कोणतही शिवकाव्य येथे शोधा

सोलापूर जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सोलापूर जिल्हा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोलापूरचा भुईकोट


किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
चढाईची श्रेणी: सोपी
जिल्हा: सोलापूर
मुंबई-हैद्राबाद हा महामार्ग सोलापूर शहरातून जातो. सोलापूर शहरात भुईकोट प्रकारचा किल्ला आहे. हा किल्ला ‘सोलापूरचा भुईकोट किल्ला’ म्हणून ओळखला जातो.मध्यकालीन इतिहासामध्ये सोलापूरच्या किल्ल्याला अतिशय महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. बहमनींच्या राज्याची शकले उडाल्यावर त्यातून पाच शाह्या निर्माण झाल्या. या पाच शाह्यांनी आपली वेगळी चूल मांडली. या पाचही राजवटीच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूरचे भौगोलिक स्थान होते. त्यामुळे सोलापूरचे महत्त्व वाढले.इतिहाससोलापूरचा किल्ला नेमका कोणी बांधला या बाबत अजूनही तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता आढळत नाही. काहींच्या मते हिंदू राजांच्या काळात बांधलेल्या या किल्ल्याभोवती महमूद गावान याने दुसरी तटबंदी बाहेरून बांधून किल्ला अभेद्य केला. महमूद गावान हा बहमनी सुलतान महंमदशाह याचा दिवाण होता.इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सोलापूरचा किल्ल्या अनेक राजवटीचे आश्रय स्थान होता. या ऐतिहासिक घटनांमध्ये एक गमतीशीर मजाही आहे. ती म्हणजे सोलापूरचा किल्ल्ला हा लग्नामध्ये हुंडा म्हणून दिल्याची नोंद आहे. ही नोंद एकदा नाही तर दोन वेळा आहे.अहमदनगर येथे बुऱ्हाण निजामशहा गादीवर होता. तर विजापूर येथे इस्माईल आदिलशहा सत्तेवर होता. त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एक विवाह संबंध घडवून आणण्यात आला. आदिलशहाच्या कन्येला बुऱ्हाण निजामशहाला देऊन हा लग्नसमारंभ धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. हा विवाह सोलापूरच्या किल्ल्यामध्ये झाला. त्यावेळी म्हणजे, इ.स. १५२३ मध्ये हा किल्ला विजापूरच्या ताब्यात होता. जावयाला हुंडा म्हणून सोलापूरचा किल्ला देण्याचे आदिलशहाने जाहीर केले होते. पण विवाहानंतर आदिलशहाने हा किल्ला देण्याचे नाकारले. त्यातून पुढे निजामशहा आणि आदिलशहा यांच्यात युद्धही झाले. या युद्धात जावई निजामशहाचा पराभव झाला. दुसऱ्यावेळी इ.स. १५५२ मध्ये अहमदनगरची राजकन्या चांदबिबी अली आदिलशहाला देण्यात आली. तर अली आदिलशहाची बहीण हदिया सुलताना हिचा विवाह मुतर्जा निजामशहाशी करण्यात आला. तेव्हा मात्र कबूल केल्याप्रमाणे निजामशहाने हा किल्ला विजापूरच्या सुलतानाला हुंडा म्हणून दिला.सोलापूरचा किल्ला बहमनी, आदिलशाही, निजामशाही नंतर मोगल सत्तेत आला. औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याचा बराच काळ या किल्ल्याच्या परिसरात गेला. पुढे हैदराबादच्या निजामाच्या आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला गेला.
किल्ल्यावर पाहण्यासारखे : सोलापूरचा किल्ला दुहेरी तटबंदीचा आहे. खंदकाच्या आत असलेल्या या दुहेरी तटबंदीमुळे सोलापूरचा किल्ला अभेद्य आणि बलदंड झालेला आहे. याच्या बाहेरील तटबंदीमध्ये चार कोपऱ्यांवर चार बलदंड बुरूज आहेत. या बुरुजांना एकमेकांना जोडणाऱ्या तटबंदीमध्ये आणखी २२ बुरूज बांधून बुरुजांची एकभक्कम साखळीच निर्माण करण्यात आली. साधारण तीस फूट उंचीची तटबंदी असून त्यावर जागोजाग माऱ्यासाठी केलेल्या जंग्या दिसतात. बुरुजांवर तोफा ठेवण्याची सोय करण्यात आली आहे.बाहेरील भक्कम तटबंदीच्या आत असलेली दुसरी तटबंदी उंच आहे. याच्याही चार कोपऱ्यांवर चार बुरूज असून ते अधिकच उंच बांधण्यात आलेले आहेत. या बुरुजांवरून दूरवर टेहळणी करता येत असे. किल्ल्याच्या एका बाजूला सिद्धेश्वर तलावामुळे नैसर्गिकपणा आला आहे.सोलापूरचा किल्ला हा पुरातत्त्वखात्याच्या अखत्यारीत आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. किल्ला आणि त्याचा परिसर सुशोभित केलेला आहे. किल्ल्याचे दरवाजे अतिशय भक्कम असून शहर दरवाजा, हत्ती दरवाजा, खाती दरवाजा अशा नावानी ते ओळखले जातात. किल्ल्यामध्ये ध्वस्त झालेले मंदिर तसेच अनेक इमारतीचे अवशेष पहायला मिळतात. नागबावडी विहीर आणि इंग्रजकालीन तोफा ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.इतिहास आणि भक्कम बांधकाम यामुळे सोलापूरचा किल्ला आपल्या स्मरणात राहतो.solapur

