सुवासिनींनी त्यांच्या पायांवर शिगभरल्या घागरी रित्या केल्या. त्यांचे पाणी शंभूराजांच्या पायी चालून पडलेल्या भेगांत शिरून चरचरले! चेहऱ्याभोवती पाजळली निरांजने फिरली. संभाजीराजांचे भिरभिरे डोळे शोधीत होते मासाहेबांना उंबरठा पार करून ते राजांच्यासह सदरचौकात आले. कधी नव्हे त्या जिजाऊ सदरचौकात येऊन उभ्या होत्या! तिथे उभे राहणेही त्यांना असहा झाले. यमुनेच्या मायाळ पात्राने पलटी घेतली ! थकल्या जिजाऊंच्या पायांत बळ उतरले. कपाळीचा कुलवंत पदर घरंगळा झाला आहे याचे भान त्यांना उरले नाही! त्या सामोऱ्या चालत आल्या. त्यांच्या रूपाने मावळी आऊपणाची एकवट मूर्तीच चालत आली!
राजांना सोडून पायझेप टाकीत शंभूराजे उसळले. क्षणात त्यांची जिजाऊंना बिलगती घट्ट हातमिठी पडली. सदरचौक दाटून आला.
" मासाहेब! मासाहे ऽब!" प्रत्येक शब्दानिशी शंभूराजांचा ऊर भरून येत होता. एका विचाराबरोबर तर त्यांचे भरले छातवान कसे गच्च गच्च दाटून आले- “मासाहेबांच्या अंगच्या नेसूलाही एक प्रकारचा भावमंगल वास येतो? जीवाचा कोंदवा करून टाकणारा! बुक्क्यात मिसळलेल्या भंडाऱ्यासारखा !!" आणि आणि शंभूराजे आपले तोंड आवेगाने मासाहेबांच्या नेसूत नुसते घुसळू लागले !
आज आणि आत्ता जिजाऊंना कळून आले की 'आई भवानीला आठ हात का असतात !! तेही तिला थिटेच पडत असतील! ' हातांचे थिटेपण जिजाऊ जबानीने भरून काढू लागल्या- " शंभूबाळ ऽ! शंभूबाऽळ! शंभूबाऽळ!!
त्या थबथबत्या मिठीतही जिजाऊंच्या मनावर एका विचित्र विचाराची घोरपड बोचऱ्या नख्या रुपवीत सरासर निर्दयपणे चढून आली- “शंभूबाळांचा... काळ झाला !!" जिजाऊ थरारल्या. सणसणत आलेला एक वर्मी तोफगोळा, दौडत्या घोड्याबरोबर फरफट होत चाललेली रिकीब, झिजून झिजून नव्हत्या झालेल्या औषधी मात्रा क्षणात त्यांच्या पाणथर डोळ्यांसमोर तरळून सरकल्या! त्यांनी त्यांचे थोरले पुत्र, खाशांची स्वारी आणि सूनबाई नेल्या होत्या!
जिवाभावाच्या माणसांचा 'काळ' होतो तेव्हा मागे राहणाऱ्यांच्या हयातीचा 'बरड-माळ' होतो हे त्यांनी भोगले होते. जिजाऊंनी शंभूराजांना एकदम हातांच्या आवेगी मिठीत कोंडून कोंडून टाकले. त्यांच्या डोळ्यांतील 'थोरली माया शंभूराजांच्या टोपावर टपटपू लागली.
सदरेवरच्या हर असामीला ते बघताना वाटले "आपण आपणच 'धाकले राजे आहोत ह्या थोरल्या मायेखाली ' न्हातो आहोत !' ,
भावनेचा कढ उलगताच जिजाऊंनी पदरकाठाने नेत्रकडा सावरल्या. शंभूराजांचा मोहरांच्या थैलीने सतका उतरून त्यांच्या खांदावळीवर हात चढवीत त्या शांतपणे " म्हणाल्या " चला!'
आभाळाच्या निळाईने विजेचा तेजवान झोत बिलगता घेऊन किनारी लावण्यासाठी चालावे तशा जिजाऊ चालल्या! देवमहालाच्या रोखाने, शंभूराजांना जगदंबेच्या औक्षवंत चरणांवर घालण्यासाठी !
