कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ६९

 आम्यावर चढून आलेली श्रावणाची पावसाळी वद्य एकादशी कोंदटत परतीला' लागली. दरबारातून बाहेर आलेल्या रामसिंगाचे घोडेपथक लाल किल्ल्याच्या बड्या दरवाज्यातून बाहेर पडले. रामसिंगाचा चेहरा चिंतावला होता. वारंवार त्याच्या कपाळीचा राजपुती टिळा आक्रसत होता. त्याच्या बगलेला धरून एका जातवान घोड्यावर मांड घातलेले संभाजीराजे कायदे पेलत धिम्या चालीने दौडत होते. कुणीच काही बोलत नव्हते. मागे राजपुती घोडाईत धावणी धरून होते. औरंगजेबाने खूब होशियारीने राजांच्या कत्तलीचा बेत आखला होता. पण फितवा केलेल्या लाल किल्ल्याच्या भिंतींनी तो रामसिंगाच्या कानी आज घातलाच. उद्याच राजांना हलविण्यात येणार होते आणि परवाला - 'जुम्म्याच्या' 'पाक' दिवशी 'नापाक' राजांना या जगातून पाठविण्यात येणार होते जहन्नमच्या दरबारातली खिल्लत घेण्यासाठी! पथकाची घोडी दुडकत दौडत होती. मान रामसिंगाचा जीव मान फासात अडकल्यागत घुसमटत होता. घोड्याच्या खूपच आवाज त्याला विचित्र वाटू लागला.


“उद्या तुम्हाला हलविण्यात येणार. खबरदार असा.” हा निरोप राजांना कोठीत पोचायला हवा होता. आज आणि मोठ्या सावधगिरीने. पण तो कसा पोचवावा ? रामसिंगाला राजांना भेटण्याची दरबारने 'मनाई' घातली होती. कोठीत त्याला जाता येत नव्हते. निरोप पोचविण्यात कुसूर झाला तर नतिजा ठरलेला होता. माथ्यावरच्या रजपुत टिळ्यावर एक जन्मभराचा काळा डाग पडगार होता!


'रामसिंगाची हवेली आली. मोतदारांनी झटकन पेश येत सवाऱ्याची घोडी ओठाळ्या धरत आपल्या ताब्यात घेतली. मध्यभागी असलेल्या राजपुती बैठकीवर रामसिंगाने संभाजीराजांना बसविले. महालात अस्वस्थ येरझाऱ्या घेणाऱ्या रामसिंगाची मूठ मध्येच कमरेच्या तलवारीच्या मुठीवर गच्च बसत होती. बेचैन हैराण झालेल्या रामसिंगाने छातवान रिते करीत एक लोंबता, असहाय निःश्वास सोडला.


संभाजीराजे रामसिंगचाच्याची घालमेल बघून बैठकीवरून उठले. त्याच्याजवळ जात म्हणाले, "चाचा, कोण प्रकारची तकलीफ ?


रामसिंग संभाजीराजांच्याकडे बघताना भरून आला. त्यांच्या खांद्यावर आपले हाततळवे चढवीत तो क्षणभर संभाजीराजांच्या डोळ्यांत बघत राहिला. त्यांच्या कपाळीचे दोन दळी शिवगंध बघताना रामसिंगाला कसलीतरी अजब मसलत स्फुरून गेली. " चंडी चंडी " ओठांतून शब्द सुटले त्याच्या.


संभाजीराजांचे खांदे घट्ट आवळून टाकीत तो म्हणाला, "कुँवर, चलो हमारे साथ ! ” संभाजीराजांना घेऊन तो थेट हवेलीच्या देवमहालात आला. देव्हाऱ्यात पूजल्या " रणचंडीच्या मूर्तीसमोर त्याने झटकन गुडघे टेकले. माथा क्षणभर देवीसमोर टेकविला.


झटकन उठून देवमहालाचे दार आडबंद टाकून बंद केले. रणचंडीच्या पायांवरचे एक त्रिदली बेलपत्र उचलले. त्याची दुबाजूची दळे खुडून संभाजीराजांच्या हातात ते ठेवताना रामसिंगाचे डोळे भरून आले. 

"कुँवर, बड़े होशियारीसे सुनना. आज रात कोठीमें राजासाबको मिलना कहना, कल तुम्हे कोठीसे हिलाया जायेगा. ये बेलपत्ता उन्हें देना कहना, एक सिर्फ एकही पत्ता बाकी रहा !! गळा दाटून आल्याने रामसिंगाला अधिक बोलवले नाही. त्याने आवेगाने संभाजीराजांना पोटाशी बिलगते घेतले.


