रामसिंगाच्या हवेलीत बैठकीच्या दिवाणी दालनात एका मोठ्या राजपुती घडावाच्या शिसवी चौरंगावर एका तबकात चकचकीत, काळेशार, शाळिग्रामी शिवलिंग ठेवण्यात आले होते. त्याजवळ दुसऱ्या तबकात पूजेचे साहित्य मांडण्यात आले होते. रामसिंग राजे-संभाजीराजे यांना बरोबर घेऊन तळावरून आपल्या हवेलीकडे निघाला.
खुद्द मिर्झाच्या आम्यातील हवेलीत येऊन आपणाला शिवलिंगाची पूजा बांधावी लागेल असे कधी राजांच्या स्वप्नातसुद्धा आले नसते. पण स्वप्न आणि सत्य नेहमीच- एकमेकांना हूल देऊन एकमेकांवर कुरघोडी करीत असतात !
संभाजीराजे दरबारातून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी औरंगजेबाने सिद्दी फौलादखानला हुकूम दिला, “सेवाको मुकामपरसे रणअंदाजखाँके कोठीपर ले जाव । ' राजांना रणअंदाजखानाच्या कोठीवर हलवून जशी दाराची केली तशी शिवाजीची बिनबोभाट कत्तल करण्यात येणार होती! रामसिंगाच्या हवेलीसमोरच्या खुल्या तळावर ते शक्य नव्हते. कशी कुणाला ठाऊक पण ही खबर रामसिंगाला लागली. तो तडक मीर बक्षी मुहम्मद अमीनखान याच्या हवेलीवर गेला. अमीनखान मित्र होता. उच्च पदावर होता. त्याच्याकरवी रामसिंगाने औरंगजेबाला कधी नव्हे तो निर्धारी निरोप पाठविला - "शिवाजीला ठार करण्यापूर्वी कबिल्यासह मला ठार करा! "
तो निरोप ऐकून धूर्त औरंगजेबाने ओळखले की, शिवाजीला कत्ल करण्याच्या आपल्या योजनेची बातमी फुटली आहे. समोर आलेल्या अमीनखानाचा फायदा घेऊन औरंगजेबाने रामसिंगालाच मध्ये अडकवून टाकण्याचा फासा टाकला. "शिवाजी आम्यातून बाहेर जाणार नाही यासाठी तू ओलीस राहतोस काय ? ' असा निरोप रामसिंगाला औरंगजेबाने पाठविला !
राजांच्या प्राणावरचे जामीनकदब्यावर निभावते हे पाहून निःश्वास टाकून रामसिंगाने बक्षी अमीनखानाकडून आमीनकदवा दस्तखत करून पाठवून दिला. औरंगजेबाने तो मंजूर केला. रामसिंग राजांना रीतसर जामीन राहिला!
रामसिंगाने आपल्या प्राणावरचे संकट दूर करून स्वतःचे प्राण टांगून घेतले हे त्याच्या तोंडून ऐकताच राजे विचारमग्न झाले. त्यांनी रामसिंगाला विश्वास दिला, "आम्ही बेलाफुलाची आणभाक घेऊन तुम्हास एतबार देऊ. निश्चिंत असणे.' "
महादेवाची पूजा बांधण्यासाठी राजे संभाजीराजांच्यासह रामसिंगाच्या हवेलीत आले. हवेलीच्या दिवाणी दालनात बल्लूशाह, गिरधरलाल. गोपीराम, तेजसिंह अशी रामसिंगाची मंडळी होती. राजांच्या बरोबर रघुनाथपंत दत्तोजीपंत, त्र्यंबकपंत, निराजी अशा असामी होत्या. राजांनी चौरंगावरच्या शाळिग्रामी शिवलिंगाची पूजा बांधली. शिवपिंडीवरचे बेलफूल उचलून घेतले. आपल्या सडक बोटांनी ते रामसिंगाच्या हाती देत राजे म्हणाले, "हम शिवजीकी कसम उठाते हैं जबतक तुम हमारे लिये जमान हो, हम आगरा नहीं छोड़ेंगे. "
राजांनी रामसिंगाची ऊरभेट घेतली. रामसिंग औरंगजेबाला जामीन राहिला. राजे रामसिंगाला आणेभाकेने बांधील झाले. एकाच वेळी राजे दोन कैदेत पडले! एक होती औरंगजेबाच्या राजकारणाची, दुसरी होती रामसिंगाच्या प्रेमाची!
