कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ४३

 किल्ले पुरंधर हा जोडकिल्ला होता. पूर्वेच्या बाजूला रुद्रमाळ उर्फ वज्रगड हा छोटेखानी किल्ला होता. त्याला धरून पुरंधरच्या माच्या पसरल्या होत्या. मध्ये होती एक निरुंद खिंड भैरवखिंड ! वज्रगडावर पुरंधरची सारी मदार होती. तो गडच मंदिराच्या - पायरीसारखा होता. पायरी ओलांडली की पाऊल जसे मंदिरात तसे वज्रगड पडला, तर पाऊल किल्ले पुरंधरात !

आता जोड होती पुरंधरच्या पराक्रमाची आणि दिलेरच्या दंग्याची. गडावर रामोशी, महार, कोळी आणि कहार या धारकऱ्यांची दीड हजारांची शिबंदी होती. गडाला आधार होता त्यांच्या नेकीचा. आणि राजांनी स्वतः नेऊन रुजू केलेल्या, मारत्या समशेरीच्या, काळभैरवाजवाया!


राजगडाच्या पद्मावती माचीवर कबिल्याचे मेणे सिद्ध होते. जिजाबाई, सोयराबाई आणि राजे बालेकिल्ला उतरून पद्मावती माचीवर आले. बरोबर संभाजीराजे, सखूबाई, राणूबाई, अंबाबाई आणि नानीबाई असा राजांचा गोतावळा होता. आता राजांच्या घरचीच झालेली धाराऊ होती. मोरोपंत, आण्णाजी दत्तो, येसाजी, रघुनाथपंत, कुडतोजी, निराजी रावजी ही मंडळी मासाहेबांना निरोपाचे मुजरे घालायला माचीवर जमली होती. राजांच्या आग्रहाने जिजाबाई राजगड सोडून कोंढाण्याकडे सोयराबाईच्यासह चालल्या होत्या. पुरंधराला चार मजलांवरच दुष्मन फौज तळ टाकून असताना आता सगळ्यांनी एका जागी राहणे हिसाबी नव्हते. जिजाबाई गड सोडायला तयार नव्हत्या. राजांना आणि बाळराजांना, शत्रू तोंडावर असता एकाकी टाकून जायला राजी नव्हत्या. पण राजांनी हरतऱ्हेने त्यांची समजूत घालून त्यांना जाण्यास तयार केले होते. राजांनी पुढे होत मासाहेबांच्या पायांना हात लावले. संभाजीराजांनी आऊसाहेबांच्या पायांवर कपाळ टेकविले. त्यांना उठवून जिजाबाई

म्हणाल्या, "आम्ही निघालो बाळराजे. आता राजांच्या महाली झोपत जा !'

ते उद्गार ऐकताना राजांचा ऊर गलबलून गेला. संभाजीराजांनी सोयराबाईंच्या पायांवर मस्तक टेकविले. पण सोयराबाईंचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते! त्या गड सोडण्यापूर्वी नजर जोडून फक्त मिळतील तेवढे 'राजे' डोळ्यांत भरून घेण्यात गुंतल्या होत्या!! राजांची नजर समोर दिसणाऱ्या निशाण चौथऱ्यावरच्या उंच निशाणकाठीवरच्या जरीपटक्यावर होती.


जिजाऊंच्या जात्या स्वारीला सगळ्यांचे नमस्कार मुजरे झाले.


