेण्याच्या बाहेर पाण्याच टाक कोरलेल आहे. हे लेण पाहून परत मुळ पायवाटेवर येऊन किल्ला उतरावा. या लेण्याकडे जाणारी पायवाट मळलेली नाही, तसेच बर्याच स्थानिक लोकांनाही या लेण्याचा नक्की ठाव ठिकाणा माहीत नाही . गावातून माहीतगार वाटाड्या घेतल्यासच हे लेण सापडू शकेल.
पोहोचण्याच्या वाटा: स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून ३ मार्गांनी सुतोंडा गडावर जाता येते
१) औरंगाबाद – चाळीसगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६३ किमी अंतरावर कन्नड गाव आहे. कन्नडहून एक रस्ता फर्दापूरला जातो .या रस्त्यावर कन्नड पासून ५० किमी वर बनोटी गाव आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव ते बनोटी अंतर २५ किमी आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
३) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडहून एक रस्ता ३१ किमी वरील घाटनांद्रा गावाकडे जातो. घाटनांद्राहून १३ किमीवर तिडका नावच गाव आहे. हे गाव फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर आहे. तिडका गावातून ३ किमीवर बनोटी गाव आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
स्वत:चे वहान नसल्यास / गडाखालील नायगावा पर्यंत पायी जाण्यासाठी:
१) औरंगाबाद – चाळीसगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६३ किमी अंतरावर कन्नड गाव आहे. येथे जाण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे.. कन्नडहून एक रस्ता फर्दापूरला जातो .या रस्त्यावर कन्नड पासून ५० किमी वर बनोटी गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव मार्गावर धावणार्या एसटीने बनोटी गावात उतरावे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे. सोयगाव ते बनोटी अंतर २५ किमी आहे. बनोटी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी उपलब्ध आहेत. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. बनोटीवरून नायगावात कोठलेही वहान जात नसल्यामुळे चालत जावे लागते. साधरणपणे ३० मिनीटात आपण नायगावात पोहोचतो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.नायगाव गावातून बाहेर पडल्यावर आईमाईच्या टेकाडाला वळसा घालून आपण किल्ल्याकडे जातो. या टेकाडावर आईमाईची घुमटी आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर वरच्या बाजूला चोर दरवाजा दिसतो. पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी २ मार्ग आहेत. पहिल्या मार्गाने आपण चोर दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करतो. हा मार्ग खड्या चढणीचा आहे. या मार्गाने किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ३० मिनिटे लागतात. दुसरा मार्ग किल्ल्याला वळसा घालून किल्ल्याच्या मागच्या बाजूस जातो. हा मार्ग सोपा आहे. या मार्गाने आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारात पोहोचतो. या मार्गाने किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
राहाण्याची सोय: गडावर रहाण्याची सोय नाही. नायगावातील शाळेत १० जणांची सोय होते.
जेवणाची सोय: जेवणाची सोय गडावर नाही, बनोटी गावातील हॉटेलांत होऊ शकते.
पाण्याची सोय: गडावरील १३ खांबी टाक्यात पिण्यायोग्य पाणी वर्षभर असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ: नायगाव मधून सुतोंडा किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.सूचनासुतोंडा व अंतुर हे किल्ले २ दिवसात करता येतात. त्यासाठी अंतुर किंवा नायगाव येथे एक रात्र मुक्काम करावा लागतो. सुतोंड्याहून ३ किमी बनोटी – ३ किमी तिडका – १३ किमी घाटनांद्रा – टाकळी – वाकी – नागापूर – अंतुर यामार्गाने अंतुर किल्ल्यावर जाता येते. त्यासाठी स्वत:चे वहान असल्यास उत्तम.sutonda_naigaon

भांगसी गड / भांगसाई गड


किल्ल्याची ऊंची: २७०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा
श्रेणी: सोपी
औरंगाबाद – देवगिरी रस्त्यावर, औरंगाबाद शहरापासून १६ किमी अंतरावर अजिंठा डोंगर रांगेपासून वेगळा झालेला एक छोटा डोंगर आहे. आजूबाजूच्या सपाट परीसरामुळे हा डोंगर उठून दिसतो. या डोंगरावर कातळात कोरलेला सुंदर किल्ला आहे, तोच भांगसी गड. या किल्ल्यावरील कातळात कोरून काढलेल्या भूयारात असलेल्या भांगसाई देवी मंदिरामुळे औरंगाबाद परिसरातील लोक या गडाला “भांगसाई गड” या नावाने ओळखतात. भांगसाई देवी ट्रस्टने भूयारी मंदिरावर नविन मंदिर व गडावर जाण्यासाठी पायर्या बांधल्यामुळे गडावर औरंगाबाद परिसरातील लोकांचा वावर वाढलेला आहे. परंतू औरंगाबादला येणार्या पर्यटकांना मात्र या किल्ल्याची फारशी माहिती नाही.भांगसी गड, औरंगाबाद – देवगिरी रस्त्यावर आहे. देवगिरी किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने सकाळी ९.०० वाजल्यानंतर त्याचे दरवाजे उघडतात. त्यामुळे औरंगाबादहून सकाळी ७.०० वाजता निघून प्रथम भांगसी गड पहावा. तो पहाण्यासाठी साधारणपणे १ तास लागतो.इतिहासभांगसी गडाचा इतिहास उपलब्ध नाही. देवगिरी या राजधानाच्या गडाशी जवळीक व गडावर कातळात खोदलेली टाकी व गुहा पहाता हा गड ७ व्या किंवा ८व्या शतकातला असावा.
