कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ४४

 "बाबा, आम्ही तुम्हास लेकरासारखे. जे सलले ते आम्हास बोलले पाहिजे." राजे म्हाताऱ्याच्या काळजात घुसले.


हैबतबाची सुरकुतली मान लटलट कापू लागली. त्याने निकराने ऊरबंद केलेला कढ डोळ्यांचे बांध फोडून पुन्हा बाहेर फुटला. लटलटत्या आवाजात तो म्हणाला, "काय सांगू राजा ? काय त्या व्हायली न्हाई. माजा एकुलता योक ल्योक येडा जाला. त्येची तरणीताठी बाईलऽऽ त्येच्या मुसक्या आवळून त्येला झाडाला बांधून त्येच्या म्होरं सकिसांनी आपल्या अंगाखाली की, रं घेतली राजा! उटाय तराण नसताना घोड्यावं • पालून त्ये भडवं घिऊन म्येलं तिला! तवापून डोसकं चक्कारलं माज्या लेकाचं... त्येचं एकुलतं याक प्वॉर हुतं. त्ये खोपटाच्या दारात मरून पडल्यालं हुतं. शिवारातनं वाडीत आलो नि ह्यो इस्कोट दिसला नदरला. या हातानं त्या पोराला मूठमाती दिली म्या राजा ! तुज्या या धांकल्या धन्याला बघताना त्या पोराची सय जाली !! एवड्याच उमरीचं हुतं ते! 'म्हलू' नाव हुतं त्येचं. आता न्हाई नदरं पडायचं! कशापायनं पोट जाळाय शिधा देतूस मला राजा ? ही म्हातारी गर्दन तुज्या हात्यारानं उतरून दे फेकून तटावरनं ! न्हाई... न्हाई सोसवत ह्यो नरक राजा!" म्हाताऱ्याने आपले तोंड ओंजळीत झाकले. पोरासारखा तो स्फुंदू लागला.


हैबतबाचं बोलणे ऐकताच राजांचे उभे अंग अंग ताठरले. डोळे संतापाच्या ठिणग्या फेकू लागले. पण पण त्या म्हाताऱ्याचे सांत्वन करायला राजांना शब्द सापडेनात ! छातीवरच्या कवड्या तटबंदीच्या दगडाएवढा आकार घेऊन जीव दबवून टाकताहेत असे त्यांना वाटले. म्हाताऱ्या हैबतबाच्या खांद्यावर हात ठेवताना राजांच्या डोळ्यांतून टपटपत पाणमोती कोसळले.


ते बघताच मात्र कमरेत वाकलेला जख्ख हैबतबा एकदम ताठ खडा झाला. पेटत्या डोळ्यांनी, डोक्यावरची, लाल पिळाची चक्री पगडी झुलवीत म्हणाला, "न्हाई 5 राजा, आण हाय या म्हाताऱ्या घ्याईची तुला, डोळ्यांत पानी आनू नगं ! आमची कुणबाऊ जात घायपातावानी. योक म्येला तर धा उपाजतील! पर तू... तू जगदंबेच्या दंडातला ताईत हाईस ताईत! खातर हाय, ह्या समद्यास्नी तारशील तर त्यो तूच. मुजरा राजा.” राजांना मुजरा करून हैबतबा समोरच्या गर्दीत घुसला. दिसेनासा झाला.


सुन्न सुन्न झालेले राजे संजीवनी माचीकडे पुढे न जाता तसेच माघारी फिरले. रानराघू, भोरड्या, घनछडी या पक्ष्यांचे कितीतरी थंवेचे थवे गडाच्या माच्यांवरून कलकलत, झेपावत गुंजणमावळाच्या रोखाने मावळतीला चालले होते. त्यांचा कलकलाट नेहमीसारखा बिनघोर नव्हता. भेदरट, कातरलेला होता. राजांना तो जाणवला. ते पक्षी दिलेरच्या तोफखान्यातील भांड्याच्या उडणाऱ्या भयानक दणक्याने भेदरून, कन्हेपठार सोडून गुंजणमावळाच्या आसऱ्याला चालले होते. नवख्या रानाशी जमवून घेताना त्यांचा कलकलाट बदलला होता !

