कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ७१

 तिसरा प्रहर टळतीला गेला. कुम्हारबाडीत संभाजीराजे, त्र्यंबकपंत आणि निराजीपंत कुंभाराच्या मेटावर होते. घोंगडीवर बसलेले संभाजीराजे विचाराच्या पाठलागाने हैराण होत होते. आपसुख उठून बाहेर येत नूरगंजबागेकडून येणाऱ्या वाटेला डोळे लावीत होते. पुन्हा आत येऊन घोंगडीवर बैठक घेत होते.


 संभाजीराजांची उलघाल वाढीला लागली. ... आणि आणि महाराजसाहेब आलेच नाहीत तर तर तर जेधेकाकांच्या संगतीने आज आम्याबाहेर पडायचं. - मथुरेच्या वाटेनं चाल धरायची. मथुरा ! कुठं आहे? कशी आहे? तेथून जमेल तसं मुलखात जायचं. आणि थोरल्या मासाहेबांनी विचारलं, 'तुमचे आबासाहेब कुठं आहेत ?' म्हणून तर ? मासाहेब! किती दिवस झाले, त्यांच्या हातून कपाळी शिवगंध - नाही रेखून घ्यायला मिळालं! आणि धाराऊ ? धाकल्या आऊसाहेब, रायाजी, अंतोजी, सैस, गोमाजीबाबा- ' त्यांच्या मनाचे राजपान वाहतीला लागले.

"टप्ऽ टप् टप्s" घोड्यांच्या निसटत्या टापा संभाजीराजांच्या कानी आल्या. त्यांच्या मनीचे विचार दूर उडाले. कमरेच्या हत्याराच्या मुठीवर पंजाची पकड चढवीत ते घोंगडीवरून ताडकन वर उठले. निराजीपंतांकडे एक नजर देत ते तरातर कुंभाराच्या मेटाबाहेर आले. बाहेर श्रावणाची एक तुटकी सर शिपकारत होती. तिच्या जाळीदार चंदेरी पडद्यातून संभाजीराजांना दोन स्वार दुडक्या गतीने येताना दिसले. दोन्ही घोडाइतांच्या डोक्यावर घेरेदार कंगणी पगड्या होत्या.


त्या स्वारांपैकी सर्जेराव जेधे पुढे झाले. सामोरे येत त्यांनी संभाजीराजांना मुजरा केला, 'चला, टाकोटाक निगायचं हाय." ते दबकून बोलले. " निघायचे ?" क्षणभर संभाजीराजे गलबलले. महाराजसाहेबांशिवाय निघायचे ? कुठे ? कशासाठी ?


सर्जेरावांच्या पिछाडीला असलेला घोडाईत पायउतार झाला होता. सर चुकविण्याचे 'निमित्त' करून त्याने थोडीशी मान झुकती ठेवली होती. त्या घोडाईताची सुराने, लगीने पावले पडत होती. पायीचे मावळी पायताण कुरकुरत होते.


त्या पावला-पावलांबरोबर संभाजीराजांचे अंग वैशाखीच्या तापट धगीने तटबंदीचा दगडी साज सरसरून यावा तसे मोहरून उठले. "हे हेऽ महाराजसाहे ऽ बच! मनाची रुजवात डोळ्यांनी पटवून देताच संभाजीराजे पायझेप टाकीत पुढे सरसे झाले.

राजे क्षणभर गडबडले. आश्चर्याने डोळ्यांना डोळे देणाऱ्या संभाजीराजांना त्यांनी स्वतःचे डोळे ताणते करून इशारा भरला. सावधगिरीचा! काही न बोलण्याचा! संभाजीराजे उमगावयाचे ते उमगले.

"निराजी, तुम्ही बालाजीच्या सराईत जा. तिथे मथुरेचे दोन कवी आहेत. त्यांना सांगा 'हत्ती' मथुरेच्या घाटावर येताहेत. नौका सिद्ध ठेवली पाहिजे!” राजांनी निराजींना कानमंत्र दिला. मांड घेऊन निराजी सुटले. मात्र त्यांनी राजांना मुजरा केला नाही !


" त्र्यंबकपंत, फर्मावल्या वस्तू सिद्ध ठेवल्या ? " राजांनी त्र्यंबकपंतांना विचारले. हातातील बोचके वर उचलून त्र्यंबकपंतांनी होकाराची मान डोलावली. आम्ही कुंभाराचा निरोप घेतो.” संभाजीराजे सर्जेरावांकडे बघत राजांना म्हणाले.


'चला. आम्हीही येतो." राजे सर्वांसह कुंभाराच्या मेटात आले. 44 आपल्या मेटावर काय घडते आहे याची कुंभाराला थोडीसुद्धा कल्पना नव्हती. तो आपल्या कामात दंग होता.


"बाबा, आम्ही निघतो.” संभाजीराजे त्याल म्हणाले. तो पुढे आला. “भाईर बारीस हाय निऽ!” तो थोडे मावळी, थोडे उत्तरी बोलला. शंभूराजांनी कंठीचा मोतीकंठा उतरला. ती संधी साधून राजे हळूच पुढे झाले. संभाजीराजांच्या कानाशी लागून पुटपुटले- “कंठा द्या पण एक सांगा त्यास. आम्ही - जाताच पहारेकरी येतील. त्यास आम्ही दक्षिणेकडे औरंगाबादेच्या रोखाने कूच झाल्याचे सांगणेस बोला!" "बाबा, हे घ्या आणि आमच्यासाठी एक करा संभाजीराजे कुंभाराला कंठा देत म्हणाले.