पहाण्याची ठिकाणे: भांगसी गड चढतांना गडमाथ्याच्या थोडं खाली उजव्या बाजूला कातळात कोरलेली एक गुहा आहे. गुहेच्या पुढे सिमेंटच्या पायर्या संपून कातळात खोदलेल्या पूरातन पायर्या लागतात. या पायर्या चढून गेल्यावर कातळात कोरून काढलेल्या उत्तराभिमुख प्रवेशव्दारातून आपला गडावर प्रवेश होतो. प्रवेशव्दाराची कमान मात्र उध्वस्त झालेली आहे. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस तटबंदीचे अवशेष आहेत. प्रवेशव्दारातून गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर पूर्व – पश्चिम पसरलेला चिंचोळा गडमाथा दिसतो. गडावरील सर्व अवशेष पश्चिमेला असल्यामुळे उजव्या बाजूला भांगसाई देवी मंदिराकडे चालत जावे. वाटेत मंदिरा समोर एक बुजलेल टाक पहायला मिळते.भांगसाई देवीच्या मुळच्या भुयारी मंदिरावर नविन मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरात असलेल्या पायर्यांनी भूयारात उतरून भांगसाई देवीच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. मुर्तीच्या डाव्या बाजूच्या असलेल्या झरोक्यातून (भोकातून) रांगत गेल्यावर आपण एक प्रशस्त गुहेत पोहोचतो. या कातळात कोरुन काढलेल्या गुहेला २५ खांब आहेत. या गुहेचे तोंड दक्षिणेला आहे. ही गुहा दोन स्तरात खोदलेली आहे. भांगसाई देवी मंदिरा पासून गुहेच्या तोंडापर्यंत डाव्या बाजूला गुहेची उंची जेमतेम १ ते ३ फूट आहे, तर उजव्या बाजूस पाण्याचे विशाल टाक खोदलेले आहे. या रचनेमुळे उन्हाळ्याच्या दिवसात गडावरील शिबंदीला पाणी आणि थंडावा एकाच ठिकाणी उपलब्ध होत असे. या गुहेच्या उजव्या कोपर्यात गणपतीची मुर्ती, शिवलिंग व नंदी ठेवलेले आहेत. त्यांच दर्शन घेऊन, गुहेच्या दक्षिणेकडील मुखातून बाहेर पडावे.भांगसाई देवीच्या मंदिरामागे एक कोरड टाक आहे. तेथून पुढे गेल्यावर डाव्या हाताला (दक्षिणेला) वळून खाली उतरावे. येथे गडाच्या दुसर्या दक्षिणाभिमुख दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. या दरवाजा समोरच कातळात खोदलेल्या गुहा आहेत. त्यांचा उपयोग देवडी प्रमाणे होत असावा. आज या गुहांच्या वरचा दगड पडल्यामुळे या गुहा बुजलेल्या आहेत. हा दरवाजा पाहून परत गडमाथ्यावर यावे. पुढे गेल्यावर कातळात खोदलेले एक खिडकी टाक आहे. या टाक्यात मुळ आयताकार खोदलेल्या टाक्याच्या आत ४ चौकोनी खिडक्या (झरोके) कोरलेल्या आहेत. या टाक्याच्या बाजूला कातळात कोरलेल शिवलिंग व नंदी आहे. या टाक्याच्या पुढे उजव्या हाताला (उत्तरेला) वळून खाली उतरावे. येथे कातळाच्या पोटात तीन दालन असलेल खांबटाक कोरलेल आहे. या टाक्या समोरील भिंतीत एक गोल झरोका कोरलेला आहे. हे टाक पाहून पुन्हा गडाच्या माथ्यावर येऊन पश्चिम टोकाकडे चालत जातांना वाटेत एक जोड टाक पहायला मिळत. या टाक्यात उतरण्यासाठी पायर्या आहेत. त्याला लागूनच एक कोरड पडलेलं टाक पहायला मिळत. या टाक्याच्या तळाला एक आयताकृती खड्डा कोरून काढलेला आहे. या टाक्याच्या जवळ एक बैठ घर बांधलेल आहे. येथून किल्ल्याचे पश्चिम टोक पाहून प्रवेशव्दाराकडे परत यावे. या ठिकाणी आपली गड फेरी पूर्ण होते.
पोहोचण्याच्या वाटा:
१) भांगसी गडाच्या पायथ्यापर्यंत खाजगी वहानाने जाता येते. औरंगाबाद – वेरूळ रस्त्यावर औरंगाबाद शहरापासून शरणपूर गाव साधारण १० किमीवर आहे. येथून डाव्या बाजूचा रस्ता औरंगाबाद – देवगिरी रेल्वे लाईन ओलांडून पलिकडे एम आय डी सी कडे जातो. या रस्त्यावर भांगसी गडाचा एकमेव डोंगर आहे, तसे़च गडाची दिशा दाखवणारे फलक लावलेले आहेत. या रस्त्यावर डावीकडे जाणारा रस्ता भांगसी गडाच्या पायथ्या पर्यंत जातो. पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी १५ मिनीटे ते ३० मिनीटे लागतात.