अकलूजचा किल्ला


किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
डोंगररांग: डोंगररांग नाही
चढाईश्रेणी: सोपी
जिल्हा: सोलापूर
तालुका: माळशिरस
अकलूज शहरात नीरा नदीच्या काठावर अकलूजचा किल्ला उभा आहे. दोन बलदंड बुरुजांच्या मधोमध पश्चिमाभिमुख महादरवाजा. दाराशी दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन घोडेस्वार, माहुतासह एक हत्तीदेखील. दरवाजावर जरीपटका मिरवणारा नगारखाना- ज्यात शिंग, तुतारी आणि नगारा वाजवणारे. भोवती सैनिक-चौकीदारांचा पहारा.. हे कुठल्या ऐतिहासिक कथा-कादंबरी वा मालिकेतले वर्णन नाही तर एका ऐतिहासिक भुईकोटाचे हे वास्तव दर्शन आहे.१९७४ पर्यंत अकलूजचा हा भुईकोट अन्य ऐतिहासिक वास्तूंप्रमाणेच एक खिंडार बनले होते. पडलेले तट व बुरूज, माजलेली झाडे आणि प्रातर्विधीपुरता लोकांचा उरलेला संबंध अशी या वास्तूची दुरवस्था होती. परंतु तत्कालीन सरपंच आणि विजयसिंह मोहितेंचे बंधू जयसिंह मोहिते-पाटील यांनी ही दुरवस्था दूर करण्याचे ठरविले. ग्रामपंचायतीची मदत व श्रमदानातून काम सुरू झाले. ढिगाऱ्यांची सफाई झाली. तट-बुरुजांची दुरुस्ती झाली. मोकळ्या जागी बाग, कारंजी अवतरली. आणि मध्यभागी एका उंच टेहळणी बुरुजावर छत्रपतींचा अश्वारुढ पुतळाही उभारला गेला. पाहता पाहता या खिंडाराचे पुन्हा धारातीर्थ बनले. आता ३५ वर्षांनंतर अकलूजच्या या धारातीर्थावर महाराष्ट्राच्या गौरवशाली शिवकथेने पुन्हा एकदा आपला डाव मांडला आहे.शिवजन्म ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा हा प्रवास. २० शिल्पपट, शिवजन्म व राज्याभिषेकाचे दोन मोठाले देखावे, शिवरायांच्या गडांच्या प्रतिकृती यांतून ही शिवसृष्टी उलडगली आहे.इतिहासअकलुज हे नाव ग्रामदेवता श्री अकलाई देवीच्या नावावरुन पडले आहे. इतिहासप्रसिद्ध असा हा किल्ला इ. स. १२११ मध्ये यादवराजा सिंघन याने बांधलेला आहे. आदिलशाही, मोगल, मराठे आदी सत्ता इथे नांदल्या. औरंगजेब १४ डिसेंबर १६८८ ते १५ फेब्रुवारी १६८९ या काळात इथे मुक्कामाला होता. या काळातच त्याला छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याची बातमी कळली तेव्हा त्याने अत्यानंदाने अकलूजचे नामकरण ‘असदनगर’ असे केले. छत्रपती संभाजी महाराज, दुसरे बाजीराव आणि ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांचेही मुक्काम या भुईकोटाने अनुभवले.पहाण्याची ठिकाणेकिल्ल्यात शिरताना निर्माण केलेले फायबरच्या हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे आपले स्वागत करतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून त्यात विवीध वादकांचे पुतळे बसविलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस चालत गेल्यावर किल्ल्याच्या तटबंदीवर शिवाजी महाराजांच्या जीवन चरीत्रावर आधारीत फायबरची भित्तीचित्रे ( म्युरल्स् ) पाहायला मिळतात. यातील पहिली तीन म्युरल शिवजन्माशी संबंधीत आहेत. त्यानंतर शिवनेरी वरली शिवजन्मस्थानाच्या महालाची प्रतिकृती बनविली असून त्यात शिवाजी महाराजांच्या बारशाचा देखावा उभा केलेला आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगावर आधारीत म्युरल्स् व त्यांच्या बाजूला प्रसंगाची माहिती या गोष्टी पाहायला मिळतात. म्युरल्स् मधील बारकावे, व्यक्तींच्या चेहर्यावरील भाव, आवेश पहाण्यासारखे आहेत. सर्वात शेवटी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा देखावा मोठ्या दालनात साकारला आहे. त्यातील प्रत्येक मुर्तीचा पेहराव, त्यांची रंगसंगती, चेहर्यावरील भाव, डोळे पहाण्यासारखे आहेत.किल्ल्याच्या मधोमध असणार्या उपल्या बुरुजावर (या बुरुजाचा वापर टेहळणीसाठी करण्यात येत असावा.) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविलेला आहे. जिन्याने तिथपर्यंत जाऊन किल्ल्याच्या व आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहाता येते. याच बुरुजावर एका बाजूला दोर लावून बुरुज सर करणारे मावळे दाखवले आहेत. तर दुसर्या बाजूस शेकोटी पेटवून पहार्यावर बसलेले मावळे रामोशी दाखविलेले आहेत.किल्ल्याच्या तटावर विविध जाती धर्माचे मावळे आपापल्या पेहरावातील वैशिष्ट्यासह उभे केलेले आहेत. यात तोफची, मशालजी, तिरंदाज, पहारेकरी, रामोशी ईत्यादींचा समावेश आहे. हे पुतळे पाहात किल्ल्याच्या तटबंदीवर फिरुन नंतर प्रवेशद्वारापाशी असलेल्या संग्राहलयात जावे. या संग्राहालयासमोर हत्तीवरुन दवंडी देणार्या मावळ्याचा पुतळा उभारलेला आहे. संग्राहलयात महत्वाच्या किल्ल्यांच्या फायबरमधील प्रतिकृती बनविलेल्या आहेत. त्यात राजगड, रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, प्रतापगड, देवगिरी यांचा समावेश आहे.किल्ल्यात ठिकठिकाणी हिरवळ, फुलझाडे व कारंजी आहेत. त्यामुळे किल्ल्याचा फेरफटका नेत्रसुखद होतो. किल्ल्यातून बाहेर पडून नदीकाठाने बुरुजाला लागून असलेल्या वाटेने गेल्यास तटबंदीतील विरगळ व इतर पूरातन अवशेष पाहाता येतात.
पोहोचण्याच्या वाटा : अकलूज हे सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचे शहर रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे.१) पुणे – अकलूज अंतर १६६ कि.मी आहे.२) पुणे – सोलापूर मार्गावरील इंदापूर येथून अकलूजला जाणारा फाटा आहे.३) सोलापूर पंढरपूर(३५ कि.मी.) अकलूज आहे.
सूचना : किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी तिकीट काढावे लागते. किल्ला सकाळी १०:०० ते १:३० व संध्याकाळी २:३० ते ६:३० पाहाण्यासाठी उघडा असतो. संध्याकाळी लाईट आणि साउंड शो असतो, परंतू त्यासाठी किमान २५ प्रेक्षक असणे आवश्यक आहे.akluj

