कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ४२

 कधी नव्हे एवढ्या जाणवणाऱ्या गंभीर आवाजात राजे बोलू लागले, “आम्हास ज्याची धास्ती होती ते समोर आले. औरंगशहाच्या मनी आमचे श्रींचे राज्य सलते. ते बुडवावे म्हणोन त्याने नामजाद केलेले दिलेर व मिर्झा पुण्यावर उतरले. मिर्झा राजाची चाल अजून खुली जहाली नाही. पण आम्ही ती जाणतो. आता त्याच्या जमेती कोंढाणा किंवा पुरंधराच्या रोखानं कूच करतील. औरंगशहास रजाबंद करण्यास मिर्झा राजा हरहुन्नरची कोशीस करेल. बोला मंडळी, तुमची जाणती मसलत बोला.” राजे थांबले. बोलताना त्यांच्या तोंडी 'औरंगशहाचं' नाव येताच त्यांचे पेटून उठणारे डोळे आणि कातर आवाज संभाजीराजांना जाणवून गेला. 

“रजपुताच्या गोटावर मारत्या समशेरीने चाल घेऊ या." कुडतोजी गुजर मान उठवून म्हणाले.

" तुमच्या निधड्या स्वभावाला घरून बोललात कुडतोजी! पण रजपूत एवढा गाफील नाही. मागच्या सरदारांच्या गफलती त्याच्याकडून होणार नाहीत. बादशहांच्या 'दोन डुया त्याने बघितल्या आहेत.” राजे शांतपणे म्हणाले. " मोगलाई मुलकात घुसून हूल देत त्येला अंगावं घेतला तर. "नेताजींनी आपली थोराड पगडी डोलावीत मसलत पेश केली..

" मनचं बोललात नेताजी. आम्ही तीच कामगिरी तुम्हांस जोडून देणार आहोत. परिड्याच्या परगण्यात तुम्ही फौजबंद होऊन उतरा. पण हा हुन्नरही किती नतिजा पावेल आम्हास शक आहे! मिर्झा राजें मुत्सद्दी आहे. घिमा आहे.'

सगळे सदरकरी खामोश झाले. कुणालाच काही सुचत नव्हते. बराच वेळ राजे बोलत होते. मिर्झा राजाचा, पठाण दिलेरचा हुबेहूब परिचय करून देत होते. औरंगजेबाच्या चालबाज, धूर्त राजकारणी डावाची उकल करून सांगत होते. शेवटी ते म्हणाले, आम्हांस औरंगजेबाच्या कडव्या चालीची खंत वाटत नाही. कीव वाटते ती मिर्झा राजाची. दिल्लीपती होण्याची त्याची योग्यता. तोच आज आमच्या पहाडखायांच्या मुलखात बादशहाचा नमकहिलाल चाकर म्हणोन उतरतो आहे. आता श्रींची इच्छा बलवत्तर. आमचा भार त्यांच्यावर." म्हणत राजे उठले. मने जखडलेले सदरकरी उठले. त्यांच्यातील रघुनाथपंत कोरड्यांच्याकडे बघत राजे म्हणाले, "रघुनाथपंत, तुम्ही जरा आमच्या महाली भेटा."

राजांच्या पाठीवर झगमगणाऱ्या जाम्यावरच्या जरीबतूच्या ठसठशीत कोयरीवर डोळे जोडून जिजाबाईंच्या बरोबर चालताना संभाजीराजे कसल्यातरी विचारभिंगरीत अडकले होते. राजांच्या महालात येताच त्यांनी राजांना विचारले, "हा औरंगशा' असा कोण लागून गेला आहे की तुम्ही त्याच्याबद्दल इतकं बोलावं ?'


त्यांच्या प्रश्नाने जिजाबाई आणि राजे चमकून एकमेकांकडे बघतच राहिले. आपल्या फर्जदाला औरंगजेबाची खूणगाठ कशी द्यावी हे राजांना क्षणभर उमगलेच नाही! बाळराजांच्या जवळ येऊन त्यांच्या दोन्ही खांद्यांवर आपले तळहात चढवून, त्यांचे खादे पक्के आवळून टाकीत, त्यांच्या कपाळीच्य शिवगंधाकडे बघत राजे म्हणाले, "तो दिल्ली तख्ताचा बादशहा आहे शंभूराजे! तो आम्हास कधीच दिसला नाही. तसा तो त्यांच्या बंद्या सरदारांखेरीज कुणासच दिसत नाही. पण त्याची करणी मात्र आम दुनियेला दिसते! त्याच्या सख्ख्या भावांना दिसली ! खुद्द त्याच्या जन्मदात्या बापाला दिसली !' राजे बोलता बोलता थांबले.


