कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ५३

 संभाजीराजे आपल्या महाराजसाहेबांचा विचार करीत होते. रजपुताच्या गोटाला जाताना त्यांनी आपल्या हातांनी गळ्यात चढविलेल्या माळेवरून मधूनच हात फिरवीत होते. याच भुयारात आबासाहेबांनी सांगितलेले, कान भरून टाकणारे घुमते बोल त्यांना एकाएकी आठवले - “ भुयारं कधीच संपत नसतात ऽऽ! चाल कधीच थांबत नसते ss !" चालते संभाजीराजे त्या आठवणीने एकदम थांबले. सगळीच मंडळी त्यांच्याबरोबर थांबली. भुयाराच्या दगडबंद घुमटावर संभाजीराजांची नजर गरगर फिरत होती. ते एकाएकी असे का थांबले कुणालाच कळले नाही.


" काय झालं शंभूबाळ ? " त्यांच्या खांद्यावर मायेचा हात ठेवीत जिजाऊंनी सासूद घेत विचारले. जिजाऊंचा तो आवाज दगडबंद भुयारात घुमला. " काय झालं शंभूबाळ ? " "


तो कानभर ऐकताना संभाजीराजे थरकून उठले. असे असेच घुमले होते आबासाहेबांचे बोल. न राहवून जिजाऊंकडे बघत त्यांनी उत्तर दिले, "काही नाही आऊसाहेब. आम्ही बघतो आहोत भुयार किती मागं पडलं ते!"


क्षणभर जिजाऊ त्यांच्याकडे बघतच राहिल्या. मग त्यांचा खांद थोपटीत म्हणाल्या " अशा वाटा चालताना पाठमाग किती मागं पडला ते नसतं बघायचं! त्यानं मग दमगीर होतं. किती पायमाग मागं टाकायचा आहे यावरच आणि पुढं नजर द्यायची. त्यानं मन हिंमतबंद होतं. चला.” जिजाऊंचे तुळजाई बोल भुयाराच्या कणाकणाला जागवीत परतत होते! ते कानभरून ऐकताना संभाजीराजांना जाणवून गेले. जे आबासाहेब म्हणाले होते ते आणि आत्ता आऊसाहेब म्हणताहेत ते एकच आहे ! तेगीची धार पात्याच्या दोन्ही बाजूंना सारखीच असते तसे!


बालेकिल्ला चढून येताच बिजाऊ, संभाजीराजे, नेताजी थेट राजांच्या महालाकडे चालले. राजांना वर्दी पोच झाली होती.


जिजाऊंच्यासाठी राजे मनातले सगळे कढ, सल विसरून महालाच्या दारापर्यंत सामोरे आले होते. आपले महाराजसाहेब नजरेत येताच टाच भरलेल्या जनावरासारखे संभाजीराजे धावत सुटले. आणि क्षणात त्यांच्या हातांचा वेढा राजांच्या कमरेभोवती पडला.


राजांना काहीच बोलवत नव्हते. त्यांच्या हाताची सडक बोटे संभाजीराजांच्या पाठीवरून फिरू लागली. एकदम राजांच्यापासून थोडेसे दूर होत संभाजीराजांनी त्यांच्या पायीच्या बाकदार मोजड्यांवर नजर ठेवली. आपल्या गळ्यातील चौसष्ट कवड्यांची माळ टोप चुकवीत उतरून ओंजळीत घेतली आणि ओंजळ वर उचलून ते म्हणाले, " महाराजसाहेब आम्ही कमी बोललो. जरूर तेव्हाच बोललो! "


राजांनी त्यांच्या ओंजळीतील माळ उचलून ती आपल्या गळ्यात घातली. राजांचा ऊरताण कुठच्या कुठं निघून गेला. संभाजीराजांनी त्यांच्या पायावर डोके टेकले.


"जा, आईचं दर्शन करून या." देवमहालाच्या रोखाने हात करीत राजे म्हणाले. जिजाऊसाहेब आणि संभाजीराजे गडाच्या देवमहालाच्या रोखाने चालू लागले. गडाच्या हर कारखान्यातील माणसे काहीतरी लटके निमित्त काढून तेथवर येत होती. संभाजीराजांना डोळाभर बघून, मुजरा करीत होती.