पिलीवचा किल्ला


किल्ल्याची ऊंची: १०० फुट
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
चढाई श्रेणी: सोपी
जिल्हा: सोलापूर
तालुका: माळशिरस
माळशिरस तालुक्यात पंढरपूरच्या वाटेवर पिलीव नावाचे एक गाव आहे. गावाच्या मागील टेकडीवर पिलीवचा किल्ला आहे. किल्ल्याचा एकंदरीत आकार पाहाता ही गढी असावी. किल्ला सुस्थितीत असून किल्ल्याच्या आतमध्ये वस्ती आहे.
किल्ल्यावर पहाण्याची ठिकाणे: किल्ल्याच्या चारही टोकाला भव्य बुरुज आहेत. बुरुजांवर व तटबंदीवर जागोजागी जंग्या आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूस पहारेकर्यांसाठी असणार्या देवड्या पाहायला मिळतात. प्रवेशद्वारासमोरच एक पडझड झालेली वास्तू आहे. या वास्तूच्या दरवाजातून आत शिरुन उजव्या हाताला गेल्यास बुरुजाखाली बनवलेली एक मोठी खोली पाहायला मिळते. या खोलीला दोन झरोके आहेत. बुरुजाखालील या खोलीत बसून टेहाळणी केली जात असावी. सध्या वटवाघळांची वस्ती या खोलीत आहे. हा बुरुज पाहून पुन्हा प्रवेशद्वारापर्यंत येऊन डाव्या हाताला थोडेसे चालत गेल्यावर तटबंदीवर जाणारा जीना लागतो. या जीन्याने फांजीवर आल्यावर बुरुजावर जाता येते. चारबाजूच्या चार भव्य बुरुजांवर जाण्यासाठी अरुंद दरवाजा आहे. या दरवाजातून पायर्या चढून बुरुजावर जाता येते. या बुरुजाचा घेर १२ मीटर आहे. बुरुजावरील ५ फुट उंचींच्या तटबंदीत जागोजागी जंग्या व तोफांसाठी झरोके केलेले आहेत. बुरुजाच्या दुसर्या बाजूला फांजीवर उतरण्यासाठी अरुंद दरवाजा व जीना आहे. मधल्या बुरुजावर एक छोटी ४ फुटी तोफ आहे. किल्ल्यात वस्ती असल्यामुळे बाकीचे जुने अवशेष आता नामशेष झाले असावेत.
पोहोचण्याच्या वाटा : सातारा – पंढरपूर मार्गावर सातार्यापासून १०६ किमी व पंढरपूर पासून ४० किमी वर पिलीवगाव आहे. तर दहिवडी पासून पिलीव ४८ किमी वर आहे. पिलीव गावातील सुभाष चौकातून डाव्या हाताचा रस्ता एका टेकडीवर जातो. या टेकडीवरच पिलीवचा किल्ला आहे.piliv

मोहोळचा किल्ला


किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
जिल्हा: सोलापूर
तालुका: मोहोळ
मोहोळ हे माढ्याच्या आग्नेयेस सुमारे २० मैलांवर पुणे-सोलापूर रस्त्यावर आहे, हे गाव फार जुने आहे. येथे एक जुना भुईकोट किल्ला आहे. येथे मराठ्यांच्या अमदानीत मोहोळ सुभ्याची कचेरी असे. मोहोळच्या भुईकोटाच्या तटबंदी सुस्थितीत असून त्यात जागोजागी देवड्या केलेल्या आहेत. मुख्यद्वार हे वाड्याच्या दरवाज्याप्रमाणे बांधलेले असून चांगल्या स्थितीत आहे.याखेरीज येथील देशमुखांनी सुमारे २०० वर्षांपूर्वीं बांधलेले दोन पडके वाडे देखील मोहोळ येथे आहेत.मोहोळ मध्ये भानेश्वर व नीलकंठेश्वर अथवा चंद्रमौळी यांची दोन देवालये असून ती हेमाडपंताने बांधली असे म्हणतात.mohol

