शामियान्याच्या सगळ्या घेराभोवती मावळे धारकरी आणि रजपूत हशम यांचा छबिन्याचा जोड पहारा नागव्या तलवारी पेलून जागत्या डोळ्यांनी फिरत होता. आपल्या जाड मावळी पायताणांची कुरकूर उठवीत, हातात नंगी तेग धरून खासे नेताजी त्या पहाऱ्यावर नजर ठेवीत फिरत होते. तळावर जागजागी आगट्या पेटल्या होत्या. मधूनच त्यातील बाभळीच्या गाठी पेटता पेटता फाटकन् फुटत होत्या. त्यामुळे फवारलेल्या ठिणग्यांचा आगटीभोवती सडाच सडा पडत होता.
समोर टाकलेल्या गवताच्या पेंढ्या सोंडेने झटकून नीट मुंगीरहित करून मगच प्रश सोडताना हत्तींच्या गळ्यांतील घंटाचे उठणारे घुमारे नाद तळावर प्रसरत होते. बैठक घेतलेले उंट माना ठेवून मिटल्या डोळ्यांनी रवंथ करीत होते. त्यांच्या ओठाळीतून फेसाच्या तारा तरंगत होत्या. लीद टाकलेली घोडी अखंड शेपट्या चाळवीत उभ्या उभ्या झिंगत होती. तळावर शांत रात्र उतरली होती.
आपल्या बिछायतीवर संभाजीराजे मात्र तळमळत होते. एकसारखी कूस पालटत होते. थोरल्या मासाहेबांचा मायेचा हात पाठीवर घेऊन बिनघोर झोपण्याची सवय असलेले संभाजीराजे बेचैन होते.
लेटल्या लेटल्या त्यांची घालमेल निरखणारा मिर्झा राजे आपल्या मंचकावरून उठला. किमॉश उतरून ठेवल्यामुळे त्याचे रुपेरी केस शमादानांच्या प्रकाशीत लकलकले. संभाजीराजांच्या मंचकाजवळ येत त्याने आपला हिरेजडित अंगठ्या असलेला हात संभाजीराजांच्या पाठीवर ठेवला. त्या स्पशनि शंभूराजे दचकून पांढऱ्या सफेद केसांकडे बघू लागले. उठले. मिर्झा राजाच्या
" कुँवर, तुम्हे नींद नहीं आती! जगह बदल गयी कि नींद हजम होती है ! आवो हमारे बिस्तरपर लेट जावो! डरो मत.” मिर्झा राजाने त्यांचा हात धरून त्याना मचकावरून उतरते केले. हळुवारपणे आपल्या मंचकाजवळ आणले.
संभाजीराजे, मिर्झा राजांच्या मंचकावर बसले. समोर उभ्या असलेल्या धिप्पाड पण शांत मुद्रेच्या मिर्झा राजाकडे त्यांनी पाहिले. मिर्झाच्या छातीवर त्याच्या अलमपन्हा औरंगजेबाने त्याला बहाल केलेले हिरव्याकंच पाचूचे मोतीलगात गुंफलेले पदक चमकत होते. त्या पदकाकडे बघत संभाजीराजे क्षणभर गप्प झाले. मग मान उडवून त्यांनी विचारले, "दादाजी, आम्ही एक विचारू? " " बेशक पूछों कुंवर संभू.” मिर्झा शांतपणे म्हणाला
" आमचे आबासाहेब म्हणाले की तुम्ही रजपूत आहात आणि आम्हीही रजपूत आहोत. मग मग तुमच्या गळ्यात भवानीच्या कवड्यांची माळ का नाही ?" त्या प्रश्नाने मिर्झा राजा हा दिल्ली दरबारचा थोर राजकारणी चरकला. त्याच्या डोळ्यांत एक दुखरी छटा तरळून गेली. आपल्या छातीवरच्या हिरव्या पदकावरून कसातरीच हात फिरवीत तो म्हणाला, "बहोत रात उतर आयी. सो जावो कुँवर ।' संभाजीराजांना लेटते करून मिर्झा राजाने त्यांच्या अंगावर शालनामा पांघरला. स्वतः मिर्झा राजा त्यांच्या शेजारी कलंडला. "चंडी, चंडी' असे पुटपुटत आपल्या हयातीच्या चुकलेल्या, मार खाल्लेल्या वाटा आठवू लागला. कुसवे होऊन मिर्झा राजाने संभाजीराजांच्यावर नजर टाकली. त्यांचा श्वास बिनघोर लयीत लागला होता !