सगळ्या सदरकऱ्यांनी त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तींना मुजरे रुजू पातले. देवीचे दर्शन घेऊन शंभूराजे पुतळाबाईच्या महाली आले. त्यांना ओवाळण्यासाठी हाती घेतलेल्या आरतीच्या तबकाचे भान पुतळाबाईंना राहिले नाही. त्या शंभूराजांच्याकडे बघतच राहिल्या.
त्यांच्या सामोरे येत, त्यांची पायधूळ घेऊन शंभूराजे म्हणाले, "मासाहेब 5, ओवाळता ? " तेच शब्द, ओढ्यासारखे उड्या घेत येणारे, तेच डोळे दर्पणासारखे साफ. पुतळाबाईंच्या हातातील तबक थरथरत फिरू लागले.
संभाजीराजांनी कमरेच्या शेल्यात खुपसलेला ताईत बाहेर काढला. तो आरतीच्या तबकात ठेवीत म्हणाले, "आम्ही सलामत आलो. येताना हा ताईत झोळीत ठेवीत होतो. झोळी खांद्यास असली की कसलीच धास्त वाटत नव्हती.' "
" गुणाचाच आहे तो!!” पुतळाबाईंच्या मनी तबकातील ताईत बघताना विचार उठला. पुतळाबाईंनी तबक चौरंगीवर ठेवले. आणि त्यांना काय वाटले कुणास ठाऊक त्यांनी पुन्हा तो ताईत उचलला ! शंभूराजांच्या जवळ जात काहीच न बोलता तो त्यांच्या दंडात बांधला आणि त्यांना आवेगाने जवळ घेतले. पुतळाबाईंना शंभूराजांच्यात एक विचित्र मुद्रा दिसली. सईबाईच्यासारखी काळ्या धाग्यांनी विणलेली ! सावळी !
तेथून दर्शनासाठी म्हणून शंभराजे सोयराबाईच्या महाली आले. पायावर कपाळ टेकवून त्यांनी मासाहेबांचे दर्शन घेतले. त्यांना वर उठवून घेत सोयराबाई म्हणाल्या, " स्वारींना म्हणवले तरी कसे तुमचा 'काळ' झाला म्हणून ? उठा. औक्षवंत व्हा ! गडावर तुमचे दिवस घातले सान्यांनी! मासाहेबांच्या कानी घातले पाहिजे. फेरभोजने घातल्याशिवाय हा दोष नाही हटायचा!"
संभाजीराजांच्या कपाळी आठ्या पडल्या. पडल्या नजरेने ते सोयराबाईंच्या पायांवर फिरलेली आळत्याची नक्षी उकलण्याचा यत्न करू लागले! तिचा शेव सापडत नव्हता. सापडणार नव्हता!
त्या रात्री जिजाऊंच्या महाली पलंगावर आडव्या झालेल्या शंभूराजांचे डोळे मिटले होते. थकव्याने झोप यायला पाहिजे होती. पण ते जागेच होते. त्यांच्या मनी प्रश्नांच्या खड़ावा खटखटू लागल्या. धूळ उडू लागली- “आमचा काळ झाला!' असे खुद्द महाराजसाहेबांनीच साऱ्यांना सांगितले। आमचे दिवस घातले गेले गडावर ? का ? असे का केले आबासाहेबांनी? यात यातही त्यांचा काही मनसुबा असेल! नाहीतर गड उतरून ते आमच्यासाठी का आले असते ?" शंभूराजांच्या डोळ्यांवर झोप आपला शालनामा पांघरू लागली.
त्यांच्या पोटऱ्यांना तेलवण चोळणारी धाराऊ त्यांच्या मिटल्या पापण्यांकडे एकरोखाने बघत होती. मायेला फक्त एकच माहीत असते, सेवा करणे! मूकपणे !
मार्गशीर्षाच्या धुकाळ पौर्णिमेचा दिवस गुंजणमावळात चढीला लागला. स्नान- घेतलेले टोपधारी शंभूराजे जिजाऊंच्या महाली आले.
पितळी सरशीने जिजाऊंनी त्यांच्या कपाळी दोनदळी शिवगंध रेखले. त्यांच्या संगतीने जिजाऊ सदरेच्या रोखाने चालल्या. त्यांच्या मागून राजे शंभूराजे उत्तरी असताना, जिजाऊंनी बिल्वपत्रे वाहताना खूणगाठेसाठी साठवण केलेल्या मोहरांची तबके घेऊन धारकरी चालले. आज ती तबके 'दान' म्हणून वाटली जाणार होती.