राणीवशाचे महाल जवळ आले. पुतळाबाईच्या महालाच्या रोखाने धाराऊ पुढे आली. जिजाऊंना बघून क्षणभर ती घोटाळली. पण निर्धाराने पुढे होत संभाजीराजांच्या पुढ्यात आली. तिने काळसर रंगाची काहीतरी वस्तू संभाजीराजांच्या टोपापासून पायापर्यंत तीन वेळा उतरली. तिला बघताच हसून संभाजीराजांनी तिच्या पायांना हात लावून नमस्कार केला. धाराऊ लगबगीने भिंतीच्या कडेकडेला होत दिसेनाशी झाली. संभाजीराजे देवमहालात आले. जगदंबेसमोर त्यांनी आपले डोके टेकले.


त्या वेळी. इकडे धाराऊने आपल्या गोंदल्या हाताने पाय बांधलेले काळे कोंबडे काही तरी पुटपुटत तटावर फेकून दिले!! भिरभिरले कोंबडे कसेतरी केकाटले! धाराऊने आपल्या हाताची बोटे तटाच्या घडीव दगडावर रुतवून काटकन मोडली! डावा पाय दाणकन भुईवर आपटला!


संभाजीराजांनी पुढे होत वाफ्यातील अष्टधान्यांचे कोंभ भरल्या मुठीने उपटून काढले. त्यांच्या मुळ्या धरून आलेली माती झटकून टाकली. समृद्धीचे शिवलक्षण असलेले ते रसवंत कोंभ त्यांनी आपल्या मस्तकीच्या टोपात खुपसले. भोसलेकुळीच्या रक्तरसरशीत कोंभाच्या मस्तकी ते अष्टधान्यांचे कोंभ शोभून दिसू लागले !


जगदंबेसमोर एका हारीत पूजलेल्या हत्यारावरील आपली म्यानबंद जमदाड संभाजीराजांनी वाकून उचलली. भगवे म्यान क्षणगर कपाळाला लावले. मुठीचा परजात हात चढवून त्या जमदाडीचे पाते सर्रकन बाहेर खेचले.. हत्याराची झगझगीत शिकल डोळ्यांत भरून घेतली. आणि पाठीशी उभ्या असलेल्या जिजाऊसाहेबांना एकदा नजर दिली. जिजाऊ नुसत्याच प्रसन्न हसल्या.


आपोआप त्यांच्या उजव्या हातीचे हत्यार डाव्या हाती गेले, मान नागफण्यासारखी ताठ झाली. आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्यांनी क्षणात हत्याराच्या लखलखीत धारेवरून सर्रकन ओढला ! अंगठ्यावर रक्ताचे कोंभ तरारत उठले होते! रक्तमंडित आपला राजअंगठा संभाजीराजांनी जगदंबेच्या चरणांजवळ नेला. जगदंबेच्या पायाखाली रगडल्या जाणाऱ्या महिषासुराच्या मस्तकावर संभाजीराजाच्या उष्ण रक्ताचे दोन थेंब स्थिरावले. नवरात्रात पूजलेले आपले हत्यार त्यांनी 'पाजून घेतले! मग हाताच्या अंगठ्यावरच्या रक्ताचाच भंडारा करून संभाजीराजांनी त्याने कपाळावरच्या शिवगंधाचा मळवट भरून घेतला! हातातील पाते म्यानबंद करून जमदाडीचे भगवे फासबंद कमरेला आवळून घेतले. त्यांच्या त्या रुद्रमंगल क्षात्ररूपाकडे बघताच जिजाऊंचे नेत्र अभिमानाने उजळून निघाले.


'चला.” संभाजीराजांच्या पाठवळीवर हात ठेवून जिजाऊ शांतपणे म्हणाल्या. गडाच्या दसरा चौकाकडे संभाजीराजे चालले. आज विजयादशमी होती. दसरा चौकात मांडलेल्या आपट्याच्या डहाळ्यांभोवतीचा 'सोनआखाडा' खाशा स्वारीने आपल्या हत्याराने फोडायचा होता. तो पिढ्यान् पिढ्यांचा चालत आलेला रिवाज होता. दिवस सणाचा होता आणि सण मानाचा होता. आजवर खुद राजेच - दसऱ्याचा 'सोनआखाडा' आपल्या खाशा हाताने फोडत आले होते. पण या दसऱ्याला आपल्या सगळ्या सोनेरी स्वप्नांची हिरवीकंच निबर पाने झालेली आहेत असे राजांना खोलवर जाणवत होते. त्यांनीच मग संभाजीराजांना 'आखाडा' फोडण्याची आज्ञा दिली होती.