कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ५२

 एवढा वेळ काफर सेवाच्या' बच्चाचे निडरपण गुमान बघणाऱ्या दिलेरखानाला संभाजीराजांची रांगडी थट्टा करण्याची लहर आली. आपल्या जाड भुवया किमॉशाकडे चढवीत त्याने खोचकपणे, झुलत्या अन्वरकडे हात उठवून विचारले, "इतना बड़ा शाही हाथी कैसे उठाके ले जावोगे संबूराजे ? " दिलेरचे पठाणी डोळे लकलकले.


अंगावर आल्यासारखा अचानकच उठलेला त्याचा संवाल ऐकताना संभाजीराजांचा हात छातीवरच्या दुपेडी भवानीमाळेवर चढला. तरतरीत, बाकदार नाकशेंड्याची, शिवपिंडीसारखी दिसणारी आपल्या महाराजसाहेबांची पोतासारखी उजळ मुद्रा क्षणात त्यांच्या डोळ्यांसमोर खडी ठाकली. दिलेरच्या पठाणी डोळ्यांत आपली मावळी, बेडर नजर विट्यासारखी फेकत नागफण्यात ताठ मान करून संभाजीराजे तासाच्या थाळीवर हातोड्याचे टोल पडावेत तशा ठणठणीत, कणीदार बोलात बोलले, " डुलत झुलत का होईना तुमचे हे जनावर चालते ते नेणे सोपे आहे! पण पण आमच्या महाराजासाहेबांनी दिलेले गडकोट चालत नाहीत!! ते नेणे कठीण आहे!


तो जाब ऐकून मिर्झा दिलेर दोघेही थरारले.


“येतो आम्ही दादाजी." म्हणत अन्वरच्या माहूताच्या रोखानं रिवाजी मोहराजड थैली फेकून संभाजीराजे बैठकीवरून उठले. नेताजीरावांना पुढे ठेवून शामियान्याच्या रोखाने चालूही लागले.


डोळे फिरलेला दिलेर त्यांच्याकडे बघतच राहिला. त्याला संभाजीराजे म्हणजे आगीची खिल्लत पांघरून चाललेला धगधगीत अंगार वाटला. त्याच्या जाड ओठांतून शब्द निसटले, " माशा ल्ला ! क्या तेज जुबाँ है! इसकी उमर क्या होगी ?"

कऱ्हेपठारावर मावळचा पाऊसकळा कोसळू लागला. लाल पाण्याचे पाट कऱ्हेचे तास फोडून दुथडी पसरले. तळावर बुणम्यांनी गवताळू छपऱ्या उठविल्या. त्यात फुटल्या आभाळाखाली थरथरत निथळणारी घोड़ी आबादान झाली. पावसाच्या भरमार सरीनंतर राहुट्याच्या कनातींच्या झालरीवर थरथरत खोळांबलेले पाणथेंब वाऱ्याची सुंकारणारी झमकी येताच टपटपत खाली कोसळू लागले.


मिर्झा राजे जयसिंग आणि निकोली मनुची हा गोरा साहेब रजपुताच्या शामियान्यात शतरंज मांडून बसले होते! शामियान्याच्या दरवाज्यात नेताजी उभे होते. मिर्झा आणि गोरा साहेब शतरंजात रमून गेले होते. कुणीच काही बोलत नव्हते. मधूनच मिर्झा राजा हुक्क्याची नळी चूस करीत होता. बाहेर सरी कोसळत होत्या.


संभाजीराजे पटावरची पांढरी-काळी मोहरी निरखण्यात दंग झाले होते. त्याच्याकडे बघत मिर्झा राजाने हसून त्यांना विचारले, "क्या सोच रहे हो कुँवर ? खेलोगे चार हाथ ? 


पटाकडे बघतच संभाजीराजे म्हणाले, "नाही !" " क्यों ? राजासाब तो अच्छे लड़ाते हैं शतरंज सिखाया नहीं आपको ये खेल ?


मिर्झा आडवा आला !


" आम्हास हा खेळ नाही आवडत. तो अपुरा आहे.” मिर्झा राजाकडे संभाजीराजे शांतपणे बघत होते.


" वो कैसे?" मिर्झाचा कपाळ-टिळा वर चढला.


