कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ६८

 कवी कुलेशांना राजे आणि संभाजीराजे यांना एकत्र बघताना मनोमन वाटले की, “कालीमाता दुर्गाभवानीने आपल्या त्रिशूळाने रेखलेले कुठल्यातरी अज्ञात काव्याचे हे दोन सर्ग आहेत! एक पुरा दुसरा पुरा होऊ घातलेला! आज ते पुसून टाकण्यासाठी -. औरंगजेबाने आपला मेहंदीच्या रसात बरबटलेला हातपंजा यांच्यावर उगारला आहे. कोण करील या देखण्या काव्यांचे रक्षण ?' शस्त्रधारी दुर्गेची मूर्ती डोळ्यांसमोर तरळलेले कवी कुलेश शेजारच्या परमानंदांना आणि खुद्द स्वतःलाही ऐकू येणार नाही असे नकळत फुटपुटले- " रक्ष रक्ष दुर्गेशनंदिनी !

राजांनी दोघाही कवींशी स्थिर चित्ताने चर्चा केली. कविवर जायला निघाले. त्यांनी राजे आणि संभाजीराजांना उत्तरी पद्धतीने झुकून अदबीचे नमस्कार केले.


“हिरोजी, रामसिंगांना आमची इच्छा कळवा. आमच्या फीलखान्याचे सारे हत्ती कविराजांना नजर केले आहेत!” राजांनी हिरोजी फर्जदला हुकूम फर्मावला.


'जी सरकार." हिरोजीने राजांची आज्ञा झुकून उचलून धरली. परमानंद आणि कवी कुलेश राजांच्याकडे बघतच राहिले. न राहवून परमानंद अदबीने म्हणाले, "स्वामिन्, हमें हाथियोंसे क्या लाभ ?'

" कविराज, आम्ही विरक्त झालो. ही सराई सोडावी म्हणतो! आपणच मार्ग दाखविला पाहिजे! हत्ती मार्गी लावले पाहिजेत! आमचा भार हलका केला पाहिजे!' राजे प्रत्येक बोल दुपेडी अर्थाने बोलले! परमानंद जे काय समजायचे ते समजून गेले.


" जैसी आपकी आग्या." म्हणत परमानंद, कवी कुलेश आणि हिरोजी यांच्यासह कोठीबाहेर पडले. राजे पलंगावर आडवे झाले. संभाजीराजांनी त्यांच्या पायगतीचा शालनामा त्यांच्या अंगावर सरकाविला. त्यांच्या कानामनात राजांचे बोल फिरू लागले - "ही सराई सोडणे आहे. आमची बिमारी बनावटी आहे. कुंभाराच्या बाडीचा रावता सोडू नका. हत्ती मार्गी लावले पाहिजेत!"


संभाजीराजे आपल्या महाराजसाहेबांचा पाय हलक्या हातांनी चेपू लागले. कोठीत राजांचे 'आजारपण' चढत्या अंगाने रंगू लागले !


" हा भार आता सोसत नाही. आई कोण सत्त्वपरीक्षा ही ? ते गनिमांचे कैदी झाले. आम्ही आमच्या देही कैद झालो. तुझ्या नावाचा उदो' करीत आम्ही पाजळले पोत नाचविले. आणि तू... ? तू आमचे 'आऊपण' भडकत्या दिवट्या भिडवून किती वार जाळू बघावे ? तू साऱ्या जगाची ' आऊ'. मग तुझ्या पायाशी ठाण मांडून बसलो तरी आम्ही पोरक्याच कशा ? घे, तू उधळलेला या जिवाचा भंडारा आता तुझ्याच आठी हातांनी तुझ्याकडे परता घे! नाही! हा भार आता सोसत नाही!" धुनीतील बाभळगाठ तडकत जळावी तशा जिजाऊ असहा कहांनी आतून जळत होत्या. त्यांच्या हाती न लागणान्या विचारांच्या ठिणग्या फुलून फुटत होत्या. मनाच्या अंगणात 'शिवरून पडत होत्या.

