समोर त्यांना काळवंडलेला पुरंधर दिसत होता. त्यांच्या काना-मनात राजांचे धीरगंभीर शब्द घुमत होते "औरंगजेब दिल्लीचा बादशहा आहे. त्यांच्या सरदाराखेरीज तो कुणालाच दिसत नाही त्याची करणी मात्र आम दुनियेला दिसते ! त्याच्या भावांना दिसली. खुद्द त्याच्या बापाला दिसली!.. "
• भुयारं कधीच संपत नसतात बाळराजे! चाल कधीच थांबत नसते!' मासाहेबांची तुळजाई बोली त्यांना आपल्या पाठवळीवरून हातासारखी फिरत असल्याचा भास झाला "अशा वाटा चालताना मागं कधीच नसतं बघायचं! - ... कुणास ठाऊक. प्रसंग पडला तर तुम्हांस आणि आम्हासही ती कोशिस करणं पडेल! जळत्या हुडव्यात हात घालणं पडेल! "
संभाजीराजांच्या सुत्र झालेल्या कानांना घुमणाऱ्या संबळीची तडतड ऐकू येऊ लागली. तुणतुण्याची टणटण त्यात मिसळली होती. एक गोंधळी कानावर हात ठेवून जगदंबेचा महिमा गाताना त्यांना क्षणभर दिसला-
" उदर परडी देऊन हाती
ब्रह्मांडी फिरवी- लक्ष चौऱ्याऐशी घरची भिक्षा " मागविली बरवी !!
स्वतःलाच पाठीवरून वाहून आणल्यासारखे संभाजीराजे मिर्झा राजाच्या सोबतीने फर्मानबाडीत आले. बाडीच्या चारी बाजवा खुल्या होत्या. सगळा तळ तो 'नजारा ' बघण्यासाठी वाडीभोवती दाटला होता. पावसाळा नुकताच संपल्याने पायतळीची जमीन ओलसर होती. वाजतगाजत सांडणीस्वार फर्मानवाडीत आला.
तसलीम करून संभाजीराजांनी उंटाच्या बगलेला ओलसर भुईवर आपले गुडघे टेकले. मान खाली टाकली.
सांडणीस्वाराने धुळीने माखलेला शाही फर्मानाचा पिस्ताई रंगाचा उंट बसता केला. हातातील फर्मानाच्या वळीची फासबंद थैली स्वाराने वर उचलली. एखाद्या फकिराने बंद्याच्या शिरावर मोरपिसाचा जुडगा ज्या टेचात ठेवावा तशी ती थैली त्याने संभाजीराजांच्या केशरी टोपावर ठेवली! चढी आबाजी लावून त्याने शिरा फुगवीत सरावाची खड़ी ललकारी दिली -
" अबुल मुझफ्फर मोईउद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादूर अलमगीर पादशहा गाझी ऽ ऽ, मालिके तख्ते ताऊस, शहेनशाहे हिंदोस्ताँसे फमनि दर्बार संभूजी विन सेवाजी भोसला सुभे दख्खनको रजामंदी से बक्षऽऽ! अदब-अदब ! " स्वाराच्या तोंडातून दरबारी शब्दांच्या लाह्या फुटत होत्या. तळावरच्या तोफा अंगाला झटके देत वारांचे आवाज उठवू लागल्या.
खाली मान घातलेल्या संभाजीराजांच्या सूर्यपट डोळ्यांतून सरसरत ओघळलेले पाणमोती कवड्यांच्या माळेवरून निसटून खालच्या ओल्या जमिनीवर उतरू लागले !
त्यांच्या छातीचा भाता कोंडला होता. भवानीचा भंडारा सांडला होता! त्यांच्या कोवळ्या नियतीने क्रूर खेळ मांडला होता! त्यांना वाटत होते, उशी घेणाऱ्या घोड्यासारखे ताडकन् वर उडावे. मस्तकावरची थैली सरळ धुळीत फेकून द्यावी आणि वाट फुटेल तिकडे घोडगढ़ीने धावत सुटावे.
