एकाएकी वळिवाच्या ढगांची आकाशाच्या नगाऱ्यावर टिपरी घुमते तशी क्षणाक्षणाला चढत्या आवाजाने जवळ येणारी असंख्य घोडटापांची टिपरी अचानक सर्वांच्या कानांवर आली! राजे चमकले. संभाजीराजे ताडकन मंचकावरून उठले. दोघांच्याही टोपांतील मोतीलगी थरथरल्या !
डेन्याबाहेर असलेला रामसिंगाचा पहारेकरी नंग्या हत्यारानिशी घाबराघुबरा होत आत आला. त्याच्या पाठोपाठ बाहेर गेलेले, भेदरलेले रघुनाथपंत, त्र्यंबकपंत, निराजी तिघेही हत्यारे उपसून आत आले. सर्वांचे गुंतवा झालेले थरथरते विचित्र शब्द राजांच्या आणि संभाजीराजांच्या कानावर एकदम आदळले. "घात झाला धनी s! हबशी हत्यार चलाने आ रहे हैं. भागो! पळा ! भागो! "
बाणासारख्या घुसणाऱ्या त्या शब्दांनी राजे गोंधळले. तबकात ठेवलेली 'भवानी' उचलण्यासाठी त्यांनी पायझेप टाकली पण संभाजीराजांची आठवण येताच ती पुन्हा मागे घेतली! एकदम संभाजीराजांना ओढून जवळ घेत राजांनी त्यांना आपल्या पोटाशी कवटाळले! एक - एकच क्षण निघून गेला. पण पण तेवढ्या अवधीत राजांच्या मनी - विचारांची किती तरी हत्यारे एकमेकांवर आदळली. राजगड सोडल्यापासून दाबून ठेवलेले अपमानाचे, चिंतेचे, व्यथेचे कैक बांध फुटले.
'श्रींचे राज्य मिर्झा राजा जीव कामी आलेले इमानबंद जीव दह्याच्या कवड्या मासाहेब.. ... ... फर्मानवाडी. भंडाऱ्याची परडी, उचलला गेलेला कैलास ... एकला भुयार... शिवलिंग पेटत हुडवा' विचित्र-विचित्र दृश्ये राजांच्या डोळ्यासमोर त्या क्षणात दाटवा धरून गेली. कैक हबशांचे निर्दय वार आपल्या आणि संभाजीराजांच्या आता अंगावर पडणार या कल्पनेने राजे अंगभर चरकले. सगळे डाव अपुरे असताना, परमुलखी, एका गाफील क्षणी एकुलत्या एक पुत्रासह कत्तलीचे केविलवाणे मरण ! सर्वस्वाची राख ! शतरंजचा हा फसलेला डाव! नामुष्कीची शिकस्त ! राजांचे सूर्यपेट डोळे कडकडीत काळजीने दाटून आले. संभाजीराजांना पोटाशी एकजीव गच्च कवटाळून धरताना राजांच्या थरथरत्या ओठांतून मायेने धबधबून गेलेले घोगरे शब्द ओघळले, "लेक ऽ राऽ, घात झाला ! आम्ही फसलो !”
तलवारीच्या पात्याला धार बिलगलेली असते तसे संभाजीराजे आपल्या आबासाहेबांना हातांच्या कवळ्याने बिलगले होते. मान उठवून राजांच्या चेहऱ्याकडे बघताना त्याच्या छातीत असंख्य कालव वळवळून उठले. " महाराजसाहेबS!" म्हणत त्यांनी आपले तोंड राजांच्या जाम्यावर घुसळले. ते फर्जद आबा थरथरत होते. काळ्याभोर ढगांच्या तांडवात सापडलेल्या वीजरेघांसारखे ! क्षणात डेऱ्याभोवती बेफाम दौडत आलेल्या घोड्यांच्या टापांचा गराडा पडला. थांबत्या घोड्यांनी पुढचे खूर नाचवीत खूर उचलताना फोडलेल्या कातल्या खिंकाळ्या घुमल्या. पठोपाठ डेऱ्याचा झिरझिरीत पडदा एका राकट, केसाळ हाताने बेदरकार उडता फेकून दिला. पत्थरी रंगाचा, हनुवटीकडे पडलेल्या जाड ओठांचा आगऱ्याचा धिप्पाड, हबशी फौजदार सिद्दी फौलादख डेऱ्यात घुसला.
आपल्या कमरेच्या रुंद पात्याच्या जमदाडीच्या मुठीवर जाड बोटांची पकड पक्की स्तवीत दरवाज्याजवळच तो थांबला. आपले भोकरांसारखे बटबटीत डोळे राजांच्यावर रोखून त्याने हनुवटीकडे पडलेला जाड ओट खोलला, रुंद दात चमकले- “मेरे हथियारबंद हशमोंका पेहरा तुमपर लगा है। किसीको भी मिलना तुम्हें सख्त मना है। ये हुक्म है आलिजाका खयाल रखना.' त्याच्या जाड भुवया क्षणभर आक्रसून " फिसकारल्या.