पुरंधरच्या वेढ्याला पंधरा दिवस लोटले. किल्ले पुरंधर प्राणबाजीने भांडत होता. रात्री-बेरात्री गडावरचे मावळे तुकड्यातुकड्यांनी दिलेरच्या गोटावर एल्गार करीत चालून जात होते. सावध असलेला दिलेर निकराने छापे मोडून काढीत होता. हत्यारे चालविताना कामी आलेल्या धारकऱ्यांची प्रेते गडउतरंडीवर तशीच पडत होती. हाती लागलेल्या प्रेतांच्या पायांना काढण्याचे फास आवळून, घोड्यांच्या टापेला बांधून त्यांची दिलेरच्या गोटासमोर फरफटती धूळधिंड निघत होती. कन्हेपठार पेटत्या तोफांच्या 'भांड्यांच्या दणक्याने दणाणून निघत होते. अस्मान धुराने काळवंडत होते. महार, कहार, कोळी, रामोशी मस्त होते. मरता मरता झुंजत होते.


आपल्याच धिप्पाड पठाणी हशमांच्या घामेजल्या उघड्या पाठीवर कोरडे ओढीत 'फत्तेलष्कर', 'अब्दुल्लाखान', 'महेली' या अवजड तोफा दिलेर, मीर अतिशखान आणि निकोलो मनुची यांनी वज्रगडावर वर्मी आगमार करतील अशा उंचींच्या धमधम्यांवर आणल्या. त्या दणकत्या तीन नागिणींनी वज्रगडाला खिंडार पाडले. गडाला 'पान' लागले!


'दीन दीन !' आक्रोशत पठाणी, बहलिया, मोगल हशम उन्हाने तळपती नंगी हत्यारे पेलत सुलतानढवा करीत वज्रगडावर तुटून पडले. गडावरचे चालते, फिरते हत्यारे थांबले. वज्रगड पडला! 'श्रींच्या कंठातील रुद्रमाळ तुटली. दिलेरचे पठाणी पाय पुरंधरच्या पायरीवर पडले! आता तो निकराने मंदिरात घुसणार होता. किल्ले पुरंधरात !!


'घनी, लई झटझुज घेतली पर अपेश पदरात आलं. आमाला त्वांड दावाय जागा नाही. आता होतर आमच्या गर्दना मारा, होतर कडेलोट करा. तेवढे मराण तरी 'किरत म्हून मागं न्हाईल!" वज्रगडचा किल्लेदार खालच्या मानेने राजांच्या समोर आपल्या उरातला कढ मोकळा करीत होता.


एक राजकारणी डावपेचाची चाल म्हणून वज्रगडच्या 'कैदी' म्हणून सापडलेल्या किल्लेदाराला आणि दोनएकशे मावळ्यांना मिर्झा राजाने हसत सोडून दिले होते. राजे किल्लेदाराला काय सजा फर्मावतील याचा चिंतातुर मुद्रांनी अंदाज करीत निळो सोनदेव, कुडतोजी, मोरोपंत, आण्णाजी दत्तो ही मंडळी सदरजोत्यावर उभी होती. सदरबैठकीवर संभाजीराजांच्यासह बसलेले राजे किल्लेदाराचे पिळवटल्या कढाचे बोलणे ऐकून उठले. संथ चालत ते हमचौकात आले. किल्लेदाराच्या खांद्यावर आपल्या आजानुबाहूचा तळवा चढवीत म्हणाले, 'किल्लेदार, काय पारख केलीत तुम्ही आमची! आम्ही हारजीत मोलाची मानीत नाही! एवढी मूठभर शिबंदी घेऊन तुम्ही दर्यासारख्या गनिम फौजेशी शर्थीनं झुंजलात! आज आमचे हात आखडते आहेत, नाहीतर तुम्हा साऱ्यांच्या पाठीवरच्या ढालीत आम्ही शिगोशीग मोहरा भरल्या असत्या !


'मुजुमदार ऽ!' राजांनी मुजुमदार निळो सोनदेवांना याद फर्मावली.

'जी' म्हणत निळो सोनदेव लगबगीने हमचौकात आले.


* या असामींची मोजदाद करा. आमच्या लोकांचा जमेल तसा मरातब आम्हास करणे आहे! जेवढ्या आसामी असतील तेवढी शेला पागोटी पेश करा.