तो सारा मामलाच अजब होता. वास्तविक आपल्या सुरक्षिततेसाठी राजांनी औरंगजेबाकडून रामसिंग जामीन मागावा तेथे राजांच्याकडून औरंगजेबाने जामीन घेतला! उलटी चालली नाही तर ती मोगली सल्तनत कसली ?
संभाजीराजे आणि रामसिंग आम्याचा फेरफटका करून परतत होते. त्यांच्या घोड्यांमागून दहा-बारा रजपूत घोडाईत चाल धरून होते. दिवस परतायला लागला होता. पथक ' कुम्हारबाडीच्या' वस्तीत घुसले. इथे कुंभाराच्या धाव्यांच्या घरांसमोर उभट उंच रांजण, गेळे, माठ कुंभारांनी हारीनं मांडले होते. ते बघताच रामसिंगाने हात वर करून पथक थांबविले. मागे न बघताच त्याने हाका दिला, "दुंगर !
“जी.” म्हणत दुंगरमल आघाडीला आला. " उसमेंके माठ लेना. राजासाबके हशमोके लिये." रामसिंगाने एका कुंभाराच्या ओसरीकडे हात उठवीत त्याला आज्ञा दिली.
कुंभारी चाक फिरविणाऱ्या कुंभाराने 'शाही सवाऱ्या' बघून हातच्या काठीने फिरते चाक थोपविले. पुढे येत रामसिंगाला आणि संभाजीराजांना कुर्निस करून तो अदबीने म्हणाला, "क्या हुकूम है सरकार ? कौनसी खिदमत करूँ ?" त्याच्या डोक्यावर उत्तरी पागोटे होते. चिखल-मळले हात त्याने मावळी रामरामाच्या पद्धतीने जोडले. " अच्छे माठ देना. इन मेहमान साहबानके लोगोंको देना है." रामसिंग संभाजीराजांच्याकडे हाताने दाखवीत म्हणाला.
कुंभाराने बारीक डोळे करून संभाजीराजांना निरखले. सहज म्हणून तो पुटपटला, "सवान्या मावळी मुलखाच्या दिसत्यात!' कुंभाराची नजर संभाजीराजांच्या छातीवरील कवड्यांच्या माळेवरून फिरली.
कुंभाराची बोली ऐकताना संभाजीराजांची उजवी भुवई नकळत वर चढली. 'असामी देशीची दिसते. मावळबोली बोलते." एक विचार त्यांच्या मनाच्या चाकावर फिरला! काहीतरी आकार घेऊ लागला.
कुंभाराने एक गोल खडा उचलून दुंगरमलला भाजीव माठ ठणाठण वाजवून दाखविले. संभाजीराजांच्या मनात कसलेतरी ठोके ठणठणून गेले.
हातांत पेलून, पारखून बघून दुंगरने चार माठ खरेदी केले. रामसिंगाने कमरेच्या शेल्यात खोचलेली दिनाराची थैली खेचून दुंगरच्या दिशेने घोड्यावरूनच फेकली. ती झेलीत दुगरने कुंभाराला माठाचे दिनार दिले. थैली आणून पुन्हा रामसिंगाच्या हातात दिली. एक एक उचलून कुंभाराने आणि दुगरने माठ चार स्वारांच्या हातांत दिले. दुगरने घोड्यावर झेप घेतली.
कुंभाराने वाकून पुन्हा, घोड्याचे कायदे खेचणाऱ्या रामसिंगाला तसलीम केली. " चलिये कुँवर. " रामसिंग संभाजीराजांना मानेच्या झटक्याबरोबर म्हणाला.