त्याला बिलगलेल्या संभाजीराजांच्या मनी कुठेतरी खोलवटातून आल्यासारखे शब्द घुमले - “रजपूत म्हणजे 'राजाचे पुत्र'! आम्ही रजपूत आहोत! तुम्ही रजपूत आहात. आणि आणि रामसिंगही रजपूत आहे !! रामसिंगापासून विलग झालेल्या संभाजीराजांनी रामसिंगाच्या छातीकडे बघितले. त्या छातीवर मिर्झा राजाच्या छातीवर होते तसे 'हिरवे पदक' नव्हते!


रामसिंगाच्या हवेलीत खाना घेऊन राजांना भेटण्यासाठी संभाजीराजे कोठीत आले. महाराजसाहेबांची पायधूळ घेऊन त्यांनी कोठीभर आपली सावध नजर फिरवली. भिंतीला टेकून मदारी आणि हिरोजी उभे होते. कोनाड्यातील टेंभे आपल्या उरातील उजेड उधळीत अंधाराला दूर पिटाळून जळत होते.


' बसा." पलंगावर लेटल्या राजांनी हाताचा पंजा बिछायतीवर थोपटला. संभाजीराजे अदबीने राजांच्या बिछायतीवर टेकले.. 'दरबारी गेला होतात ?" शांतपणे राजांनी विचारले. "जी." जळत्या टेंभ्यांना धरून पुन्हा शांतता पसरली. कोठीच्या दरवाज्यावरचे रजपूत आणि हबशी पहारेकरी हत्यारे पेलून आडफेर टाकीत नेहमीसारख्या येरझाऱ्या घेत होते. त्यांच्या कोठीत आलेल्या फिरत्या सावल्या राजे आणि संभाजीराजे यांना क्षणभर झाकाळून टाकीत होत्या. पुन्हा दूर जात होत्या.


थाळा घेतलात ?" राजांनी मायेने विचारले. " 'संभाजीराजांनी पुन्हा हुंकार भरला.


“महाराजसाहेब 5.... पायदळी वाहिलेल्या सोनचंपकाच्या अनवट कळ्याने आपला सुगंध देवमूर्तीच्या नाकाकडे उचलून धरावा तसे संभाजीराजांनी आपले बोल राजांच्या कानी घातले- " रामसिंगचाच्यांचा सांगावा आहे. तुम्हास उद्या बादशहा कोठीतून हलविणार! ही बेलपत्ती तुम्हास द्यायला सांगून भरल्या डोळ्यांनी चाचा म्हणाले, 'एक सिर्फ एकही पत्ता बाकी है!” संभाजीराजांनी ते एकदळी बेलपान - राजांच्या हाती ठेवले.


दिवसभर भरघाव दौड घेऊन, रात्री पागेत ठाण झालेल्या, मिटल्या डोळ्यांनी उभ्या असलेल्या घोड्यांच्या हारीत ऐन मध्यरात्री एखादा भुजंग फणा उभवीत, फूत्कारीत घुसताच ती घोडी जशी खूर खटखटून उधळतील तसे राजांचे सारे दबले विचार क्षणात उफाळले! कोठी बदलणे म्हणजे कत्तल ! केविलवाणे मरण !


झटकन कोपरावर भार देत राजे बगलेने अर्धवट उठले. संभाजीराजांचा दंड त्यांनी • आवेगाने घट्ट धरला. त्यांच्याकडे भरल्या नजरेने एकटक बघताना राजांना एक बालभुत्या दिसू लागला. " भवानी राजा उदंऽऽ" म्हणत विखुरलेल्या केसांनी काठीच्या ठेक्यावर पोत नाचविणारा. हरभट ज्योतिष्याचे भाकीत बोल राजांच्या कानांत दौडून गेले, “हा उंच गडकोटावर राहील! प्रलय माजवील! "संभाजीराजांच्या चर्येत उतरलेल्या सईबाईंच्या खुणा राजांना गद्गदवून गेल्या- एकला जीव, पदरी घातला!


राजांनी एक निश्चय मनी पक्का करून टाकला. चुनेगच्च मनसुबा ! " आम्ही कोठीबाहेर सलामत पडलो तर बेहतरच आहे. तसे नाहीच घडले तर तर हे बाळराजे - तरी यवनाच्या दाढेतून सुटलेच पाहिजेत! गडकोटावर राहणेसाठी! प्रलय माजविणेसाठी!" बाहेरून शांत असलेले राजे म्हणाले "आज तुम्ही कोठीतच झोपा. '


संथपणे राजे पलंगावर लेटते झाले. बघणाऱ्याचा जीव घुसमटेल असे बराच वेळ खोकले. लटके ! हिरोजीने पुढे येत थुंकीसाठी तस्त राजांच्यासमोर पेश धरले. तस्तात थंकून राजे म्हणाले, " हिरोजी, खानसाहेबांना निरोप द्या. बाळराजे आजची रात्र कोठीत झोपण्याचा हट्ट करताहेत. त्यांना इथं झोपू द्या म्हणावं.' "जी." तस्त पलंगाच्या खुराजवळ ठेवून हिरोजी बाहेर गेला. मदारीने एक मात्रा उगळायला सुरुवात केली.


