कोणतही शिवकाव्य येथे शोधा

अंमळनेरचा किल्ला


प्रकार: भुईकोट
चढाईची श्रेणी: सोपी
जवळचे गाव: अंमळनेर, पारोळा, जळगाव
अंमळनेर हे बोरी नदीकाठी वसलेले जळगाव जिल्ह्यातील मोठे शहर आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी नगरदूर्ग होता; म्हणजे शहराला तटबंदी व बुरुज बांधून संरक्षित केलेले होते. या शहराच्या एकाबाजूस बोरी नदीचे पात्र असल्यामुळे नैसर्गिक संरक्षण होते. ते भक्कम करण्यासाठी नदीच्या बाजूस ही तटबंदी व बुरुज बांधण्यात आले होते. शहराच्या उरलेल्या तीन बाजूस ३ दरवाजे व २० फुटी तटबंदी होती.इतिहासअंमळनेर हा नगरदूर्ग कोणी व कधी बांधला याचा इतिहास उपलब्ध नाही. इस १८१८ मध्ये हा किल्ला पेशव्यांचा प्रतिनिधी माधवराव यांच्या ताब्यात होता. पेशव्यांच्या आज्ञेप्रमाणे माधवरावाने किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात देण्याचे ठरविले, पण किल्ल्याचा जमादार अली व त्याच्या हाताखालची अरब फलटण यांनी या गोष्टीला विरोध केला. ब्रिटीश कर्नल हस्कीन्सन मालेगावहून भिल्ल बटालीयन घेऊन अंमळनेरवर चालून आला. त्याने नदीच्या पूर्वेकडून किल्ल्यांवर तोफांचा मारा केला. अली जमादार व त्याच्या सैन्याने प्रयन्तांची शर्त केली. पण ब्रिटीशांनी चारही बाजूंनी त्यांची कोंडी केली होती. दक्षिणेकडील बहादरपूर किल्ल्यावरुन येणारी रसद (व दारुगोळा) ब्रिटीशांनी तो ताब्यात घेतल्यामुळे बंद झाली त्यामुळे अली जमादार व त्याच्या सैन्याने नदीच्या पात्रातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयन्त केला, पण ते सर्वजण इंग्रजांचे कैदी बनले.
पहाण्याची ठिकाणे: अंमळनेर हा नगरदूर्ग होता. आता या शहराची वाढ झाल्यामुळे मुळच्या किल्ल्यावर त्याने अतिक्रमण केले आहे. अंमळनेर शहरातच किल्ल्याचा २० फूट उंच बुलंद दरवाजा व त्याबाजूचे भक्कम बुरुज उभे आहेत. या दरवाजाखालून जाणारा रस्ता बोरी नदी काठावरील संत सखाराम महाराजांच्या समाधी मंदीराकडे जातो. या बाजूने बोरी नदीच्या पात्रात उतरल्यावर किल्ल्याची तटबंदी व त्यावर स्थानिकांनी चढवलेली घरे दृष्टीस पडतात. उजव्या हाताला एक बुरुज दिसतो. नदीवरुन प्रवेशद्वाराकडे परत येताना रस्त्यात देशमुखांचे लाकडी नक्षीकाम असलेले सुंदर दुमजली घर आहे.
पोहोचण्याच्या वाटा: अंमळनेर हे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर रस्त्याने व रेल्वेमार्गाने देशाशी जोडलेल आहे.amalner_fort