" आम्ही त्या औरंगशहाला भेटून विचारावं म्हणतो. संभाजीराजांचे बोल पुरे " झाले नाहीत. राजांनी त्यांच्या ओठांवर आपली तर्जनी ठेवीत झटकन त्यांची जबान रोखली. "हां शंभूबाळ, सांब करो आणि तुमच्यावर तो प्रसंग कधीच न येवो!"


चौरंगावरील तबकात ठेवलेल्या स्फटिक शिवलिंगाकडे बघत राजे म्हणाले.

मिर्झा राजाने आपली चाल खुली केली. तीन पवित्र्यांत त्याचे सैन्य हलू लागले. सुप्यापासून जोडलेल्या पिछाडीच्या प्रत्येक ठाण्यावर तो हत्यारबंद, जागती शिबंदी पेरत आला होता. आपल्या प्रचंड फौजेचे गिधाडी पंख त्याने आता बारा मावळांत पसरले. खासा तो आणि दिलेरखान दोघे हुजरातीचे ताकदवर सैन्य घेऊन किल्ले पुरंधरच्या रोखाचे कूच झाले. मीर आतिशखान आणि निकोलो मनुची या गोऱ्या दरोम्यांच्या नजरेखाली खडखडाट करीत मिर्झा राजाचा तोफखाना पुरंधर जवळ करू लागला.


पेटली ! बारा मावळांची होळी ऐन तावत्या उन्हात पेटली. डोंगर पायथ्यांना आसरा धरून उभी असलेली मौजी, खुर्द, बुद्रुके घोड्यांच्या दौडत्या टापांखाली रगडली जाऊ लागली. सर्पणाच्या रानशेणी आणि काटक्या गोळा करण्यासाठी बाहेर पडलेल्या तरण्याताठ्या कुणबी बायका, 'काफरकी दौलत कमीनेकी औरत!' म्हणत चालत्या घोड्यांवर घेऊन, त्या हातपाय झाडीत किंचाळत असताना पळविल्या जाऊ लागल्या. त्यांच्या थरकत्या किंकाळ्या मावळाच्या दऱ्यांत गायब होऊ लागल्या. दावणीची जनावरे, नंग्या तेगींनी दावी छाटून तांड्यातांड्यांनी मोगली गोटांकडे हाकारली जाऊ लागली. शेपट्या उचलून, खूर झाडीत नवख्या मुलखाकडे फेसाटत धावताना ते अश्राप तांडे केविलवाणे हंबरू लागले. दिवसाढवळ्या पेटत्या मशाली घेऊन वाडीखेड्यांत घुसणारे पठाणी, तुर्की, मुगल, बहालिया हशम गंजी घरट्यांना मशाली भिडवू लागले. वेठबिगार करून घेण्यासाठी पकडलेल्या कुणब्यांच्या पाठी कोरड्यांच्या फटक्यांखाली फुटू लागल्या. गावेच्या गावे लुटली, जाळली, रगडली जाऊ लागली.

काढण्या चढवून, ताणीव गावची कात आणलेल्या मावळ्यांवर कोरडे ओढताना दिलेरचे हशम गर्दना मागे टाकीत खदखदा हसत विचारू लागले, "सुव्वरकी अवलाद, कहां है तुम्हारा सेवाजी ?" उभ्या मुलखाचे सुरूरपण सुकत चालले. तावत्या उन्हात बारा मावळांवर अवकळा उतरू लागली. शाही फौजेचा घरघरता वरवंटा अश्रापांच्या मोडक्यातोडक्या संसारावर निर्दयपणे फिरू लागला. माणसे हकनाक मरू लागली.

राजेवाडी - सासवड मार्गाने पुढे सरकलेला, फौजबंद दिलेरखान पुरंधरच्या पायथ्याला भिडला. पाठोपाठ भुलेश्वरच्या खिंडीतून मिर्झा कन्हेपठारावर उतरला. किल्ले पुरंधरला अफाट शाही फौजेचा घेर पडला ! कन्हा नदीच्या काठाला, ठोकलेल्या खुंट्यांना जखडलेल्या तणावांचा आधार घेत केशरी करड्या रंगांच्या राहुट्या, डेरे, तंबू, शामियाने उठले. हत्ती, उंट चीत्कारू लागले.


पुरंधरच्या सदर दरवाज्याच्या बाजूला खासा दिलेर, किरतसिंग, मीर अतिशखान, इंद्रमण बुंदेला, उदयभान गौर, रसूलबेग, झबरदस्तखान यांनी आपल्या बर्कदाज हशमांचे वळे उभे केले. मोर्चे रोखलेल्या तोफांच्या भांड्यांची तोंडे किल्ल्यावर बेसुमार आग ओकू लागली.