शामियान्यासमोरच्या पैस जागेत शाही इतमामात बैठकीचा चौथरा सजला होता. त्यावर राजपुती वाणाच्या तलम बिछायती अंथरल्या होत्या- जरीबतूची नकसदार कलाकुसर असलेल्या खोळी घातलेल्या गिर्धा, लोड मांडले होते. -
संभाजीराजांना नजराणा देऊन दिपवून टाकणासाठी तो चौथरा मिर्झा राजाने एका रात्रीत सिद्ध केला होता. चौथऱ्याच्या एका अंगाला सरपोसांनी झाकलेली पेहरावाची तबके घेऊन काही रजपूत धारकरी उभे होते. पिछाडीला अब्दागिन्यांची मोठी पिंपळपाने हातात धरून अब्दागिरे खडे होते. एका बाजूला शिंगे, तुताऱ्या, नगारे यांचा शहाजणांचा ताफ़ा उभा होता. तळावरचा तमाम हशमलोक तो नजारा बघण्यासाठी जागा मिळेल तिथे दाटला होता.
ज्येष्ठ वद्य द्वितीयेचा दिवस कासराभर वर आला होता; पण पावसाळी कुंदपणामुळे तसे वाटत नव्हते. आपल्या शामियान्यातून मिर्झा राजा जयसिंग संभाजीराजांच्यासह बाहेर आला. रजपुताच्या अंगावर सोनेरी बुट्ट्यांचा हिरवाकंच मोगली जामा होता. खांद्यावरून फिरलेले गर्द निळे जरीकाठाचे उपरणे होते. पाचू मढविलेला, मागे झुकलेला, झुरझुरत्या सफेद पिसांचा तुर्रेबाज किमॉश त्याने मस्तकी चढविला होता. गळ्यात मोत्यांचे कंठे आणि हिरवे पदक होते.
संभाजीराजांनी जरीकोयऱ्यांच्या नकसकामाचा पांढरा सफेद जामा परिधान केला होता. राजांचा होता त्या माटाचाच, पिछाडीला ठेवणारा केसरी टोप त्यांनी मस्तकी चढविला होता. कमरेला गर्द जांभळा जरीशेला आवळला होता. चुणीदार मांडचोळण्याखाली पायात भगवे चढाव होते. मोत्याच्या कंठ्याबरोबर छातीवर कवड्यांची दुपेडी माळ आणि कपाळी दोनदळी शिवगंध होते. सर्व दरवाजे मिटलेल्या जगदंबेच्या शांतमंगल गाभान्यातून समईचा एखादा कवडसा बाहेर झेपावून यावा तसे ते. दिसत होते !
मिर्झा राजे संभाजीराजांच्यासह बैठकीच्या रोखाने चालू लागले. शिंगांच्या कातय ललकाऱ्या शहारत उठल्या. शहाजणे वाजू लागली.
आघाडीच्या खाशा स्वाऱ्यांमागून नेताजी, गंगाधरपंत, कर्माजी, किरतसिंग, रायसिंह राठोड, चतुर्भुज चौहान, रामसिंग हाडा, महमद तखन, तुर्कताझखान अशी मंडळी अदबीत चालली. मिर्झा राजाने संभाजीराजांना हात पेश करून बैठकीवर बसते केले. आपण स्वतः बैठक घेतली आणि किरतसिंग व उदयराज मुन्शी यांच्याकडे इशारतीची नजर दिली.
नजराण्याच्या पेहरावाचे तबक घेतलेला, एक एक राजपूत धारकरी पुढे होऊ लागला. मिर्झा राजासमोर अदबीने वाकून हातांतील तबक पुढे करीत तबकाला मिर्झाचा दस्तुरी-स्पर्श करून घेऊ लागला. तसेच पुढे होत ते तबक संभाजीराजांच्यासमोर धरू लागला. संभाजीराजे नजराणा आपला केल्याचे दस्तुरी-स्पर्श देऊ लागले.
