कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ६३

 राजे आणि संभाजीराजे गेरूच्या रंगाचा लाल किल्ला निरखत चालले. त्यांची घोडी रामसिंगाच्या मोतदारांनी आपल्या ताब्यात घेतली. नजराण्याची तबके घेतलेले मावळे. पाठीशी घेऊन राजे संभाजीराजांच्यासह घुसलखान्याच्या दरबाराच्या रोखाने चालले. या वेळी औरंगजेब घुसलखान्याला लागून असलेल्या पेशाबगारात खापराच्या तुकड्याने 'इस्तिजा' करीत होता!


'इस्तिजा' नंतर हातपाय धुऊन औरंगजेबाने 'वजू' केली. वाळामिश्रित थंडगार पाणी पिऊन तो घुसलखान्याच्या कोटबंद आसनाच्या आवारात प्रवेशला. घुसलखान्याच्या प्रवेशद्वारात येताच रामसिंग थांबला. कमरेत वाकून त्याने राजांना विनंती केली - " जूते यही पर उतार दीजिये राजासाब।'


कपाळाला आठ्या घालीत राजांनी आपल्या भगव्या मोजड्या सगमरवरी फरसबंदीवर उतरल्या. त्यांच्या शेजारी संभाजीराजांनी आपल्या मोजड्या उतरून ठेवल्या. रामसिंगाने आत वजीर जाफरखानाला वर्दी दिली.


जाफरखान सात-आठ हात उचीच्या कोटबंद आवारात आसनावर गर्दीला रेलून बसलेल्या औरंगजेबासमोर पेश झाला. वाकून छातीवर आडवा हात घेत त्याने वर्दी औरंगजेबाच्या कानी घातली, आला हजरत 5, दख्खनसे 'सेवा' भोसला फर्जदके साथ आया है! रामसिंग पेश आनेकी इजाजत मांगता है!" ती वर्दी ऐकताना गिर्दीला रेललेला औरंगजेब पुढे झाला.


 त्याच्या हाताच्या बोटाबरोबर फिरणारे माळेचे मणी क्षणभर थांबले. काही क्षण तसेच गेले. झुकलेल्या वजीर जाफरखानाच्या पाठीवर अत्यंत शांत शब्दांची खिल्लत औरंगजेबाने फेकली. "इजाजत 5 ! एकदा घुसलखान्याच्या दरवाज्याला नजर " देऊन औरंगजेब पुन्हा गिर्दीला रेलला, मर्णी फिरू लागले !


रामसिंगाला सामने ठेवून राजे दरबारात जायला निघाले. पुन्हा रामसिंग थांबला. आपल्या कमरेच्या शेल्यात खुपसलेला, मोगली नकसकामाचा, विणलेला दरबारी रुमाल त्याने अदबीने वाकत तो राजांच्या हाती देत म्हटले, “लीजिये." भुवईला कमानबाक चढवीत राजांनी त्या रुमालाकडे बघत रामसिंगाला विचारले, "ये क्या है ?


" एक दर्बारी रिवाज है राजासाब. नजराना पेश करते वक्त आला हजरतने आपसे कुछ पूछा तो यह रुमाल मुँहपर रखकर जबाब देना राजासाब! ये रिवाज है!' " राजे काहीच बोलले नाहीत. तो रुमाल त्यांनी उजव्या मुठीत आवळला. रामसिंगासह राजे आणि संभाजीराजे घुसलखान्यात प्रवेशले. त्या दरबारात

शायिस्तेखान, बहादूरखान, अमीनखान, शेख मीर, झुल्फिकारखान नजाबतखान, जसवंतसिंग असे औरंगजेबाचे कैक नेक बंदे दाटले होते. उभ्या दरबारात, हिरवे, निळे, जांभळे सगळ्या रंगांचे किमॉश, जामे होते. फक्त राजांच्या आणि संभाजीराजांच्या मस्तकी केशरी टोप होते. ते उठून दिसू लागले. रामसिंगाच्या सोबतीने आसनाजवळ जात राजांनी 'नजर' म्हणून एक हजार सोनमोहरा, दोन हजार रुपये व 'निसार' म्हणून पाच हजार रुपयांची तबके औरंगजेबाला पेश केली. दोघा पितापुत्रांनी शाही रिवाजाचे मुजरे केले.