राजांनी कर्माजीबरोबर मिर्झा राजाला थैली पाठविली होती. दोन किल्ले देऊ करून तहासाठी हात पुढे केले होते. आदिलशाहीच्या विजापूरवर चाल घेतल्यास मिर्झा राजाला ससैन्य मदत करू असे सुचविले होते. हरतऱ्हेचा डाव राजे रजपुतावर टाकू बघत होते. मध्यंतरी कुडतोजी गुजरांनी मिर्झा राजाच्या गोटात घुसून त्याच्यावर नंग्या हत्याराची चाल करून बघितली होती. पण कुडतोजी पकडले गेले होते. मिर्झा राजाने त्यांना एक घोडा व तलवार पेश करून मुद्दाम इतमामाने सोडून दिले होते. राजांना डिवचण्याची एकही संघी कावेबाज मिर्झा राजा वाया जाऊ देत नव्हता. पुरंघरच्या वेढ्यातील माणसे उचलून त्याने राजांचा मुलूख जाळण्या-लुटण्यासाठी फेकली होती. रात्री-बेरात्री ते घोडेस्वार मशाली नाचवीत थेट राजगडाच्या पायथ्याने दौडत होते.


मिर्झा राजांच्या गोटातून परत आलेल्या कर्माजीला बाळाजी आवर्जीनी राजांच्या समोर पेश केले. कर्माजीचा चेहरा पार पडला होता. मुजरा करून त्याने कमरेला लटकवलेली मिर्झा राजाची थैली राजांच्या हाती दिली. राजांनी ती बाळाजींच्या हाती दिली. बाळाजी चिटणीस मिर्झा राजाचे पत्र वाचू लागले-


... आमची शाही फौज आसमानातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहे. तुझा पहाडखायांचा मुलूख तिला अजिंक्य नाही. आमच्या घोड्याच्या टापांखाली कुठलाही मुलूख तसनस होऊन जाईल. जिवाची खैर असेल तर बादशाही चाकरी पत्करून शरण ये ! असे न करशील तर आपल्याच हातानं तू आपली आणि आपल्या रियायाची खराबी करून घेशील ! "


मिर्झा राजाला पाहिजे होती राजांची संपूर्ण शरणागत! ते पत्र ऐकत असताना राजे सुन्न, बधिर झाले.


“रजपुताच्या गोटात दोन फार खराब गोष्टी कानांवर पडल्या सरकार. " समोर उभा असलेला कर्माजी म्हणाला.


" बोल. आता सगळं खराबच समोर वाढून ठेवलं आहे." राजे म्हणाले. "पुरंधरच्या सफेदबुरुजासमोर दिलेरनं लाकडी घमघमे उभे करून तोफांची मारगिरी जारी केलीय. त्या धमधम्यावरून आलेला एक तोफगोळा सफेदबुरुजाच्या बारुद कोठारात पडला! कोठाराच्या भडक्यानं चिरेबंद सफेदबुरुज अस्मानात उडाला. त्यावरच्या ऐंशी धारकऱ्यांच्या डोळ्याचं पातं लवायच्या आत नुसत्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या धनी! त्यांच्या तुटक्या हात-पायांचा पाऊसच पाऊस माचीवर कोसळला. किल्लेदारानं ते पडलेले हात-पायच गोळा करून सगळ्यांना एकदमच आगीनडाग दिला! आणि...


" आणि काय कर्माजी ? बोल. गड पडला काय ?


"नाही, गड नाही पण एक छातीचा गडी पडला ! काल दिलेरनं गडावर पाच हजार पठाणांनिशी सुलतानढवा केला. तो मोडून काढण्यासाठी सरदरवाजा उघडून सातशे रामोशी, महार धारकरी पाठीशी घेऊन मुरारबाजी त्याच्यावर तुटून पडले. दोन्ही हातांत पट्टे चढवून मुरारबाजी विजेच्या लोळासारखे गडउतरंडीवरून दिलेरवर कोसळले. हातघाईची हत्यारमार झाली. " हाणामारा हरहर हर महादेव!" असं ओरडत - मुरारराऊ चढत्या उन्हात तळपणारे पट्टे दोन्ही हातांनी फिरवीत होते. भरल्या शिवारातील कणसं कापावीत तसे पठाणी हशम कापून काढीत होते. फार जोरावर जंग झाला.


