कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ७९

 काशीपंत, कृष्णाजी, विसाजी यांना ' विश्वासराऊ' हे किताब देण्यात आले. पेहराव, पालखी, हत्ती, सरंजाम देऊन साऱ्यांचा गौरव करण्यात आला. एकामागून एक दानाची तबके शंभूराजांच्या सामोरी येऊ लागली. नावनिशीवार त्यांचा उल्लेख होताच संभाजीराजे तबकांना दस्तुरी हातस्पर्श देऊ लागले.


उपवासाचे पारणे फेडून सदरेवर बसलेल्या जिजाऊ समाधानाने भरून आल्या होत्या. तबके सरतीला आली तशी संभाजीराजांच्या कपाळी निसटत्या आठ्या उठून गेल्या. राजांच्याकडे झुकते होत ते पुटपुटले “महाराजसाहेब - "बोला. " राजे समाधानाने फुलले होते.


मरातबाचं एक तबक आम्याच्या वाटेनं जाऊ द्यावं !! " "राजांनी भुवया चढत्या ठेवीत 'कशासाठी' असा काही न बोलताच सवाल केला.


नजर राजांच्या छातीवरच्या माळेवर टाकीत संभाजीराजे म्हणाले- 'कुम्हारवाडीच्या कुंभारानं आम्हास घरोबा दिला. त्याच्यासाठी !!


नकळतच राजांचा हात संभाजीराजांच्या पाठवळीवर चढला. जामा काखेला धरून दाटला. मोहरांनी भरलेले एक तबक आम्याच्या कुंभाराच्या नावाने बाजूला काढण्यात आले. राजांनी आपल्या खाजगीच्या कारभाऱ्यांना बैठकीवरून नजर दिली. कारभारी सरपोसाने तबक घेतलेला एक तबकधारी घेऊन राजांच्या सामोरे आले. त्यांनी मुजरा केला. तबकधान्याने सरपोस हटता करून तबक राजांच्या समोर झुकते होऊन धरले. संभाजीराजांना तबकात सोनतारांत मढविलेले एक पदक दिसत होते! कसल्या तरी पिसांचे!


"हे काय ? " त्यांनी राजांना विचारले.

"हे गरुडाचे पाँख. हरकामी यश देणारे!” राजे तबकातील पदकाकडे बघत उत्तरले. त्यांनी डोळ्यांनी तबकधाऱ्याला तबक जिजाऊंच्या समोर पेश धरण्याची इशारत केली. " मासाहेब, त्या पदकास हात द्यावा!” राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. जिजाऊंनी गरुडपिसांच्या मढविलेल्या पदकाला हातस्पर्श दिला. आत्ता पदक सर्वार्थानि 'हर काममें यश देनेवाले' झाले !


जिजाऊ राजांना काहीतरी विचारणार होत्या. एवढ्यात पाली दरवाज्यावरच्या नगारखान्यावरून उठलेली नौबतीची दुडदूड सदरेत घुसली ! राजे आणि जिजाऊ ती ऐकताना एकमेकांकडे बघून मंद हसले. का ते मात्र सदरेवर कुणालाच उमगले नाही. सदर उठायला झाली. लगबगीने गडाचा पोतराज बैठकीसमोर आला. मुजरा घालून म्हणाला, “सरकार, आज पुनव हाय. आईच्या गोंधळाचा चौक भरायची आज्ञा "" चाकराला व्हावी. खाशांनी गोंधळाला रात्री मान द्यावा.'


" जरूर " राजांनी पोतराजाला पानविडा आणि नारळ दिला. सदर उठली. सांज धरूनच थाळ्याएवढे 'चंद्रफूल' आभाळसुंदरीने डुईत माळले! चांदण्याच्या रूपने त्या फुलाचा सुगंध राजगडावर पसरला.


सदरचौकात गोंधळ्यांनी तांदळाचा चौक भरला. रात्रीचा थाळा घेतलेले राजे, संभाजीराजे आणि जिजाऊ यांच्यासह सदरेच्या बैठकीवर गोधळ ऐकायला बसले. सगळी सदर माणसांनी गच्च भरली होती.


चौकाचा सारा साज मांडून होताच गोंधळ्यांचा म्होरक्या सामोरा आला. डुईची लाल पगडी झुकवीत म्हणाला - "सरकार, उदे करायचा हुकूम व्हावा.'


राजांनी त्याला हाताचा पंजा उठवून थोडा वेळ थांबायची खूण दिली. राजांच्या टोपात गरुडपिसाचे पदक मढले होते! ते तिरपे टाकीत राजे सदरेत येणाऱ्या अंत:पुराच्या दरवाज्याकडे बघू लागले. साऱ्या नजरा त्या रोखाने लागल्या.


त्या दरवाजाआड गोंदल्या हातांची, पदर सरसा करताना हालचाल झाली. काकणांचा किणकिणाट उठला. त्या किणकिणाटाशी बोलत काही क्षण गेले आणि पाठोपाठ गलमिश्या असलेल्या पिलाजींच्या आणि गोंदल्या मनाच्या धाराऊच्या मधून येसूबाई सदरेवर प्रवेशल्या! खालच्या मानेने ! धडधडत्या उराने!