त्या संपूर्ण दरबारात सर्वांत लहान असे नऊ वर्षे उमरीचे एकटे संभाजीराजेच होते. 'ज्यांची करणी आम दुनियेला दिसते.' असे आबासाहेब ज्याच्याबद्दल नेहमी म्हणत होते तो औरंगजेब संभाजीराजे निरखून बघत होते.


संगमरवरी कोटबंदा आड औरंगजेबाची सारे शरीर झाकून गेले होते. दरबाराला त्याचे फक्त गळ्यापासूनचे वरचे शिर दिसू शकत होते. फक्त शिर ! जे सलामत ठेवण्यासाठी अनेकांची शिरे त्याने धडावेगळी करविली होती. ज्यात असलेला मेंदू चलाखीने चालवून, कुराणाची ढाल समोर धरीत त्याने आपली पीळबाज राजहवस पुरी करून घेतली होती !


संभाजीराजांना वाटले औरंगजेब काहीतरी बोलेल. पण तो काहीच बोलला नाही ! बक्षी आसदखानाने पुढे होत राजे आणि संभाजीराजे यांच्या हातात दरबारी मानाचे पानविडे दिले. रामसिंग मागल्या पावली जाऊन आपल्या अडीच हजारी सरदारांच्या रांगेत उभा राहिला होता. बक्षी आसदखानाने राजांना आणि संभाजीराजांना आणून पंचहजारी सरदारांच्या रांगेत उभे केले. ही रांग आसनापासून कितीतरी मागे होती. खिल्लत वाटपाचे काम सुरू झाले. औरंगजेबाचे शाहजादे, जाफरखान आणि जसवंतसिंग यांना खिल्लती देण्यात आल्या.


खिल्लत घेतलेला जसवंतसिंग मागच्या हटत्या कदमांनी मागे येत राजांच्या समोर उभा राहिला. आता शाही दरबार बरखास्त होणार होता!


" उन्हातान्हातून शेकडो मजला मागे टाकीत आम्ही येथवर का आलो? हा दरबार आहे की मजाक ? हाच आमचा इतमाम ?” पायाच्या नखापासून मस्तकीच्या केसापर्यंत राजांच्या उभ्या अंगात रक्ताची एक अजब वीजलाट सरकून गेली !


" स्वागतासाठी मुन्शी येतो! आसनावर बसलेला अकडबाज औरंगजेब एका अक्षराने वाजपूस करीत नाही! ज्यांच्या पाठीवर आमच्या मावळ्यांनी घोडे फेकले त्यांच्या खांद्यावर खिल्लती चढतात! अपमानाच्या कळा असह्य झालेल्या राजांची/ छाती वरखाली धपधपू लागली. तिला धरून असलेली कवड्यांची माळ लपलपू लागली! कपाळावरच्या उडत्या उभ्या शिरेबरोबर शिवगंधाचे पट्टे खालीवर धडधडू लागले! पोत-पोत झाला राजांच्या उभ्या अंगाचा थरथरता उसळता! जाळता!

घुसलखान्याच्या संगमरवरी भिंतीवर रोमांच उठतील असे खणखणीत बोल राजांच्या तोंडातून बाहेर पडले- " राऽऽ मऽ सिंऽऽच !" दरबारी शांततेला ते जाळीत गेले. राजांची उजवी भुवई घोड्याच्या नालेसारखी वाक घेत वर चढली होती. मान सरळ मागे करून रामसिंगाच्या रांगेवर डोळे चालवीत राजे पुन्हा गर्जले, " राऽऽम सिंऽऽ घ ! "


