कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ७२

 यमुनेवर लाटा उमटवीत नौका' किनान्याकडे ' चालली होती. बराच वेळ मनाच्या कोपऱ्यात घर करून राहिलेले एक आश्चर्य राजांनी शांतपणे उभे केले. त्यांनी संभाजीराजांना विचारले, "कुंभाराच्या घरासमोर हिरोजीच्या वेशातही तुम्ही आम्हास कसं पारखलं ? " क्षणभर यमुनेच्या उचंबळ्या लाटांनी ही बाब ऐकायला आपली खळबळ रोखून धरली !


राजांच्या पायांवर नजर टाकीत संभाजीराजे अदबीने म्हणाले, "डोकीवर टोप असल्यासारखेच चालत होतात तुम्ही आबासाहेब !! '


मथुरेच्या ब्राह्मण वस्तीतील एका कौलारू घरात छाटीधारी संन्यासी आणि बालसंन्यासी शिरले. पाठीशी निराजी होते. हे घर मोरोपंत पिंगळ्यांचे मेहुणे कृष्णाजीपंत त्रिमल यांचे होते. निराजींनी त्यांचा तपास लावून राजांना त्या सुरक्षित जागी आणले होते. कृष्णाजी आणि त्यांचे बंधू काशीराव व विसाजीपंत यांनी आपल्या थोर अतिर्थीचे उत्तरी दिललगाव पद्धतीने स्वागत केले. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाईंनी रसोई शिजायला टाकली. पाकगृहात मथुराई पद्धतीच्या रसोईचा अन्नगंध दरवळू लागला.


घराच्या अतिथी सदरेवर अंथरलेल्या स्वच्छ बैठकीवर राजे आणि संभाजीराजे छाट्या धारण करून बसले होते. कुणाची नियती, कुणाला कुणाच्या दारात नि कसल्या रूपात उभे करील सांगता येत नाही। वास्तविक संन्यासी, योगी, बैरागी यांचे स्वागत राजांनी करावे. पण आज तेच खुद संन्यासी वेषात दुसऱ्याच्या घरचे आतिथ्य घेत होते, आणि तेही एका मथुरेसारख्या तीर्थक्षेत्रातल्या ब्राह्मणाकडून !


राजे उसासले. छाटीधारी संभाजीराजांना ते निरखून बघू लागले. फार विचित्र विचारांची भगवी छाटी त्यांच्या मनाने पांघरली :


" राजा हा जन्मानेच संन्यासी असतो! सारे सोडून संन्यासी होणे सोपे, पण साऱ्यात असून संन्यासी राहणे कठीण. हे पडताळून बघायला आम्ही अनेक साधुसंतांचे पाय धरले. तुम्हाला मात्र या उमरीतच हे समजते आहे! असेच व्हावे तुम्ही वृत्तीने राजे आणि मनाने संन्यासी !


त्रिमलांच्या घरची भोजने उरकली. राजांनी सर्व मंडळींशी खलबत केले. पुढच्या दौडीचा बेत आखून झाला. राजे आणि संभाजीराजे बिस्तऱ्यावर आडवे झाले. संन्याशाला बिलगत बालसंन्यासी सुख झाला..


तिकडे आम्यात कल्लोळ उसळला होता! “सेवा गैब हो गया" ही खबर हां हां म्हणता शहरभर पसरली होती. काल्पनिक धास्तीने औरंगजेबाने प्रथम आपल्या महालाभोवती हत्यारबंद हशमांचे पहारे आवळून टाकले! " बेमुर्वत, निकलो यहींसे " म्हणत फौलादखाँची शेलक्या शिव्यांनी हजामत करून औरंगजेबाने त्याला महालाबाहेर हाकलला. 

'वजीरे आझम्, सेवाने कितने रुपये नजर निसार पेश किये थे ? " औरंगजेबाने जाफरखानाला विचित्र कडवट सवाल टाकला.


'बाप बेटेने मिलकर करीबन डेढ हजार मुहर और पंद्रह हजार रुपिये नजर किये थे हुजूर." जाफरखानाने जामदारखान्याचा तपास घेऊन प्रत्युत्तर दिले. " उसे दर्बार आने के लिये खर्चा कितना दिया था ?" औरंगजेबाच्या कपाळी आठ्यांचे जाळे चढले.


'एक लाख रुपिया आलिजा!" जाफरखानाला सवालाचा रोख कळल्याने तो पडल्या आवाजात उत्तरला.

"नमकहराम, दगलबाज !" हिशोबातली तूट पाहून अस्वस्थ औरंगजेब माळेचे मणी सरसरते ओढत पुटपुटला.


" इकडे काखेच्या झोळीत, लाख लाख रुपये किमतीचे हिरे, रत्ने, माणके दडवून राजे संभाजीराजांच्यासह मथुरेच्या वेशीबाहेर पडले होते, बैरागी, उदासी, भोले अशा निरनिराळ्या उत्तरी पंथांचे वेष राजांच्या माणसांनी चढविले होते. वेगवेगळे ताफे करून एकमेकांशी संबंध राखत ते चालले होते. बनारसच्या रोखाने. चालीच्या वाटा दाखवायला स्वतः कृष्णाजी त्रिमल आणि कवी कुलेश बरोबर होते. कृष्णाजींचे बंधू काशीपंत आणि विसाजी संगती होते.

