कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ५८

 " मला नरकाच्या आगीपासून वाचव" म्हणून खुदाला बिनविणान्या शहाजहानला तशी संधी औरंगजेबाने ठेवलीच नव्हती! हरप्रकारच्या नरकयातना शहाजहानने कैदेतच भोगलेल्या होत्या. इमानी कुत्र्यासारख्या असलेल्या मुतमद नावाच्या आपल्या खोजाच्या हवाली औरंगजेबाने आपल्या बापाला सुपूर्द केले होते !


शहाजहानच्या आसवाबखान्याचा दरोगा ख्वाजा मामूर मेला तेव्हा मुतमदने आसवाबखान्याला चक्क मोहरा ठोकल्या ! दुसरा दारोगा नेमला जाईपर्यंत, दिवसाला पाचपंचवीस जामे बदलणाऱ्या शहाजहानने अंगावरच्या एकाच जाम्यावर दिवस काढले! या सगळ्यावर कही केली होती औरंगजेबाने दारा शिकोहच्या जनानखान्यातील, शहाजहानच्या आसऱ्याला असलेल्या गायिका, गणिका त्याने दिल्लीला आपल्या जनानखान्यासाठी पाठवून द्या असे पत्र आंधळ्या आब्बाजानला लिहिले होते ! हे सगळे भोगून शहाजहानने एका संध्याकाळी आपला देह लाल किल्ल्यात ठेवला. हे सारे अघटित, नवीन होते.


ताजमहालाचा आरसपानी चिरान् चिरा कसा रेखीवपणे एकमेकावर उभा होता. पण - पण त्याच्या निर्मात्याचा खुद्द शहाजहानच्या शरीराचा चिरान् चिरा फाकळून निघाला होता !! तो शांतपणे चंदनी शवपेटीत तसाच विश्रांती घेत होता !! शहेनशहाची काय आणि साध्या हशमाची काय हयातीची बाकी शेवटी शून्यच असते !!


फोंड्याहून माघार घेतलेले शिवाजीराजे मिर्झा राजाला विजापूरजवळच्या गोटात भेटून राजगडावर आले. या भेटीत मिर्झाने राजांच्या गळ्यात सगळ्यांत मोठा खोडा टाकला होता. औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे निमित्त करून त्याने राजांना संभाजीराजांच्यासह आग्रा दरबारात पेश करण्याचा सल्ला दिला !


हे वरचे कारण होते. मनातून मिर्झा चरकला होता. विजापूरला कुतुबशाहीने पन्नास हजार घोडदळाची मदत केली होती. राजांचा उजवा हात नेताजी फुटून विजापूरला मिळाला होता. त्यात खुद्द राजेच विजापूरला सामील झाले तर आपली धडगत नाही या शंकेने मिर्झाने औरंगजेबाला पत्रे पाठविली. शिवाजीराजांना शंभूराजांच्यासह आग्रा दरबारी बोलावून घेण्याचा मनसुबा बनवून आणला.


"आला हजरत औरंगजेब रजामंद झाला तर राजांना त्या दरबारात दख्खनची सुभेदारी देईल' असा मिर्झाचा अंदाज होता. काही दिवस पडती घेऊन ती स्वीकारणे याशिवाय राजांना तूर्त मार्ग उरला नव्हता. काही चांगले हाताशी लागेपर्यंत, हातात असलेले कमी चांगले न सोडणे हे राजकारणात शहाणपणाचे ठरते! राजांनी दरबारी जायचे मान्य केले होते. आम्याला जाण्यापूर्वी सरलष्करपदाची मोकळी जागा योग्य असामीच्या हवाली करणे भाग होते. त्यासाठी राजांनी सदर बोलावली. सदरेत जाण्यापूर्वी राजांकडे संभाजीराजांनी भीतभीत नेताजींबद्दल चौकशी केली. आबासाहेबांनी असा निर्णय तडकाफडकी का व कसा घेतला याबद्दल संभाजीराजे हैराण होते.

राजांनी दिलेले उत्तर शंभूराजांना नीट आकलन करता आले नाही. फारसे पटलेही नाही. राजे म्हणाले होते, " ही फौजी शिस्त आहे. योग्य वेळी ध्यानी येईल. " भरल्या सदरेत राजे संभाजीराजांना घेऊन दाखल झाले. रिवाजाप्रमाणे भंडाऱ्याची परडी सदर बैठकीत फिरली.


मुजुमदार निळोपंत, सरलष्करपदाचा पेहराव, लाल कंगणी पगडी, जरीनक्षीच्या म्यानाची तलवार असा साज असलेली सरपोसांनी झाकलेली तबके जोत्यावर सिद्ध ठेवून राजांच्या उजव्या तर्फेला उभे राहिले. नेताजींच्या कडू आठवणींची इंगळी राजांच्या काळजाला क्षणभर डसून गेली. सदरेत भयाण शांतता होती. "मंडळी, आम्ही बादशहाच्या भेटीला उत्तरेत जाणार आहोत!” राजांना एवढेच बोलताना भरून आल्यासारखे झाले. स्वतःला सावरून ते एकलगीने म्हणाले, 'रिती पडलेली सरलष्करपणाची जिम्मेदारी आम्ही कुडतोजी गुजरांच्या खांद्यावर टाकण्याचे योजले आहे. कुडतोजी, असे सामने या."


कुडतोजी राजांच्या बैठकीसमोर आले. अदब मुजरा करून सावरत्या अंगाने उभे राहिले. राजे बैठकीवरून उठले. निळोपंतांनी पेश केलेल्या तबकातील शेला, चोळणा त्यांनी कुडतोजींच्या खांद्यावर चढविला. त्यांच्या कमरेला तलवारीचे बंद आवळले. कुडतोजींनी आपल्या डोकीवरची पगडी काढून हाती घेतली. राजांनी तुरेबाज लाल कंगणी पगडी उचलून ती कुडतोजींच्या मस्तकावर चढविली. सदरेकडे बघत राजे म्हणाले, "आजपासून कुडतोजी गुजर... आमच्या फौजेचे सरलष्कर ! आम्ही त्यास 'प्रतापराव' ही खिताबत बहाल करतो आहोत.” राजांनी कुडतोजींना ऊरभेट दिली. ती घेतांना ना कुडतोजींना ना एकाही संदरकऱ्याला कळले की राजांच्या उरात कसले कह दाटून आले आहेत. त्यांनी "कुडतोजी, आमच्या फौजेचे सरलष्कर" असे थांबून म्हटले होते. "श्रींच्या राज्याचे सरलष्कर " असे म्हटले नव्हते!


राजांचा शब्दन् शब्द कान देऊन ऐकण्याचा सराव झालेल्या संभाजीराजांना मात्र ते जाणवले. बैठकीवर बसल्या बसल्या ते कुडतोजींच्या डोक्यावरील, कंगणी पगडीतील 'तुयाकडे बघत राहिले. त्यांच्या मनात विचारांचा तुरा डुलला - "नेताजीकाका झाले तसे तुम्ही आमच्या महाराजसाहेबांना पारखे होऊ नका ! त्यांच्या मनावेगळी गोष्ट करू नका!"


सदर उठली. सदरकरी चौकाबाहेर पडू लागले. त्या सगळ्या सदरेला कल्पना नव्हती की औरंगजेब दिल्लीहून आम्यात आला होता. आपल्या मृत बापासाठी जियारत पढायला !