कोणतही शिवकाव्य येथे शोधा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

|| किल्ले रसाळगड ||


रसाळगड
किल्ल्याची ऊंची : १७७० मी .
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग .
डोंगररांग : रत्नागिरी ,कोकण.
 श्रेणी : मध्यम.
जिल्हा : रत्नागिरी.
सह्याद्रीची रांग उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे जाताना रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग आपले लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोर्‍यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंद गड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
रसाळगडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस एक ते दीड तास लागतो. रसाळवाडीतून किल्ल्यावर शिरतानाच वाटेत दोन दरवाजे लागतात. पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच तटातील मारुतीचे दर्शन होते. वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसर्‍या दरवाजात पोहोचतो. या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते. तोफा हे या किल्ल्यांचे मोठे वैशिष्ट्यच आहे. किल्ल्यावर लहानमोठ्या मिळून सुमारे १६ तोफा आहेत.
संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच होय समोरच झोलाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. कोनाड्यात अनेक सापडलेल्या मूर्त्या ठेवल्या आहेत. मंदिराच्या समोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. समोरच एक तोफ सुद्धा ठेवलेली आहे. मंदिराच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला शिवाचे छोटेसे मंदिर आहे. पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा आहे , यालाच बालेकिल्ला म्हणतात. यात वाड्यांचे मोठ्या प्रमाणावर अवशेष आहेत. बुरूजावर तोफा आढळतात. येथून समोरच एक दगडी बांधकाम असलेली खोली आढळते. हे धान्य
कोठार असावे असे वाटते. बालेकिल्ल्याच्या जवळच आणखी एक पाण्याचा तलाव आहे. या दोन्ही तलावात बारामही पाणी असते. किल्ल्याच्या नैऋत्य भागात एक नंदी आहे. मात्र येथे शिवाची पिंड आढळत नाही. किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठ्या प्रमाणावर आहेत, म्हणजे हा किल्ला पूर्वी मोठ्या प्रमाणावर नांदता असावा.

गडावर  पोहोचण्याच्या वाटा :

१) वाडीबीड गावातून :-
खेड वरून वडगाव बिरमणी कडे जाणारी बस पकडायची आणि वाटेत असणार्‍या हुंबरी फाट्यावर उतरायचे. हुंबरी फाट्यापासून थेट बीड गावात जाणारी वाट पकडायची. साधारणत: बीड गावात पोहोचण्यास एक तास लागतो. वाडीबीड गावातून गडावर जाण्यास मळलेली वाट आहे. या मार्गाने किल्ल्यावर पोहचण्यास दीड तास लागतो.
) रसाळवाडी मार्गे:-
खेड वरून निमनी गावात जाण्यासाठी बसेस सुटतात. निमनी गावात उतरून एका तासात रसाळवाडी मार्गे किल्ला गाठता येतो. वाट अत्यंत सोपी आहे.
) मौजे जैतापूरहून - रसाळवाडी मार्गे :-
खेड वरून मौजे जैतापूर गावात जाणारी एस टी पकडावी. मौजे जैतापूरहून रसाळवाडी मार्गे दोन तासात रसाळगड गाठावा. वाट अत्यंत सोपी आहे.

गडावर राहाण्याची सोय : झोलाई देवीच्या मंदिरात ३० ते ४० माणसे राहू शकतात.

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत करावी

पाण्याची सोय : गडावर पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे.

गडावर  जाण्यासाठी लागणारा वेळ :
रसाळवाडीतून गडावर जाण्यास १ तास लागतो.

किल्ले सुवर्णदुर्ग



इतिहास
इ.स.१६६० मध्ये महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याची डागडुजी केली.दर्याराजे कान्होजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गाच्या बळावर सागरावर आपले वर्चस्व गाजविले.सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग हर्णेच्या बंदराजवळ वसलेला आहे.

