राजगडावरच्या देवमहालात शाळिग्रामी शिवलिंगासमोर चंदनी पाटावर जिजाऊ बसल्या होत्या. म्हाताऱ्या पावसाने झोडपून काढलेल्या सुत्र, बधिर, काजळकाळ्या संध्याकाळी सारख्या !
“बाळराजे आणि राजे आगरियात कैदी पडले." ही खबर कानांवर पडताच आपले काळीजच कुणीतरी देठास हात घालून ते खुडून दूर नेत आहे असे त्यांना वाटले. पारण्याच्या उपवाशी पोटी, थरथरत्या हाताने त्या एक एक बिल्वपत्र शिवपिंडीवर अर्पित होत्या. लक्ष बिल्वपत्रांचा संकल्प त्यांनी मनी बांधला होता.
शंभर शंभर बेलपानांची तबके धाराऊ त्यांच्यापुढे गोंदल्या हाताने आणि काळवंडल्या मनाने सरकवीत होती. एका तबकातील बिल्वदले संपली की खुणेसाठी एक सोनेरी मोहर उचलून बाजूच्या ताम्हनात ठेवीत होती.
'शांतता' हा शब्द मनोमन उठविला तरी भंग पावेल एवढी भयाण शांतता देवमहाली पसरली होती! लटकल्या नंदादीपातील करंजेल तेलाशी वातीचे भांडण झाले तर तेवढाच 'चर्रर्र ऽ' असा आवाज उठत होता. जिजाऊंच्या नसला तरी धाराऊच्या काळजाला तो चिरत जात होता!
शिवपिंडीशी आणि त्यामागे उभ्या असलेल्या उग्रदर्शनी जगदंबेच्या मूर्तीशी जिजाऊंनी मुक्या ओठी आणि उघड्या डोळी वितंड-भांडण मांडले होते! एक एक बेलपत्राबरोबर आऊसाहेबांच्या मनाचा एक एक कप्पा उलगडत होता.
शेकडो, हजारो कप्पे !
" किती किती फसगत करावी तू आमची आई! थोरले संभाजीराजे तू आमच्या ओटीतून कनकगिरीवर हिरावून नेलेस. होदिगेरीच्या रानात तू आमचं कुंकू पायतळी घेतलंस! राजांना पुत्रलाभ झाला यासाठी समाधानानं आम्ही ओठ खोलले नाहीत तोच तू आमच्या थोरल्या सूनबाईंना जवळ केलंस! आणि आणि आज- -
" जे जे आम्हांस आवडावं ते ते तुझ्या डोळ्यांत भरतं! मग मग नेमक्या आम्हीच - कशा नाही भरत तुझ्या डोळ्यांत ? की आमच्या फुटक्या कपाळानं आम्ही तुलाही तोंडासमोर नकोशा झालो ? बोल आई, किती वेळ हातीचं त्रिशूल तू आमच्या कंठाशी आणून लावणार ? का मांडावी तुझी पूजा आम्ही ? " 'नाही हे थांबविणे आहे!! आमच्या राजांच्या बाळराजांच्या केसास ढका लागला तर बरे समजेन असणे ! आम्ही तुझाही मुलाहिजा नाही धरणार !! "
आम्याचा तावला मुलूख गदगदून आला. मृगाचा सरीबाज पाऊस लाल किल्ला, ताजमहाल, हवेल्या, कोठ्यांवर रपरपत कोसळू लागला.
पहारा देणे सोयीचे व्हावे म्हणून फौलादखानाने राजांना रामसिंगाच्या हवेलीला लागून असलेल्या दगडबंद कोठीत हलविले. खुल्या मैदानात शामियान्यात असलेले राजे अधिक बंदिस्त झाले. राजांच्या मनी विचारांचा पाऊसकाळा कोसळू लागला. सरींवर सरी, विचारांवर विचार धावणी घरू लागले. आणि आणि खुद्द आपल्याच माणसांना हबका बसावा असे साधेसुधे राजे ठरवून आजारी पडले! आजारी माणसांस अधिक सावधानगीचे उपाव सुचतात !