सांगोला किल्ला


किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
श्रेणी: सोपी
जिल्हा: सोलापूर
तालुका: सांगोला
महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण.सोलापूर व पंढरपूरच्या नैऋर्त्येस अनुक्रमे ८२ व ३१ किमी. वर सांगोला किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. दक्षिणमध्य रेल्वेच्या कुर्डवाडी-मिरज लोह-मार्गावरील हे एक स्थानक आहे. सांगोला किल्ला आदिलशाही काळात (१४८९–१६८६) बांधला गेला असून तत्कालीन कागदोपत्री सांगोला एक भरभराटीचे स्थान मानले जाई. त्यामुळे त्याची ख्याती ‘सोन्याचे सांगोला’ अशी होती.आदिलशाहीच्या पतनानंतर (१६८६) किल्ला मोगलांच्या आधिपत्याखाली आला व औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) छत्रपती शाहूं राजे (१७०७–४९) यांच्या अखत्यारीत हे शहर आले. छत्रपती शाहूंनी मरतेसमयी दोन सनदांद्वारे राज्याचा कारभार पेशवे बाळाजी बाजीराव यांकडे सोपविला. त्यानंतर १७५० मध्ये महाराणी ताराबाईंच्या यमाजी शिवदेव नावाच्या सेवकाने सांगोल्याचा किल्ला हस्तगत करून बाळाजींच्या विरूद्घ बंड केले. ते सदाशिवराव भाऊने नेस्तानाबूत करून त्यावर पुन्हा पेशव्यांची सत्ता प्रस्थापित केली. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत (१७९५–१८१८) होळकरांच्या पठाण पलटणीने १८०२ मध्ये सांगोला शहरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. त्यात शहराचे अतोनात नुकसान झाले.पेशवाईच्या अस्तानंतर ते इंग्रजी अंमलाखाली भारतीय स्वातंत्र्यापर्यंत होते. शहरात नगरपरिषदेमार्फत (स्था.१८५५–५६) पाणी, आरोग्य, स्वच्छता, जलनिःसारण इत्यादींचे व्यवस्थापन होते. येथे प्राथमिक, माध्यमिक शाळा, सांगोला महाविद्यालय, विज्ञान महाविद्यालय या शैक्षणिक संस्था असून माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था माता-बालके यांच्या विकासार्थ कार्यरत आहे. किल्ल्यात काही शासकीय कार्यालये आहेत.सांगोले तालुका सहकारी सूत गिरणी उत्तम धाग्यासाठी प्रसिद्घ आहे. वासाहतिक वास्तुशैलीची बुद्घिहाळ इमारत, गोलघुट, अंबिका देवी मंदिर, सांगोला किल्ला ही येथील प्रसिद्घ स्थळे होत. उच्च प्रतीच्या डाळिंबांच्या उत्पन्नासाठी हे ख्यातनाम असून त्यांची परदेशांतही निर्यात होते. दर रविवारी येथे जनावरांचा मोठा बाजार भरतो. येथील खिलार जातीचे बैल प्रसिद्घ आहेत.sangola