 
किल्ल्याच्या महाद्वाराजवळ पायरीवर कासवाचं शिल्प आहे, तर उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मुर्ती कोरलेली आहे.प्रवेशद्वाराच्या आत पहारेकराच्या दोन देवड्या आहेत.सुवर्णदुर्गाच्या आत विहिरी तसेच पडझड झालेले वाड्याचे अवशेष आहेत.
   
 suvarnadurga3    


 suvarnadurga4        
गडावरची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत उभी आहे.गडावर एकून सात विहिरी आहेत.सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या किनार्‍यावर आणखी तीन सागरी दुर्गांची उभारणी करण्यात आलेली आहे,ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग,फत्तेदुर्ग आणि गोवागड.सुवर्ण दुर्गाच्या किनाऱ्यावर या दुर्गाचे दर्शन होते.एका तासात किल्ला पाहून होतो.
 


गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था
मुंबई-गोवा महामार्गावर खेड ला उतरावे.तेथून दापोलीहून हर्णला.हर्णे बंदरातून,होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटं लागतात.गडावर राहण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही,जेवणाची व्यवस्था स्वत: करावी.
suvarnadurga9
 

किल्ले भरतगड



इतिहास
भरतगड किल्ल्याचे बांधकाम सावंतवाडीकर फोंड सावंत यांनी इ.स. १६८० मध्ये केली.वाडीकर फोंड सावंत यांनी किल्ल्यावर पाणी लागल्यानंतर किल्ल्याची बांधणी केली.पुढे तुळाजी आंग्रे यांनी भरतगड किल्ला जिंकला.पुढे इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात किल्ला गेला.

   
भरतगडाचे दार भग्नावस्थेत आहे. तटबंदीची सुद्धा खूप प्रमाणात पडझड झालेली आहे. गडावर घनदाट वनराई आहे.गडावर मुख्यत: काजू व आंब्याच्या बागा आढळतात.
 
   bharatgad1   


          bharatgad4       
भरतगडावर २०० फूट खोल विहीर आहे.या विहीरीच्या तळाशी असलेल्या गुप्त दरवाजातून थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाता येते. भरतगडाचे वैशिट्य म्हणजे गडावर मंदीर आणि मशीद शेजारी आहे.गड पाहावयास एक तास पुरेसा आहे.
   


गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था
भरतगडाला भेट देण्यासाठी गडाजवळचे मसूरे गाव गाठावे लागते.मालवण ते मसूरे अंतर १५ कि.मी. आहे. गडावर राहण्याची तसेच खाण्याची व्यवस्था नाही.पिण्याचे पाणी सोबत घ्यावे.
Bharatgad
 

किल्ले बाणकोट



इतिहास
प्राचीन कालखंडात मंदारगिरी या नावाने बाणकोटचा उल्लेख आहे.आदिलशहाकडून हा गड शिवरायांनी जिंकून घेतल्यानंतर किल्ल्याचे हिंमतगड असे नामकरण केले. संभाजीराजांच्या वधानंतर पुढे बाणकोट जंजिरेकर सिद्धीच्या ताब्यात गेला.

   
पेशवाईच्या कालखंडामध्ये सन १७३३ साली बंगाजी महाडिक यांनी बाणकोट मराठ्यांच्या ताब्यात आणला. सन १७३४ मध्ये सिद्धीने हा किल्ला परत काबीज केला.पुढे पिलाजी जाधव यांनी हा किल्ला जिंकला त्यानंतर याचा ताबा आंग्रेकडे आला. १७५६ मध्ये आंग्रेंच्या पराभवानंतर पेशवे व इंग्रज यांच्यात तह झाला व बाणकोट इंग्रजांना मिळाला.
  
 bankot1     


 bankot5         
किल्ल्याची तटबंदी ७० मीटर रूंद व ३० मीटर उंच असून किल्ल्याचे दोन भव्य बुरुज उत्तराभिमुख आहेत. किल्ल्यातून आत प्रवेश केल्यानंतर पहारेकरांच्या प्रशस्त देवड्या दिसतात तेथून किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी दगडी जिना बांधलेला आहे.किल्ल्यावर खंदक,चोर दरवाजा,दारू कोठार आहे.गडावर दगडमातीने बुजलेली विहीर आहे.
 


गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था

रत्नागिरीहून मंडणगड मार्गे बाणकोटला जाता येते तसेच हरिहरेश्वरहून वागमांडला येऊन तेथून बोटीने साधारणत: अर्ध्या तासात बाणकोटला जाता येते. गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही,जेवणाची सोय स्वत: करावी.
bankot8
 

किल्ले पूर्णगड



रत्नागिरी जिल्ह्यामधील मुचकुंदी नदीच्या जवळ पूर्णगड किल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे.गडाच्या दक्षिणेला मुचकुंदी नदीची खाडी असून पश्चिम बाजूस सागर किनारा आहे.गड एका लहानश्या टेकडीवर आहे,किल्ल्याच्या पूर्व उतारावर पूर्णगड नावाचे गाव वसलेले आहे.

 purnagad1    इतिहास
 
सदर किल्ला हा छत्रपती शिवरायांच्या कालखंडात बांधला गेला आहे.छत्रपती शिवरायांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड म्हणून ओळखला जातो.काही इतिहासकारांच्या मते किल्ल्याच्या लहान आकारा वरून यास पूर्णगड हे नाव पडले.


   
किल्ल्यावर नक्षीकाम केलेला सुंदर असा दरवाजा आहे, दरवाज्यावर गणेश तसेच चंद्र-सूर्याची शिल्पे आहेत. किल्ल्याच्या दाराजवळ मारुतीचे सुंदर असे मंदिर आहे.मुख्य प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवडय़ा आहेत, येथून तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवरुन संपूर्ण गडाची फेरी मारता येते.
 
 purna   


purna4     
गडावरील काही तटबंदी ढासळलेली आहे,पण बहुतेक तटबंदी अजूनही भक्कम अशी आहे.किल्ल्याला पश्चिमेच्या बाजूस एक लहानसा सुंदर असा दिंडी दरवाजा आहे.



गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था
गडावर पाण्याची सोय नाही,गडापासून जवळच्या अंतरावर असलेल्या पावसच्या आश्रमात जेवणाची तसेच राहण्याची व्यवस्था होऊ सकते.रत्नागिरीपासून पावस ते पूर्णगड अंतर तीस कि.मी आहे.तर राजापूर पासून पंचेचाळीस कि.मी आहे.
purna5
 

किल्ले निवती




तिहास
निवती किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवरायांच्या कालखंडात झाली,सन १७४७ साली हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला.पोर्तुगीजांच्या ताब्यातून हा किल्ला सावंतवाडीकर फोंड सावंत यांच्या ताब्यात आला.पुढे करवीर कोल्हापूर संस्थानाच्या ताब्यात हा किल्ला आला.सन १८१८ साली इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला आला.

 
सध्या किल्याची मोठी पडझड झाली आहे.याची साक्ष आहे किल्ल्यावरची ढासळलेली तटबंदी व बुरूज.किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्राचे मनमोहक रूप दिसते.किल्ल्याच्या मागल्या बाजूला देवबाग आणि भोगावेचा पांढराशुभ्र किनारा दिसतो.तर समोरून निवतीच्या वाडीचा निळा समुद्र डोळ्याचे पारणे फेडतो.
  
 nivti5    


   nivti6    
डॉल्फिन दर्शन हे निवतीचे आकर्षण आहे,निवतीच्या किनाऱ्यावरुनही डॉल्फिन दर्शन होते.अर्ध्या तासात सगळा किल्ला पाहून होतो.
गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था

निवती गावात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मान्यता दिलेल्या ठराविक अशा घरांमधून अस्सल कोकणी वातावरणाचा अनुभव घेत मुक्काम करता येईल. ताजे मासे आणि त्याला सोलकढीची जोड, कोल्हापूरी भाषेत बोलायचे तर नाद खुळा, असे कोकणी जेवण येथे मिळते.शाकाहारी पर्यटकांसाठीही चांगली व्यवस्था आहे.पुणे-कोल्हापूर-कणकवली-कुडाळ-निवती,मुंबई-चिपळूण-कुडाळ-निवती तसेच पणजी-शिरोडा-वेंगुर्ले-मार्गे निवतीला पोहचू शकता.
nivti11
 

किल्ले जयगड



इतिहास
 
जयगड किल्ल्याचे बांधकाम अदिलशाहाच्या कालखंडात झाले आहे.छत्रपती शिवराय तसेच सरखेल कान्होजी आंग्रेच्या कालखंडात जयगड किल्ल्यास वैभव प्राप्त झाले होते. या किल्ल्यामुळे रत्नागिरी जवळच्या समुद्रात मराठ्यांचा दबदबा निर्माण झाला होता.