२) औरंगाबादहून वेरूळ, मनमाड, चाळीसगावकडे जाणार्या एसटीने शरणपूर फाट्याला उतरावे. तेथून चालत पाऊण तासात किल्ल्यावर जाता येते.
राहाण्याची सोय: गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय: जेवणाची सोय गड पायथ्याच्या हॉटेलात होऊ शकते.
पाण्याची सोय: गडावर पिण्यायोग्य नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ: पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी २० मिनीटे लागतात.bhangsaigad

लहुगड


किल्ल्याची ऊंची: २७०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा
श्रेणी: सोपी
औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा, वेरूळ ही दगडात कोरलेली अजोड लेणी आहेत. त्याचप्रमाणे दगड तासून / कोरून बेलाग बनवलेला देवगिरी किल्लाही सर्वांच्या परीचयाचा आहे. यांच्याच पंक्तीत बसणारा लहुगड हा दगडात कोरलेला एक छोटेखानी किल्ला औरंगाबाद शहरापासून साधारण ४० किमीवर आहे. या किल्ल्यावर दगडात कोरलेले गुहा मंदिर, कातळात कोरलेली वेगवेगळ्या प्रकारची १८ पाण्याची पाण्याची टाकी, दगडात कोरलेले प्रवेशव्दार, पायर्या, गुहा असे कोरीवकामाचे वैविध्य पहायला मिळते.औरंगाबाद – अजिंठा व औरंगाबाद – जालना या पुरातन मार्गाच्या मधून अजिंठा डोंगररांग या मार्गांना समांतर धावते. या दोन मार्गांना जोडणार्या खिंडीवर लक्ष ठेवण्यासाठी लहूगडाची निर्मिती करण्यात आली होती. अजिंठा डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर कोरलेल्या किल्ल्याला एकदा तरी आवर्जून भेट द्यावी असा आहे.
इतिहास: लहुगडचा इतिहास उपलब्ध नाही. देवगिरी या राजधानाच्या गडाशी जवळीक व गडावर कातळात खोदलेली टाकी व गुहा पहाता हा गड ७व्या किंवा ८व्या शतकातला असावा.
पहाण्याची ठिकाणे: लहूगडाचा ताबा सध्या एका साधूबाबाने घेतला असल्यामुळे आसपासच्या गावकर्यांनी गडावर बर्याच सोई निर्माण केल्या आहेत. गडाच्या पायथ्यावरील फलक “लोहगड” असा लावण्यात आला आहे. गडावर जाण्यासाठी ३ बाजूंना सिमेंटच्या पायर्या बांधून काढलेल्या आहेत. यातील खिंडीच्या जवळ असलेल्या पायर्यां जवळ मारूती मंदिर आहे. पायर्या चढतांना डाव्या बाजूस कातळात खोदलेला एक चौकोनी खळगा आहे व त्याच्या बाजूला एक शिवलिंग व नंदी आहे. या नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे याचे शरीर नेहमी प्रमाणे ३ मितीत (थ्री डायमेंशन) असून तोंड मात्र २ मितीत (टू डायमेंशन) बनवलेले आहे. पुढे थोड्या पायर्या चढून उजव्या बाजूला वळल्यावर एका झाडाखाली गणपतीची पूरातन मुर्ती पहायला मिळते. पूर्वी ही मुर्ती गुहा मंदिरा समोरच्य देवळीत होती. तिथे नविन मुर्ती बसवल्यामुळे ही मुर्ती बाहेर ठेवण्यात आलेली आहे. येथेच उजव्या बाजूस गडावर पूर्वी रहात असलेल्या साधूचे मंदिर बांधलेले आहे. या मंदिराच्या पुढेच डाव्या बाजूला किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायर्या बनविलेल्या आहेत. पण तेथे न जाता प्रथम पायर्यांच्या बाजूला असलेले गुहा मंदिर पहावे. हे गुहा म्हणजे कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना आहे.गुहेच्या समोरच कातळात खोदलेले चार फूट उंच मंदिर आहे. आधी कळस मग पाया याप्रकारे कोरलेल्या या मंदिरात गणपतीची नविन मुर्ती व दोन पुरातन मुर्त्या ठेवलेल्या आहेत. गुहा मंदिराच्या डाव्या हाताला उघड्या चौथर्यावर अनेक मुर्तींचे मुखवटे, छोट्या पिंडी, नंदी मांडून ठेवलेले आहेत. त्याच्या पुढे कातळात खोदलेले रुंद व खोल पाण्याच प्रचंड मोठ खांब टाक आहे. गुहा मंदिराच्या वर असणार्या कातळावर पडणारे पाणी टाक्यात जमा होण्यासाठी कातळात पन्हाळी/ पाट कोरलेले आहेत. (या कातळावर बाधलेल्या सिमेंट्च्या पायर्यांमुळे ह्या पन्हाळी/ पाट काही ठिकणी बंद झालेल्या दिसतात.) मंदिराच्या बाहेरच्या बाजूला दोन गोलाकार खांब कोरलेले आहेत. त्यानंतर थोडीशी जागा सोडून मंदिराचे दार कोरलेल आहे. दारावर व्दारपट्टीका व दोन बाजूंना खांब व नक्षी कोरलेली आहे. मंदिरात हवा