पहाऱ्यावरच्या हबशांनी, "मरहठ्ठा बेमार हो गया" ही खुशीची खबर परस्पर 'फौलादाच्या जाड कानांत नेऊन सोडली! राजांची पूछताछ करायला तो कोठीत आला. 'सुना है तुम्हारी तबियत बिगड गयी है ?" जाड, काळ्या ओठांवरचे फौलादचे भोकरी डोळे लखलखले. पाय ओढत चुकार चाल धरणाऱ्या घोड्याकडे हवशी घोडेपारखी बघतो तसा फौलाद राजांना निरखू लागला !
तापल्या लोखंडी ठशाचा डाग खुब्यावर घेणारे घोडे कण्हते तसे राजे बेमालूम कण्हले! उभ्या चर्येवर वेदनेचा भंडारा फासून घेत पलंगावरून आस्ते उठले ! तो कातळकठोर सह्याद्री छातवान गद्गदवून अमळ खोकला !!
"खाऽन, आम्हास आमचा भरोसा लागत नाही! जिवाची घालमेल होते आहे! आमच्यावर एक मेहरबानी करा. आमच्या पापांची आम्हांस फेड करू द्या! आम्ही खैरियत करावी म्हणतो! मेवामिठाईची, दिनारांची, साऱ्यांचीच!” धाप लागल्यागत करीत राजे थांबले. कपाळीचे शिवगंध त्यांनी आक्रसून टाकले. पलंगाच्या काठाळ्या दोन्ही तळहातांत गच्च धरल्या. खाली मान टाकून 'पापांचा बोजा शिरावरून झटकण्यासाठी, आपली आपणालाच नफरत वाटते आहे अशी बेमालूम डावी-उजवी मान डोलविली ! खान डोळे ताणून बघतच राहिला.
शेजारी पलंगावर टेकलेले संभाजीराजे कापल्या नजरेने राजांना निरखू लागले ! " आम्हास खैरियत देण्याची इजाजत आलिजासाहेबांकडून मिळवून द्या खान. एवढी एवढी मेहरबानगी करा आमच्यावर!" वेदना असहा झाल्यासारखे भासवीत बुरुजाचा ढलपा हळूहळू ढासळत बांधकामातून खचावा तसे खचत, 'जगदंब, जगदंब' म्हणत, उसासे भरून राजे पलंगावर आडवे झाले !
राजांनी फौलाद भवानीच्या माळेने दस्त करून टाकला !
जरूर ... जरूर हम कोशीश करेंगे!" खानाचे जाड, निबर ओठ आयुष्यात प्रथमच थोडे नरमाईचे बोलले. खान कोठीबाहेर गेला. संभाजीराजे लेटल्या राजांच्या कपाळाकडे बघत राहिले. मिटल्या डोळ्यांच्या राजांच्या कपाळी मध्येच आठ्या उठत होत्या.
औरंगजेबाने खुशमिजाजीने राजांना खैरियतीची परवानगी दिली! आम्याच्या 'मेवामंडीतून' मध्यम माटाचे पेटारे मिठाईने भरून त्र्यंबकपंत आणि निराजीपंत ते 'दस्तुरी-स्पर्शासाठी' कोठीकडे पाठवू लागले. फौलादाच्या धिप्पाड सिद्दी पहारेकऱ्यांना कधीच मालूम पडले नाही की रोजाना पेटारे नकळत मोठ्या माटाचे का होताहेत ?
उभ्या आग्रा शहरात राजांनी हातस्पर्श दिलेले मिठाईचे पेटारे मोकाट सुळसुळू लागले. त्यातील मिठ्ठास मिठाई खाताना सराई सराईतील फकीर आणि आग्रेकर आस्मानाकडे हातपंजे उठवून दुवा देऊ लागले - "खुद्द बेमारको सलामत रखे !! ' ""
बाहेर आम्याचे आस्मान पावसाळी ढगांनी झाकाळले होते. कोठीत राजांचे मन विचारांच्या असा काळढगांनी येरगटले होते. धारेला लागलेल्या नावेसारखे मध्येच त्यांचे मन सरासर राजगडापर्यंत झेपावत होते. जगदंबेसमोर बसलेली मासाहेबांची काळवंडलेली मुद्रा बघून पुन्हा माघारा हटत होते..