रामसिंगाने घोड्याला टाच देताच त्याच्या रजपूत घोडाईतांनीही टाचा दिल्या. पथक 'हलले. मुद्दाम कायदे आखडते घरून संभाजीराजांनी आपल्या घोड्याला लटकी टाच दिल्यासारखे केले! घोडे गोंधळले. पुढे जायचे का थांबायचे या अंदेशाने खूर मागेपुढे नाचवून जागीच थांबले! रामसिंग दुंगर पथकासह पाच-दहा कदम पुढे गेल्याची संभाजीराजांनी खातरजमा करून घेतली. झटकन आपल्या गळ्यातील टपोऱ्या मोत्याचा कंठा उतरून हातात घेतला.
कुंभार संभाजीराजांच्या घोड्याकडे बघत दिनार मुठीत धरून थांबला होता. संभाजीराजांनी हातातील कंठा कुंभाराच्या अंगावर फेकला! “आम्ही मावळाचे. भवानीचे भुत्ये! पारख ठेवा. येतो आम्ही. रामराम.” संभाजीराजांनी घोड्याला जबरी टाच दिली.
" रामराम जी." हे कुंभाराचे शब्द संभाजीराजांनी ऐकले नाहीत. चकित पडलेल्या, कंठ्याकडे बघताना हरखून गेलेल्या कुंभाराने अंदाज लावला, "बच्चा मावळी सरदाराचा हाय!" कुंभार मूळचा मराठी मुलखाचा होता. हातच्या कसबाने त्याला उत्तरेत आम्यात आणून सोडले होते.
घटना आता दिवसरात्रीच्या पाठीवर गस्त घालीत फिरू लागल्या. रामसिंगाला इतबार देण्यासाठी राजांनी त्यांच्या रजपुती धारकऱ्यांचा पहारा आपल्या तळावर बसवून घेतला.
संभाजीराजे आणि रामसिंग यांचा घरघसटीचा प्रेमा वाढत चालला. घडले तेच एवढे जबरी होते की, रामसिंग राजे आणि संभाजीराजे यांची डोळ्यांत तेल सोडून हिफाजत राखत होता. ह्या 'मेहमान स्वाऱ्या' सलामत आपल्या मुलखात परत कशा जातील याचीच रामसिंगाला फिकर लागली. तिला दोन कारणे होती: एक तर दिला शब्द पाळणे हे रजपुतांचे रक्त होते आणि दुसरे महत्त्वाचे कारण होते की, जर राजे आणि संभाजीराजे यांच्या जीवाला काही धोका झाला तर आपले दख्खनेत असलेले 'पिताजी' मावळ्यांच्या जानकुर्बान झडपीतून सुखरूप परत येतील की नाही याची रामसिंगाला काळजी पडली! जगदंबेनेच हे विचित्र त्रिशूळ आम्याच्या उरावर रोखून धरले होते!- तिचा तरी काय इलाज होता ? राजे-संभाजीराजे तर तिचे भुत्येच होते. पण खुद्द मिर्झा राजाही तिचा भक्तच होता! तिला सगळ्यांनाच दाद देणे भाग होते.
औरंगजेबाने राजांना काबूलवर स्वारीसाठी पाठविण्याचा बेत रामसिंगाला बोलून दाखविला. काहीतरी कारणामुळे पुढे तो बेत बारगळला.
राजांनी औरंगजेबाचा वजीर जाफरखान याची त्याच्या हवेलीत भेट घेऊन त्याला किंमती नजराणा दिला. बादशाही रदबदली करण्याचा राजांचा हा बेतही कारणी लागला नाही.
दख्खनेतून मिर्झा राजाची औरंगजेबाला पत्रे येत होती. शेवटी औरंगजेबाने कंटाळून मिर्झा राजाला पत्र पाठवले- • तुमने दखनी सेवाको कौन कौनसी बयत जवान दी है ? सिलसिला बयाजवार भेज देना ! " राजांच्या हाती आता एकच चाल राहिली. औरंगजेबाला आपले कलमकसदार विनंती अर्ज पेश करणे!