व प्रकाश येण्यासाठी दरवाजाच्या दोनही बाजूंना खिडक्या कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत गेल्यावर मंदिराचा कातळात कोरून काढलेला सभामंडप ४ खांबावर तोललेला दिसतो. या ४ खांबामधे नंदी बसवलेला आहे. मंदिराच्या गाभार्यात पिंड बसवलेली असून तिला रामेश्वर नावाने ओळखतात. गाभार्या समोर व डाव्या बाजूला अशा दोन खोल्या कोरून काढलेल्या आहेत. दुरुनही लोकांना दिसावा म्हणून गुहा मंदिरावर हल्लीच सिमेंटचा कळस बांधलेला आहे. मंदिराच्या समोर लाद्या बसवलेल्या आहेत. तसेच झाडांना पार बांधलेले आहेत. मंदिराच्या पुढे साधूबाबाची मठी व स्वयंपाक घर नव्याने बांधलेले आहे.गुहा मंदिर पाहून बाजूच्या कातळात कोरलेल्या पायर्या चढून प्रवेशव्दाराकडे जातांना जेथे पायर्या डावीकडे वळतात तेथे उजव्या हाताला एक कोरड टाक आहे. तिथून थोडस पुढे किल्ल्याच कातळात कोरलेल सुबक ठेंगण प्रवेशव्दार पायर्यांच्या मार्गावरच आहे.प्रवेशव्दारच्या आतल्या बाजूस डाव्या हाताला वरच्या बाजूस एक गुहा कोरलेली आहे. त्याचा वापर देवडी म्हणून होत असावा. गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर समोरच ८ टाक्यांचा समुह आहे. तो पाहून उजव्या बाजूला वळून गड प्रदक्षिणा चालू करावी. प्रथम जमिनीच्या पोटात कोरलेले खांब टाक पहायला मिळत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे ओळीने ६ पाण्याची टाकं लागतात. त्यापैकी एका टाक्यातच पिण्यायोग्य पाणी आहे. त्यानंतर झाडीत लपलेले झेंडा टाक पाहून वळसा मारला की आपण गडाच्या पिछाडीला येतो. येथे कातळात कोरलेली १ खांबी प्रशस्त गुहा आहे. या गुहेला एक दरवाजा व ४ खिडक्या आहेत. गुहेच्या थोड पुढे किल्ल्याच्या मागिल प्रवेशव्दाराचे अवशेष व अंजनडोह गावाकडे उतरणारी वाट आहे. ती पाहून गुहेच्या उजव्या बाजूने गुहेच्या वरच्या भागात जाणार्या पायर्या चढून गेल्यावर आपण सीता न्हाणी पाशी जाऊन पोहोचतो. येथे कातळात खोदलेल टाक व सीतेच छोट मंदिर आहे. ते पाहून उजवीकडे खाली उतरल्यावर कातळात कोरलेली प्रशस्त गुहा आहे. ती पाहून परत वर येऊन किल्ल्याच्या प्रवेशव्दाराकडे येतांना वाटेत एक पाण्याच टाक आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील सपाटीवर वास्तूंचे अवशेष आहेत. किल्ल्याचा माथा छोटा असल्यामुळे गडफेरी करायला अर्धा तास लागतो.या गडाच्या बाजूला असलेल्या डोंगरावर ३ गुहा (लेणी) आहेत. ही लेणी म्हणजे कातळात कोरलेल्या केवळ गुहा असल्यामुळे गडाच्या पायथ्या पासून १० मिनिटात आपण लेणी पाहून परत येऊ शकतो.
पोहोचण्याच्या वाटा: स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून २ मार्गांनी लहूगडावर जाता येते.
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून २९ किमी अंतरावर फुलंब्री गाव आहे. फुलंब्रीच्या पुढे ४ किमी अंतरावर पालफाटा आहे. या फाट्यावर उजवीकडे वळल्यावर आपण राजूर रस्त्याला लागतो. या रस्त्यावर पालफाट्यापासून ६ किमी अंतरावर जातेगाव फाटा आहे. या फाट्यापासून जातेगाव ३ किमीवर आहे. जातेगाव पासून नांद्रा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव ४ किमीवर आहे. नांद्रा गावाच्या मागे ३ किमीवर लहूगड आहे.
२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १५ किमी अंतरावर चौका गाव आहे.या गावातून एक रस्ता २८ किमीवरील नांद्रा गावात जातो.नांद्रा गावाच्या मागे ३ किमीवर लहूगड आहे. हा रस्ता छोट्या गावांमधून फिरत जातो. रस्त्यात दिशादर्शक पाट्या नसल्याने चुकण्याचा संभव आहे.
३) औरंगाबाद – जालना रस्त्यावर औरंगाबाद पासून २१ किमी अंतरावर करमाड गाव आहे. या गावातून लाडसावंगी – अंजनडोह मार्गे जाणारा रस्ता लहूगडापर्यंत जातो. परंतू हा रस्ता बर्याच ठिकाणी कच्चा आहे.
स्वत:चे वहान नसल्यास:
१) औरंगाबादहून लहूगडाच्या पायथ्याशी असलेल्या नांद्रा गावात जाण्यासाठी दुपारी १२ व संध्याकाळी ६ वाजता एसटीच्या बसेस आहेत. नांद्रा गावातून लहूगडावर चालत जाण्यास पाऊण तास लागतो.
