कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ६४

 रामसिंगाच्या हवेलीत राजे आणि संभाजीराजे दिवाणी दालनात बैठकीवर बसले होते. समोर चेहन्यावर चिंतेची काजळी चढलेला रामसिंग उभा होता. रामसिंगाच्या चाकरांनी खुशबूदार सरबताचे पेले आणून मेहमानांच्या हातात दिले.


दरबारी राजांना योग्य जागी उभे करण्यात आले होते. खुद मिर्झा राजे जयसिंग आणि ताहिरखान जिथे उभे राहत ती जागा होती ती. हे सारे रामसिंग राजांना पटवून देऊ बघत होता. पण आता बाण सुटला होता.


"भाई, तुम फिक्र मत करना.” राजांनी रामसिंगाला तसल्ली दिली. कधी नव्हे ते 'भाई' हा शब्द रामसिंगाला राजांनी जाणूनबुजून वापरला ! अर्धा घंटा हवेलीवर धांबून राजे आपल्या डेऱ्यात आले.


रामसिंगाने आपला कारभारी गोपीराम मेहता याच्याकडून राजांच्यासाठी सुकी फळफळावळ पाठविली. राजांनी त्याला सरोपा बक्ष केला. रामसिंगाच्या विश्वासातील बल्लूशाह आणि गिरधरलाल राजांच्या भेटीसाठी आले.


बल्लूशाह राजांचे पराक्रम ऐकून त्यांच्यावर खूष होता. तो अदबीने राजांना बादशहाशी दिलजमाई करण्याचा सल्ला देण्यासाठी आला होता. राजे सुखरूप दख्खनेत परतावेत असे त्याला मनापासून वाटत होते. बल्लूशाह आणि गिरधर निघून गेले. चिराखलागणीची वेळ झाली. राजे नेहमीप्रमाणे स्फटिक शिवलिंगाच्या पूजेला बसले. तिकडे लाल किल्ल्यात आपल्या खाजगीच्या महालातील मजलसही औरंगजेबाने बरखास्त केली आणि तो 'मगरीबची नमाज पढायला निघून गेला.

या मजलसीत औरंगजेबाचे खास सरदार जाफरखान, जसवंतसिंग, मुर्तुझाखान, शायिस्ताखान आणि त्याची बहीण जहानआरा यांनी आग्रहाने औरंगजेबाला 'बदतमीज 'सेवाला' कत्ल करण्याचा सल्लाही देऊन टाकला! औरंगजेबाला चीड आली होती ती राजांनी 'खिल्लत' साफ नाकारल्याची. त्यांनी दरबारी कधी न येण्याचा नारा लावण्याची. पण तो बाहेरून शांत होता!


नमाज पढता पढता त्याने दोन गोष्टी स्वतःशी तय करून टाकल्या. 'सेवाला 'दरबारी पेश यायला भाग पाडायचे. खिल्लत पांघरायला लावायची. तसे झाले तर काबूलच्या मोहिमेवर त्याला नामजाद करून टाकायचे! तेथून तो सलामत परतणारच नाही! आणि हे सगळे नाहीच घडले तर तर मुल्लामौलवींच्याकडून सेवाच्या बदतमिजीचा कथला - तय करवून घ्यायचा. ते देतील ती सजा त्याला बहाल करायची! आणि ते कोणती सजा त्याला देतील याबद्दल औरंगजेब निश्चिंत होता !


औरंगजेबाने आग्याचा कोतवाल फौलादखान याला याद फर्मावली. तो परतीतराय नावाचा हरकारा बरोबर घेऊन पेश झाला. औरंगजेबाने त्याला हुक्म सुनावला - " " रामसिंगको बतावो कि सेवा को समझाकर कल दर्बार ले आना।' फौलादखान आणि परतीतराय किल्ल्यावरून रामसिंगाच्या हवेलीवर आले. त्यांनी आपल्या ओलिजाचा हुक्म रामसिंगाला सुनावला. रामसिंग रात्रीची वेळ असताना राजांच्या डेऱ्यात आला. त्यांना घेऊन आपल्या हवेलीत तो परतला. बराच वेळ तो राजांना 'बादशहा सलामतची भेट घेणे किती आवश्यक आहे ते सांगत होता. राजे त्याचा निरोप घेऊन आपल्या डेऱ्यात आले.


