*** भाग ३***
राजगडावरून निघालेली संभाजीराजांची स्वारी दिवस कलंडायला आला असताना मिर्झा राजाच्या तळाजवळ आली. भले मोठे पाण्याचे टाके तांबड्या कमळांनी फुलून जावे तसे उभे कन्हेपठार केशरी राहुट्यांनी भरून गेले होते. तळापासून हाकेच्या टप्प्यावर संभाजीराजांची पालखी ठाण करून किरतसिंगाने आपल्या 'राणाजींना वर्दी पाठवली.
मिर्झा राजाचा पसरलेला प्रचंड तळ, हत्ती, उंटाचे चीत्कार, तोफगाड्यांचे खडखडाट या कशाकडेच संभाजीराजांचे लक्ष नव्हते. ते रोखल्या नजरेने समोर दिसणाऱ्या तोफमाऱ्याने काळवंडलेल्या पुरंधराकडे बघत होते. ते त्यांचं जन्मस्थळ होतं. कसलीतरी न कळणारी सळसळ त्यांच्या उदरात दाटली होती.
मिर्झा राजाचा मुन्शी उदयराज, इंद्रमण बुंदेला आणि काही रजपूत धारकरी संभाजीराजांच्या आगवानीसाठी सामोरे पेश आले. तळावर शहाजणे वाजू लागली. नेताजींच्या सोबतीने संभाजीराजे मिर्झाच्या सर्वांत उंच उठून दिसणाऱ्या शामियान्याकडे चालले.
उभ्या हयातीत एवढ्या पोरवयाच्या पराक्रमाचे स्वागत करण्याचा प्रसंग कधी मिर्झा राजावर आला नव्हता. त्याला 'कुँवर ' बद्दल कुतूहल होते. मिर्झाच्या तळावरील रजपूत, पठाण, बहालिया धारकरी धावत येत दाटीने 'सेवा का बच्चा' बघत होते. नेताजींच्या पाठोपाठ संभाजीराजे मिर्झाच्या शामियान्यात प्रवेशले. संभाजीराजांना बघताना मिर्झाच्या पातळ ओठांतून अस्पष्ट शब्द निसटले, " ओऽ ह सरण चंडी ! बेहतरीन !" आपल्या कपाळावरच्या केशरी रजपुती टिळ्याची आठ्यांत घडी करून टाकत, भुवया चढवून मिर्झा राजे जयसिंग समोर बघतच राहिला. आकाशात लकलकणाच्या तेजवान विजेचा एक तरतरीत कोवळा कोंभ त्याला आपल्या शामियान्याच्या दारात उभा ठाकलेला दिसत होता! उग्रसेन कछवाहकडून हे शिवाजीराजांचे 'असली कुंवरच' आहेत याची शहानिशा करून घेण्याचे भान काही मिर्झा राजाला राहिले नाही !
" आइये कुँवर शंभूराजे !" म्हणत मिर्झा राजे हसत दोन चार कदम पुढे झाले. पुढे होत "आम्ही मुजरा करतो आहोत दादाजी." म्हणत संभाजीराजांनी मिर्झा राजांच्या पायाला आपले हात भिडवले.
क्या कर रहे हो कुँवर ?”
ते काय करताहेत हे पटकन न उमगलेला मिर्झा थोडे मागे हटत म्हणाला, "ये-ये- त्याच्याकडे निर्भय डोळ्यांनी बघत संभाजीराजे खणखणीत आवाजात म्हणाले, गड सोडताना आमच्या महाराजसाहेबांनी आम्हास बजावलं आहे की, आपल्याला आम्ही 'दादाजी' म्हणावं. त्यांच्या ठिकाणी आपल्याला मानावं. आम्ही त्यांची आज्ञा पाळावी." गंगाधरपंतांनी पुढे होत त्याचा उत्तरी तर्जुमा सांगितला.
शिवाजीराजांनी आपल्यावर केवढी जिम्मेदारी टाकली आहे हे संभाजीराजांच्या तोंडून मिर्झा राजाला आता अचूक कळून चुकत होते! राजांचा, 'विश्वास टाकून माणूस बांधील करण्याचा बेत संभाजीराजांच्या पहिल्या भेटीतच अचूक साधला गेला.
संभाजीराजांचा हात हातात घेत मिर्झा राजाने त्यांना अलिशान बैठकीवर नेऊन बसविले. शामियान्यात असलेला उग्रसेन, मिर्झा राजाची नजर त्याच्यावर जाताच मिर्झाराजाच्या जवळ आला. तसलीम करून म्हणाला, "राणाजी, एक बात " बोलो उग्रभान, क्या है ? " मिझनि विचारले..
झटकन मिर्झा राजाच्या कानांजवळ आपले तोंड नेत उग्रसेन हळूच त्यांच्या कानात राजपुतानीत पुटपुटला, “ये कुँवर संभूही है! खुद राजासाबने अपने कुलदेवीकी माला इसके गलेमें चढाई है!" आणि हे सारे तो गळ्याभोवती हात फिरवून मिर्झा राजांना अभिनयाने पटवून देऊ लागला.
ते ऐकून मिर्झा राजे मान मागे टाकीत एकदम मोठ्याने हसले. सरकारी ढंगात बोलून गेले, "बेवकूफ हो उग्रभान ! जाओ अपने डेरे में !”
उग्रसेनाच्या त्या हालचालीमुळे संभाजीराजे आणि नेताजी थोडे बिचकले ! एकमेकांना त्यांनी सावध नजर दिली.