राजगडाची सदर मानकऱ्यांनी सजली होती. ही कदरेची सदर होती. मधुरेहून संभाजीराजांना सुखरूप देशी आणणाऱ्या कृष्णाजी, काशीपंत आणि लक्ष्मीबाई या त्रिमल त्रिवर्गांची कदर राजे सदरसाक्षीने करणार होते. जिजाऊ आणि शंभूराजे सदरेवर प्रवेशले. बैठक घेतलेले राजे जिजाऊंना बघताच
अदबीने चटकन उठले. सदर सुरू झाली. धारकन्यांनी मोहरांची तबके बैठकीच्या बगलेला हारीने मांडून ठेवली. भंडाऱ्याची परडी फिरली. राजांनी बैठ्या बैठ्या मुजुमदार निळोपंतांना नजर दिली.
पुढे येत निळोजीपंतांनी सदरेचे प्रयोजन खुले केले - “उत्तरी सरकारस्वारीवर वाका प्रसंग बेतला. हुत्रराने राजियांनी गलिमाची कैद फोडली. देशी यावे म्हणोन बैराम्यांचे वेष धारण केले. पण मार्गी पेच उभा राहिला. धाकट्या राजियांना संगती घेवोन चाल धरणे मुश्किल झाले. म्हणोन सरकारस्वारीने धाकट्या राजियांना मथुरेस त्रिमलांच्या हाती स्वाधीन केले, त्रिमलांनी कस्त कोशिस करोन इमानइतबारे घरचा दागिना घरी पावता केला. त्याकारणे त्रिवर्ग- त्रिमलांचा मरातब करावा असे मनी धरोन स्वारींनी ही सदर बसती केली असे.
"ये सदरी मरातब म्हणोन मशारनिल्हे काशी त्रिमल, मजकुर मथुरा यासी रुपये - रोख पंचवीस हजार" निळोपंत थांबले.
मोरोपंतांच्या शेजारी बसलेले काशी त्रिमल उठले. बैठकीजवळ अदबीने आले. राजांनी आणि संभाजीराजांनी चंदेरी रुपयांनी शिगोशीग भरलेल्या तबकाला दस्तुरी स्पर्श दिले. झुकून मुजरा देत काशीपंतांनी तबक हाती घेतले. त्यांचे हात आणि मन भरून आले. मथुरेत असताना ज्या भावभन्या डोळ्यांनी ते यमुनेच्या पात्राला बघत होते तसेच त्यांनी 'माँजी जिजाऊंना जवळून डोळाभर बघितले. हातीचे तबक बाजूला ठेवून त्यांनी बैठकीवरच्या राजे-संभाजीराजे आणि माँजी जिजाऊ या त्रिदळी राजकुटुंबाला उत्तरी अदबीचा साष्टांग दंडवत रुजू केला. उपरण्याचा जरीकाठ ठाकठीक करीत निळोपंत पुढे बोलले- " त्रिमलांच्या मातुश्री -आईजी लक्ष्मीबाई मजकुर मथुरा यासी रुपये रोख पंचवीस हजार!" निळोपंतांनी राणीवशाच्या बैठकीत चिकाच्या पडद्याआड बसलेल्या लक्ष्मीबाईना म्हणून पडद्याला नजर दिली. पडदा सळसळला. लक्ष्मीबाई स्त्रीवशाच्या बैठकीतून बाहेर आल्या. निजाऊंनी दस्तुरी हातस्पर्श दिलेले बंधा चंदेरी रुपयांचे तबक लक्ष्मीबाईंनी आपल्या थरथरत्या हाती घेतले. पाणावल्या डोळ्यांनी त्या जवळून जिजाऊंना निरखू लागल्या. त्यांच्या हाती चंदेरी रुपयांचे शिगभरले तबक होते आणि समोर दिवसाढवळ्या सदरबैठकीवर उतरलेले. दूधदाट चांदणे त्यांना दिसत होते !
तबक बाजूला ठेवून नमस्कारासाठी म्हणून लक्ष्मीबाई वाकायला गेल्या. " बाई, तुमचे आमच्यावर थोर उपकार! हा कोण प्रकार ? शक्य असते तर आम्हीच स्वत: तुमची भरल्या फळाने ओटी भरली असती इथे. सदरसाक्षीने.” जिजाऊ त्यांचे हात वरच्यावर उचलून घेत म्हणाल्या. या क्षणी आपले कपाळ उजाड आहे याची खंत जिजाऊंना कातरून गेली.