कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ५७

 नेहमीसारख्या जिजाऊ सदरकाम आटोपते घेत होत्या. मान मोडून एकलगीने बाळाजी आवजी त्यांच्या शब्दांबरोबर शहामृगपीस चालवीत होते.


जिजाऊंनी शेवटचा खलिता सांगून संपविला. त्या थांबण्याची वाट बघत बाहेर थांबलेले मोरोपंत पेशवे सदरचौकात आले. छातीवरच्या उपरण्याला हात भिडवीत त्यांनी मासाहेबांना मुजरा केला.


काय पंत ? " जिजाऊ त्यांच्याकडे बघत म्हणाल्या. " शृंगारपुराहून एक वेदपारंगत शास्त्री आलेत. केशवभट नावाचे. आईसाहेबांची भेट मागतात. आज्ञा होईल तर. मोरोपंत अदबीने थांबले.


"


" पेश करा त्यांना पंत.'


मोरोपंतांनी सदरदरवाज्याकडे बघितले. त्यांच्या इशाऱ्याची वाट बघत बाहेर खोळंबलेले केशवभट आत आले.


अंजिरी रंगाचा जरीकिनारीचा रुमाल त्यांनी मस्तकाला बांधला होता. तांबड्या काठाच्या धोतरावर लांब बाहीची स्वच्छ बाराबंदी होती. खांद्यावरून छातीकडे येत पाठीशी वळलेला उपरण्याचा वेढा होता. रांगोळीने घासलेल्या पितळी देवमूर्तीसारखे शास्त्रीपणाचे तेज त्यांच्या मुद्रेवर होते.


केशवभटांनी कमरेत वाकत दोन्ही हात जोडून जिजाऊंना नमस्कार केला. आऊसाहेबांना बघण्याची फार दिवसांची त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी आपल्या तेजस्वी डोळ्यांनी जिजाऊंना निरखून पाहिले. " काय योजून येणं केलंत शास्त्रीबुवा ?” जिजाऊंनी केशवभटांच्याकडे बघत शांतपणे विचारले. त्या प्रश्नाने केशवभट पुन्हा कमरेत वाकले. म्हणाले, “थोडंसं शास्त्र जाणतो.


"रामायण, महाभारत, वेद-उपनिषद पायीच्या सेवेचा योग येईल तर. "छान! आम्ही अशा आसामीच्या शोधातच आहोत. मोरोपंत, यांना आमच्या महाली पेश करा.. जगदंब !” जिजाऊंची चर्या प्रसन्न दिसत होती. त्या बैठकीवरून उठल्या. आपल्या महालाच्या रोखाने चालू लागल्या.


त्यांच्याकडे बघितले तर कुणालाही कळले असते की कसले तरी विचार त्यांच्या बरोबर चालत असावेत. पण ते राजांचे नव्हते. संभाजीराजांचे नव्हते. राजांच्या राणीवशाचे तर नव्हतेच. राज्याचेही नव्हते. जिजाऊ विचार करीत होत्या आपल्या नारासूरवाईचा ! येसूबाईचा !


संभाजीराजांचे लग्न झाले आणि पिवळ्या अंगाने येसूबाई पिलाजीरावांच्या बरोबर शृंगारपूरला गेल्या होत्या. जाणतेपणीच त्या माहेरीच राहणार होत्या. ते माहीत असूनही जिजाबाई स्वत:शी म्हणाल्या, "फार दिवस झाले. पोर डोळ्यांआड राहिली. एकदा बलावू धाडलं पाहिजे!"


पन्हाळाप्रांताहून निघालेला बहिर्जी नाईक चिराखलागणीच्या वेळेला राजगड चढून आला. बाले किल्ल्यावर येऊन त्याने जिजाऊसाहेबांना आपण आल्याची वर्दी पाठविली. त्या वेळी जिजाऊंच्या महाली मोरोपंत आणि केशवभट उभे होते. जिजाऊ संभाजीराजांच्यासह मंचकावर बसल्या होत्या.


केशवभटांची आस्थेने विचारपूस केल्यावर जिजाऊंनी त्यांना, संभाजीराजांना रामायण-महाभारत सांगण्याची मोलाची कामगिरी जोडून दिली. बहिर्जी आल्याची वर्दी मिळाल्यामुळे जिजाऊंनी मोरोपंत आणि केशवभट यांना निरोप दिला. रामोशी वेषातील दूरची धावणी घेतलेला दमगीर बहिर्जी महालात आला. जोहार घालून त्याने मासाहेबांकडे बघितले. "कोण मामल्याची खबर ? बोला नाईक." विचारांचा गोंधळ उडाल्यामुळे घोटाळलेल्या बहिर्जीला जिजाऊंनी धीर दिला.

" इज्यापूरला लई जोराचा जंग झाला. धन्यास्नी आन् रजपुताला शर्जाखानाम्होरं शिकस्त घ्याया लागली. '


"ते कानी आलंय आमच्या. विजापूरच्या सरलष्कर सर्जाखानानं पहाडाचं काळीज दाखविलं. एकेकाळी त्यानं चालून आलेल्या रजपूत, दिलेर, नेताजी आणि राजे या चार सेनापतींना निकरानं भांडून शिकस्त दिली. फार इमानाचा आणि ताकदीचा असला पाहिजे सर्जाखान राजे विजापूर सोडून पन्हाळ्याकडं कूच झाल्याचं आम्ही ऐकून आहोत. काय झालं पन्हाळ्याचं ?"


"जी. कंदी घडायचं न्हाई असं घडलं पन्हाळ्यावं आईसाहेब... आपला हजार पाऊलोक पन्हाळ्याच्या छाप्यात कामी आला! गड काई हाताला लागला नाई. " बहिर्जनि मान खाली घातली. " मतलब ?” संभाजीराजांच्या कपाळी आठ्या चढल्या. सारे अंग ताठरले. हजार लोक एका छाप्यात खर्ची पडले होते!