संभाजीराजांचा काळ झाला या उटलेल्या हुलीवर विश्वास टाकून पिलाजीराव संभाजीराजांचे जोडे सती जायला निघालेल्या येसूबाईंच्यासाठी मागायला आले होते. त्या वेळी त्यांची समजूत घालून राजांनी त्यांना शृंगारपुरी परते धाडले होते.


संभाजीराजे सुखरूप परतताच शृंगारपूरला राजांनी थैलीस्वार धाडला होता. पिलाजींना लिहिले होते "पौर्णिमा घरोन सूनबाईंनिशी निघोन येणे! येते वहती भावेश्वरीचा अंगारा घेवोन येणे! शंभूराजे सुखरूप गडी पावते जहाले ! "

पिलाजींना सदरेवर येताना बघून संभाजीराजे अदबीने उठायला गेले पण पुढे पुढे येणारे चमकते तोडे बघून ते पुन्हा खाली बसले! आपसुखच.

"या. सूनबाई." म्हणत राजे मात्र उठून तसेच पुढे गेले. त्यांनी येसूबाईंना हाती धरून आणले आणि मासाहेबांच्या बगलेने बैठकीवर इतमामाने बसविले. पिलाजी बसले. राजांनी समोर आलेल्या परडीतील भंडाऱ्याची चिमट उधळली. गोंधळ्यांना उदोची इशारत दिली. गोंधळ्यांनी पोत पाजळून नमन घरले:


" गजवदना - गणराया गौरी!" संबळ तुणतुण्यांचे मेळसूर घुमू लागले. म्होरक्या गोंधळी नाचत्या पोतांवर कानाशी हात नेत जगदंबेचा महिमा उभा करू लागला - "आदिशक्तीचे कवतुक मोठे भुल्या मज केले!" 

आम्याच्या प्रवासाने आणि ध्यानीमनी नसता समोर ठाकलेल्या एकाहून एक बाक्या प्रसंगाने संभाजीराजांची जाण आता चढीने वाढली होती. राजांनी आपल्या ताब्यातील गडकोटांचा फेर टाकून गडकऱ्यांना दर्शन दिले. अण्णाजी दत्तोंच्या मदतीने मुलखाची ऐनजिनसी जमाबंदी बांधून घेतली. आपल्या लष्कराला नवा कानुजाबता घालून दिला. कडक नियम जारी केले.


'लष्कराने पाऊसकाळात चार मास आपल्या राहणीच्या मुलुखावर जावे. शेतीभातीची कसणूक करावी. दसरा धरून साहेबकामावरी रुजू व्हावे. आठ मास मुलुखगिरी करोन पोट भरणे ते भरावे. स्वारीत बायाबापड्यांनी बदअमल करू नये. मुलुखगिरीस जाताना व देशी परते येताना सरकारी चौकी पहाऱ्यावर जमेनिसास झाडा द्यावा. गैरवाका वर्त नये. कानुजाबत्यास बाघ आणील त्याचे हात जल्लादाकरवी कलम होतील.' असा लष्कराचा कडक जाबता राजांनी घालून दिला.

जमीनधाऱ्याबद्दल मलिकंबरला मागे टाकील असे धोरण राजांनी घालून दिले. गावचा देशमुख, देशपांडा, पाटील आणि चार जाणते, कदीम गावकरी अशा सात असामींनी मिळून जमिनीचा वकूब बघून प्रत ठरवावी. एकपिकी, दुपिकी अशी जमिनीची प्रतवारी लावावी. त्यामानाने सरकारी धारा बसवावा. जे रयतेस धारा नगद पैक्याचे रूपाने देणे निभत नसेल त्याजकडून ऐनजिनसी धान्यरूपाने धारा वसूल घ्यावा. नांगर, बैल, बियाणे जो वस्तभाव कसणुकीस लागेल तो सरकारफडातून कुणबियांस वख्ती द्यावा. हे पुढे टाकायच्या चालीसाठी असलेले धोरण होते. संभाजीराजांच्या समक्ष ते सारे घडत बनत - होते.


सदरेवर बसलेले राजे, आपला कुणबी आणि धारकरी यांच्यासंबंधी बोलताना केवड्या मायेने भरून येतात हे शंभूराजे समक्षच बघत होते. कधीमधी त्यांच्या मनी विचार येत होता- " तसा फावला समय हाताने आलाच तर महाराजसाहेब उठतील. आम्हास संगती घेऊन एखाद्या वाडीत जातील. अंगचा निमा टोप चोळणा उतरवून ठेवतील आणि धोतराचा काचू मारून, मुंडं अंगी चढवून बैलजोडीचा माग घरीत नांगराच्या खुंटाळीला हात घालतील!! आम्हास म्हणतील- शंभूराजे, तो कोढता घ्या. आम्ही केलेल्या नांगरटीतील ढेकूळबाब सपाटीस लावा.