हिरोजीने फौलादखानचा निरोप परत्या पावलांनी आणला. "म्हाराज, खानसाब म्हनलं- बेशक, बेशक सोने दो बच्चेकू बापके साथ !" रात्रीने चौक भरला. श्रींच्या राज्याचे पिढ्यांपिढ्यांचे भवितव्य ठरविणारा, अत्यंत सावध 'गोंधळ' कोठीत उभा राहिला! घटनांचा, हुन्नराचा, धैर्याचा, कसबाचा.


मनोमन आईचा उदो' करीत राजे, संभाजीराजे, हिरोजी, मदारी सान्यांनीच हा गोंधळ पार पाडायचा होता. यातील एक जरी 'चुकूर' झाला तरी जगदंबा आठी हातांत पोत घेऊन साऱ्यांनाच पुरते जाळून काढायला मुलाहिजा राखणार नव्हती! पाळणुकीला कठीण असलेले दैवत होते ते !


कपाळीच्या शिवगंधावर उजव्या हाताचे पालथे मनगट ठेवून राजे पलंगावर पडून होते. त्यांच्या एका बगलेला फरसबंदीवर हिरोजी बसला होता. पलंगावर पायाशेजारी संभाजीराजे बसले होते. राजांच्या तळपायांना तेलवण चोळण्याच्या निमित्ताने मदारी पायगतीला बसला होता. कोठीला उजेडाचा उबारा देत कोनाड्यात टेंभे जळत होते. डोळे मिटलेले राजे दबक्या आवाजात बोलू लागले, ""बाळराजे ऽ' असे जवळ या.'

संभाजीराजे पुढे सरसे झाले.


" नीट ध्यान देऊन आम्ही सांगतो ते ऐका. एकही बाब विसरू नका.” राजे क्षणभर थांबले. मग एकीत बोलू लागले, “उद्या सकाळी तुम्ही कोठीबाहेर पडा. चाच्यांच्या हवेलीत जा. नेहमी त खे त्यांच्याबरोबर दरबारी जाऊन या. जाताना सर्जेरावांना बरोबर घ्या. पहिला दरबार उलंगताच 'तब्येत ठीक नाही. आम्ही निघतो. ' असे रामसिंगचाच्यांना सांगून सर्जेरावासह किल्ल्याबाहेर पडा. तुम्ही कुम्हारवाडीत देशीच्या कुंभाराच्या मेटावर थांबा. सर्जेरावांना दोन घोड्यांनिशी नूरगंजबागेजवळ तयार राहायला सांगा, आम्ही तुम्हांस उदईक कुम्हारवाडीत भेटू ! तिसऱ्या प्रहरानंतर आम्ही आलो ना आलो तरी तुम्ही सर्जेरावांसह आम्याबाहेर कूच करा. त्यांच्याजवळ दस्तके आहेत ती दाखवून मथुरा जवळ करा. ते सांगतील तसे वागा. कमी बोला. आमच्यासाठी थांबू नका.” राजे थांबले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर कितीतरी चेहरे क्षणात गरगरत फिरून गेले - मासाहेब, पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई! सावळ्या, पारख्या झालेल्या सईबाई ! सांगितले ते केवढे उमगले याचा सरतपास घेण्यासाठी राजांनी दोन वेळा सारे संभाजीराजांच्या तोंडून वदवून घेतले.


'आता. झोपा तुम्ही.” राजांनी संभाजीराजांना सांगितले. मदारीने पुढे होत संभाजीराजांचा टोप हाती घेतला. नेऊन चौरंगावरच्या तबकात राजांच्या टोपाजवळ ठेवला. संभाजीराजे पलंगावर आडवे झाले. केस मोकळे सुटलेले संभाजीराजे बघताना राजांच्या छातीत असंख्य कालव वळवळले. त्यांनी बाळराजांचे मस्तक हळूच आपल्या मांडीवर घेतले. कुणी सांगावे ही भेट शेवटचीही ठरली असती ! राजांची निमुळती सडक बोटे संभाजीराजांच्या कुरळ, दाट केसांवरून फिरू लागली. मावळी आभाळ बालसूर्याच्या जावळातून बोटे फिरवीत होते ! फार दिवसांनी संभाजीराजांना अशी मायेची 'बिछायत' मिळाली होती. त्यांच्या पापण्या झापडू लागल्या. आपोआप मिटल्या.