कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ७०

 टेंभ्याच्या उजेडात मांडीवर सुख झालेल्या संभाजीराजांना बघताना राजे कशात तरी हरवले. विचार करू लागले' खरेच भाग्यवान आहात. आम्हाला आठवत नाही कधी आमच्या महाराजसाहेबांची मांडी अशी उशी म्हणून मिळाल्याचे !


राजांनी झोपल्या संभाजीराजांची मान हल्केच बिछायतीवर ठेवली. त्यांच्याशेजारी ते आडवे झाले. पलंगाजवळ एका घोंगडीवर हिरोजी, दंडाची वळी डुईखाली घेऊन कलंडला. मदारी पहारा दिल्यासारखा कोठीत फिरू लागला. 'हिरोजी ऽ" पडल्या पडल्या राजांनी दबकेच हाकारले.


" जी " फरसबंदी बोलली. राजे पलंगावरून खाली कलंडलेल्या हिरोजीशी दबक्या आवाजात, तख्तपोशीकडे. बघत बोलू लागले. सगळ्या जिवाचा कान करून हिरोजी नीट ऐकू लागला.

" आमच्या साऱ्या लकबी ध्यानी घेतल्या ?” राजांनी विचारले.


" जी ऽ” हिरोजी हुंकारला.


" पहाटे लाल किल्ल्यावरची नौबत दुडदुडते ? ती ऐकायला जागे राहा. त्या वेळी बादशहा फज्रची नमाज पढतो. रात्रीचे पहारे त्या वेळी गस्त देत पालटतात. त्या वेळी आमच्या जागी 'तुम्हास बिमार म्हणून झोपायचे आहे! तुमचा चेहरा आमच्याशी मेळजुळीचा आहे. उद्या पहाटेपासून तुम्ही राजे. आम्ही हिरोजी. आमच्या जागी पलंगावर कोठीच्या दरवाज्याकडे पाठ करून कोरे झोप. उदईक पेटाऱ्याबरोबर आम्ही हिरोजी म्हणून कोठीबाहेर पडू. संध्याकाळी तुम्ही पुन्हा तुमचा पेहराव चढवा. इथे असलेल्या लोड, गिर्द्या पलंगावर रचून त्यावर बेमालूम शालनामा पांघरा. त्या लोड-गिर्घाच्या धन्याचे पाय चेपा. संध्याकाळी नमाजाचे वख्ती पहारे बदलतात तेव्हा शिताफीने तुम्ही कोठीबाहेर पड़ा. जमेल तशी दौड घेऊन मुलूख गाठा. गाफील राहू नका. " इथे झोपल्यावर एकसारखी मिशीवर पालथी मूठ फिरवू नका!"


ताणल्या डोळ्यांच्या हिरोजीने सारे ऐकून घेतले. त्याची विचारचक्रे सुरू झाली.


राजांच्याबद्दलचा आदरभाव बाराबंदी तोडून बाहेर येईलसे त्याला वाटले. " झोपा आता." पलंगाने फरसबंदीला सूचना केली. गोंधळाचे पहिले नमन पार पडले होते. लाल किल्ल्यात मऊ बिस्तऱ्यावर लेटलेला औरंगजेब अंगावर उबदार रजई पांघरून दोन्ही हातपंजे अस्मानाकडे उडवीत पुटपुटला "खुदा आमेन ! आमेन!"


कोंदटलेल्या, पावसाळी आकाशाची कूस फोडण्यासाठी श्रावण वद्य द्वादशीचा दिवस झट्या घेऊ लागला.


" दुडदुडऽऽ धुमम्म् दुड दुड धुम्मू" लाल किल्ल्यावर नगारखान्यात - 'सबरची' नौबत उठली. पहाटवाऱ्यावर स्वार होत ती राजांच्या कैदखान्याच्या कोठीत घुसली.


राजे निसबतीने जागेच होते! नौबत ऐकून त्यांनी आग्याच्या पहाटवाऱ्याच्या कानांत आपला सर्वांत आवडता व भरोशाचा मंत्र सोडला- "जगदंब जगदंब !" माणसे असली तरी कुठल्याच देशीचे 'वारे' मात्र बेईमान नसतात! त्यांना एकदा सायवळ करून घेतले की त्यांच्या मागाने जीवनाची नौका निर्धार हाकारता येते! क्षणभर राजांनी लेटल्या लेटल्या आपल्या कुळाचा 'वसा' असलेल्या छातीवरच्या कवड्यांच्या माळेवर हात चढविला. कवड्या भवितव्याला चकरा देणाऱ्या थोर गुणाच्या ! राजांच्या बोटांची आणि त्यांची काही न बोलताच मसलत घडू लागली.