नेताजींची भरीव बोटे नकळत कमरेच्या हत्याराच्या मुठीवर गपकन रुतली. शामियान्याच्या दरवाज्याकडे रोखल्या नजरेने बघताना नेताजींच्या ताणल्या छातीवरचा बाराबंदीचा एक बंद तटकन तुटला! त्यांना 'दग्याची' शंका आली. पण हे सारे उग्रसेनाच्या गैर हालचालीमुळे झाले होते.
मिर्झा राजाने आपल्या चलाख डोळ्यांनी नेताजी आणि संभाजीराजे कसल्या गैरसमजात आले आहेत हे हेरले. तो गडबडीने म्हणाला, “गल्लतफहमी न करना कुँवर ! ये उग्रसेन तुम्हारे गलेकी मालाकी निशानी बनाकर तुमही राजासाब के असली कुँवर हो और कोई नहीं ये बता रहा था !"
ते ऐकताना कोंडल्या श्वासाचा दमदार निःश्वास टाकून हत्यारावरची मूठ ढिली टाकत नेताजी म्हणाले, "चटका लागल्याबिगर कळत न्हाई 'इंगळ' कनचा आन् 'कोळसा' कनचा ! " मिर्झा राजाला मात्र नेताजींची मावळबोली काही कळली नाही!
सगळ्या तळाभोवती पावसाळी सांज दाटून आली होती. पाखरांचे थवे आपल्या कोटरांच्या निवाऱ्याकडे परतून स्थिरावले होते. तळावरच्या रसोईखान्याच्या आगळ्या धुराचे लोळ फेकीत शिलगत होत्या. मिर्झा राजाच्या शामियान्याच्या दारात उभे असलेले संभाजीराजे नजर जोडून, पावसाळी ढगांनी वेढलेल्या धुरकट पुरंधरच्या माथ्याकडे बघण्यात स्वतःला हरवून गेले होते. शामियान्याची कनात धरून नेताजींच्या निवडक धारकऱ्यांचे पथक हातांत नंगी हत्यारे पेलून सावध अंगाने खडे होते. त्यात स्वतः नेताजी संभाजीराजांच्यावर नजर ठेवून उभे होते.
सुरक्षितता आणि इतमाम म्हणून मिर्झा राजाने संभाजीराजांच्या मुक्कामाची सोय खुद आपल्या शामियान्यातच केली होती. त्यावर किरतसिंग आणि आपले खास विश्वासू रजपूत लढवय्ये जोडून दिले होते. शामियान्याच्या अंत:पुरात मिर्झा राजा रणचंडीची संध्यापूजा करण्यात गुंतला होता. कितीतरी वेळ संभाजीराजे पुरंधरचा धुरकटला माथा एकटक निरखीत राहिले. आता चांगलेच अंधेरून यायला लागले होते.
एकसारखी चुळबूळ करणारे नेताजी पुढे झाले. संभाजीराजांना मुजरा करून म्हणाले,
" " किन्त्राटीचं आता बाळराजांनी आत चलावं ! भाईर हुवं न्हाऊ नये.' कसलीतरी साखळी तुटल्यासारखे संभाजीराजे भानावर आले. नेताजींच्या थोराड 'पगडीकडे बघत म्हणाले, "नेताजीकाका, हा गड आम्हास जणू साद घालतोय ! त्याच्यावरची नजर काढू नये असंच वाटतंय. छातीत खळबळ माजतेय.
पगड़ी डोलवीत नेताजी म्हणाले, 'बराबर हाय बाळधनी मानूस जिथं उपाजतं ती जागा त्येला सादच घालती! तुमी या गडावं उपजला. म्याच किल्लेदार हुतो त्या वक्ताला. मासायबांनी लई गर्दी उडवली हुती तुमचं पयलं बाळरडं ऐकून आता ह्यो गड पठाणाच्या कबजात हाय न्हाईतर दावला असता थोरल्या रानीसायबांचा म्हाल तुमास्नी एकडाव!" ते तगडे रांगडे मन हे बोलताना दाटले होते.
सगळी कोडी सुटल्यासारखे संभाजीराजांना क्षणभर वाटले. पण अशी कोडी कधीच "सुटत नसतात! गुंतवा झालेल्या धाग्याच्या भेंडोळ्यातून नेमका शेव हाताशी येत नाही. संभाजीराजांचे मन आपल्या 'आऊसाहेबांचा विचार करू लागले. किल्ले पुरंधर वरून कसा दिसत असेल अशी उत्सुकता त्यांच्या मनात येऊन गेली. ते दरवाज्यातून वळले. संथपणे शामियान्यातील तलम रुजामे तुडवीत गेले.
संभाजीराजांसह रात्रीचा खाना एका पंक्तीने उरकून शामियान्याच्या ख्वाबगारात मिर्झा राजे आपल्या मंचकावरच्या मऊ बिछायतीवर लेटले होते. मावळतीच्या बाजूला एका शिसवी मंचकाच्या बिछायतीवर संभाजीराजे पडून होते. त्यांच्या अंगावरची शाल दूर हटून पायगतीला गोळामोळा होऊन पडली होती. आतली हिंदोस्थानी शमादाने मंद तेवत होती. ख्वाबगाराला लागून असलेल्या अंत:पुरात मिर्झा राजाने पुजलेल्या रणचंडीच्या मूर्तीसमोर तेवत होत्या.