निळो सोनदेवांनी मावळ्यांची मोजदाद केली. शेला पागोट्यांची तबके त्यांनी हमचौकात आणविली. आपल्या हाताने राजे प्रत्येक लढल्या मावळ्याला शेला पागोटे बहाल करू लागले. सदरबैठकीवरून उठून संभाजीराजे हमचौकात आले. पुढे होत आपल्या आबासाहेबांची तकलीफ कमी व्हावी, म्हणून तबकातील एक एक पागोटे उचलून अदबीने ते राजांच्या हातात देऊ लागले.


आपल्या उरात खोल खोल लपवून घ्यावे असे एक जीवनसत्य संभाजीराजांना कळून चुकले होते- 'आयुष्यात हारजितीला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला ! निकराने, प्राणबाजीने शर्धनि झुंजण्याला !!"


राजे प्रतापगडावर जाऊन जगदंबेचे दर्शन घेऊन आले. बेघर, बेआसरा झालेल्या, सर्वस्व लुटलेल्या, हताश मावळमाणसांची आता राजगडावर दाटीच दाटी झाली होती. बारा मावळांच्या चौकोन्यांतून हुसकलेल्या, उद्ध्वस्त झालेल्या लोकांचे रोज नवे नवे तांडे राजगड चढत होते. राजे जातीनिशी त्यांची विचारपूस करीत होते. अंबारखान्यातील धान्यपोती बाहेर काढण्याच्या आज्ञा देऊन आपल्या माणसांना पोटपाण्याला लावीत होते. पण त्यांच्या चेहऱ्यांवर पसरलेले काकाळपण ते पुसू शकत नव्हते. हा सल राजांच्या मनात खोलवर सलत होता.


नेहमीसारखे राजे, संभाजीराजांच्यासह बालेकिल्ला उतरून लोकांच्या भेटीगाठीसाठी पद्मावती माचीवर आले. गडाच्या सुवेळा, संजीवनी, पद्मावती या तिन्ही माच्यांवर मार खाल्लेल्या मावळ्या-कुणब्यांची दाटी झाली होती. किरणे मावळतीला आली होती. राजे पद्मावतीच्या सदरचौकाबाहेर पडले. त्यांच्या पाठीशी शंभूराजे होते.


राजे बधिरल्या मनाने चालत होते. माणसे पायांवर लोटांगणे घालू लागली. एकाएकी त्या कोंदाटल्या गर्दीतील हैबतबा पांढरे हा चार विसा वर्षांची उमर झालेला म्हातारा, राजांच्या मागून चालणान्या शंभूराजांना बघून गलबलून गेला. त्याचे पांढरे कानकल्ले थरथरले. लटलटत्या हाताने भोवतीच्या कुणब्यांची गर्दी फोडीत तो पुढे झाला. शंभूराजांचा हात आपल्या सुरकुतल्या हाताने धरून तो कापया, कातर आवाजात म्हणाला, "थांब वाईच माज्या लेकरा ऽ! डोळं भरू दे माजं!' "त्याचे बोल ऐकून राजे थबकले. त्यांनी मागे वळून बघितले. म्हातारा हैबतबा आपल्या रखरखीत, थरथरत्या तळहाताचे पंजे संभाजीराजांच्या रसरशीत गालांवरून फिरवीत होता. ते फिरविताना त्याच्या म्हाताऱ्या पांढरट डोळ्यांतून उठलेली पाण्याची धार त्याच्या पांढऱ्या गलमिश्यांत उतरू लागली.


" काय झालं बाबा ? डोळ्याला पाणी का ? " राजांनी त्याला विचारले. म्हाताया हैबतबाने चदिशी बाराबंदीच्या हातोप्याने आपले डोळे पुशीत जाब दिला, " कुटं काय हाय धनी ? म्हातारपणानं डोळे पाझरत्यात वाईच! " हैबतबा आपला कढ राजांच्या समोर उघडायला राजी नव्हता.