मंगळवेढे किल्ला


किल्लाचा प्रकार: भुईकोट
श्रेणी: सोपी
जिल्हा: सोलापूर
तालुका: मंगळवेढा
किल्ल्याचा इतिहासइ.स. १७०० नंतर मोगल अंमल संपून मंगळवेढे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. श्री छत्रपती शाहू महाराज यांनी राजे पांढरे यांना प्रमूख नेमले. इ.स. १७०८ ते १७४२ पर्यंत त्यांचा अंमल होता. त्यांनी सध्या उभी असलेली चौबुरुजी (चार बुरुज) इ.स. १७२० ते १७३० पर्यंत बांधली. ही चौबुरुजी मुख्य किल्ल्यातील आतील बालेकिल्ला आहे. तो चौकोनी असून प्रत्येक बाजूची लांबी २३० फूट आहे. भिंत १८ फूट उंच असून ८ फूट रूंद आहे. त्यास रणमंडळ रहाट, भूत व बडेखान असे चार बुरुज असून ते २५ फूट उंच व ३० फूट व्यासाचे आहेत. तटाचे रणमंडळ बुरुजावर तास वाजवित असत म्हणून त्या बुरुजास तास बुरुज असे म्हणू लागले. सध्या करंदीकर वकील राहतात त्यांच्या घराजवळील हा रणमंडळ बुरुज होय. इ. सन. १७४२ ते १७५० पर्यंत पंतप्रतिनिधीचा अंमल असून यमाजी शिवदेव हे येथे सरदार होते.इ.स. १७५० पासून प्रथक कमाविसदार म्हणून मंगळवेढ्यास आले. नंतर गोविंद हरी पटवर्धन यांच्या सरंजामांत हा किल्ला इ.स. १७५१ साली दिला गेला. पटवर्धनाचे मिरज व मंगळवेढे हे दोन महत्त्वाचे किल्ले होते. गोविंद हरी पटवर्धन यांच्यावर पेशवे दरबारची इतराजी झाली. त्यावेळी ते मंगळवेढे येथे किल्ल्यात येऊन राहीले होते. त्यावेळी त्यांनी श्री संत दामाजी महाराज यांची सेवा केली म्हणून त्यांना त्यांच्या कृपा प्रसादांमुळे जहागिर परत मिळाली अशी त्यांची श्रध्दा होती. पुरुषोत्तम दाजी पटवर्धन हे मघ:श्याम याचे नातू होते. ते मंगळवेढे येथे राहत असत. इ.स. १७५५ साली श्रीमंत नानासाहेब पेशवे, श्रीमंत भाऊसाहेब पेशवे व श्रीमंत दादासाहेब पेशवे हे मंगळवेढे येथे येऊन काही दिवस राहीले होते. त्यावेळी मंगळवेढे परगणा होता व आंबेगाव (सध्या आंबे-चळे म्हणुन असलेला गाव) मंगळवेढे परगण्याखाली होता. तो गांव त्यावेळी श्रीमंत पेशव्यांनी नारायण कृष्ण व पुरुषोत्तम कृष्ण यांना इनाम करुन दिला. श्री. पुरुषोत्तम दाजी हे श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा खून झाला त्यावेळी मंगळवेढ्यास राहात होते.दाजी मोठे शुर असून त्याचे वक्तृत्व चांगले होते. ते धाडसी असून पराक्रमी होते. म्हणून श्रीमंत नारायणराव पेशवे यांच्या वधानंतर त्यांच्या पत्नी गंगांबाईसाहेब या गरोदर असताना त्यांना संभाळण्याकरीता मुद्दाम श्रीमंत दाजीसाहेब पटवर्धन यांना नाना फडणिसांनी पुण्यास बोलावून नेले होते. दाजी मरण पावल्यानंतर त्यांच्या पत्नी आंब्यास राहावयास गेल्या. इ.स. १७६३ मध्ये निजाम पंढरपूर लुटण्यास आला होता. पण मंगळवेढे येथील पटवर्धनांनी निजामास परत जाण्यास भाग पाडले, पहिली सरदारकी मिळाली. इ.स. १८०८ पर्यंत मंगळवेढे हे पटवर्धण घराण्याकडे होते.mangalvedhe

माचणूर किल्ला

machnur
किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
डोंगररांग: डोंगररांग नाही
श्रेणी: सोपी
जिल्हा: सोलापूर
तालुका: मंगळवेढा
सोलापूर – पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून ४३ किमी अंतरावर माचणूर गाव आहे. या गावातून वहात जाणार्या भीमा नदीच्या काठी असलेल्या प्राचिन सिध्देश्वर मंदिरामुळे हे गाव प्रसिध्द आहे. या मंदिराजवळच माचणूरचा किल्ला आहे.