खांद्यावरच्या झगझगीत, हिरव्या खिल्लतीचा उजव्या कोपराने पिसारा फुलवून टाकीत, जबाबाची वाट न बघता फौलाद वळला. आणि मोहरमचा नाचता ताबूत पुढे जावा तसा झपाट्याने डेऱ्याबाहेर निघूनही गेला!
पाच हजार धिप्पाड, कडव्या हबशांच्या दाट चौक्या डेऱ्याभोवती पडल्या! तोफांची तोंडे डेन्यावर रोखून हबशांनी तोफगाड्यांची मांडणावळ केली. जसा पन्हाळ्यावर पडला होता तसाच 'सिद्दीचा वेढा पडला! मावळी सिंह आगऱ्याच्या हिरव्या कुरणात अडकला ! राजे कैद झाले !
औरंगजेबाच्या हातातील जपाची माळ आणि राजांच्या छातीवरची भवानीची माळ आता एकमेकींच्या पाठीवर जागती 'गस्त घालू लागल्या !!
राजे कैद झाले तरी संभाजीराजांना मात्र कैद पडली नव्हती. ते रामसिंगाची हवेली, आग्रा शहर, लालकिल्ला यात ये-जा करू शकत होते. औरंगजेबाला माहीत नव्हते त्याने ही केवढी गफलत करून ठेवली होती. धाकला असला तरी साप म्हणू नये आपला' हे तत्त्व औरंगजेब विसरला! आणि हे तर मावळी बचनाग ! संधी मिळेल तेव्हा सळसळत फणा वर उठविणारे !
राजे आता वरून अगदी शांत दिसू लागले, पण आत त्यांचा 'मनाशी मनाचा' तुंबळ संवाद पडला होता. एकच एक ध्यास त्यांच्या सावध मनाने घेतला.
'संभाजीराजांच्यासह आलेल्या साप्या असामींनिशी या काळदाढेतून सलामत सुटका! " कोण हुन्नर चालवावा ? कैसी चाल खेळावी ? आणि राजांनी मनोमन भवानीचे नाव घेत शतरंजाची पहिली खेळी बाहेर काढली !
एका संध्याकाळी खाशा स्वाऱ्यांना 'दिवट्याची सलामी' द्यायला आलेल्या मावळ्यांना बघताच भुवया वर चढवीत राजांनी जरबेने विचारले, “कशास आलात ? चालते व्हा ! आमचे आणि बाळराजांचे होगे असेल ते होईल !” राजांनी शेजारी उभ्या असलेल्या संभाजीराजांना जवळ घेतले.
मावळे चरकले. तो शोरगुल ऐकून फौलादखाँ डेऱ्याजवळ आला! त्याला बघताच एकसारख्या फेच्या घेता घेता राजे मावळ्यांवर कडाडले, "काय सांगतो आम्ही ? चालते व्हा! तुमचा विचार कराया आम्हास अवसर नाही. निघा येथून !'
हुषार राजांनी आपले मावळे गोंधळलेले बघून त्यांना 'परवलीची खूण' देण्यासाठी गळ्यातील माळ उचलून आपल्या कपाळी शिवगंधाला भिडवून सोडली !
मावळ्यांनी हा 'बनाव' हेरला ! " पर आमी जावं कुठं ? खालच्या मानेने दावलजी घाटग्यांनी विचारले.
" कुठेही जा. देशी जा. निघा." राजे फेऱ्या घेतच राहिले. "क्या हुआ ? " सिद्दी फौलादखाने आत येत राजांना विचारले.
" चाकरी करते हैं! कैदीकी चाकरी! खान, इन लोगोंका बौज हमपर किसलिये ? जाने दो इन्हें मैं आलिजाको अर्जी पेश करता हूँ। दे दो दस्तक इनको! " राजांनी फौलादखौमार्फत औरंगजेबाला आपली 'शिनंदी' परत पाठविण्यासाठी दस्तके देण्याविषयी अर्ज दिला !
बहिर्जीने आपले खबरगीर निरनिराळ्या वेषांत आम्यास पेरून टाकले. त्याचे नाव होते ' बहिर्जी' पण कुणालाही ऐकता येणार नाही असं' खाशा गोटातील ' ऐकण्याएवढे त्याचे कान ' तिखट' होते! नाव 'बहिर्जी' आणि कृती 'बहुरूपी' असा होता ! तो मामला 'मला रामसिंगाच्या तळावरून हलवा." असा एक अर्ज राजांनी औरंगजेबाला केला.
" रामसिंग हमारा कदीम चाकर है। वही रहना। " असा जबाब औरंगजेबाने दिला... "मला संसाराचा कंटाळा आला आहे. काशीस जाण्याची इजाजत मला आला हजरतनी द्यावी. संन्यास घेऊन तेथे राहण्याची माझी इच्छा आहे!" असाही एक अर्ज राजांनी औरंगजेबाला केला.