त्यांच्यासमोरची जगदंबा समया, नंदादीपाची किरणफेक अंगावर लपेटून शांत शांत उभी होती. ती हलत नव्हती. उभ्या जगातील माजलेले 'अभद्र' प्राशून टाकण्यासाठी तिने विस्फारलेले धोर मोठे डोळे बघताच जिजाऊ बसल्या जागी थरथरल्या. त्यांच्या कातर झालेल्या देहाच्या याच्या वृंदावनावर कुणीतरी आकाशाचे ताम्हन पालथे करून थंड थंडगार पाणी शिंपल्यासारखे त्यांना वाटले! त्या शहारल्या. एक चमत्कारिक विचार त्यांचा पाय एका अशुच रिकिबीत जखडवून त्यांना फरफटवत दूर घेऊन गेला ! जीव घायाळ करणारी होती ती फरफट. जगदंबेचे विशाल, फाकले नेत्र बघताना जिजाऊंना वाटले नरमुंडाचा सोस असलेली तू! तू. हे डोळे ताणून रोखले आहेस तेच माझ्या राजा बाळराजांवर !!! बालेकिल्ल्याच्या तटबंदीवरून एखादी पितळी थाळी थडथडत, थरकत, थपडा खात पायथ्याशी उतरावी तसे जिजाऊंचे मन त्या चरकविणाऱ्या विचाराने कुठेतरी खोलाव्यात तडफडत कोसळत गेले !

"नाही! हा भार आता सोसत नाही!" म्हणत कावऱ्या-बावऱ्या झालेल्या जिजाऊंनी असहायपणे देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर आपला असहाय, उजाड माथा टेकला! तोही जगदंबेसमोरच ! धड म्यानात न जाणाऱ्या, धड बाहेर पडून हाती न येणाऱ्या, मध्येच अटकलेल्या तेगीच्या पात्यासारखी त्यांच्या मनाची अवस्था झाली. देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर टेकलेल्या त्यांच्या उजाड माथ्याखालचे डोळे सरासर पाझरू लागले. प्रतापगडीच्या गोंधळ्याच्या हातातील पोत गडवान्यावर थरथरतो तशा त्या अंगभर गदगद् लागल्या.


भेदरलेली धाराऊ लगबगीने पुढे झाली. तिला 'मासावास्नी' कशी साद घालावी कळेना. रंजुकीत खिळा ठोकलेली तोफ नाकाम होते तशी रांगडी असली तरी गळा भरून आल्याने धाराऊ सुन्न झाली होती. तिने आपला भरला गोंदला हात गद्गदत जिजाऊंच्या पाठीवर ठेवला! तिच्या डोळ्यांतून टपटप आलेले थेंब खाली पाटावर ठेवलेल्या ताम्हनात पडताहेत याचे तिला भान नव्हते. त्या ताम्हनात वाहिलेल्या बेलपत्रांची खूणगाठ, पटावी म्हणून तिनेच एक एक करून सोडलेल्या सोनमोहरा होत्या! आता ते ताम्हन भरले होते. त्या मोहरा धाराऊच्या मावळी अश्रूंनी धुतल्या जात होत्या. जिजाऊंना माहीत नव्हते, धाराऊला कळले नव्हते पण एक अतिशय भावपूर्ण चित्र त्या देवमहालाच्या दगडबंद भिंती भारल्या नजरेने बघत होत्या.


आपला गोंदला हात जिजाऊंच्या पाठीवर 'सांतवना' साठी ठेवलेली धाराऊ होती. संभाजीराजांची 'दूधआई'! तिचा हात पाठीवर असलेल्या व माथा जगदंबेसमोर टेकलेल्या जिजाऊ होत्या राजांच्या आऊसाहेब! आणि त्या दोघींच्या पाठीवर - आपल्या विशाल डोळ्यांचे हात फिरवीत उभी होती जगदंबा उभ्या मावळाची आई !! - 'बेताला पक्का' असलेल्या औरंगजेबाने एक मनसुबा चिरेबंद करून टाकला ! राजांच्या कत्तलीचा !! आग्रा शहरातील विठ्ठलदासाची हवेली आता बांधून पुरी होत आली होती. फौलादखाँकडून राजांना त्या हवेलीत हलवून दुसऱ्याच दिवशी त्या हवेलीत हबशी नंग्या हत्यारांनिशी घुसवायचे होते. जी काफर दारा शिकोहची झाली तीच गत 'दख्खनी काफर मरहट्ट्याची' होणार होती !