२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून २९ किमी अंतरावर फुलंब्री गाव आहे. फुलंब्री गावातून फुलंब्रीच्या पुढे ४ किमी अंतरावर जातेगावला जाण्यासाठी एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत. जातेगाव पासून नांद्रा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव ४ किमीवर आहे. जातेगाव ते नांद्रा सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत. नांद्रा गावाच्या मागे ३ किमीवर लहूगड आहे. नांद्रा गावातून लहूगडावर चालत जाण्यास पाऊण तास लागतो.
राहाण्याची सोय: गडावरील मंदिरात ४ जण राहू शकतात, तर मंदिरासमोरील ओट्यावर १५ जण आरामात राहू शकतात.याशिवाय गडाखाली धर्मशाळा बांधलेली आहे. परंतू तेथे पाण्याची सोय नसल्याने कोणी राहात नाही.
जेवणाची सोय: जेवणाची सोय फुलंब्री किंवा औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर होऊ शकते.
पाण्याची सोय: लहूगडावर पिण्यायोग्य पाणी २ टाक्यात आहे. त्याबद्दलची माहीती किल्ल्यावरील साधूबाबा कडून घ्यावी.lahugad

देवगिरी / दौलताबाद


किल्ल्याची ऊंची: २९७५ फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
श्रेणी: मध्यम
डोंगररांग: देवगिरी
जिल्हा: औरंगाबाद
देवगिरी म्हणजे ‘देवतांचा पर्वत’.औरंगाबाद शहराच्या ईशान्येस सुमारे १४ किलोमीटरवर वेरूळच्या रस्त्यावर एका शंकाकार डोंगरावर; १० कि.मी. परीघ असलेल्या तटबंदीच्या आत किल्ला व गाव आहे. त्याची उंची पायथ्याच्या पठारापासून २२१ मीटर आहे. महंमद-बीन-तुघलक ह्याने त्याचे दौलताबाद असे नामांतर केले.यादव राजवंशाने ह्या किल्ल्याचे निर्माण केले. ह्या काळात यादव साम्राज्य समृद्धी आणि उत्कर्षाच्या परमोच्च बिंदूवर होते. त्याची खबर अलाउद्दिन खिलजीला लागली आणि त्याने देवगिरीवर हल्ला केला. हा मुस्लिमांचा दक्षिणेवरचा पहिला हल्ला. हा हल्ला धरून एकून 3 हल्ले झाले देवगिरीवर. त्यात अनुक्रमे रामदेवराय, शंकरदेव आणि हरपालदेव ह्यांचा पराभव होउन देवगिरीवर मुस्लिम शासन सुरू झाले. एके काळी काही काळ ह्या किल्ल्याने भारताची राजधानी व्हायचा मानही मिरवलाय. पेशवाईतील २ वर्षे सोडता हा किल्ला आणि आजुबाजुचा प्रदेश पुर्णकाळ मुस्लिम शासकांच्या ताब्यात होता. ह्या किल्ल्याची रचना इतकी अभेद्य केलीय की हा किल्ला अपराजित आहे. ह्यावर जो कब्जा मिळवला गेला तो फक्त कपट कारस्थानं आणि फंदफितुरीने.
इतिहास: देवगिरी किल्ल्याचा प्राचीन इतिहास निश्चित नाही. तथापि हेमाद्रीच्या मते पाचवा भिल्लम यादव याने १८७ मध्ये या डोंगरावर किल्ला बांधून तेथे यादवांची राजधानी केली. अलाउद्दीन खल्जीने १२९४ मध्ये हा किल्ला घेतला आणि खंडणी मान्य झाल्यावर रामचंद्र यादव यास परत दिला. पुढे यादवांनी खंडणी बंद करताच मलिक काफूरने १३०७, १३१० व अखेरीस १३१८ अशा स्वाऱ्यात घेतला आणि अखेरच्या हरपालदेव यादवास फाशी दिले. महमद तुघलकाने १३३७ साली त्याचे नाव यादवांच्या तेथील विपुल संपत्तीमुळे दौलताबाद ठेवले. दिल्लीहून राजधानी दौलताबादेस आणण्याचा यत्न झाला. १३४७ मध्ये तो किल्ला बहमनी सत्तेखाली गेला आणि १५०० नंतर अहमद निजामशाहने तो आपल्या अंमलाखाली आणला. त्यांची ती राजधानीच होती. पुढे शाहजहानने चार महिन्यांच्या वेढ्यानंतर १६३३ मध्ये घेतला आणि अखेर १७२४ मध्ये किल्ला निजामाच्या सत्तेखाली आला.