" काय सरकार ? "

"आम्ही औरंगाबादेस जातो आहोत. मुलुखास. कुणी आमची वाजीपुशी केल्यास सांगणे. येतो आम्ही!"

“जी.” कुंभार कंठ्याकडे बघत म्हणाला.

पुढे संभाजीराजांचा घोडा ठेवून राजे, सर्जेराव, त्र्यंबकपंत आम्यातून 'दक्षिणेकडे' बाहेर पडणाऱ्या वेशीजवळ आले. राजांच्या अंदाजाप्रमाणे पहाऱ्याच्या हशमांनी हे पथक हटकविले. सर्जेराव घोडा पुढे घेत हशमांजवळ गेले. त्यांनी कमरेच्या कशात ठेवलेली 'दस्तके' काढून दाखविली.


"कौनसी सवारी है?" तरीही एका हशमाने सर्जेरावांना तराटणी देत सवाल केला. पुढे होत राजांनी शहरातील रामसिंगाच्या हवेलीकडे पगडीचा रोख ठेवून जाब दिला, 'राणा रामसिंग की मेहमान सवारी! 'सेवा' दख्खनकी फर्जद सवारी!

मिर्झा राजाचा दरबारी असलेला वचक आठवून पहारेकऱ्यांनी दस्तके पाहून पथक सोडले! आता राजे ' दक्षिणेकडे गेले ही भूमिका सर्वत्र उठणार होती.


सारे 'दक्षिणवेशीबाहेर' पडले. कुणीच काही बोलत नव्हते. आम्याला घरून श्रावणी सांज उतरत होती. राजांनी यमुनेच्या किनाऱ्याने 'उत्तरेकडे ' हात उठविला. घोडी यमुनेच्या रोखाने दौडू लागली. यमुनाकाठ येताच घोडी थांबली. सगळे पायउतार झाले. त्र्यंबकपंतांनी बोचके सोडले. राजे आणि संभाजीराजे अंगीचे पेहराव उतरून भगव्या छाट्या चढवून संन्यासी झाले! यमुना हळहळत होती. चारी बाजूने सांजावून आल्यामुळे तिला हे दोन्ही 'भुत्ये संन्यासी' काही बघायला मिळत नव्हते.


उतरलेल्या पेहरावाचे पुन्हा बोचके आवळून त्र्यंबकपंतांनी ते घोड्याच्या पाठीवर टाकले. सर्जेराव आणि ते आपल्या आणि राजांच्या व संभाजीराजांच्या घोड्यांच्या ओठाळ्या धरून यमुनाकाठची मऊ वाळू तुडवीत काठाने उत्तरेकडे चालले. त्यांच्यात आणि आपल्यात थोड़ा फासला ठेवून राजे आणि संभाजीराजे यमुनेच्या काठची ओलवती वाळू तुडवू लागले. त्यांच्या पायठशांनिशी यमुनेच्या साक्षीने आता भवितव्याचे महाभारत उभे ठाकणार होते! मथुरेच्या रोखाने नौका नेणारा घाट आला. राजांनी त्र्यंबकपंत आणि सर्जेराव यांची खांदाभेट घेतली.


घाटावर निराजी, कवींद्र परमानंद व कवी कुलेश यांच्यासह सिद्धच होते.. न दिसणाऱ्या यमुनेच्या पात्राला राजे-संभाजीराजे यांनी नमस्कार केले आणि ते नौकेत चढले. पाठोपाठ निराजी वर चढले. नावाड्यांनी वल्ही पेलली. अंधाराला चिरत नौका पात्र तोडू लागली. पात्राच्या मध्यावर येताच राजांनी खांद्यावर चढविलेल्या झोळीत हात घातला. सोनमोहरांची भरली मूठ बाहेर काढून ती संभाजीराजांच्या हातात देत ते म्हणाले, " यमुनामाईला अर्पण करा."


संभाजीराजांनी सोनमूठ यमुनेच्या कृष्णमुखात सोडली. या वेळी औरंगजेबाची लाल किल्ल्यातील मगरीबीची नमाज संपली होती! तो खुदातालाला भरल्या आभाळाकडे पंजे उठवून दबरी 'पावती' देत होता "अर्र - हम्मा ऽ निर्रहिम्म! " खरोखरच तुझ्यासारखा 'दयाशील' तू एकटाच आहेस !!'


त्याच दयेचा फायदा घेऊन कोठीत पलंगावर गिर्धा, लोड रचून, राजांचा तबकातील टोपसुद्धा उचलून त्या जागी सरपोसाने झाकलेली 'पाण्याची सुरई' चढवून हिरोजी सिताब कोठीबाहेर पडला होता! मदारीने 'औषधे' आणण्याच्या निमित्ताने केव्हाच कोठीला पाठ दाखविली होती! सरे पक्षी उडाले होते! उरली होती पिसे ! निर्दय कैदेच्या आठवणीची.


आपल्या हवेलीच्या देवमहालात रणचंडीसमोर माथा टेकून एक मानी रजपूत तिला साकडे घालीत होता- "मेहमान सलामत रहे !" तो होता रामसिंग ! एक वास्तू आपल्या नावाला येणारा बट्टा टळला म्हणून यमुनेकडे बघत निःश्वास टाकीत होती- 'विठ्ठलदासाची हवेली ! '