हाती धरलेला आबासाहेबांचा हात थरथरत एकदम गरम झाला आहे हे संभाजीराजांना जाणवले. त्या बदलत्या स्पर्शाबरोबर न कळणारी सरसरी त्यांच्या अंगी सरकून गेली. ते दोन्ही हात थरथरू लागले. आडवे येणारे सरदार कसेतरी चुकवीत भेदरलेला रामसिंग राजांच्याजवळ आला. समोरच्या पाठमोच्या सरदारांकडे हत करून पेटत्या डोळ्यांच्या राजांनी त्याला


सवाल केला, “ये हमारे सामने कौन खड़ा है रामसिंग ? " " जी वो महाराजा जसवंतसिंग." रामसिंगाला राजांचे काय बिघडले ते कळेना. त्याच्या तोंडाला कोरड पडली.


'जसवंतसिंग ऽ ? हमारे मुल्कसे भागा जसवंतसिंग! इसके पीछे हमें खड़ा किया तुमने ? नहीं! हम ये बर्दाश्त नहीं कर सकते! "


नकळत राजांचा हात संभाजीराजांच्या हातातून निसटला ! आपण कुठे आहोत, कोण आहोत, कसलेच भान राजांना उरले नाही. त्यांच्या कानाची पाळी रसरसून लालेलाल झाली होती. डोळ्यांच्या आत गाजरी रंगाच्या रक्तशिरांचे जाळे उठले होते. थरथरत्या कानांच्या पाळ्यांबरोबर सोनचीकडे थरथरत होते. बाकदार नाकशेंड्यावर टपटपीत घामथेंब तरारले होते! केसरी टोपाखाली राजांच्या मुद्रेवर एक रसरशीत नारिंगी भोसलाई सूर्य उत्तरला होता !


कसलाही विचार न करता राजे सरळ आपल्या रांगेतून बाहेर आले. पेशवाटेवरच्या तलम रुजाम्यावर येताच त्यांनी औरंगजेबाच्या आसनाकडे तडक पाठ केली !


"महाराजसाहेबS!" म्हणत संभाजीराजे थरथरत सरदारांच्या रांगेतून त्यांच्याकडे धावले. राजांचे कान सुन्न-बधिर झाले होते. निमुळते डोळे गरागर फिरवीत फुसफसतं निःश्वासत ते दरवाज्याच्या रोखाने झपाझप पावले टाकू लागले. त्यांना गाठण्यासाठी रामसिंग पाठमोरा उलटा धावू लागला !


कोरड्या तोंडातील टाळ्याला चिकटू बघणारी जीभ रामसिंगाचा जीव घुसमटवीत होती. आसनाकडे पाठ न करता तरातर पाच कदम मागे हटत, पुन्हा राजांच्याकडे बघत कसरत करून रामसिंगाने राजांना कसेतरी गाठले! त्यांचा हात हातात घेऊन तो गदगदा हलवीत दबक्या आवाजात रामसिंग म्हणाला, "सुनिये तो राजासाब! "


" कभी नहीं ऽ!" म्हणत राजांनी त्याचा हात सरळ झिडकारून टाकला! तसे करताना रामसिंगाने त्यांना दिलेला दरबारी रुमाल राजांच्या हातातून सुटला आणि खालच्या तलम रुजाम्यावर पडला.

भेदरलेले संभाजीराजे “महाराजसाहेब ऽ! महाराजसाहेबS!" अशा सादा घालीत राजांच्या मागून पेशवाटेवरून धावत आले. त्यांच्या पायाखाली तो रुमाल सापडून मागे पडला! संभाजीराजांनी राजांचा हात धरला. ते दोघेही पितापुत्र दरबाराबाहेरच्या सदरजोत्यावर आले. क्षणभर थांबले.


मावळमुलखातील पुरंधर, राजगड, प्रतापगड कुठल्याही गडवास्तूला कधीच बघायला मिळाले नव्हते असे विचित्र दृश्य त्या संगमरवरी सदरेला बघायला मिळत होते ! वर राजसंतापाने थरथर कापणारे 'शिवाजीराजे' आणि खाली त्यांचा हात धरून भीतीने थरथर कापणारे 'संभाजीराजे' असे ते विचित्र दृश्य होते !