सगळ्या आग्रा शहरभर सालगिऱ्याची रोषणाई पेटली होती. यमुनेच्या पात्रावर निरनिराळ्या प्रकारच्या दिव्यांच्या प्रतिबिंबांची बाग उठली होती.


राजांची बराच वेळ वाट बघून संभाजीराजे डेऱ्यातील मंचकावर आडवे झाले होते. त्यांनी काही खाल्ले नव्हते. राजांनाही काही खावेसे वाटत नव्हते.


राजांनी आपल्या डोकीवरचा टोप तबकात उतरून ठेवला. झोपलेल्या संभाजीराजांना बघताना त्यांना जाणवून गेले " यांना नको होतं बरोबर आणायला !'


" जगदंब ! जगदंब !" पुटपुटत राजे संभाजीराजांच्या शेजारी आडवे झाले. ते पितापुत्र काही न खाता यमुनाकिनारी आपल्या डेऱ्यात होते. राजांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता.


लाल किल्ल्यात आणि उभ्या आग्रा शहरात बिर्याणी सागुतीच्या दावती झडत होत्या. दर्बारी झालेल्या प्रकारची चर्चा करताना आग्रेकर म्हणत होते" जो शाहजादा दाराका हुआ, मुराद-सुजाका हुआ वही दख्खनी 'सेवाका' होगा!

दुसऱ्या दिवशी उन्हें कासराभर वर सरकली तरी राजे मंचकावरून उठले नाहीत. त्यांनी त्र्यंबकपंत, रघुनाथपंत, निराजी रावजी या आपल्या माणसांना बोलावून सांगितले, " "आम्हास ज्वर धरला आहे!'


ती बातमी परस्पर रामसिंगाच्या कानावर गेली. त्याला माहीत होते की, 'राजासाबका बुखार बनावटी है.' पण 'तुम्हाला बुखार कसा चढला ?" असे काही तो राजांना विचारू शकत नव्हता! त्याने मनोमन एवढाच अर्थ लावला की, 'शिवाजी आता कोणत्याही कारणासाठी दरबारी जाणार नाही !'. राजांनी रघुनाथपंत कोरड्यांच्याकडून रामसिंगाला निरोप पाठविला, “हम बीमारी से


मजबूर हैं। हमारे फर्जद संभाजीराजाको दरबार ले जाना।' आता मिळेल तो माणूस अक्कलहुषारीने पणाला लावल्याशिवाय राजे आग्यांतून सुटूच शकत नव्हते.


सगळ्यांत मोठे हाल होते रामसिंगाचे! त्याला राजांची सुरक्षितता आणि औरंगजेबाचा विश्वास दोन्ही सांभाळणे भाग होते. सगळ्यांत मोठी कसोटी होती. संभाजीराजांची! ते राजांच्याबरोबर आलेल्या सर्वात कमती उमरीचे होते. परक्या मुलखात होते. आणि आता तर ते सारेच प्राणसंकटात होते.


- आपल्या डेऱ्यात राजे संभाजीराजांना हरभातीच्या सावध सूचना देत होते. "ज्या रस्त्याने दरबारी जाणार आहात तो नीट पारखून ध्यानात ठेवत चला. येताना दुसऱ्या रस्त्याने येण्याची रामसिंगचाच्याला विनंती करा! बादशहाने काही विचारले तर न कचरता जाब द्या. हिंदोस्तानी बोली जमेल तसे बोलत चला. संधी मिळेल त्या असामीची ओळख करून घ्या.'


त्यांना सूचना देताना मध्येच राजे थांबत होते. जिजाऊंचे बोल त्यांना आठवले की मन सुन्न होत होतं, "राज्यासाठी द्यावी लागली तर जुनी पिढी खर्ची द्यायची असते. पुढची स्वप्ने बघायची असतात ती नव्या पिढीने.' "संध्याकाळ होत आली. राजे मंचकावर आडवे झाले. रामसिंग संभाजीराजांना दरबरी नेण्यासाठी आला. झोपलेल्या राजांच्या पायांना आशीर्वादासाठी हात लावून संभाजीराजे म्हणाले, “येतो आम्ही महाराजसाहेब.'