मग रामसिंगच्या गळ्यावर तो वीतभर रुंदीच्या पठाणी तेगीचे पाते धरून त्याला जाहीर करायला लावणार होता "बेमार सेवा' गुजर गया !!'


जसे फर्मान घेऊन आम्यातून 'शाही सवार' सुटले होते तसेच राजांची 'वस्त्रे' घेऊन सांडणीस्वार मग मजल दरमजल करीत दख्खनेच्या रोखाने सुटणार होते! खिल्लत पांघरलेला औरंगजेबाचा एखादा खास 'विश्वासू सरदार त्यांच्याबरोबर घोडा फेकीत • जाणार होता. एका उजाड माथ्याच्या 'म्हातारीसमोर ' राजांच्या वस्त्रांचा थोर थाळा ठेवून म्हणणार होता- "आलिजाने दवादारूकी जारी कोशिस की! मगर बस ना चला ! राजासाब 5 ... राजासाब खुदाको प्यारे हो गये!!" आणि आपल्याच मकानातले. कुणीतरी 'गेल्यासारखे दाखवीत तो हात बांधून गर्दन 'मातमीच्या दुःखाने' खाली टाकणार होता! मग कधीच न जिरणाऱ्या आक्रोशाचा काटा राजगडाच्या तटबंदीच्या अंगावर फुलायला वेळ लागणार नव्हता!

मागे 'राखलेल्या 'संबूला मग 'शाहजादे, संबूराजे' असे हाकारत , मुल्ला मौलवींकडून मोगली रिवाज पढविणे फारसे अवघड नव्हते. कोवळी रोपटी हवी तशी बाक देऊन वळविता येतात!


दिल्लीच्या भोवती असलेली बगावतखोरांची दंगल मोडून काढताच, जन्माने मराठी असलेल्या आणि वृत्तीने मोगली झालेल्या 'सेवाच्या बच्चाला संबूराजाला ' बरोबर - घेऊनच लाखभर प्याद्यांसह मग दख्खनेत उतरता आले असते- राजरोस !


खुद्द आपल्या बैठकीच्या 'शाही हत्तीवरच्या ' हौद्यात 'संबूराजाला' बसवून घेऊन, ढोल-ताशांची तडतड उठवीत मराठी मुलखात औरंगजेबाला दवंडी पिटता आली असती- " तमाम मुफलिसोंको जाहीर हो ऽऽ बादशहा सलामत राजा सेवाजी की 'अमानत' लाये हैं ss ! अदब-अदब !!


औरंगजेबाच्या मनात बनलेला असा हा बीतपशील 'शाही' बेत होता! औरंगजेबाने राजांच्या माणसांना आग्रा सोडण्यासाठी 'दस्तके देऊन टाकली. त्याला मिळेल तेवढा शिवाजी आता एकाकी करायचा होता, आणि स्वतःच्या कबजात घ्यावयाचा होता. राजांची माणसे आम्याबाहेर पडली. राजांनी रामसिंगामागे 'जामीनकीचा कतबा रद्द करून घ्या, आमच्यासाठी तुमची जान' गुंतवू नका' असा लकडा लावला.


नाना लटपटी करून रामसिंगाने राजांच्यासाठी असलेली आपली जमानकी रद्द करून घेतली. औरंगजेबानेही तिची गरज उरली नाही हे पाहून ती रद्द केली. रामसिंग रीतसर मोकळा झाला !


'बिमारासाठी' 'दुवा' मागणारे मिठाईचे पेटारे ठरल्यावेळी कोठीत येत होते. राजे ते पेटारे मार्गी लावण्यासाठी कधी मदारी मेहतर तर कधी हिरोजी फर्जंद यांना कोठीबाहेर पाठवीत होते.


'बाळकृष्णासह' यादवनायक वसुदेव मथुरेतून धो धो कोसळणाऱ्या मुसळधारांचा सपकारा अंगावर घेत कंसाच्या कैदेतून सलामत सुटला तो 'कृष्णअष्टमीचा दिवस मागे पडला. राजांच्या कृष्णभक्त मनाला त्या दिवसाने एक दिशा गूढपणे दाखवून दिली. "पण हे सारे जमावे कैसे? पेटाऱ्यात बसून ? राजांच्या जागत्या, उघड्या डोळ्यांसमोर भवानीचे शेकडो पोत नाचू लागले. कात्रजचे बैल ! दिवट्या ! हूल ! गनिमांस पेटारियांची हूल !” राजे विचारासरसे झटकन् पलंगावर उठून बसले! "हिरोजी 5, सोस पडला ! पाणी !” हिरोजीला राजांनी आज्ञा केली.