'सेवा' अवलिया बनना चाहता है। ठीक है। उसे कहना इलाहाबादके किलेपर जाकर वो अवलिया बने रहे। हमारा सुभेदार बहादूरखान उसकी अच्छी हिफाजत रखेगा। " असा जवाब औरंगजेबाने त्या अर्जाला दिला !
राजांचा आणि औरंगजेबाचा 'शतरंज' एकमेकांचे मनसुबे मारण्यासाठी रंगू लागला. जे घडत होते, घडू घातले होते त्यांनी संभाजीराजांची जाण नकळतच आपोआप वाढत होती. आपण कसल्या पेचात आहोत हे त्यांनी हेरले. रामसिंगाशी ते अधिक अदबीने वागू लागले. वेळ मिळेल तेव्हा ' कुम्हारवाडीत जाऊन कुंभाराची गाठभेट घेऊ लागले. नेहमीप्रमाणे एके दिवशी ते रामसिंगासह लाल किल्ल्यात आले. रामसिंगाला कळले की बादशहा सलामत 'पैलवानोंका जंग देख रहे हैं!"
संभाजीराजांना घेऊन रामसिंग कुस्तीच्या आखाड्याजवळ आला. एका प्रशस्त गोलाकार मैदानात ताक आणि तेल घालून मळलेल्या लाल मातीचा होदा होता. हौद्याभोवती फिरलेला भक्कम लकडकोट होता.
कडकोटाला लागून मांडलेल्या एका आसनावर औरंगजेब बसला होता. त्याच्या मस्तकावर अब्दागिन्या, चवऱ्या ढळत होत्या. त्याच्या पाठीमागे काही सरदार उभे होते. आम्याच्या तळपत्या उन्हात हौद्यातील लाल माती चमकत होती. ती बघताना औरंगजेबाला वाटले, “खुदातालने हर किस्म की मिट्टी पैदा की। लाल, काली, सफेद पर हारी मिट्टी कैसी नहीं पैदा की ?" अस्वस्थ होऊन त्याने हातातील काश्मिरी गुलाबाचा गेंद नाकाला लावला आणि त्याला रामसिंग आणि संभाजीराजे दिसले!
हिरव्या जांगा कसलेले, पठाणी, हबशी, उझबेकी, तुर्की धिप्पाड मल्ल हौद्यात उतरत होते. औरंगजेबाला कुर्निस देऊन " या ऽ मौलाली ऽ" अशा गर्जना करीत एका पायावर नाचून हौचाला फेरा घेत होते. सलामीची माती आपल्या जोडीदाराच्या हाती देत दणादण शडू ठोकत होते. त्यांच्याशी अंगझट्या देत होड घेत होते. त्यांची तजेलदार अंगे घामाने निथळून निघाली होती !
मल्लांची भरल्या कणसांसारखी दिसणारी पटबाज शरीरे निरखत संभाजीराजे रामसिंगासह लकडकोटाजवळ थांबले. "आता एकदम जिले सुबहानीसमोर कसं जावं' या विचाराने रामसिंगही थांबला.
दोघेही हौद्यातील रोमांचक दंगल बघण्यात गढून गेले.
'रामसिंग !" बक्षी आसदखानाने त्यांच्याजवळ येत त्यांची तंद्री मोडली. 'क्या है ? " रामसिंगाला एवढ्या दिवसांत चारच समाधानाचे कुस्ती बघण्याचे क्षण मिळाले होते तेही निघून गेले !
" आला हजरत पूछते हैं की सेवाका ये बच्चा कुश्ती खेलेगा क्या ? आसदखानाने रामसिंगाच्या गळ्यावर शब्दांची तळवारच सरळ आडवी धरली. संभाजीराजांचा हात पटकन हातात घेऊन रामसिंग म्हणाला, “बक्षी, उमर तो देखो इनकी.' बक्षी आसदखानाला कल्पना नसताना संभाजीराजे त्याला म्हणाले, “हांऽ जरूर खेळू आम्ही हौदा ! पण तो या चाकरी ठेवलेल्या मल्लांशी नाही. असले पैलवान आम्हास रोजाना मुजरे करतात! आमच्या जोडीचा 'शाहजादा' उतरेल हौद्यात तर आम्हीही जांग चढवू!" आसदखानाने संभाजीराजांची जवान औरंगजेबाच्या कानांवर घातली! बसल्या आसनावरूनच औरंगजेबाने संभाजीराजांना निरखले.
"आसद, उसको पैलवानकी ठंडाई देना।" एवढेच औरंगजेब म्हणाला आणि " आपले शहजादे कसे निपजतील ? " या शंकेबरोबर तो आसनावरून उठला आणि नमाज पढायला आपल्या महालात निघून गेला !