रजई हटवून ख्वाबगारातून बाहेर पडलेला औरंगजेब वजू करून, मक्केला मुखड़ा देत नमाजासाठी गुडघे टेकून कलमे पटू लागला - " "हिरोजी ऽ" राजांनी फरसबंदीला साद घातली. संकल्पाने साधनाला हाकारले.

"जी" फरसबंदी रात्रभर जागीच होती! हिरोजी बांधल्या आवाजाने उत्तरला. “मदारी " राजांनी 'मदार' टाकलेल्या मदारीला सादवले.


  जी जागा हाय ! "जाब अला. क्षणभर शांततेने आपली काळी घोंगडी सगळ्या कोठीभर पुन्हा पसरली.


“मदारी, दरवाज्याची जागा घे, कुणी कोठीच्या आत डोकावले तर इशारत भर !" " " जी 5!" मदारी उठला. कोठीचा दरवाजा आणि जाळीदार खिडकी यावर नजर ठेवीत पहारा देऊ लागला. करंजेल सरतीला आल्याने टेंभे सुमार झाले होते...


“हिरोजी, पडल्या पडल्या अंगीचा पेहराव उतरा.” राजांनी उभा केलेला गोंधळ रंगू लागला.


पलंगावर पडूनच राजांनी आपला जामा, आतला तहबंद आणि मांडचोळणा उतरला. गळ्यातील कंठे, कवड्याची माळ, कानातील सोनचीकडे, अंगठ्या उतरवून एक एक करीत हिसेजीच्या हाती दिले. उजव्या हातातील सोनकडे काढण्याची राजे खटपट करू लागले. ते काही निघत नव्हते! हिरोजीने आपली बाराबंदी आणि चोळणा पलंगावर सरकविला. पडूनच राजांनी हिरोजीचे कपडे पेहरले. सडक बोटांच्या नखांनी कपाळीचे शिवगंध खरवडून काढले ! शेजारी सुख झालेल्या संभाजीराजांच्या पाठीवर एकदा मायेने हात फिरवला. राजांचा साज चढवून हिरोजी तयार झाला होता. " हिरोजी, आम्ही उठतो. सिताबीनं आमची जागा घ्या. आम्ही तुमच्यासमोर दर्पण धरू. त्यात बघून कपाळी शिवगंध रेखून घ्या !"


राजांनी अंगावरचा शालनामा हळूच दूर हटविला. राजे पलंगावरून खाली उतरले. क्षणात मन बांधून हिरोजी पलंगावर चढला. त्या हालचालीत झोपलेल्या संभाजीराजांनी हुस्कारा सोडीत कूस परती केली. हिरोजीने त्यांच्या पाठीवर 'मायेचा हात फिरवला ! हिरोजीचा पांढरा, सुताडी शेला राजांनी कमरेला आवळला. भिंतीकडे पुढा करून खालचा ओठ दातांखाली दाबून खटपटीने आपल्या उजव्या हातीचे 'सोनकडे ' बाहेर खेचले. पलंगाजवळ जात त्यांनी हिरोजीला त्याच्या हाती असलेले चांदीचे कडे उतरायला सांगितले. खुद्द आपल्या हातांनी राजांनी हिरोजीच्या हाती सोनकडे भरले. त्याचे चांदीचे कडे आपल्या मनगटात चढवून घेतले. राजांनी डोकीवर थोराड मावळी कंगणी पगडी चढविली.


ऊर भरून आलेला हिरोजी म्हणाला - "म्हाराज 5,..." राजांनी त्याला धीर दिला. "तुम्ही आता राजे आहात. संकोचू नका. आम्ही म्हणतो तसं एकदा 'जगदंब' म्हणा. "


हिरोजी क्षणभर घोटाळला. मग निर्धाराने तो छातीवरच्या माळेवर बोटे चढवीत, डोळे मिटून पुटपुटला, " जगदंब, जगदंब!” हुबेहूब राजेच झोपले होते पलंगावर!