पाण्याचा गडवा घेऊन हिरोजी राजाच्यासमोर आला. त्याच्या हातून गडवा घेताना राजांची त्याच्यावर नजर गेली. आणि राजे हिरोजीकडे बघतच राहिले. दर्पणात बघितल्यासारखे! हिरोजी राजांचा अनौरस बंधू होता. त्याची शकल राजांशी मिळतीजुळती होती! हनुवटीभर राजांच्या सारखी निमुळती दाढी फिरली होती.

एक विचार राजांच्या मनाच्या चक्रावर चढला. भवानीने त्रिशूलाने चक्राला फिरका दिला! माठ घडू लागला. राजांचा एक बेत मनोमन पक्का झाला " आमचा पेहराव - अंगी चढवून हिरोजी आमच्याऐवजी या पलंगावर चढेल औरंगशाचा दर्बारी 'बिमार' म्हणून! आम्ही हिरोजीचा मावळ वेष अंगी चढवू. 'हिरोजी' म्हणून! पुढे ? पुढे आई माग देईल तसे! "


"महाराज, पानी!" गडवा हाती घेऊन विचारात हरवलेल्या राजांना हिरोजीने पाणी पिण्याचा आठव करून दिला.


मान वर करून नरड्याची घाटी वरखाली दौडवीत राजे पाणी प्याले. गडवा हाती देताना हिरोजीला थंडपणे म्हणाले, "हिरोजी, आमचं चालणं-बोलणं, उठबशीचा लकब नीट पारखून ठेवणे! मोठा हुन्नर कार्यों लावणे आहे. " वाऱ्याच्या झुळकीबरोबर खिडकीचे दार कळेल न कळेल असे करकरते तसा हिरोजीच्या तोंडून अस्पष्ट होकार बाहेर पडला- “जी. '


कमरेचा शेला उतरवून हिरोजीच्या हाती देत राजे म्हणाले, "आता पेटारे येतील. त्यातल्या एकात हा ठेवून द्या! त्याचा शेव झाकणाबाहेर दिसेल असा राखा. पेटायाबरोबर तुम्ही जातीनिशी जा. घडेल ते आमच्या कानी घाला.'

'जी." हिरोजीला राजांचा अंदाज येईना!


ठरल्याप्रमाणे उत्तरी भोये पेटारे घेऊन आले. राजांनी झाकणे उघडलेल्या पेटाऱ्यातील मिठाईला दस्तुरी-स्पर्श केले.


हिरोजीने राजांचा शेला एका पेटाऱ्यात बाहेरून शेव दिसेल असा बेमालूम सरकविला! कमरेत झुकून राजांना अदबमुजरा घालीत हिरोजी पाच कदम मागे हटला. पेटाऱ्यांबरोबर कोठीबाहेर पडला. पेटाऱ्यांसह चालू लागला.


कोठीच्या तोंडावरचा एक पहारा चुकला. दुसरा मागे हटला आणि एका सिद्दी हशमाने शेल्याचा लोंबता शेव बघून आपले बटबटे डोळे ताणीत भोयांना दरडावले, “ठायरो ऽ ! खोलो ये!" त्या पेटाऱ्याकडे तेगीचे टोक रोखीत तो म्हणाला.


भोयांनी तो पेटारा जमिनीला टेकविला. हिरोजीने झटकन पुढे होत पेटाऱ्याचे झाकण उघडले. हशमांने शेल्याचे टोक हातात धरून तो सर्रकन बाहेर खेचला. " खाली करो ये सब. पेटाऱ्यातील सगळी मिठाई त्याने बाहेर काढायला लावली! एखाद्या 'लड्डूत' सेवा बसलेला नाही याची खातरजमा करून घेतली !! राजांनी अंदाज बांधला तसेच घडले होते! सिद्दी पेटाऱ्यांची केव्हाही झडती घेतच होते. घेणार होते.