"उठिये कुँवर " मिझनि वाकून त्यांच्या पाठीवर हात ठेवला. फर्मानासह त्यांना तसेच दहा कदम मागे हटते घेतले. संभाजीराजांनी मान वर उठवून फर्मान नेताजींच्या हाती दिले. त्यांच्याकडे बघताना नेताजींना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला ! एवढ्या अवधीत बाळराजांची नजर केवढी दुखरी झाली होती! ती बघताना नेताजींची मान आपोआप खाली गेली. आणि त्या खाली गेलेल्या मानेबरोबर, चारा मावळांचा रानवारा पिणारे 'हर हर महादेव' चा जोष उठविताना इंगळासारखे पेटून उठणारे नेताजींचे डोळे क्षणात पाणथरून आले. त्यांना आपल्या 'धाकल्या राजाच्या ' पांढया सफेद जाम्यावर गुडघे टेकल्यामुळे उठलेले मातीचे डाग दिसत होते! ते डाग जामा घुतला तरी कधीच जाणार नव्हते !!
मिर्झा राजाची पाठीवरची भुणभुण आता कमी झाली आहे या भरोशाने राजे सैन्यासह तळकोकणात गेले होते. त्यांना जाऊन पाच दिवस मागे हटले होते. जिजाऊसाहेब सदरेवरचे निवाड्याचे आणि खलित्याचे मजकूर मायने सांगण्याचे काम आटोपते घेत होत्या. त्यांचे मन आताशा कशातच लागत नव्हते.
"बाळाजी, थांबू या आता. येतो आम्ही.” जिजाऊ सदरबैठकीवरून उठत चिटणिसांना म्हणाल्या. चिराखलागणीची वेळ होत आली होती. "जशी आज्ञा म्हणत बराच वेळ कुरुकुरु चालविलेले सफेद शहामृगनीस बाळाजींनी कलमदानात हलकेच ठेवले. ते लगबगीने उठून उभे राहिले.
तिकडे जिजाऊंच्या खासेमहालात नित्याप्रमाणे त्यांना दिवट्यांचे सलाम देण्यासाठी लक्ष्मीबाई, पुतळाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, काशीबाई असा जवळ जवळ सारा राणीवसा जमला होता. पुतळाबाईंच्या शेजारी संभाजीराजे उभे होते. त्यांच्या तर्फेने सखूबाई, राणूबाई, अंबाबाई अशा त्यांच्या बहिणी उभ्या होत्या. सारीजण जिजाऊंची वाट बघत होती. इतक्यात बुट्ट्याचा काळाशार शालू नेसलेल्या गौरवर्णी सोयराबाई तोलत्या धिम्या पावलांनी आपली कन्या बाळीबाईसह त्या महालात प्रवेशल्या. त्यांच्या मागे त्यांची खास दासी चंद्रा आणि दोन चार कुणबिणी होत्या. त्यांना बघताच सगळ्या राणीवशाने आपले 'उभे राहणे' झटकन् सावरले !
संभाजीराजांनी कमरेत वाकून त्यांना 'तिपेडी' अदबमुजरा केला.
सोयराबाई सिधे चालत पुतळाबाईंच्या जवळ आल्या. पुतळाबाईंची मान अदबीने खाली गेली होती. नजर सोयराबाईच्या पायांवर खिळली.
होती. त्या गोऱ्यापान पायांवरच्या कोरलेल्या आळत्याच्या नक्षीत क्षणात पुतळाबाईंचे आपले बिब्बेवाणाचे डोळे संभाजीराजांच्यावर जोडून त्यांच्या खांद्यांवर हात ठेवीत सोयराबाई पुतळाबाईंच्याकडे न बघताच म्हणाल्या, “बाकी धाकल्या बाई, फर्मानाची बाब बाळराजांच्यावर निभावली म्हणून निभावली! खुद्द स्वारींनाच फर्मान घेणें पडले असते तर कोण बेअदबी झाली असती साऱ्यांची! आमचे बाळराजे हुषारीचे, कुठलीच कसूर त्यांनी नाही केली ! '
टाकली मान वर उठवून पुतळाबाईंनी एकवार सोयराबाईच्याकडे बघितले. पायांवरची आळत्याची नक्षी त्यांच्या डोळ्यांत दिसल्यासारखे पुतळाबाईंना वाटले! या म्हणत संभाजीराजांनी सोयराबाईंच्याजवळ उभ्या असलेल्या बाळीबाईंना हाताला धरून आपल्याजवळ घेतले.