अमीनखानमार्फत राजांनी औरंगजेबाला अर्ज पाठविला - "पुरंधरच्या तहातील माझे सर्व किल्ले जर मला परत दिले तर मी दोन कोटी रुपये दरबारी पेश करीन! मला दख्खनेत जायला इजाजत मिळावी. माझे फर्जद संभाजीराजे यांना मी आम्यातच ठेवून जाईन. बादशाह चाहतील तर मी कसम घेण्यास तयार आहे. बादशाह सलामतांची दख्खनेत आदिलशाही विजापुरावर मोहीम जारी आहे. तिथे जाण्याची मला इजाजत द्यावी. मी ती मोहीम फत्ते करून देईन । वख्त पडल्यास त्या जंगात जान कुर्बान करून आलिजांपाशी माझी चाकरी रूजू करीन!"
अमीनखानाने राजांचा अर्ज दरबारात वजीर जाफरखानाच्या हवाली केला. त्या दरबारात रामसिंगासह संभाजीराजे हजर होते. जाफरखानाने अर्ज जिले सुबहानी औरंगजेबाला पढून दाखविला.
हातची माळ थांबवून औरंगजेबाने अर्जातील शब्दन् शब्द कान देऊन ऐकला. त्याच्या स्वतःच्याच ध्यानी आले नाही पण तो ऐकताना त्याच्या हातातील माळेचे चार मणी नेहमीसारखे न फिरवता उलटे फिरून गेले होते !!
बाकलेल्या जाफरखानाच्या हातातील राजांच्या अर्जाच्या वळीकडे बघत औरंगजेब शांतपणे म्हणाला, "जाफर, देखो 'सेवा' कितना इनायती है! शाही सूरतके तीन कोट रुपिया हजम करके हमें दो कोट बक्ष दे रह है!!" आणि तो काही तरी पुटपुटत तख्तावरून उठला. दरबार बरखास्त झाला.
संभाजीराजांच्यासह रामसिंग दरबाराबाहेर पडला. सगळे दरबारिये बाहेर पडले. मोकळ्या 'दिवाण-इ-खास' मध्ये फक्त कनोजी धूपाची वळी तेवढी फिरत राहिली! रामसिंग संभाजीराजांना घेऊन राजांच्या तळावर आला. आपल्या डेऱ्यात राजे रामसिंगाची वाट बघत होते. डेऱ्यात त्र्यंबकपंत, रघुनाथपंत, निराजी ही मंडळी होती. रामसिंग आणि संभाजीराजे डेऱ्यात प्रवेशले.
"क्या हुआ रामसिंग हमारे अर्जीका ? " राजांनी रामसिंगाला विचारले. ' कुछ राय नहीं दी आलिजाने आपके अर्जीपर राजासाब. हजरत सोचकर जरूर कुछ करेंगे, आप फिकर मत करना. "रामसिंग किती केले तरी रजपूत होता !
थोडा वेळ थांबून रामसिंग आपल्या माणसांसह आपल्या हवेलीकडे निघून गेला. पाठीवर हात बांधून राजे डेऱ्यातच नजर पायगतीला टाकून विचारांबरोबर फेन्या घेऊ लागले. संभाजीराजे मंचकावर बसून राजांची घालमेल बघताना अस्वस्थ झाले होते.
"रघुनाथपंत, बादशाह कोण चालीचा फैसला करील आमच्या अर्जाचा ?" राजांनी मध्येच थांबून कोरड्यांना विचारले.
"बाळराजांना ठेवून जाण्याचे कलम अर्जात घातले आहे. तेवढ्याचाच काही नतिजा निघेल असे वाटते, स्वामी." कनातीजवळ उभे असलेले रघुनाथपंत म्हणाले. राजांनी ते ऐकताच संभाजीराजांच्याकडे बघितले. त्यांना मासाहेबांचे शब्द आठवले - “प्रसंग पडला तर समयी राज्यासाठी जुनी पिढी खर्ची द्यायची असते. राज्याची स्वप्ने बघायची असतात ती नव्या पिढीत ! "
संभाजीराजांच्या रोखाने राजे वळले. त्यांची समजूत पाडण्याच्या इराद्याने.