एकाएकी पुरंघरच्या पायथ्याच्या रोखाने उठलेली घोड्यांच्या टापांची टपटप सर्वांना ऐकू आली. सर्वांच्या नजरा त्या आवाजाच्या रोखाने वळल्या. कैक काळजे घडघडली. झटकन् मिर्झा राजे बैठकीवरून उठले. आपल्या मुलाकडे बघत जाणवणाऱ्या करड्या " आवाजात दबके बोलले "किरत ऽ!' - "जी" म्हणत किरतसिंगाने कमरेच्या हत्यारावर मूठ रुतवली. एका घोड्याच्या पाठीवर चलाख झेप घेऊन किरतसिंगाने आवाजाच्या रोखाने घोडे पुढे काढले. काही क्षण तसेच गेले. संभाजीराजे आणि नेताजी यांची नजरानजर केव्हाच होऊन गेली होती! भोवतीच्या कुणालाही कळायच्या आत नेताजींचे तरबेज पट्टेबाज धारकरी संभाजीराजांच्या भोवती फेर धरून एकवटले गेले !
सगळ्यांचे डोळे किरतसिंग गेला त्या वाटेवर जोडले होते. टापा जवळ येऊ लागल्या. रामेट्याच्या, घाणेरीच्या, करवंदीच्या गर्द झुडपांना वळसा टाकत तीस एक स्वारांची घोडेतुकडी दौडत येत होती. त्या तुकडीच्या आघाडीला दोन उमदे घोडे खूर फेकत दौड़त होते. ते स्वार होते किरतसिंग आणि पठाणांचा लष्करे सालार साक्षात दिलेरखान !
ते दौड़ते पथक चौथऱ्याजवळ आले. दिलेरखानाला बघताच मिर्झा राजाच्या कपाळावर एक बारीक आठी उठली. मांड मोडून दिलेरखान, सगळ्या तळावर क्षणात सरसरती नजर फिरवीत पायउतार झाला. खांद्यावरच्या हिरव्याकंच फुगीर खिल्लतीमुळे तो केवढातरी धिप्पाड दिसत होता.
मिर्झा राजासमोर येऊन त्याला तसलीम करीत निधड्या पठाणी बोलीत पुरंधरच्या रोखाने हात उडवीत, मिझाने काही विचारू नये म्हणून तोच म्हणाला, "गडपर रसद चढानी है। ऊपर दानातक पीछे नहीं छोड़ा है काफर मरहट्टोंने।' त्यावर मिर्झा राजाला काहीच बोलता आले नाही. चेहऱ्यावर खोट्या हास्याची खिल्लत चढवीत तो दिलेरला म्हणाला, "आइये खाँसाब।'
संभाजीराजे बैठकीवरून दिलेरला निरखीत होते. त्याच्या भुक्या जाड होत्या. खांद्याच्या गिर्दीत त्याची गर्दन घट्ट बसविल्यासारखी वाटत होती. डोळे भेदक होते. सगळी हयात दौडीत गेल्यामुळे त्याचा कोरल्या दाढीचा पठाणी चेहरा रासवट, निबर दिसत होता. अंगावरच्या खिल्लतीचे बंद त्याने डाव्या खांद्याजवळ गाठीत आवळले होते. डोक्यावरच्या पठाणी किमॉशात पाचूचे हिरवे पान मढविले होते. मिर्झा राजाने दिलेरखानाचा संभाजीराजांना परिचय करून दिला. त्याला बैठकीवर आपल्या उजव्या हाताला बसवून घेतले.