वास्तुशास्त्र दृष्ट्या येथील किल्ला वैशिष्ट्यपूर्ण असून त्याला सात (काहींच्या मते आठ) दरवाजे होते; पण त्यांपैकी मक्का व रोझा या नावाचे दोनच आता उपयोगात आहेत. किल्ल्याच्या सभोवती खंदक खणलेले असून त्यांवरील साकव अशा रीतीने बांधले होते, की शत्रू आला असता खंदाकातील पाण्याची पातळी कमीजास्त होई व हे साकव पाण्याखाली जात. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचीही सोय आहे. दरवाज्याच्या पायऱ्या खडकात खोदल्या असून किल्ल्यात अनेक गुप्त मार्ग, दरवाजे व संरक्षणासाठी बांधलेल्या शेकडो खोल्या आहेत. अगदी वरच्या खोल्यांत जाण्यासाठी पूर्वी चामड्याची शिडी वापरत असे इब्न बतूताने लिहिले आहे. त्याने १३४० मध्ये किल्ल्यास भेट दिली होती. बाहेरील तटाच्या आत काही अंतरावर आणखी दोन तट असून डोंगराच्या कडा इतक्या तासून गुळागुळीत केल्या आहेत, की त्यांवरून वर चढणे अशक्य होते. सर्वात उंचीवर असणाऱ्याध भागास कटक किंवा महाकोट म्हणतात, तर खालच्या भागास बालाकोट म्हणतात. किल्ल्यात अनेक इमारती आहेत. त्यांपैकी शंक्वाकार बुरुज, चांद मिनार, नगारखाना, चिनी महाल या प्रसिद्ध असून अनेक मशिदी व मंदिरेही आहेत. आज प्रवाशांचे ते एक पर्यटन केंद्र बनले आहे.युद्धपद्धती आणि युद्धकलेतील गरजांच्या फेरबदलांना अनुसरुन या किल्ल्याची रचना आणि बांधणीही वेळोवेळी होत गेली असावी. याचसाठी दौलताबादचा किल्ला सैन्यवास्तुकलेतील प्रगतीचे प्रतीक म्हणून गणला जातो.ह्या किल्ल्याचा नकाशा, भिंती आणि प्रवेशद्वाराची रचना अशी योजनाबद्ध रीतीने करण्यात आलेली आहे की, शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित राखता येईल असे वळणा-वळणाचे अरुंद रस्ते शत्रुसैन्याच्या सहज प्रवेशाला थोपवून धरतात. तर उंच,उंच भिंती किल्लेबंदी करणा-या उरतात. संपूर्ण किल्ला चहूकडून जलमय कालव्यांनी वेढलेला आहे. किल्ल्याची उंची गाठण्यासाठी डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेल्या दूर्गम, अतिसुरक्षित असे अंधारे बोगदे ओलांडावे लागतात. किल्ल्याच्या या रचनेमुळे लक्षात येते की, शत्रुची दिशाभुल करण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी अशी रचना केलेली असावी.पाहण्यासारखी ठिकाणेकिल्ल्याच्या एका बाजूला दहा कि.मी. भिंत पसरलेली आहे. किल्ल्यात प्रवेश करतांना एक महादरवाजा आहे, या दरवाजावर हत्तींचा हल्ला थोपवण्यासाठी टोकदार खिळे ठोकण्यात आलेली आहेत. यातून प्रवेश केल्यावर प्रत्येक गल्लीत पहारेक-यांच्या कोठड्या बांधण्यातमुख्य महादरवाज्यातुन आत आल्यावर बर्याच तोफा मांडुन ठेवल्या आहेत.भारतमाता मंदिर आतमधे एक मंदिर आहे जे यादवकालीन जैन मंदिर होते. तेथे कुतबुद्दीन खिलजी ने मस्जिद बनवली. जेव्हा १९४८ साली हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले तेव्हा त्या तिथे भारतमातेची मुर्ती स्थापन केली आणी ते ठिकाण भारतमाता मंदिर म्हणुन प्रसिद्धीस आले.चाँद मिनार भारतमाता मंदिराजवळ एक मोठा ३ मजली मिनार आहे. हे मंदिर तोडुन तिथे मस्जिद बांधली असल्यामुळे अहमदशहा बहामनीने हा उत्तुंग मिनार त्यावेळेच्या मशिदीजवळ बांधला. दिल्लीच्या कुतुबमिनार नंतर उंच मिनारांमधे ह्या ३ मजली चाँद मिनारचा दुसरा क्रमांक लागतो.