कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ७४

 ****भाग ५****


कधी नव्हता तो भोसलेकुळीचा चौरंग झाला. मधुरेत संभाजीराजे, तीर्थक्षेत्रांच्या वाटेवर राजे, राजगडावर थकदिल जिजाऊसाहेब आणि माहेरी शृंगारपुरी येसूबाई ! संजाबाचा घेर डुईवर राखलेले, अंगच्या वस्त्रांच्या शेवांची मानेमागे गाठ आवळलेले, छातीवर आडवे यज्ञोपवीत चढविलेले, कपाळी गंघटिळा भरलेले शंभूराजे आता ओळखदेखील येत नव्हते. ते मुंज न होताच बटू झाले होते !


केसोपंतांनी त्यांना उत्तरी आन्हिके, आचमन, संध्या या सगळ्यांचा सराव दिला.. केसोपंतांच्या सुसंस्कृत घरी शंभूराजांना कानी पडणाऱ्या संस्कृत बोलीने भुरळ घातली. आकाशसुंदरीने शारदीय सांजवेळी पौर्णिमेच्या टपोऱ्या चंद्राचे फूल आपल्या निळ्या केसगुंफणीत माळावे तशी ही बोली होती! मधुरातली मधुर. ऐकताना अंगाभोवती पिवळाधमक शालनामा पांघरतो आहोत असे वाटायला लावणारी !

आपण नेहमी ऐकतो त्यासारखीच ही भाषा आहे. पण नेमकी कशासारखी हे संभाजीराजांना फार दिवस उकलत नव्हते.


एकदा ते विसाजीरावांबरोबर देवदर्शनासाठी हरिहरेश्वराच्या मंदिरात गेले. तिथे आरतीचा जयकार चालला होता. तो ऐकताना त्यांना मनचा पेच उकलून गेला! 'ही भाषा देशी आमचे गोंधळी, आईचा महिमा उभा करतात, तशीच आहे! -मंदिरातून परतताना 'कंसका किल्ला' हे बेसाऊ ठिकाण आले. विसाजीपंत म्हणाले " देखना है किला ? "


" जरूर " म्हणत संभाजीराजे कंसकिल्ला' या मथुरेतील सर्वांत उंच ठिकाणावर आले. समोर यमुनेचे डौलबाज वळण फिरलेले दिसत होते. पायांची वल्ही भारत तळवटातून उसवलेली कितीतरी कासवे पाण्याबाहेर मानांच्या काठ्या उठवीत होती. पुन्हा त्या काठ्या गायब होत होत्या.

थोरल्या मासाहेब या यमुनाकाठी वाळूवर उभ्या राहिल्या तर कशा दिसतील ? एक वळण शंभूराजांच्या मनात सर्रकन फेर टाकून गेले. ते यमुनेकडे डोळेजोड़ बघत राहिले.


त्यांना अंदाज नव्हता की याच यमुनेला पुढे मिळणाच्या गंगा आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर राजांचा तांडा उभा असेल !

राजे प्रयागच्या त्रिवेणी संगमात स्नान करून घाटपायऱ्या चढून येताना त्यांना एका पारध्याने या वेळी रोखले होते!


हातातील पिसांचा जुडगा त्यांच्या समोर धरून तो म्हणाला, " बुवाजी, ये गरुडके पाँख हैं! मैनाकेके पहाडीके! हर काममे यश देनेवाले. ले जावो पांच ! राजे त्या पारध्याकडे बघत भुवईची कमानबाक चढवून गेले. “हर काममें यश देनेवाले ! गरुडके पाँख!" पारध्याच्या हातातली पिसे बघताना राजांना संभाजीराजांची आठवण झाली. " आता एकाच कामी यश पाहिजे. शंभूबाळ सुखरूप परतण्याच्या !" राजांनी गरुडाची पाच पिसे आपल्या सडक बोटात घेतली! सर्जेरावांनी पारध्याला दिनार दिले. क्षणभर पिसांकडे बघून राजांनी ती काखेच्या झोळीत सोडली. राजांना अंदाज नव्हता की त्यांचा 'गरुडबच्चा' कंसकिल्ल्याच्या उंच ठिकाणावरून हरवल्या डोळ्यांनी यमुना बघतो आहे! आपला आणि मासाहेबांचाच विचार करतो आहे !