"या खेळात उंट आहे, हत्ती आहे, घोडा आहे, प्यादी, वजीर आहेत, राजा आहे. पण पण कुठंच राजाचा फर्जद नाही! त्याच्या मासाहेब नाहीत. हा खेळ अपुरा आहे !!


मिर्झा राजाने चूस करण्यासाठी ओठापर्यंत नेलेली हुक्क्याची नळी ओठाला न लावताच खाली आणली ! तो संभाजीराजांकडे बघत कुणालाही कळणार नाही असे पुटपुटला - “ ये दिमाग है या दौडता घोड़ा! " हयातभर शतरंज खेळलेल्या मिर्झा राजाच्या मनात संभाजीराजांच्या मनात आला तसा विचार काही कधीच आला नव्हता !!


कृष्णाष्टमी तोंडावर आली. जिजाऊसाहेबांनी आपला 'बाळकृष्ण' राजगडावर दिसावा असा ध्यास धरला. त्यांनी राजांना रजपुतास पत्र लिहायला लावले. तहाप्रमाणे राजांनी आता जवळ जवळ ठरल्या सर्व गडांचा ताबा मिर्झा राजांच्या माणसांच्या हवाली केला होता. राजांचे पत्र मिर्झा राजाच्या गोटात दाखल झाले. मिर्झाचे हुकूम सुटले. संभाजीराजांना नजर केलेल्या 'अन्वर' हत्तीवर झूल, हौदा चढविण्यात आला. खासा किरतसिंग संभाजीराजांना अदब-सोबत करण्यासाठी निघणार होता.


नेताजी मावळी पथक पालखी जोडून सिद्ध झाले. पाठीवर ढाल आवळलेले धिप्पाड नेताजी सावलीसारखे संभाजीराजांच्या बरोबर होते. मिर्झा राजाने नेताजींच्या बारीकसारीक हालचाली आपल्या तेज नजरेने टिपल्या होत्या. त्यांचे सावधपण, इमान त्यांनी नकळत हेरले होते. खासा पेहराव अंगावर चढविलेले संभाजीराजे कमरेच्या हत्यारावर डाव्या हाताची मूठ चढवून मिर्झा राजाला मुजरा करण्यासाठी झुकले. त्याच्या गोऱ्यापान पायांना हात लावताना म्हणाले, "आम्ही मुजरा करतो आहोत दादाजी. काही चुकलं असेल तर ते आमचं. आमच्या महाराजसाहेबांचं नव्हे! येतो आम्ही.'


त्यांना वर उठवून जवळ घेताना राजकारणी मिर्झा भरून आला. एवढ्या कमती वयात एवढी बेडर नजर, असे काळजाची निशाणी साधणारे बोलणे, थोरांसमोरची अशी अदब त्याने आपल्या उभ्या हयातीत कधी बघितली नव्हती. कितीही केले तरी मिर्झा राजा रजपूत होता. साठ पावसाळे त्याने बघितले होते.


संभाजीराजांचे खांदे थोपटत तो स्वतःशीच बोलल्यासारखा म्हणाला, "गल्लत किसका है, सही कौन है वो चंडी जानती है। लेकिन आपको बिदा देते वख्त हमें हमारे मुल्कके राजस्थानका अरवली पहाड़ याद आ रहा है! पैरोंमें जलता रेगिस्तान लेकर अरवली खड़ा है. खडा है कुँवर...! मिर्झाला काय म्हणायचे होते ते संभाजीराजांना ... नीट कळलेच नाही. पण खांद्यावर थोपटले जाणारे त्याचे भरगच्च तळहात मायेने भरून आले आहेत हे त्यांनी जाणले.


मिर्झा राजाने चौरंगावरच्या तबकातील निरोप विडा उचलून संभाजीराजांच्या हातात ठेवला. संभाजीराजे त्या विड्याकडे बघू लागले. एका वाट चुकलेल्या, पराक्रमी, राजकारणी, रसिक आणि रजपुती हातातून त्यांना मिळत असलेला तो पहिला विडा होता. संभाजीराजांनी मूठ वळून तो विडा वेढून टाकला !