चिनी महल एके काळी ह्या महालाच्या भिंती चिनी मातीच्या नक्षीकामानी अलंकृत केल्या होत्या. ह्या महालाचा कारागृह म्हणुन वापर केला जात असे. औरंगजेबाने ह्या महालात संभाजीराजांच्या पत्नी येसुबाई आणि पुत्र शाहुराजे ह्यांना कैद करून ठेवले होते अशी वंदता आहे. तसेच औरंगजेबाने गोलकोंडाचा अंतिम राजा सुल्तान आबूल हुसैन तानाशाह आणि विजापुरचा अंतिम शासक सुल्तान सिकंदर यांना इथेच कैदेत ठेवलेले होते. रंग महाल येथुन डावीकडे एक लहानश्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर रंगमहालाचे भग्नावशेष सापडतात विभिन्न खोल्या आणि महालाच्या सुनियोजित बांधणीव्यतिरिक्त यातील खांब आणि खणामधील लाकडांवर केलेलं नक्षीकाम पर्यटकांना गतवैभावाची आठवण करुन देतात.मेंढा तोफ चिनी महालापासुन जवळच एका बुरुजावर ही मेंढा तोफ आहे. चारही दिशांना फिरू शकणार्या ह्या तोफेला मागच्या बाजुला मेंढ्याचे तोंड आहे त्यामुळे ह्या तोफेला मेंढा तोफ असे नाव पडले. मुस्लिम शासक हिला ‘तोप किला शिकन’ म्हणजे ‘किल्ला तोडणारी तोफ’ म्हणत. ह्या तोफेवर ही तोफ तयार करणार्याचे मुहमद-हुसेन अमल-ए-अरब आणि औरंगजेबाचे नाव कोरले आहे. ह्या तोफेच्या तोंडावर कुराणातील एक वचन कोरले आहे.खंदक मेंढा तोफेच्या बुरुजावरून पुर्ण किल्ल्याचे दर्शन करता येते. आणी किल्ल्यात जाण्याच्या मार्गात एक मोठा खंदक आहे. ह्या खंदकात दोन स्तर आहेत. ह्या दोन्ही स्तरांमधे पाणी भरलेले असायचे. नेहमीच्या वेळी फक्त खालचा स्तर भरून पाणी असायचे. त्याने किल्ल्यात जा-ये करण्यासाठी असलेला पुल उघड असायचा. हल्ल्याच्या वेळी पाणी दुसर्या स्तरात सोडले जायचे जेणेकरून पुल पाण्याखाली जाउन शत्रु खंदकात पडून खंदकातील मगरींच्या भक्षस्थानी पडायचा. ह्या खंदकातील भिंती विशिष्ट पद्धतीने बांधल्या होत्या ज्याने त्यावर शिडी लावणे अशक्य होते.अंधारी/ भुलभुलय्या हा भुलभुलय्या ह्या किल्ल्याच्या अभेद्य रचनेचा कळस आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठीचा हा मार्ग आहे. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी हा भुलभुलय्या पार करावा लागतो. ह्याचे प्रवेशद्वार एखाद्या गुहेसारखे आहे. आणि हा पुर्ण मार्ग एकदम अंधारी आहे. अक्षरश: काळोख. काहीही दिसत नाही. भुलभुलय्या अशासाठी म्हणतात की हा पुर्ण मार्ग वर्तुळाकार जिन्याने बनलेला आहे. पायरी पायरी मधील अंतर विषम आहे. एक पायरी एकदम उंच तर एक पायरी एकदम लहान.शत्रुला उल्लु बनवण्याची फुल तजवीज आहे इथे. हवा आणि प्रकाश येण्यासाठी काही झरोके आहेत. त्यात शत्रुने प्रवेश केला रे केला की तो सरळ खंदकात पोहोचलाच पाहिजे अशी सोय केलेली आहे. शत्रु जरा विचार करत थांबला की वरून दगडांचा मारा करायला छुप्या जागा बनवलेल्या आहेत.बारादरी सध्याला ह्या किल्ल्यावर चांगल्या स्थितीत असणरी ही एकच वास्तु आहे. शहाजहानने बनवलेला हा महाल अष्टकोनी आहे. ह्याच्या बाहेरच्या बाजुला १२ कमानी आहेत त्याने ह्याचे नाव बारादरी असे पडले. इथे अष्ट्कोणी खोल्या आणि या खोल्यांची छत घुमटाकृती आहेत. बारादरीवरून पुर्ण किल्ल्याचे व आजुबाजुच्या परिसराचे सुंदर असे विहंगम दृश्य दिसते. एकनाथांचे गुरु आणि या किल्ल्याचे किल्लेदार जनार्धनस्वामी इथे निवास करीत असे म्हणतात. राजकारण आणि युद्धानी त्रासलेल्या सामान्य जनतेस ते उपदेश, मार्गदर्शन करीत. किल्लेदार असुनही त्यांनी धार्मिक जीवनाची कास धरली संसारात अटकलेल्यांना आणि अध्यात्माची कास धरणा-यां सर्व धर्मियांना ही एक हक्काची जागा तेव्हा वाटत असावी.याच गुहेत दोन भाग आहेत. एकीकडे अखंड प्रवाह असलेली जलधारा इथे आहे, मोतीटाका हे जलाशयाचे नावअत्युच्च शिखर हा ह्या किल्ल्यावरील अत्त्युच्च बुरुज. इथे एक मोठी तोफ आहे जीचे नाव आहे दुर्गा तोफ. एवढी वजनदार आणि भव्य तोफ इथे कशी आणली असेल वाटून उगाच जीव दडपून जातो.