ते ऐकताना राजे कमरेत वाकले. फरसबंदीकडे त्रिवार हात नेत अदबमुजरा घालीत सहीसही हिरोजी त्यांनी पेश केला, “महाराज, मुजरा." वर उठून त्यांनी डाव्या हाताने बाराबंदीचा उजवा हातोंपा चुण्या देत वर सारला. डावाही वर घेतला. हिरोजीसारखा ! मिश्याखालून पालथी मूठ फिरविली. चांदीचे ओळंबते कडे वर सरकवून हातपोटरीत घट्ट बसविले !


बाहेर पहारे बदलले होते. आत राजे बदलले होते. आम्यात दिवस बदलत होता! पलंगावर हिरोजीशेजारी सुख झालेल्या संभाजीराजांना याची काहीच कल्पना नव्हती ! राजांनी हिरोजीसमोर दर्पण धरला. मदारीने शिवगंधाचे तबक धरले. हिरोजी आपल्या कपाळी दोनदळी शिवगंध रेखून घेऊ लागला.


सुखदुःखाचे दोन पट्टे 'शिवानेच' त्या सर्वांच्या भाळी रेखले होते. आता तोच निभावून नेणारा समर्थ होता!


दिवस वर आला. संभाजीराजे उठले. मदारीने त्यांच्या हातात पाण्याचा गडवा दिला. संभाजीराजे तस्तात हात तोंड धुऊ लागले. ते बघताना हिरोजीच्या वेषातील राजांना बराच वेळ मनात घोळत असलेल्या एका पेचावर तोड सुचली.


राजांना आपल्याच सोंगाचा बाहेरच्या पहारेकऱ्यांना "कोणेविशी शक- अंदेशा येतो काय याचा सरतपास घ्यायचा होता. शंभूराजांचे बनावट 'हिरोजीवर 'ध्यान नव्हते. झटकन राजे पुढे झाले. त्यांनी वाकून तस्त उचलले! तस्त घेऊन ते ताठ मानेने कोठीबाहे पडले. बाहेर ते रिकामे करून पुन्हा कोठीत आले. पहारे नंगी हत्यारे पेलून चालूच होते ! राजे कोठीच्या भिंतीला धरून 'अदबीने' उभे राहिले. मदारीने संभाजीराजांना त्यांचा टोप, कमरेत वाकून अदब- पेश केला.

हिरोजी पलंगावर कोरे पडून होता.


“महाराजसाहेब, " संभाजीराजे पलंगाजवळ जात म्हणाले.


हां." पलंगावरचा हिरोजी हुंकारला. बेमालूम खोकल्याची उबळ उठवली. “येतो आम्ही!” संभाजीराजे म्हणाले आणि पाय शिवण्यासाठी पलंगाच्या पायथ्याकडे सरकले.


खोकत हिरोजीने झटकन पाय पोटाशी घेतले आणि तो धापावत- गडबडीने म्हणाला, "आम्ही सांगितलेलं नीट ध्यानी धरा. आता टाकोटाक बाहेर पडा. कुम्हारबाडीत आमची वाट बघा. तिसन्या प्रहरानंतर औक्षवंत व्हा!' " संभाजीराजांनी "जी" म्हणत तीन वेळा पलंगाला मुजरा केला आणि ते कोठीबाहेर पडू लागले. न राहवून मावळी वेषातले राजे भिंत सोडून पुढे झाले. बाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या बालभुत्याकडे बघताना त्यांच्या मनात विचारांचे कल्लोळच कल्लोळ उठले, "ये राज्य व्हावे हे श्रींचे मनी फार आहे. आपण सारे त्यास बांधील आहोत. येशवंत व्हा!' दरवाज्यातून दूर जाणारी संभाजीराजांची पाठमोरी मूर्ती राजे एकटक बघत होते.


मदारी हिरोजीच्या वेषातील राजांच्याकडे गलबलत्या काळजाने बघत राहिला. कारण छातीवर आता कवड्यांची माळ नाही याचे भान काही राजांना उरले नव्हते. ते आपल्या छातीवरच्या बाराबंदीवर हाताची चाचपती बोटे फिरविताना स्वतःला विसरून गेले होते!