"कोण प्रकारचं खलबत चाललं आहे बाळराजे थोरल्या बाईंशी ?" असे हसून म्हणत जिजाबाई महालात आल्या. त्यांच्या येण्याने महालाला जणू सुगंधी भरलेपण मिळाले! कुणी काही बोलण्याच्या आत सोयराबाई पदर सावरीत बोलून गेल्या, "नाही, आम्हीच म्हणत होतो बाळराजांना... सोयराबाईच्या नाकाचा मुळात लालसर असलेला शेंडा लालावून आला.
मंचकावर शांत बैठक घेत जिजाऊंनी त्यांना विचारले, "काय म्हणत होतात ? " . की उमर लहान असताना त्यांना फर्मान घेणं पडलं !! त्यांनी म्हणूनच हुषारीनं ते निभावलं ! " ते ऐकताना राणीवशातील सगळ्या राण्या एकमेकींच्या तोंडाकडे बघतच राहिल्या! सोयराबाईंनी नक्षी क्षणात पालटून टाकली होती !
जिजाबाईंना, संभाजीराजांना, राणीवशाला कुणालाच राजगडावर कल्पना नव्हती की राजे तळकोकणात नव्हते! ते मिर्झा राजाच्या गोटात, त्यांच्यासाठी दिलेल्या शामियान्यात, पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखे अस्वस्थ फेन्या घेत होते.
मिर्झा राजाने तळकोकणात तातडीचे पत्र धाडून राजांना कन्हेपठारावर आपल्या तळात बोलावून घेतले होते. राजांना कल्पना नसताना मिझनि खुद्द त्यांच्या नावाचे 'बफादारी' जाहीर करणारे पत्र परस्पर औरंगजेबाला पाठविले होते. औरंगजेबाने तातडीने खुद्द राजांच्या नावे 'फर्मान' पाठविले होते! तळकोकणातून राजे तातडीने मिर्झाच्या गोटात आले होते. आणि छातीवर सह्याद्री ठेवून राजांनी बक्षी जानी बेगच्या 'शाही रिवाजाप्रमाणे' आज फर्मान स्वीकारले होते !!
फर्मानाच्या उंटाजवळ गुडघे टेकून 'शाहीथैली' खालच्या मानेने टोपावर घेताना राजांना संभाजीराजांनी सांगितलेला कढ आठवला होता. " जनावरासमोर गुडघे टेकून फर्मान घेताना जाम्यावर डाग पडतात! ते जाता जात नाहीत!"
फर्मान घेऊन आलेले राजे त्या आठवणीने हैराण झाले होते. एकसारखे अस्वस्थ फेन्या शामियान्यात घेत होते. एकाएकी ते थांबले. त्यांच्या मनात विचार उठला - "शंभूराजे, फर्मान झेऊन तुम्ही आमच्या भेटीस आला. काही न बोलता आम्ही तुम्हाला पोटशी घेतलं. आज आम्हीही फर्मान घेऊन आलो. पण पण आम्हाला पोटाशी घेणारं इथं कुणीच नाही !!”
परंतु आपले राजेपण मिर्झाच्या तळावर धुळीत टाकून राजांनी आणि संभाजीराजांनी आपल्या लोकांना जगण्याचा धीर दिला होता ! दुर्बलांच्या हक्काचे संरक्षण करणे हेच खरे 'राजेपण'! राजांनी ते पाळले होते. फार फार मोठी किंमत देऊन!
मिर्झा राजाच्या हिशेबी शिवाजीराजांचे 'श्रीचे राज्य' आता निकालात निघाले होते. • सगळा राजस्थानी चिवटपणा पणाला लावून 'शिवाजी आणि संभाजी' हे दख्खनी मावळमणी त्याने उचलले होते. आपल्या निष्ठावंत हातांनी औरंगजेबाच्या जपाच्या तसबीहच्या माळेत ते गुंफण्यात आपण फत्ते घेतली या समाधानात मिर्झा राजे होता ! आता त्याची रेगिस्तानी पिंगट नजर विजापुराकडे आदिलशाहीच्या रोखाने वळली! तो पुरा दख्खन पायाखाली रगडायला आला होता.
मिर्झा राजाने आपला खास हेजिब राजगडावर पाटवून राजांना आपल्या फौजेनिशी पुरंधराच्या तळावर दाखल होण्याचा निरोप पाठविला ! विजापुरावर चालून जाऊन शाही चाकरी बजावण्यासाठी! त्यासाठी राजांना त्याने आपल्या तहात बांधून घेतले होते. राजे रजपुताबरोबर विजापूरच्या रोखाने गेल्याला दोन महिने लोटले.