" एका टेकाडावर उभा असलेला दिलेरखान पठाण, आपल्या ओठांवर हाताची बोटं ठेवून मुरारराऊंच्या हातांतील तळपत्या पट्ट्यांचं कडं बघून म्हणाला, "या अल्ला 5, अरे तू कैसा सुरमा सिपाही खुदाने पैदा किया! आलिजाहके कदमोंपर आ मालेमाल कर देगे ! '


खिनभर पट्टे थांबवून, त्यांच्याकडं पेटल्या डोळ्यांनी बघत, घाम थबथबल्या मुद्रेचे मुरारराऊ तिरस्कारानं पचकन थुंकले! "ये तो सिवाजी राजियांच्या इनामबंद शिलेदार हाये! तुझा कौल घेतो की काय ?" असं मोठ्यानं गर्जत ते सिधे दिलेरच्या रोखानंच हत्यार चालवीत पुढं चालून गेले.


" कुणीतरी फेकलेला एक सरसरता बाग आला आणि कचकन त्यांच्या गळ्यात आरपार रुतला. रक्ताची फव्वारती चिळकांडी उमळली. 'आई अंबे' म्हणून मुरारराऊ क्षणभर कळवळले. आणि आणि गळ्यात रुतता बाण तसाच घेऊन हत्यार मारत तसेच दहा हात पठाणी गर्दीत पुढं घुसले. गळ्यातल्या बाणानं त्यांना 'हर हर महादेव' ओरडता आलं नाही.


"दहा हात पुढं घुसलेल्या मुरारबाजींनी निकरानं मिळतील तेवढे पठाण गडउतरंडीवर लोळविले आणि आणि मुरारबाजी कोसळले. उतरंडीवर त्यांनी चार-पाच पलट्या - घाल्ल्या. त्यामुळे गळ्यातला बाण भुईला थडकून जखम फुटली. उताणे पडलेले मुराराऊ धेसपांड्ये गडावरच्या निशाणाकडं भरल्या डोळ्यांनी बघत साहेब कामावर खर्ची पडले! किल्लेदारानं काल त्यांच्या देहाला गडावर अनी दिला. सरकार, मारत्या समशेरीचे, मुरारबाजी कामी आले! आता पुरंधर टिकणं मुश्किल हाय." ती गैरखबर सांगताना कर्माजीच्याच डोळ्यांत पाणी उभे राहिले.


कर्माजीचे बोलणे ऐकताना संभाजीराजांच्या मनात दोन विचित्र गोष्टींची सरभेसळ झाली होती. म्हाताऱ्या हैबतबाची थरथरती मावळबोली त्यांच्या मनात फिरत होती- "राजा, तू तू तर जगदंबेच्या दंडातल ताईत हाईस ताईत!" आणि त्यांच्या डोळ्यांसमोर मात्र उभे होते ते गळ्यात रुपता बाण घेऊन, पट्टे चालवीत पुढे जाणारे, 'तुझा कौल घेतो की काये ? " म्हणणारे रक्ताळलेले मुरारराऊ !


रघुनाथपंत कोरड्यांची पालखी राजगडाच्या पाली दरवाज्यातून बाहेर पडली. त्यांच्या हातात राजांनी, मिर्झा राजाला दिलेली, 'संपूर्ण शरणागतीचा खलिता असलेली लाल फासबंदाची थैली होती! पालखीला संरक्षण देत दहा हत्यारबंद धारकरी मिर्झाच्या गोटाकडे चालले. पंत हेजीब म्हणून राजांचा निर्वाणीचा खलिता घेऊन रजपुताच्या गोटाकडे चालले. राजे रजपुताशी शरणागतीचा सुलूख करताहेत ही बातमी वाऱ्यासारखी गडभर पसरली होती.