फारा दिवसांनी पाली दरवाज्यावरची नौबत दुडदुडली. राजे बालेकिल्ल्यावर आले. त्यांची मुद्रा निर्धारी दिसत होती. डोळे मासाहेबांना शोधण्यासाठी हरणाचे पावखूर लावून दौडत होते. सदरजोत्यावर जिजाऊ उभ्या होत्या. पाठीशी, उडू बघणारी डोळ्यांची मावळपाखरे गोंदल्या मनाने मुश्किलीने थोपती करून धाराऊ उभी होती.
खाशांच्या संगतीत राजे सदरचौकात प्रवेशले. समोर जिजाऊ उभ्या होत्या. आसवांची अगणित सफेद फुले जगदंबेच्या चरणांवर गाळून आता देहच तिथे टाकावा काय या विचाराने थरारलेल्या प्राजक्ताच्या कुलवंत झाडासारख्या! परिस्थितीच्या घोडेटापांनी निर्दयपणे तुडवून टाकलेल्या, मंदिराकडे जाणाऱ्या समर्पित पायवाटेसारख्या ! भवानीने उधळलेला भंडारा मिठीत सामावून घ्यायला आसावलेल्या परडीसारख्या !
क्षणभर राजांचे पाय फरसबंदीला जागीच चिकटल्यागत झाले. दुसऱ्याच क्षणी भरतीच्या समुद्राचा उसळता भावकल्लोळ उरी घेऊन राजे झपाझप चालले. टोपाची मोतीलग हिंदकळली. तिचे डुलते फुलोर तेवढे जिजाऊंना कसेबसे दिसले. मग डोळ्यांवर आसवांची सफेद तावदाने सरसरून दाटत उतरली ! त्या तावदानांतून एक धूसर सोनस्वप्न समोर येत होते. एक थरथरता तेजाळ पोत जवळ येत होता. बाकीचे काहीच दिसत नव्हते. दिसावेसे वाटत नव्हते.
राजांनी पायांवर ठेवलेल्या कपाळाच्या स्पशन जिजाऊ उभ्या देही थरारून उठल्या. त्या थरथरीने त्यांच्या डोळी उतरलेली आसवांची तावदाने खळळकन निखळली ! जिजाऊसाहेबांचा तुळजाई सोशिक आत्मा नेत्रांच्या महाद्वारांनी पाझरू लागला ! झुकते होऊन त्यांनी थरथरत्या हातांनी राजांना उठते केले. आणि पहाटवाऱ्याच्या झमकीत सुगंधाचा गुंतवा व्हावा तसे यमुनेच्या पाणपाठीला सूर्यरस बिलगावा तसे राजे - जिजाऊंच्या मिठीत विसावले!
पुत्रपण भरून पावले. मोहरले. मातृपण मुके, मुके झाले ! कृतार्थता कृतार्थ झाली !! चौकात दाटलेल्या हर आसामीला ते बघताना वाटले आपणच 'आऊसाब' आहोत!
'राजे' आपल्याच हातमिठीत आहेत ! फक्त एकच कुणबाऊ मनाने शंकेला सुपात घालून थडाथड पाखडायला सुरुवात केली. उडणारे भूस डोळ्यांत चरचरत शिरू लागले. धाराऊच्या! 'ल्येकरू कुटं हाय ?' म्हणत तिचे भिरभिरते डोळे राजांच्या बरोबर आलेल्या बैरागी तांड्यांच्या काखेतील झोळ्या झटकू लागले! तटबंदीचे थोराड बुरुज उचलून ते कुणीतरी क्षणाक्षणाला आपल्या उरावर रचत आहे असे धाराऊला वाटले!
मिठीतल्या राजांच्या रोखाने एक- फक्त एकच शब्द जिजाऊंच्या दाटल्या कंठाला चकवा देऊन निसटला! जन्माष्टमीच्या दिवशी दुधाच्या धारेत न्हाऊन निघणाऱ्या श्रीकृष्णाच्या बैठ्या लंगडमूर्तीसारखा !! मायेने चिंब चिंब थबथबलेला - "शिवऽऽ बा !
त्या सुटल्या शब्दाचे मायाळ थबथबीतपण जिजाऊंचे जिजाऊंनाच जाणवले! त्याने तर त्यांचे कान क्षणात सुन्न झाले, मन भिन्न झाले. त्या सुन्न भिन्नतेत सारे सारे भाव गुदमरून उठले. आणि क्षणातच आभाळीच्या निळाईत इथून तिथवर विजेची नागीण सळसळत जावी तशी जिजाऊंच्या भरल्या मनी शंकेची कातरी नागीण वळवळत गेली - " आमचे शंभूबाळ ?
कधी कधी आठी हातांनी पूजेच्या भरल्या साजाचे तबक परते सारणाऱ्या निग्रही भवानीगत जिजाऊंनी झटकन राजांना विलग केले! त्यांचे खांदे हाततळव्यात घट्ट धरून ठेवीत थरथरत विचारले, "राजे ऽ, आमचे शंभूबाळ कुठं आहेत ? '
त्या बोलांतील मायेचा ओलावा धरून आलेली जरब ऐकताना राजे सुन्न झाले. निशाणकाठीवरून सरसरत खाली उतरणाऱ्या जरीपटक्यासारखे राजांनी डोळे जिजाऊंच्या पायावर टाकले!
राजांचे निसूरपण असह्य झालेल्या जिजाऊंनी आपल्या हाततळव्यातील त्यांचे खांदे गद्गद घुसळून टाकीत थरका फेरजाब केला- " बोला ऽ राजेऽ बोला ऽ!” त्या लटलट्या शब्दांतच नको ती शंका उतरली होती.