राहाण्याची सोय: किल्ल्यावर राहण्याची सोय नाही पण औरंगाबाद मध्ये होऊ शकते
जेवणाची सोय: किल्ल्यावर जेवणाची सोय नाही पण किल्ल्याच्या समोर हॉटेल आहेत
पाण्याची सोय: गडावर पिण्यायोग्य पाणी नाही.devgiri

अंतूरगड


उंची: २७०० फूट
प्रकार: गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी: सोपी
डोंगररांग: अजंठा-सातमाळा
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुकामध्ये अंतुरगड किल्ला आहे.अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या पुर्वपश्चिम उपरांगेवर मोक्याच्या ठिकाणी अंतुरगड ठाण मांडून बसलेला आहे.इतिहासया भक्कम आणि बलदंड किल्ल्याची उभारणी एका मराठा सरदाराने केली होती. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता. मलीक अंबरच्या काळात येथे काही बांधकामे झाली. पुढे मोगली वावटळीत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी इतर किल्ल्याबरोबर याचाही ताबा पुढे मिळवला.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणेअंतुरच्या पुर्व अंगाला असणाऱ्या कड्याच्या पोटात दक्षिणेकडे तोंड करून हा दरवाजा आहे. अरुंद जागेत दरवाजा असल्यामुळे तो समोर गेल्याशिवाय चटकन दिसत नाही. येथे दरवाजाच्या बाहेर पहारेकऱ्यांच्या जागा आहेत. काही वर्षांपुर्वीपर्यंत (१९९० पर्यंत) या दरवाजाला लाकडी दारे होती. ती आता बेपत्ता झाली आहेत. या दारातून आत गेल्यावर आतील मार्ग तटबंदीने बंदिस्त केलेला असून तो अरुंद आहे. या मार्गावर वरुन खूपच दगडी पडलेली आहेत. पुढचा दरवाजा मात्र पुर्व दिशेला तोंड करून आहे. हा भव्य दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा आहे.दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूच्या कमानीवर शिल्पे आहेत. अशी शिल्पे अनेक ठिकाणी पहायला मिळतात. पण येथे या शिल्पाबरोबर सजावटीसाठी तोफेचे चार गोळे वापरले आहेत. अशा प्रकारे केलेली सजावट महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही आढळत नाही. ही वैशिष्ट्यपूर्ण सजावट पाहून आपण तिसऱ्या दारावरील भव्य असा फारशी शिलालेख अवलोकन करून गड प्रवेश करायचा. आपला प्रवेश गडाच्या मध्यभागीच होतो. गड दक्षिणोत्तर पसरलेला असून तटबंदीने वेष्टित आहे. या तटबंदीच्या कडेने आपण उत्तर टोकाकडे चालू लागतो. उजवी कडील तटबंदीमध्ये काही बुरुज आहेत. डावीकडे एक टेकडी असून टेकडीच्या दक्षिण बाजूला भलामोठा तलाव आहे. टेकडीच्या उतारावर भव्य इमारत आहे. इमारतीच्या गच्चीवर जाता येते. त्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. टेकडीच्या माथ्यावर टेहाळणीकरिता भलामोठा चौथरा बांधलेला असून त्यावर चढण्यासाठी उत्तरेकडून पायऱ्या आहेत. या चौथऱ्यावरुन संपुर्णगडावर लक्ष ठेवता येते तसेच येथून अंजठा-सातमाळा रांगेचे उत्तम दर्शन होते. उत्तरेकडील खानदेशाचा परिसर न्याहाळता येतो.गडाचा दक्षिण भाग एका तटबंदीने वेगळा केलेला आहे. या तटबंदीमध्ये तीन दरवाजे आहेत. त्यापैकी मध्यभागी मोठा दरवाजा असून त्याला दक्षिण बाजूला दोन मोठे बुरुज आहेत. मधल्या टेकडीच्या पश्चिम उतारावर तटबंदीजवळ पाण्याचे टाके कोरलेले आहे.गडाचा उत्तर भाग बालेकिल्ल्यासारखा असून तो अधिकच भक्कम करण्यात आला आहे. या बाजूला किल्ला हा डोंगर रांगेशी जोडला गेला असल्यामुळे या बाजूला मोठा खंदक कोरलेला आहे. खंदकाच्या माथ्यावर भक्कम तटबंदी असून या तटबंदीला चिलखती बांधणी आहे. एक तोफ ही इथे पडलेली आहे.
पोहोचण्याच्या वाटा: अंतुरच्या किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१)कन्नड कडून गौताळा अभयारण्यामधून एक रस्ता नागदकडे जातो. या रस्त्याला पुढे सिल्लोडकडे जाणारा एक उपरस्ता आहे. या रस्त्यावर आठ नऊ कि.मी. वर नागापूर नावाचे लहानसे गाव आहे. या गावातून अंतुरगडाकडे कच्चा रस्ता जातो. यामार्गावर खोलापूर म्हणून लहानशी वस्तीही वाटेत आहे. खोलापूरच्या पुढे असलेला रस्ता पावसाळ्यात खराब होतो. खोलापूर पासून सहा कि.मी. अंतरावर अंतुरगड आहे. हा मैलाचा चौकोनी दगड आहे. त्यावर काही शहरांच्या दिशा सांगितल्या असून हा इ.स. १६०८ मध्ये बसविल्याचा उल्लेख आहे. साधारण सपाटी असलेल्या या मार्गावरुन चालत पाच एक कि.मी. गेल्यावर आपल्याला अंतुरगडाचे दर्शन होते. अजंठा सातमाळा रांगेचे एक शृंग थोडे उत्तरेकडे घुसले आहे. या शृंगावरच अंतुरगड आहे.
२)जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामधून आहे. नागोद गावा कडून अंतुरगडाच्या पायथ्याच्या दस्तापूरला पोहोचायचे. तेथून अंतुरचा पायथा गाठून डोंगर चढायचा. हे दोन्ही मार्ग अंतुरच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येतात. अंतुरच्या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. डोंगर उतारावर भरपूर झाडी आहे.
राहाण्याची सोय: किल्ल्यावरील मशिदीमध्ये १० ते १५ लोकांना रहाता येऊ शकते.
जेवणाची सोय: जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय: गडावर पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ: पायथ्यापासून साधारण अडीच तास लागतात.anturgad