त्यांच्या पलंगावर पायगतीला बसलेले संभाजीराजे गोंधळल्या, बावऱ्या नजरेने राजांच्याकडे बघू लागले. 'खरंच महाराजसाहेब आजारी आहेत ?' क्षणात एक तर क्षणात दुसरी अशा शंकांत त्यांचे मन फटका खाऊ लागले.
राजांनी त्यांच्या मुद्रवरचा शक-अंदेश हेरला. हळुवार उठून संभाजीराजांच्या कानांतील चौकड्यांजवळ ओठ नेत राजे पुटपुटले. सूर्यफुलाच्या पाकळीवर बिलगलेल्या धुक्याचे पहाटवेळच्या थंड वाऱ्याने दवबिंदू उमटावेत तसे राजांचे सावध मोतीबोल संभाजीराजांच्या कानांत उतरले, "काळीज टाकू नका! आमची बिमारी बनावटी आहे! इथून सुटणे आहे आम्हास, आणि तुम्हासही ! रामसिंगचाच्याकडे येणाऱ्या हर असामीचा बोल नू बोल कान देऊन ऐकत चला ! कुंभाराच्या वाडीचा राबता तोडू नका ! सावध असा !
"जगदंब, जगदंब.” असे पुटपुटत, राजे कण्हत पुन्हा पलंगावर आडवे झाले. संभाजीराजांनी त्यांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे एकदा बघितले. आणि त्यांचे हात आपोआपच पुढे झाले. आपल्या हलक्या हातांनी ते राजांचे पाय चेपू लागले ! कोठीत विचित्र भावनेचा पडदा पसरला. राजे आजारी आहेत अशा चिंतेची खिल्लत संभाजीराजांनी आपल्या चेहऱ्यावर चढविली.
" दो पंडत आये हैं। अंदर पेश आना चाहते हैं। आलिजाने उनको इजाजत दी है। " कोठीच्या दरवाज्यावर पहारा देणारा रामसिंगाचा नाथावत हा धारकरी आत येऊन राजांना म्हणाला.
" भेज देना ऽ." राजे पलंगावरून न उठताच म्हणाले. नाघावत उत्तर हिंदोस्तानी, ब्राह्मणी पेहराव केलेल्या दोन इसमांना घेऊन कोटीत आला. त्यांतील एक होते कवींद्र परमानंद आणि दुसरे होते अलाहाबादचे कवी कुलेश. त्यांना बघताच राजे पलंगावरून उठण्यासाठी हालचाल करू लागले. राजांना नमस्कार करून झटकन पुढे येत परमानंद आदराने म्हणाले, "लेटते रहना स्वामिन् '
"राजांची कीर्ती ऐकून ते दोन्ही कवी त्यांच्या भेटीसाठी आम्यात आले होते. औरंगजेबाला त्यांनी राजांच्या भेटीसाठी परवानगी द्यावी असा अर्ज केला होता. औरंगजेबाने तो अर्ज मंजूर केला! एकाच हेतूने की, 'बिमार सेवाला' हे 'पंडत' आयुष्य नश्वर आहे हे काफरी पद्धतीने अधिक चांगले पटवू शकतील !
परमानंदांनी राजांना आपला परिचय करून दिला. राजे पलंगावर उठून बसले. “ ये कनोजके कविवर है कवि कुलेश." परमानंदांनी कुलेशांच्याकडे हात करीत त्यांचाही राजांना परिचय करून दिला. आणि म्हणाले, " बड़े सुभागसे आपके दर्शन हुए"
संभाजीराजांच्या पाठीवर आपला हात ठेवीत राजे एक एक शब्द म्हणाले, "हमारे फर्जद- संभाजीराजे.” संभाजीराजांनी दोघाही कवींना नमस्कार केले.