काळाने दिवसरात्रीचे काळेपांढरे 'गरुड पाख' आपल्या टोपात खुपसले! दीड महिन्यांचा काळ मागे पडला. मजल दरमजल मागे टाकीत राजे मराठी मुलखात सुखरूप पावते झाले. संन्यासी वेशात ! उतू घातलेल्या दुधासारखा राजगडाचा ऊर उचंबळून आला.

गडपायथ्याशी येत असलेल्या राजांची वर्दी मोरोपंतांनी जिजाऊंच्या कानी घातली, आईसा ऽ हेब, राजे... राजे सुखरूप पावते झाले. पायथ्याशी स्वाऱ्या येत आहेत- संन्यासी वेषात! पालखी सामोरी नेण्यासाठी आम्ही गड उतरतो आहोत. सारा गडलोक पायथ्याच्या रोखाने धावत सुटला आहे!" भावनांचा कल्लोळ झालेल्या मोरोपंतांचे डोळे आजवर दाटलेल्या चिंतेला वाट करून देताना आनंदाने वाहू लागले.


झुकलेल्या केवड्याच्या कणसासारख्या दिसणाऱ्या जिजाऊंचे मन उकळत्या पाण्यात खालवर घुसळण घेणाऱ्या तुळशीच्या पानागत मिरमिटले! मिरमिरटताना क्षीण आवाज उठला, "जगदंब ! जगदंब !"


भरल्या डोळ्यांनी त्यांनी समोरची जगदंबा दिसते का ते पाहिले । ती दिसत नव्हती! जिजाऊ काळीजभर चरकल्या. “आई, मनाच्या पिळात आम्ही तुला नको ते बोललो. कोप करू नको. आम्ही लेकरू!” जिजाऊंनी दाटल्या नेत्रकडा निपटल्या. देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर आपला सोशिक माथा टेकविला.


मोरोपंत आज्ञेसाठी खोळांबले होते याचे भान जिजाऊंना उरले नाही. पायथ्याकडे ओढ घेणाऱ्या मनाला आवरणे असह्य झालेले मोरोपंत म्हणाले,


"आम्ही निघावं आईसाहेब ?' "


त्यांना हात इशारतीने जहळ बोलावून घेत जिजाऊ मुश्किलीने एक-एक शब्द म्हणाल्या, “पंत, त्यांचा पेहराव घेऊन चला संगती! संन्याशाच्या वेशात आऊसमोर येऊ नये म्हणतात! या.” जिजाऊंनी धाराऊकडे बघितले. ती तबकात साठवण झालेल्या मोहरांकडे बघत होती.


पायथ्याशी कोण कोण आले आहे याची कल्पना नसलेले मोरोपंत राजांच्या आणि शंभूराजांच्या पेहरावांची तबके घेतलेल्या धारकऱ्यांसह पालखी घेऊन गड उतरले. गडपायथ्याच्या वाडीतील नायकाच्या घरी राजे आपल्या वैरागी तांड्यानिशी घोंगडीवर बसले होते. घराबाहेर माणसांचा दाटवा झाला होता. उतावळे जीव कलकलत होते. संन्यासी ते ऐकून गलबलत होता.


मोरोपंत आले. त्यांनी दारी पालखी ठाण करून तत्रकधारी मावळ्यांनिशी नायकाच्या घरात प्रवेश केला. राजे समोर दिसताच मोरोपंत पुढे झाले. राजांचे बैरागी पाय शिवण्यासाठी ते झुकणार एवढ्यात घोंगडीवरून उठून राजांनी त्यांना उठवते घेतले, खांदाभेट दिली. दोघांचाही प्रेमा उचंबळून आला. केळीचा मोना पाझरावा तसे पंतांचे डोळे पाझरू लागले.