   
सन १७५६ साली इंग्रजांच्या मदतीने जयगड किल्ला पेशव्यांनी जिंकला त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील मराठ्यांचा वचक कमी झाला,नानासाहेब पेशवा व आंग्रे यांच्यातील भांडणाचा इंग्रजांनी फायदा करून घेत आपले सामर्थ्थ कोकण किनारपट्टीवर वाढविले.
 
   jaigad4  


   jaigad5    
किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत अवस्थेत उभी आहे.किल्ल्यावर अंदाजे पन्नास फूट खोल विहिर आहे.समुद्राच्या जवळ असलेल्या या विहिरीचे पाणी गोड आहे.किल्ल्यावर दारूगोळ्याची कोठारे तसेच पहारेकर्‍यांच्या देवड्या आढळतात.संपूर्ण गड पाहण्यास एक तास पुरेसा आहे.
  
गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था

रत्नागिरीहून जयगडला बससेवा उपलब्ध आहे.हे अंतर एक तासाचे आहे.गडावरील गणपतीच्या मंदिरात राहण्याची व्यवस्था होऊ शकते.गडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही,जेवणाची सोय स्वत: करावी.
jaigad15
 

किल्ले कणकदुर्ग



इतिहास
 
सुवर्णदुर्गावर मारा करण्यासाठी सिध्दीने कणकदुर्ग व फत्तेगड बांधले असावे असे इतिहासकारांचे मत आहे.सध्या कणकदुर्ग उध्वस्त अवस्थेत उभा आहे.गडावर प्रवेश केल्यानंतर एक भक्कम बुरूज आढळतो.

   
गडावर सध्या दीपगृह उभारले आहे.गडावरून खाली येताना पाण्याची टाकी दिसतात.गड पाहण्यासाठी वीस मिनिटे पुरेसे आहेत.
   
   kanakdurga2  


  kanakdurga1     kankdurga  


गडावर जाण्या-येण्याची तसेच राहण्या-खाण्याची व्यवस्था

मुंबईहून खेड मार्गे दापोली येथे यावे,तेथून हर्णे साठी बससेवा उपलब्ध आहे.हर्णे बंदराच्या किनाऱ्याजवळ कनकदुर्ग आहे.
kanakdurga4

सिंधुदुर्ग किल्ला



सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३ गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत त्यांची नावे दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्यामध्ये महाराश्ट्रातील एकमेव शिवाजी महाराजांचे शंकराच्या रुपातील मंदीर आहे याची स्थापना ‍राजाराम महाराजांनी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वर्‍हाड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनार्‍याची पाहणी झाली. इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळे कभिन्न खडक किल्ल्यांसाठी आणले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्यकृती आणि दुसरीकडे चंद्रकृती कोरुन त्या जागी महाराजांनी पूजा केली. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले.
शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे :
“चौर्‍याऐंशी बंदरात हा जंजीरा, अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केला ।  सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा ।  जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार । चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।”
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते. हे द्वार भक्कम असे उंबराच्या फळ्यांपासून केले आहे. उंबराच्या लाकडाचा उपयोग दीर्घकाळ टिकण्यासाठी होतो. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. आत गेल्यानंतर मारोतीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर १५ मैलांचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरिमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २२८ फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवरुन तो ध्वज सहज दृष्टिस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत.
गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदूका टांगण्यासाठी तटाला भोके ठेवली आहे. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे, हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.
पाण्याची सोय – मुख्य म्हणजे किल्ला परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे. यामुळे किल्ल्यावर रहाणे सुलभ झाले आहे. तिथे पिण्याच्या पाण्यासाठी त्यावेळी तीन विहीरींचे बांधकाम केलेले आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला व कपडे धुण्यासाठी होतो.