कोणतही शिवकाव्य येथे शोधा

अहमदनगर जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अहमदनगर जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

।। किल्ले रतनगड ।।



रतनगड किल्ला

 किल्ल्याचा प्रकार : ............
डोंगररांगः कळसूबाई डोंगररांगा
जिल्हा : अहमदनगर
श्रेणी : 
मध्येम
सह्याद्रीचे रांगड रुप, सह्याद्रीचा राकटपणा, सह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडाला भेट द्यावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यामधे अकोले तालुका आहे. अहमदनगरच्या पश्चिम अंगाला हा अकोले तालुका डोंगरदर्‍यांनी अतिशय समृद्ध आहे. या गिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड हा किल्ला आहे.
भंडारदर्‍याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या परिसरामधे येत असतात. पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर मात्र काही मोजकेच पर्यटक जातात. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूर करीत नाही. इच्छा, शारिरीक क्षमता आणि वेळेचे नियोजना व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकाल स्मरणात राहील अशीच आहे.

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईची डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्या दक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे. रतनगडाजवळ प्रवरानदी उगम पावते. या प्रवरानदीवर भंडारदरा धरण आहे. पुर्वी हे विल्सन डॅम म्हणून परिचित होते. या धरणाच्या पाण्याचा फुगवटा दोन बाजूंना पसरला आहे. एक फाटा समुद्रकडे जातो जर दुसरा फाटा रतनवाडीकडे जातो.
इतिहास:
इंग्रजांचे राज्य येण्यापुर्वी रतनगडास फार महत्व होते.अलंग,कुलंग,मलंग हे किल्ले आणि राजुर,सोकलीचा प्रदेश रतनगडाच्या अधिपत्याखाली येत होता.इ.स. १७६३ मध्ये जावजी या कोळी सरदाराच्या ताब्यात हा गड होता.कॅप्टन गोडार्डने या किल्ल्यावर १८२० मध्ये प्रत्यक्ष ताबा मिळवुन गडावरच आपला तळ ठोकला.पण त्याचा मुक्काम हलताच पूर्वीचा किल्लेदार गोविंदराव याने रामजी भंग्रियाच्या साथिने परत उठाव करुन रतनगड ताब्यात घेतला.
 
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:
 साधारण दीड दोन तासात रतनगडच्या खुटय़ाला वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. डावीकडे खोल दरीतील बाणच्या मुळका आपले लक्षवेधून घेतो. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालत गेल्यावर पायर्‍या लागतात. या कातळकोरीव पायर्‍यांबरोबरच कातळात कोरलेला त्रंबक दरवाजा आहे. या दमछाक करणार्‍या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. या प्रवेशदारात पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. अर्थात देवडय़ा, दरवाजा आणि पायर्‍या या सर्व कातळात कोरुन तयार केलेल्या आहेत. 

कुलंग, मदन, अलंगडाबरोबर महाराष्ट्राचे उत्तुंग शिखर कळसूबाईचे दर्शन घेवून आपण रतनगडाच्या नेढय़ाकडे चालू लागतो. नेठे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना नेढे आहे. गडाच्या पश्चिमकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात. त्याच्या उजवीकडे आजोबाचा विशाल पर्वत आणि त्याची लिंगी लक्षवेधी आहे. येथून जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे. याला राणीचा हुडा म्हणतात. इथे जवळच पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. इथे एक नंदी आणि शिवलींग पहायला मिळते.इथून जवळच गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजाच्या थोडे पुढे हनुमान दरवाजा आहे. जवळच कडय़ात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवी तांदळा आहे. कळसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते. म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे. 

गडावर जाण्याच्या वाटा:
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईची डोंगररांगआहे. या डोंगररांगेच्या दक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे.  
 आपल्याला आधी अहमदनगर ला जावे लागते . तेथून बस ने अकोले या गावी जावे लागते.  अहमदनगरच्या पश्चिम अंगाला अकोले हा तालुका आहे.
 
गडावर राहण्याची सोय : गडावरती राहण्यासाठी नाही .

जेवणाची सोय : येथे जेवणाची सोय नसल्याने जेवणाचे साहित्य आपण स्वतःच घेऊन
जावे लागते .

गडावर पाण्याची सोय :
गडावर जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे. याला राणीचा हुडा म्हणतात. इथे जवळच पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. तेथे  बारामाही पाणी असते .
 
जाण्यासाठी लागणारा वेळ : संपूर्ण गडफेरी करण्यासाठी आपल्याला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.

किल्ले कुंजरगड


 
किल्ल्याची उंची : ४५००  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
डोंगररांगः हरिश्चंद्राची रांग.
 श्रेणी : सोपी.
जिल्हा : अहमदनगर.

अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुका हा दुर्ग संपन्न तालुका आहे. कुंजरगड हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील एक गाव आहे. तेथे एक अपरिचित दुर्गरत्न म्हणजे कुंजरगड हे होय. कुंजरगडावर शिवाजी राजांनी मुक्काम केल्याची इ.स.१६७० मधील नोंद आहे.
माळशेज घाटापासून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असलेली ही डोंगररांग बालाघाट म्हणून ओळखली जाते. हरिश्चंद्रगडापासून सुरू होणारी ही रांग पूर्वेकडे बीड जिल्ह्यापर्यंत जाते. हीच रांग माळशेज घाट परिसरात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची सीमा विभागते. या रांगेमध्ये हरिश्चंद्रगडाच्या पूर्वेला कुंजरगड किल्ला दिमाखात उभा आहे.
कुंजरगड हा कोंबडा किल्ला या नावानेही ओळखला जातो. कुंजरगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. कुंजरगडाच्या जवळ फोफसंडी नावाचे लहानसे गाव आहे. हे गाव डोंगररांगेच्या माथ्यावर असलेल्या पठारी भागात वसलेले आहे.कुंजरगड समोर ठेवल्यास डावीकडे खिंड आहे. या खिंडीमधून विहीर गावाकडे जाणारी पायवाट आहे. कुंजरगडाच्या उजवीकडून गडावर जाणारा पायऱ्यांचा मार्ग आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
 गडाची तटबंदी, वाड्याचे अवशेष, पाण्याची टाकी, घरांची जोती असे गडपणाचे अवशेष पहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरून मुळा नदीचे खोरे विस्तृत दिसते. हरिश्चंद्रगड, कलाड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसूबाई रांगही दिसते.पायऱ्या उतरल्यावर तसेच थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेली गुहा लागते. गुहेच्या आतल्या कोपऱ्यात एक सापट तयार झाली आहे. विजेऱ्यांच्या उजेडात सावधगिरीने या सापटीत शिरावे लागते. सुरवातीला काही अंतर रांगत जाऊन नंतर झोपून डावीकडे वळावे लागते. जमिनीलगत असलेल्या लहान भोकातून डोके आत घालून सर्व शरीर आत ओढून घ्यावे लागते. येथून आत शिरल्यावर पुढे हे भोक मोठे होत जाते. भोकाच्या टोकाला चार पाच जण उभे राहू शकतात. हे भोक कुंजरगडाच्या कड्यावर उघडत असल्याने येथून खालची दरी आणि निसर्ग उत्तम दिसतो.
गडावर जाण्याच्या वाटा :
गडावर जाण्यासाठी दोन प्रमुख वाटा आहे.
• फोफसंडी हे एक दुर्गम गाव आहे. तिथे पुणे-आळेफाटा-ओतूर मार्गे जाता येते. किंवा अकोले- कोतुळ मार्गे जाता येते. या गावापासून उत्तर दिशेला किल्ला आहे. पाऊलवाटेचा उपयोग करून किल्ल्यावर जाता येते.
• अकोले तालुक्यातील कोतुळमार्गे विहीर गावात पोहचून येथील पाऊलवाटेने जाता येते.

गडावर राहायची सोय : गडावर राहण्याची सोय नाही, परंतु तंबू किंवा तत्सम साहित्य नेल्यास मुक्काम करता येतो.

गडावर पाण्याची सोय : गडावर पाण्याची टाकी असून हिवाळ्याच्या शेवटपर्यंत पाणी उपलब्ध असते.
गडावर जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.

हरिश्चंद्र गड

हरिश्चंद्र गड किल्ला पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती. सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत.खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने तिचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. राष्ट्रीय महामार्ग २२२ असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होऊ शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.
हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूला इंग्रजी यू आकाराची खिंड आहे. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा आहे. पायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणार्‍या वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो. येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बर्‍याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या मार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो. येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा,जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड,भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड, कुंजरगड असे किल्ले दिसतात.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे –
कोकणकडा – या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा म्हणून ओळखला जातो. हा कडा इंग्रजीतील यु ‘U’ आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसुन बाह्य गोल आकाराचा आहे. समोरुन बघितला तर नागाच्या फण्यासारखा हा कडा दिसतो. कड्याच्या माथ्यावर झोपूनच याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो.
महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साईक्सला इंद्रवज्र दिसले होते.
तारामती शिखर – तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. उंची साधारणतः ४८५० फूट्.. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात. माथ्यावर दोनतीन शिवलिंगे आहेत.