" राजांनी तातडीने चलावे. मासाहेब. मोरोपंतांचे शब्द घशातच घुटमळले. 'निघण्यापूर्वी हा राजसाज अंगी धारण करावा. पुत्राने मातेसमोर संन्याशी वस्त्रात जाऊ नये असा शास्त्रबंध आहे." पंतांनी जिजाऊंचे वसा जपणारे मन राजांच्या कानी घातले. राजांच्या कपाळीचे भस्म-पट्टे वर चढले. "हे ध्यानी नव्हते राहिले!” राजांनी भस्मपट्ट्यांना मनाचा पडसाद दिला. ते खाली उतरले.


तबकधाऱ्यांनी तबके आतल्या दालनात नेऊन ठेवली. राजे दालनात गेले. अंगीच्या छाटीला त्यांनी ती उतरण्यासाठी हात घातला. लवभर त्यांचा घातला हात थबकला. मनावर विचारांची छाटी चढली- 'आम्ही ही छाटी उतरतो आहोत. पण पण ... शंभूबाळांच्या अंगी ती आजही असेल! हे असे विचार, असे क्षण पाठलागावर पडले की वाटते अंगची छाटी कधी उतरूच नये! पुत्र संन्यासी वेषात, पिता राजपेहेरावात हा कसला खेळ! काय आहे आईच्या मनी ? "


" जगदंब, जगदंब! " राजांनी छाटी उतरली. अंगी चढवावा म्हणून त्यांनी घोंगडीवर मांडलेल्या एका तबकातील जामा उचलला. आणि राजांच्या उभ्या अंगावर सरसरते बाभळीचे बनचे बनच फुलले! डोळे ताणून ते हातातील आखूड हातबाहीच्या जाम्याकडे बघतच राहिले! तो शंभूराजांचा होता !


त्याच्या एका दर्शनाने राजांचे 'राजेपण', 'संन्यासीपण' घुसळून दूर फेकून दिले. नको तो विचार राजांच्या 'आबा' म्हणविणाऱ्या मनात चौखुर घुसला - 'शंभूबाळ सलामत आले नाहीत तर ?


पेहराव करून, कपाळी शिवपट्टे भरून राजे दालनाबाहेर आले. बैरागी, मंत्रिगण यांच्या संगतीने नायकाच्या घराबाहेर आले. बाहेर दाटलेला मावळ माणूस गर्दन पुढे उसळला. पगड्या राजांच्या मोजड्यांवर टेकू लागल्या. इमानी नेत्रकडा ओल्या होऊ लागल्या. बाराबंद्यांचे बंद तणाव देऊ लागले. माणसे 'हरवलेला राजा' डोळ्यांच्या म्यानात तलवारीगत आबादानीने साठवून घेऊ लागली. त्या कल्लोळात एकट्या मोरोपंतांखेरीज, बैरागी सोडले तर, शंभूराजांचे भान कुणालाच आले नाही. पेहरावाचे एक तबक तसेच परत आलेले पाहून मोरोपंत मनी चरकले होते..


आपल्या माणसांना राजदर्शन देऊन राजे पालखीत चढले. त्यांनी पालखीचा राजगोंडा हाती धरला. आणि एका पेचाने त्यांच्या मनाचा राजगोंडा करून मुठीत घट्ट. धरला! " आता मासाहेब विचारतील आमचे शंभूबाळ कुठे आहेत ?' - आमची वाट पाहून शिणल्या थकल्या त्यांच्या कानी काय घालावे ? राजांच्या मनाला पालखीच्या चालीबरोबर हिसके हिंदोळे बसू लागले. मन सुत्र झाले ....