आपल्या नाकाचा गड्डा हात चिमटीत धरून, मिटल्या डोळ्यांनी, डुईचा टोप डावा उजवा झटकीत, मोतीलग होलपटून टाकीत राजे घोगरल्या आवाजात म्हणाले, “मासाहेब, मासाहेब आपल्या शंभूबाळांचा काळ झाला! ते ते गेले !!."
ते नको ते बोल उच्चारताना राजांच्या पोटात लक्कखन खड्डा पसरला. त्यांच्या मिटल्या डोळ्यांना दिसला एक 'सावळा हात!' 'जगदंबेच्या पोतावर दाटलेली काजळी माखून घेत तो हात पुढे येतो आहे. आमच्याच रोखाने ! ' हा विचार मनी येताच राजे काळीजभर गलबलले !
कानांवर थरथरते हात ठेवणाऱ्या जिजाऊंच्या तोंडून रणशिंगाच्या काळीजमार ललकारीसारखा एकच चीत्कार उठला " शंभू बाऽळ!" उभी सदर गरगरली.
बैठकीचा पायचौथरा काढून घेताच जगदंबेची आवेशी मूर्तीसुद्धा खाली ढासळू लागावी तशा जिजाऊ ढासळू लागल्या! “द्येवा रं माज्या !' म्हणत पायच ठार गेलेली धाराऊ तर धाडकन खालीच पडली. तिचे अंग गद्गद हलू लागले.
झटकन राजांनी पुढे होत जिजाऊंना सावरले. चौकातल्या पगड्या थरथरून डुलल्या. खाली माना टाकलेल्यांचे इमानी डोळे बाराबंद्या भिजवू लागले. क्षणात सदरेचा नूर पलटी घेत गद्गदला. देठ नसलेले फूल हाती असावे तसे झाले! राजे आले म्हणून हसावे की धाकटे राजे गेले म्हणून रडावे तेच कुणाला सुधरेना.
" आमचे ऐकता. मासाहेब!" राजे जिजाऊंना सावरीत देवमहालाच्या रोखाने चालवीत नेताना पुनः पुन्हा म्हणत होते. जिजाऊंना काहीच ऐकू येत नव्हते. “पंत, धाराऊलाही पाठवून द्या.” राजांनी देवमहालाची इशारत देत मोरोपंतांना सदर सोडताना आज्ञा केली.
देवमहालात आणून राजांनी जिजाऊंना प्रथम नीट बसते केले. तोंडात पदराचा बोळा कोंबून फुटू बघणारा काळजाचा इस्कोट आवरीत धाराऊ देवमहालात आली. ती आत येताच राजांनी दाराला आडवंद टाकला. पूजल्या भवानीच्या पायांवरचे एक बिल्वदल उचलले. शांतपणे ते देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर मस्तक टेकलेल्या जिजाऊंच्याजवळ आले.
'मासाहे ऽब!” राजांनी जिजाऊंच्या खांद्यावर हात ठेवीत शांत साद घातली.. "आमची शपथ आहे. मान वर घ्यावी. आम्ही सांगतो ते मन बांधून ऐकावे. " भरल्या डोळ्यांनी जिजाऊंनी मान वर घेतली. हत्तीचे बिल्वदल मासाहेबांच्या हातात देत तो श्रींच्या राज्याचा संकल्प-पुरुष बांधल्या आवाजात म्हणाला,
मासाहेब काळीज टाकू नका! शंभूबाळ मथुरेत सुखरूप आहेत !! औरंगजेबाच्या चौकीपहाऱ्यातून ते सुखरूप सुटावेत म्हणूनच आम्ही ही चाल टाकली आहे! आमच्या जिभेवर आणि तुमच्या काळजावर घोंडा ठेवून! असे केले तरच शंभूराजे देशी सलामत परत येणार आहेत !! " राजे क्षणभर थांबले. भवानीच्या मूर्तीकडे शांत डोळ्यांनी बघत पडल्या आवाजात म्हणाले, " यासाठी कधी नव्हे ती आम्ही तुम्हास तापदरा दिली. पण हे समजून घेतले पाहिजे. थोर मनी आम्हास क्षमा केली पाहिजे ! "
वेगवेगळ्या भावनांचा काना-उरात कालवा झालेल्या जिजाऊंना काय बोलावे कळेना. मान डोलावीत त्या कसेबसे म्हणाल्या, “शिवबा, तोड काढता पण ती आम्हास नाही पेलवत. काही करा आणि शंभूबाळांना आमच्यासमोर जलद हजर करा !"
डोळे फाडून धाराऊ राजांच्याकडे बघत होती. तिला म्हणावेसे वाटले, “कसं, कसं म्हणायचं हो ? " पण शब्द फुटला नाही. न बघितलेल्या कल्पनेच्या मथुरेत ती केव्हाच 'जाऊन पोचली होती !
घोड्यावरचे जिन काढून ठेवावे तसे राजांनी मन बाजूला सारले आणि राजगडावर शंभूराजांचे 'दिवस' घातले! सारा गड़देव सुतकात पडला. संभाजीराजांच्या मरणाची भूमका बारामावळात पसरली ! वाडी-मजन्यांतील खोपटांची पाखी हळहळली. राजांनी राजगडाहून धाडलेला थैलीस्वार शृंगारपूरच्या वेशीत घुसला. डुईची पगडी काढून तो पिलाजी शिक्यांच्या वाड्यात दिंडी पार करीत शिरला. " टाकोटाक निघोन येणे. खाजगीने बोलणे आहे." एवढाच मजकूर राजांनी
पिलाजींना लिहिला होता.