मिर्झा राजाच्या शामियान्यातून ते बाहेर पडू लागले. त्यांच्या टोपात हिंदकळणारे मोतीलग बघताना रजपूत मिर्झा राजाला कुठेतरी खोल खोल जाणवून गेले की - "आपल्या हयातीची मोतीलग तुटून गेली आहे. आणि ते सगळे टपटपीत मोती राजस्थानाच्या तापलेल्या रेगिस्तानात कुठच्या कुठं केव्हाच विखरून गेले आहेत!'


मिर्झा राजाच्या शामियान्याच्या दरवाज्यात क्षणभर उभे राहून संभाजीराजांनी समोर दिसणाऱ्या पुरंधरचा माथा निरखला. याच गडावर ते उपजले होते. आता तो गड दिलेरखानाच्या ताब्यात होता. संभाजीराजांना नेताजींचे बोल आठवले, "जिथं मानूस उपाजतं ती जागा साद घालती मानसाला !” त्यांच्या मुठीतील विडा नकळत आवळला गेला !


तरातरा चालत संभाजीराजे सज्ज ठेवलेल्या पालखीत चढले. नेताजी आणि किरतसिंगांनी पालखीच्या डंबरीच्या दोन्ही बाजवा घेतल्या. सोंड झुल्लवीत, कान फडफडवीत ' अन्वर' हत्ती पालखीच्या सामने घिमा चालू लागला.

राजगडच्या पाली दरवाज्याची गडचढीची नौबत दुडदुडली. संभाजीराजांची पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली. त्यांची नजर भिरभिरत होती. आपल्या महाराजसाहेबांना धुंडीत होती. पण राजे या वेळी पद्मावतीवर आले नव्हते. येणार नव्हते. नेताजींनी पुढे होत संभाजीराजांना पद्मावतीच्या सदरेसमोरच्या हमचौकात आणले. सदरजोत्यावर जिजाऊसाहेब उभ्या होत्या. त्या बालेकिल्ला उतरून आपल्या बाळराजांना सामोरे जाण्यासाठी पद्मावतीवर आल्या होत्या.


किती दिवसांनी थोरल्या आऊसाहेबांचे दर्शन घडत होते! संभाजीराजांच्या पोटऱ्यांत भिंगरी उतरली. तरातर चालत हमचौकाची फरसबंदी मागे टाकून ते सदरजोत्याच्या पायऱ्या पार करीत जिजाऊसाहेबांना बिलगले. शब्द निसूर झाले होते. जबान जखडबंद झाली होती. त्यांची हनुवटी तर्जनीने वर उठवून जिजाऊ त्यांचा मुखडा बघण्याची खटपट करीत होत्या. डोळ्यांत उभ्या राहिलेल्या पाणपडद्याने जिजाऊंना तो मुखडा नीट दिसत नव्हता!


उंच कडेकपारीला पावसाळी बेलाग ढंग विलगावा तसे संभाजीराजे जिजाऊसाहेबांना बिलगले होते! शब्दांच्या धारा कोंदटल्या होत्या. मूकपणालाच बोलकेपणाचा अर्थ आला होता. भानावर येत संभाजीराजांनी जिजाऊंच्या पायावर वाकून डोके ठेवले. जिजाऊंनी वाकून संभाजीराजांना वर उठवून घेतले.


“महाराजसाहेब नाही आले थोरल्या आऊसाहेब ? " जिजाऊंकडे बघत मान उठवून संभाजीराजांनी विचारले.


" नाही आले. ते महालाबाहेर पडत नाहीत. आम्हालाही टाळू बघतात. कुणाशी बोलत नाहीत. चला, त्यांच्याकडेच जायचं आहे. " जिजाऊंनी संभाजीराजांना बरोबर घेऊन पद्मावतीची सदर सोडली. नेत सिदोजीराव त्यांना मुजरा करून त्यांच्या पुढे चालले.


सारी मंडळी पद्मावतीवरून बालेकिल्ल्यावर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आली. भुयाराची धोंड हटली. चार टेंभेकरी हातात पेटते टेंभे घेऊन भुयारात उतरले. पाठोपाठ नेताजी सिदोजी आत गेले.


नेताजींनी हात देऊन मासाहेबांना आणि संभाजीराजांना आत घेतले. जिजाऊ संभाजीराजांच्यासह पुढे झाल्या. पलोत्यांच्या धूसरमंद प्रकाशात भुयाराच्या पायऱ्यांमागून पायऱ्या मागे पडू लागल्या.