उरलेली तबके पेश करून झाली. संभाजीराजांनी नेताजींच्याकडे पाहिले. नेताजींनी फेरनजराण्याची तबके घेतलेले मावळे पुढे घेतले. संभाजीराजांनी मिर्झा राजे व दिलेरखान यांना ती तबके बहाल करण्यासाठी त्या तबकांना दस्तुरी स्पर्श दिले. चौथऱ्यावरचे ते दृश्य मजेदार दिसत होते. दिल्ली दरबारचे दोन खंदे सेनापती आणि जगदंबेचा एक बाळभुत्या त्या बैठकीवर बसले होते. किरतसिंगाला इशारत करून मिर्झा राजे हसत संभाजीरावांना म्हणाला, "और एक ऐसा तोहफा हम नजर करेंगे जिसे आप बहोत पसंद करोगे कुँवर ।'
संभाजीराजांच्या भुवया, ते ऐकून वर चढल्या. दिलेरखानालाही मिर्झाच्या तोहफ्याचा अंदाज येईना. तळावर ठाण केलेल्या हत्तीतील एक जंगा हत्ती रुप्याचा नकसदार हौदा चढवून, झूल घालून सजविण्यात आला होता. किरतसिंगाने त्या हत्तीवर बैठक घेतलेल्या फीलवानाला इशारत देताच त्याने तो हत्ती चौथऱ्यासमोर आणला.
त्या सजल्या हत्तीकडे हात करीत मिर्झा राजा संभाजीराजांना म्हणाला, "ये शाही फीलखानेका हाथी 'अन्वर' शहेनशाहने आपको नजर किया है कुँवर संभू । आप दरबारके सबसे पहले कम उम्र पंचहजारी सरदार हो। "
फीलवानाने एकसारखा अंकुश टोचून "चल बेटे 'अन्वर' सलामी दे ।" अशी हत्तीशी बातचीत करून तो जंगा हत्ती पुढच्या थोराड गुडघ्यात खाली बसविला. बसल्या 'अन्वरने' रणशिंगासारखी बाकदार सोंड उचलून मेहमानांना ऐटदार सलामी दिली आणि पुन्हा तो ताठ खडा होऊन सोंड झुलवीत, कान फडफडवीत डुलत उभा राहिला.
ते भरगच्च जनावर बघून संभाजीराजे नकळत बैठकीवरून उठले. नेताजींना इशारत करून त्यांनी जवळ बोलावून घेतले. त्यांच्या कानाशी आपले ओठ नेत काही तरी त्यांनी त्यांच्या कानात सांगितले.
"जी," म्हणत नेताजींनी पगड़ी डोलावली. कमरेच्या हत्यारावर हाताची मूठ ठेवून - नेताजी तळावरच्या फीलखान्याजवळच्या गंजीतून एक गवताची पेंढी घेऊन आले. अदवीने त्यांनी ती संभाजीराजांच्या हाती दिली. तो पेंढी घेऊन धिम्या चालीने संभाजीराजे झुलत्या 'अन्वर' जवळ आले. हातातील पेंढी उंचावून त्यांनी ती हत्तींच्या सोंडेच्या रोखाने धरली. अन्वरने आपली भरदार सोंड हातासारखी पुढे करीत पेंढीला वेढा टाकला. त्याच्या गर्दनीवरचा फीलवान डोळे जोडून संभाजीराजांना बघत होता..
सोंडेत धरलेल्या पेंढीचा कट झटके देऊन हत्तीने उस्कटला व गवत सोंडेने झटकून साफ केले आणि आख्ख्या पेंढीचा थोराड घात त्याने सहज आपल्या घशात सोडला. चौथऱ्याभोवतीचे सारे आसामी ते दृश्य टक लावून बघत होते. पठाण दिलेरखान ते बघताना खूप झाला होता. हसून नेताजींच्याकडे बघत संभाजीराजे पुन्हा येऊन बैठकीवर विसावले. संभाजीराजांच्या चालण्याबोलण्यावर, अदब रिवाजावर खूष असलेला मिर्झा राजे अभिमानाने म्हणाला, "हाथी पसंद आया कुंवर संभूराजे ? "
त्याच्याकडे आणि दिलेरखानाकडे एक नजर आलटून पालटून बघत संभाजीराजे म्हणाले, "ते बिचारे मूक जनावर! कोणासही पसंत येईल. कितीही झाले तरी ते पेंढीचे गुरू !
मिर्झा राजाला शेवटचा चटका नीट कळला नाही; आणि कळला असता तरी काही उपयोग नव्हता! तो त्याला कधीच वळला नसता !