सदरेच्या बगलेला एक जिन्यासारखा भाग बघताच राजे तिकडे गेले. संभाजीराजांचा हात त्यांनी सोडून दिला. दोन्ही हातांनी डोके गच्च आवळून घेत राजे त्या पायरीवर बसले. त्यातील एका हाताची मूठ वळलेली होती. तीत दरबारी पानविडा होता. फसफसणारा श्वास त्यांचा त्यांनाच जाणवत होता!


दरबारात गडबड मचली होती. जाफरखानाकडून औरंगजेबाला कळले की, 'सेवा खिल्लत के लिये खपा हो गया।' त्याने मुलतिपखान, मुखलिसखान आणि आखिलखान यांना आज्ञा दिली, "सेवाला खिल्लत देऊन शांत करून आत आणा.' ते तिघेही बंदे राजांच्याजवळ आले. त्यांना खिल्लत घेण्याची विनंती करू लागले. त्याने राजे अधिकच भडकले. त्यांनी त्या तिघांना स्पष्ट इन्कार देत सांगितले, "पाहिजे तर तुमचा बादशहा माझा खून करू शकतो. पण मी आता पुन्हा दरबारात मुळीच येणार नाही!"

औरंगजेबाने रामसिंगाला बोलावून त्याला विचारले, “ क्या हुआ रामसिंग ? सेवा


खपा क्यों हो गया ?


"हमारे मुल्क के गरमीसे उनकी तबियत बिघड गई है आला हजरत !" रामसिंगाने राजकारणी उत्तर दिले!


औरंगजेब हसून म्हणाला, " अपने मुकामपर उसे पहुँचा दो ! "


 'जी हुजूर" म्हणत रामसिंग बाहेर आला.


राजांच्या घामेजल्या हाताच्या मुठीत आवळलेला हिरवा पानविडा राजांनी फरसबंदीवर फेकून दिला. संभाजीराजांनी तर तो केव्हाच टाकून दिला होता.. थोडा वेळ जाताच राजांची थरथर थांबली. रामसिंग त्यांना घेऊन तळाकडे जायला निघाला.


"महाराजसाहेब, आपल्या मोजड्या.” संभाजीराजांनी त्यांना आठवण करून दिली! कुणाची वाट न बघता संभाजीराजांनी राजांच्या भगव्या मोजड्या उचलल्या आणि त्यांच्यासमोर आणून ठेवल्या! राजांनी मोजड्यांत पाय भरले.

रामसिंगाच्या मोतद्दारांच्या ताब्यात दिलेली घोडी राजांनी आणि संभाजीराजांनी मांडेखाली घेतली. रामसिंगाच्या सोबतीने सगळा सरंजाम तळाकडे परत चालला. कुणीच काही बोलत नव्हते.


संभाजीराजे झाला प्रसंग आणि राजांचा चेहरा आठवून विचारात पडले होते- 'आई जगदंबा एकदा स्वप्नात आली तेव्हा आबासाहेबांचा चेहरा नेहमीपेक्षा वेगळा झाला होता! आजचा त्यांचा चेहरा तर फारच वेगळा होता! प्रत्यक्ष आऊसाहेबांनी तो बघितला असता तर त्याही भेदरल्या असत्या राजे आणि संभाजीराजे लाल किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पडले. आपल्या मनोऱ्यांचे डोळे करून मुमताजची कबर असलेला ताजमहाल त्यांच्याकडे बघत होता. आज तो धन्य झाला होता. दारा, मुराद, सुजा या प्रत्यक्ष मुमताजच्या मुलांना जे जमले नव्हते, खुद्द शहाजहानला कधी साधले नव्हते, ते करून राजे लाल किल्ल्याबाहेर पडत होते!


औरंगजेबाच्या पन्नासाव्या सालगिराचा रोशन झालेला दिवस सांजावून आल्यामुळे निसूर होत होता !!