" अं" राजे ठरल्याप्रमाणे कण्हले.


रामसिंग संभाजीराजांना घेऊन दरबारी निघाला. राजांचा सगळा नटलेला सरंजाम संभाजीराजांच्या पाठीशी उभा होता. सजलेल्या पांढऱ्याशुभ्र घोड्यावर संभाजीराजांनी मांड घेतली. रामसिंगाच्या घोड्याला घोडा भिडवून नऊ वर्षे वयाचे संभाजीराजे दिल्ली तख्ताच्या बादशहाच्या भेटीस चालले! एकटे. बाबरपासून औरंगजेबापर्यंत अनेक दरबार भरले होते पण हा असला प्रसंग प्रथमच घडत होता. रामसिंग आणि संभाजीराजे सरंजामासह लाल किल्ल्यात आले.

"दिवाण-इ-खास' चा मगरबी दरबार भरला होता. रामसिंग आपल्या शेजारी अलकाबांच्या लंब्या ललकाऱ्या उठल्या. पाठोपाठ औरंगजेब दरबारात प्रवेशला. ताजीम देण्यासाठी सगळे दरबारिये कमरेत झुकले. संभाजीराजे दूरवर दिसणाऱ्या औरंगजेबाकडे बघत तसेच उभे राहिले. सगळेच झुकल्यामुळे संभाजीराजे उभे आहेत हे कुणाच्याही ध्यानी आले नाही !


वजीर जाफरखानाने सर्वांत प्रथम चौकशी केली ती रामसिंगाची ! रामसिंग संभाजीराजांना घेऊन आसनासमोर पेश झाला. कुर्निससाठी झुकलेल्या रामसिंगावर औरंगजेबाने सवालाचा कोरडा ओढला - 'क्यों रामसिंग, 'सेवा' किधर है ?'

-" जी. हुजूर, उनकी तबियत बिगड गयी है। सख्त बुखार आया है उनको। " रामसिंग झुकूनच बोलला. कोटबंद उच्चासनात औरंगजेबाची मान अर्थपूर्ण डुलली. " उन्होंने अपने फर्जदको भेजा है अलिजा " रामसिंग औरंगजेबाला येऊ बघणारा बुखार सावरण्याची कोशिश करीत म्हणाला.


औरंगजेबाचे टपटपीत डोळे संभाजीराजांवर खिळले. निर्धोकपणे त्याच्या डोळ्यांना डोळे लावीत संभाजीराजे भरल्या दरबारात उभे होते! त्या चार डोळ्यांत कमालीची तफावत होती. त्यातले दोन होते कृतकर्माची धूळ साचलेल्या दर्पणासारखे औरंजेबाचें; आणि दोन होते आतबाहेर स्फटिक साफ संभाजीराजांचे !


संभाजीराजांना बघताच औरंगजेबाचा तिरकस स्वभाव जागा झाला. त्याने विचारले - "क्यों फर्जद संभू, तुम्हें नहीं आय बुखार ? अंगावर काहीही घेण्याची सवय नसलेले संभाजीराजे तळपत्या डोळ्यांनी उत्तरले, नाही ! आम्हास बुखार येत नाही! आमच्यामुळे इतरांस बुखार येतो!" "


"क्या बोला वो ? " औरंगजेबाने भुवया चढवीत रामसिंगाला विचारले.


संभाजीराजे काय बोलले ते रामसिंगालाही नीट कळले नव्हते! पण जाब देणे त्याला भाग होते. तो वाकून म्हणाला, "जी हुजूर. वे बोले- हमें बुखार नहीं है! " "कैसी मासूमी है। जाफर, संभाको नजराना इनायत करो।" औरंगजेबाने वजिराला आज्ञा केली. संभाजीराजांना सरोपा, मोत्याचा कंठा आणि जडावाची कट्यार नजर करण्यात आली.