दिवसभर धर्मशाळेत मुक्काम आणि सांज व पहाट धरून वाटतोड असा प्रवास सुरू झाला. सरतीला आला तरी पावसाळा ठार हटला नव्हता. मार्गीच्या नद्यांची विशाल पात्रे धावणीची गती रोखीत होती.

सांज धरून एका धर्मशाळेत राजांचा मुक्काम पडला. कृष्णाजीपंतांनी धुनी पेटवली. तिच्या फेराने राजे संभाजीराजे, कृष्णाजी, कुलेश असे बैरागी बसले.


"सर्जेराव, किती पल्ला मागं पडला ?” राजांनी धुनीच्या उसळत्या ज्वालांकडे बघत भोल्याचा वेष घालून बसलेल्या सर्जेराव जेध्यांना विचारले. "जी असंल की धा कोसाचा." सर्जेरावांनी उत्तर दिले.


'एवढाच ? " राजांनी एक काटूक उचलून धुनीत घातले. आणि संभाजीराजांकडे बघितले. ते धुनीत फुललेल्या निखाऱ्यांवर डोळे जोडून विचारात हरवले होते- ज्वालांच्या चटचटीबरोबर त्यांचा सूर लागून राहिला होता.


मथुरा सोडून बनारसच्या रोखाने बैरागी तांडा चालला होता. सारेजण चटकी पावले उचलीत होते. नकळत संभाजीराजे मागे पडत होते. बोलत पुढे गेलेले राजे मग एकदम थबकत होते, तांडा थांबत होता. सगळ्यांचा मेळजोड होऊन पुन्हा वाटतोड सुरू होत होती. 

थकलात ? " राजांनी प्रश्न करून संभाजीराजांची तंद्री तोडली.

"जी, नाही. "


कसल्यातरी निर्धारी मनसुब्याने चालते राजे एकाएकी थांबले. त्यांच्या कपाळीचे भस्म-पट्टे आक्रसले. चर्या निर्धारी झाली..


घामाने डवरलेल्या, लालावलेल्या संभाजीराजांच्याकडे त्यांनी नजरजोड बघितले. जवळ जात त्यांनी त्यांच्या खांद्यावर आपला 'संन्यासी' हात ठेवला ! " जरा येता ? " घोगरल्या आवाजात राजांनी पायवाटेच्या कडेला असलेल्या एका डेरेबाज झाडाकडे हाताने इशारत केली. संभाजीराजांनी डोईवरचा साफा डोलविला. ते दोघेही पितापुत्र झाडाच्या घेराखाली आले. तांडा पायवाटेवर उभा राहिला. राजांच्या मनी काय आहे याचा कुणालाच अंदाज येईना.

'आमचं एक ऐकता ? " राजांचा हा आवाज नेहमीपेक्षा वेगळा होता. "जी!'

काही क्षण खोळांबले! मनी बांधलेले संभाजीराजांच्या कानी घालताना आजवर राजांना कधीच शब्द धुंडाळावे लागले नव्हते. आज ते करणे पडले. " पल्ला लांबचा आहे...' राजे थांबले. आपसुखच. " "जी.'


" तुम्ही. तुम्ही थांबता ?" राजांनी संभाजीराजांचे दोन्ही खांदे हातपकडीने - एकदम घट्ट आवळले. शब्दांपेक्षा ती पकडच खूप बोलकी वाटली संभाजीराजांना. ते दोघे पितापुत्र एकमेकांचे डोळे पाजळल्या पोतांसारखे एकमेकांस भिडवून एका क्षणात उदंड बोलून गेले. ज्योत ठिणगीला समजावून गेली. एकाच हातपकडीतून !

"जी, आज्ञा!" कुठूनतरी आलेला तोफगोळा रिकाम्या तोफगाड्यावर आदळताना ठणकावा तसे संभाजीराजे निर्धारी बोलले.

ते ऐकताना राजांचे डोळे पाणथरून आले. चंदावलीचा फुलला स्वार, ऐन घुमाळीत हत्यारमार करीत हरोलीला यावा तसा एक विचार राजांच्या मनातील सगळे पेच दूर हटवीत वर आला " खरंच आमचे काळीजच यांच्या रूपानं कुणी तरी सोनरसात - डुबवून ते आम्हास आपल्या सावळ्या हातांनी पेश केलं आहे!! " राजांचे डोळे अभिमानाने पाणथरले होते !


'सावळे हात एकला जीव !" क्षणातच राजांचे पुरे भान सुन्न झाले. - चला. संभाजीराजांच्या खांदावळीवर हात ठेवून राजे झाडाच्या घेराखालून तांड्याकडे चालले.


"कृष्णाजीपंत, बड़े ध्यान से सुनो." तांड्यात येताच राजे कृष्णाजीपंतांना जरा बाजूला घेऊन मन बांधून निर्धाराने बोलले.


" हां. स्वामिन्. " " हम आगे कूच करते हैं। हमारे फर्जद, केसोपंत और कविजीके साथ पीछे लौटेंगे।