" इज्यापूर सोडताना धन्यांनी फौजच्या दोन फळ्या केल्या. एक सरलस्करांच्या दिमतीला दिली. दुसरी संगं घेऊन खासं राजं कालच्या षष्ठीला पन्हाळगडाला मध्यरातीचं भिडलं. नेताजीस्नी त्येनी षष्ठीची रात नेमून दिल्याली हुती. पर नेताजी वक्ताला गडाच्या पायथ्याला भिडलं न्हाईत! वाट बघून राजे हैरान झालं. रात टळतीला यायला लागली म्हून आपली फौज पिऊन गड चडाय लागलं पर गडकन्याला सासूद लागल्याला हुता. धुकटलेल्या तटाभवत्यानं आपलं धारकरी घेऊन त्यो दव्यानं बसला हुता. राजं टप्प्यात येताच त्यो मोहऱ्यानं चालून आला. चान्न्यात हत्यारमार झाली! हजार माणूस उतरंडीला पडला! गर्दी करून राजं उरलेल्या लोकांनिशी विशाळगडाकडं सरकलं. ' "


" मग राजे आता विशाळगडी आहेत तर आणि आमचे सरलष्कर कुठं आहेत ?" जिजाबाईंना नेताजींचा करिणा काय ते कळेना. "न्हाई मासाब, राजं फोंड्याच्या रोखानं कोकणात उतरल्यात. आनू...


बहिर्जीचा साद कातरला. नजर जिजाऊंच्या आणि बाळधन्याच्या पायांवर पडली. " आणि काय नाईक ?" जिजाऊंना आणि कुणी कामी तर आले नाही ना अशी शंका आली.


"कसं सांगावं मासाब! अशी खबर सांगण्यापरास जीब झडल्याली ब्येस.'


" नाईक, जीभ झडली तरी सत्य झाकून राहणार थोडंच ? बोला.” जिजाऊंनी बहिर्जीला जखडून टाकला.


" विशालगडावयनं राजांनी सरलस्करास्नी खलिता धाडला. 'सरलस्कर असून समयास कैसे पावला नाहीत ? दाखल होण्यास दिरंग केला. सबब तुम्हास बरतर्फ करतो 'आहोत' असा हुकूम दिला. त्यो वाचून नेताजी बिधारले. राजांच्यावर रागं झालं.

राजांनी पारखं होऊन इज्यापूरच्या दरबाराला फौजासुद्धा जाऊन मिळाले!!” मुंडासे डुलवून बहिर्जी गद्गदल्या सुरात बोलला.


जिजाबाई डोळे ताणून बहिर्जीच्या धुळकटलेल्या मुंडाशाकडे बघतच राहिल्या. बहिर्जीच्या अंगावरच्या घोंगडी काचोळ्यांकडे संभाजीराजे रोखून बघत होते. त्यांच्या कानांत भरदार मिश्यांच्या, धोराड, तिधारी पगडीच्या 'नेताजीकाकांनी ' रजपुताच्या गोटात सांगितलेले शब्द घुमू लागले " मानूस जिथं उपाजतं ती जागा - मानसाला साद घालती बाळधनी !!'


संभाजीराजांना वाटले- "बहिर्जीच्या अंगावरचं घोंगडी काचोळं मोठमोठं होत आहे! ते भलं मोठं काचोळं आपल्या हातात घेऊन 'नेताजीकाकांनी ' ते जाळ्यासारखं फेकून सगळा पुरंधरकिल्ला त्यानं पार झाकून टाकला आहे!!" त्या काचोळ्याखाली त्यांचेच शब्द गुदमरून तडफडताहेत "माणूस जिथं उपाजतं ती जागा मानसाला साद घालती बाळघनी !!”


इकडे आम्यात संगमरवरी सफेद चिन्यांचा ताजमहाल असाच गुदमरून तडफडत होता! लाल किल्ल्यावरच्या मुसामाँ बुरुजालगतच्या मनोऱ्यातील शहाजहानची सात वर्षांची कैद संपली होती !


"ऐ अल्लाताल, मेरी आगेवाले जहानकी हालत अच्छी कर. मुझे जहन्नमके दर्दे आगसे बचा ले" अशी खुदाला कळवळून प्रार्थना करीत शहाजहानने आम्याच्या लाल किल्ल्यात शेवटची साँस टाकली. ही सारी उत्तरी वार्ता वाऱ्याबरोबर दक्षिणेकडे येऊन पोहोचली होती. ऐकणारे विस्मित होत होते..


शहाजहानची मुलगी जहानआरा बेगमा अकबराबादी महल आणि फत्तेपुरी महल त्याच्या बुढ्या, आंधळ्या आणि फाकळलेल्या निस्तेज प्रेतावर कोसळून फुटफुटून रडल्या.


शहाजहानचे सुरकुतलेले, म्हातारे, गोरे अंग फाकळून निघाले होते..


औरंगजेबाने त्याच्या खास विश्वासातल्या तबिवाला फितवून औषधी म्हणून विषारी तेलाने त्याच्याकरवी शहाजहानला मालिश करवून घेतले होते! आपल्या बापाच्या मनाचा झाला तो दाह कमी वाटला म्हणून की काय औरंगजेबाने त्याच्या शरीराचाही आगडोंब पेटवून दिला होता !


'वृंदावन' या एका हिंदू वैद्याच्या औषधींनी शहाजहान त्या 'मालिशच्या मुसीबतीतून' कसातरी बचावला होता! पण त्याचे अंग फाकळून निघाले होते. त्यातून हाय खाल्लेला शहाजहान पुन्हा कधी उठलाच नाही.