इतिहास : दक्षिण जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्य़ांच्या हल्ल्यांनी त्रस्त झाला होता. त्यांच्या पासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हगिरी गावाजवळ भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५ च्या आसपास किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. औरंगजेब या किल्ल्यात बसून न्यायदान करीत असे.या किल्ल्याच नाव माचणूर कसे पडले याबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे. औरंगजेबाने हा प्रदेश जिंकल्यावर सैनिकांना सिध्देश्वराची पिंड (शिवलींग) फोडण्याची आज्ञा केली. त्याकामासाठी गेलेल्या सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला, त्यामुळे त्यांना परत फिरावे लागले. याप्रकारने संतापलेल्या औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले, पण शंकराच्या पिंडीच्या पुढ्यात नैवेद्याचे ताट ठेवून त्यावरील कापड बाजूला केल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसली.(त्यामुळे या ठिकाणाला मास – नूर असे म्हटले जाऊ लागले. पुढे याचाच अपभ्रंश होऊन गावाचे नाव माचणूर झाले.) या सर्व प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते.
पाहाण्याची ठिकाणे : माचणूर गडाच्या प्रवेशव्दारावर शत्रूला थेट मारा करता येऊ नये यासाठी गडाच्या प्रवेशव्दारा समोर भिंत व दोन बुरुज उभारून आडोसा निर्माण केलेला आहे. गडाचे प्रवेशव्दार तटबंदी व बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशव्दारातून गडात प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दाराच्या विरुध्द टोकाला मशिद आहे. मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. मशिदीच्या मागिल बाजूस खोलवर भीमा नदीचे पात्र आहे. नदीच्या बाजूची तटबंदी पूरांमुळे नष्ट झालेली आहे.सिध्देश्वर मंदिर माचंणूर गावात प्रवेश केल्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर समुह लागतो. हा मंदिर समुह काळ्या पाषाणात बांधलेला आहे. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात साम्य आहे. दगडी प्रवेशव्दातून प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. पुढे प्रशस्त पायर्या उतरून दुसर्या प्रवेशव्दारापाशी पोहोचता येते. या प्रवेशव्दाराच्या भिंतीत दोन बाजूस वीरगळी बसवलेल्या आहेत. मंदिर तटबंदीने वेष्टित असून तटबंदीमध्येच ओवर्या काढलेल्या आहेत. मंदिरात ३ फूटी नंदी आहे. शिवलिंगा पर्यंत जाण्यासाठी २ दार आहेत. त्यातील पहील दार ५ फूट उंचीचे तर दुसरे दार २.५ फूट उंचीचे आहे.या खिडकी वजा दरवाजातून बसुनच गाभार्यात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या मागिल बाजूस नदीवर दगडी प्रशस्त घाट बांधलेला आहे.
पोहोचण्याच्या वाटा : माचणूर गाव सोलापूर – पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून ४३ किमी व पंढरपूरपासून २१ किमी अंतरावर आहे. तर मंगळवेढ्या पासून १२ किमी अंतरावर आहे. गावात जाणार्या रस्त्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते व रस्ता संपतो तेथे माचणूरचा किल्ला आहे.
राहाण्याची सोय: गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय: जेवणाची सोय स्वत: करावी.पाण्याची सोय: गडावर पाण्याची सोय नाही.
माहिती साभार: ट्रेक क्षितीज संस्था

करमाळा शहर किल्ला


किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
श्रेणी: सोपी
जिल्हा: सोलापूर
तालुका: करमाळा
करमाळा शहर किल्ला बांधती बापलेक । त्येंच्या भोवती खंदक ।।करमाळा शहर ओळखू येत मौलालीनं। करतो राखण माळावरनं ।।या लोकगीतामध्ये वर्णन केलेले करमाळा शहर म्हणजे रंभाजीराव निंबाळकरास पुण्याच्या जहागिरीच्या मोबदल्यात मिळालेल्या जहागिरीमधील मुख्य गाव होय. निबाळकरांनी उभारलेल्या या वास्तूमध्ये केवल विविधता होती असे नाही. तर उत्तर व दक्षिण स्थापत्याचा सुरेख संगम साधलेला होता. स्थापत्य पध्दती तर अशी की, तिच्यात हिंदू स्थापत्य शास्त्राचा मूळ बाज राखूनही मुस्लिम शैलीची प्रचिती सहज यावी. मग ते आदर्श व्यक्तीचे कला मंदिर असो अथवा एखाद्या सूफी साधूंचा दर्गा असो किंवा एखादे शिवमंदीर असो, सर्वधर्म समभाव दर्शवणारी एवढी प्रतिके निंबाळकरांच्या जहागिरी व्यतिरिक्त उभ्या महाराष्ट्रात कोठेच आढळत नाहीत. रावरंभा निंबाळकराने करमाळ्यामध्ये सूफी संत हजरत करमे मौला यांचा दर्गा गावाच्या दक्षिणेला माळावर बांधलेला आहे. हे सूफी संत दीर्घकाळ करमाळा येथे वास्तव्य करून होते. मात्र त्यांचा कालखंड आजही उपलब्ध नाही. या सूफी संताच्या करमे मौला या नावावरूनच या गावाला करमाळा असे नाव पडले असावे असे सांगितले जाते.रंभाजीराव उर्फ रावरंभा हा तुळजापूरच्या क्षेत्र तेजस्विनी तुळजा भवानीचा परमभक्त होता. या आदिशक्तीचे एक भव्य मंदिर उभारण्यापर्यंत कल्पना करमाळे शहराच्या पूर्वेस एक तुलनात्मक मंदिर उभे करून त्यांनी प्रत्यक्षात आणली. तुळजापूरची भवानी माता आपल्या परमभक्तांसाठी त्याच्या मागे पायी चालत येऊन करमाळे शहरात पावन करती झाली, अशी दंतकथा आजही सांगितली जाते. या मंदिरा बरोबर त्याने करमाळ्यात अठरा बुरजांनी युक्त असा भुईकोट किल्ला बांधला आहे.karmala