कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ४५

 संभाजीराजांना 'सुलूख' म्हणजे काय तेच नीट कळेंना! आपल्या महालातून ते राजांच्या महालाकडे आले. मिटला दरवाजा त्यांनी लोटून बघितला. तो बंद होता. " महाराजसाहेबS!” संभाजीराजांनी साद घातली. दरवाजा जाब देत होता.


देण्याच्या मनःस्थितीत नव्हता. क्षणभर त्या मिटल्या दरवाज्यासमोर शंभूराजे घोटाळले आणि त्यांची पावले मासाहेब पुतळाबाईच्या महालाकडे वळली.


आपल्या कपाळावर मेणमाळल्या कुंकवाची ठसठशीत दोन आडवी बोटं दर्पणात बघून रेखून घेतलेल्या पुतळाबाई, कुणबिणीने समोर धरलेल्या पोसाला ती बोटे पुसत होत्या. महालात येताच मुजरा करून संभाजीराजे पुतळाबाईंच्या जवळ आले. त्यांच्या ताज्या, ओल्या कुंकवाकडे बघत त्यांनी विचारले, “आऊसाहेब, सुलूख म्हणजे काय? का करायचा तो ? कुणाशी करायचा ? तुम्ही केला आहे कुणाशी सुलूख ? " त्यांचे प्रश्न ऐकून पुतळाबाईंची चर्या, गडावरच्या त्या ताणलेल्या अवस्थेतही आरक्त झाली. त्यांना म्हणावेसे वाटले, “आम्ही केला आहे जन्मोजन्मीचा 'सुलूख' आमच्या कपाळीच्या कुंकवाशी ! अंबेनं तो निभावण्याची ताकद आम्हास द्यावी.' "


पण त्या तसे काहीच बोलू शकल्या नाहीत. म्हणाल्या, "सुलूख म्हणजे तहकोंडीत फसल्या गेल्या माणसाची शरणागत! "


त्या शंभूराजांचे समाधान करू बघत होत्या. बाळराजे त्यांच्या ओल्या कुंकूपट्ट्याकडे बघत होते. त्या दोघांचे प्रतिबिंब बाजूच्या दर्पणात पडले होते. तो दर्पण स्वतःलाच म्हणत होता, "या धाकट्या मासाहेब आणि बाळराजे यांचा किती जन्मांचा सुलूख आहे हे त्यांचे त्यांनाही माहीत नसेल.' "" जिजाऊसाहेबांना सोबत म्हणून कोंढाण्यावर पोचते करून आलेल्या सोयराबाई आपल्या महालात होत्या. त्यांच्या कानावर मात्र यातले अजून काहीच आले नव्हते.. आज राजे गड उतरणार होते, रजपूत मिर्झा राजाच्या गोटात जाण्यासाठी ! बिनशर्त शरणागत पत्करून बेहत्यार भेट घेण्यासाठी! आपल्या माणसांची आणि मुलखाची झाली त्याहीपेक्षा होणारी मसनवट रोखण्यासाठी !


आयाळ उतरविलेल्या सिंहाचे जसे असेल, सोंड छाटलेल्या राजहत्तीचे जसे असेल, वशिंड कापलेल्या अटकर पाड्याचे जसे असेल, तसेच हे जिणे होते. शरणागतीच्या मरणयातना कळायला राजाचे जातिवंत मनच असावे लागते. जिवापाड प्रेम केलेली कवड्यांची माळच छातीवर असावी लागते.

या तहाच्या कागदावर राजे शाईने दस्तखत करणार होते. पुढे ही शाईच प्रथम राजांना गिळणार होती आणि नंतर अवघी शिवशाही, तमाम मराठेशाही डुबविणार होती ! तह म्हणजे पहिल्याने माघार आणि शेवटाला सर्वनाश!


राजे कुणाशीच काही बोलत नव्हते. सर्व दरवाजे बंद असलेल्या, दाभणधार पावसाने निर्दयपणे झोडपून काढलेल्या गडासारखे त्यांचे मन सुत्र, बधिर होते. निरोपाचे अदबमुजरे झडले. राजे संभाजीराजांच्या जवळ आले तसे त्यांच्या पायातील भगव्या, बाकदार मोजड्यांवर कपाळ टेकवून संभाजीराजे वर उठले.


दुष्काळी भुईकडे कोरड्या आकाशाने बघावे तसे राजे आपल्या फर्जद शंभूकडे बघत होते! सईबाईंचा 'सावळा' चेहरा राजांच्या डोळ्यांसमोर तरळू लागला. तो बोलत होता - "आमचे शंभूबाळ, एकला जीव स्वारींच्या पदरी घातला.'


राजांच्या पिळवटल्या मनात विचार येऊन गेला, "सई, तुम्ही तुमचा एकला जीव आमच्या पदरी घातलात. मोठ्या भरोशानं आणि आज आज आम्हीच आमचा आणि - आमच्या सान्या मावळमाणसांचा जीव रजपुताच्या शेल्यात टाकायला चाललो आहोत !! सई, माणसाच्या हयातीचं त्याच्या हातात काही सहात नाही हेच खरं.' काही न बोलता राजांनी शंभूराजांच्या खांद्यावर आपला तळहात ठेवला, स्वत: लाच जडशीळ वाटणारा तो तळहात दोनदा त्यांच्या खांद्यावर कसनुसा थोपटला.


राजे पालखीत बसले. डावी उजवी हेल खात पालखी वर उठली. आनंदराव, रघुनाथपंत, निराजी रावजी, नागोजी बहिर्जी फर्जद, विश्वासराव, कृष्णाजी जोशी यांनी पालखीभोवती कडे केले. तळपती पाती हातात पेलत हत्यारबंद धारकरी चालू लागले. 'श्रींच्या राज्याची शपथ घेणारा सर्जा सूर्य अंधाराशी तह करायला निघाला! राजांच्या पालखीकडे संभाजीराजे एकनजर बघत होते. कधी नव्हते ते आज घडले होते. गड सोडताना महाराजसाहेब त्यांच्याशी काहीच बोलले नव्हते.


पालखी दूर जात होती. संभाजीराजांना महाबळेश्वरावर सूर्यग्रहणाच्या दिवशी राजांनी कृष्णाकाठी सांगितलेले बोल आठवत होते. "राहू केतू हे सूर्याच्याच भावकीतले पापग्रह त्याच्या धावणीची वाट रोखून धरतात. त्याची चालदौड मुष्किल मुष्किल करून सोडतात; बाळराजे! सूर्यासही ग्रास पडतो ! "


मिर्झा राजाच्या गोटाकडे राजे निघून गेले. आता राजगडावर जिजाऊसाहेब नव्हत्या. राजे नव्हते. नकळतच संभाजीराजे पुतळाबाईच्या महाली रेंगाळत होते.


पुतळाबाईंची एकचित्त देवपूजा, कुणबी दासदासींबरोबरसुद्धा माया ओसंडते बोलणे, राणीवशातील इतर 'बाईसाहेबांची' अदब राखणे, सखू, राणू, अंबा, बाळीबाई ह्या आपल्या मुलीच आहेत अशी त्यांची देखभाल ठेवणे, थोडकेच पण खूप काळ लक्षात राहील असे घंटानादी बोलणे, आणि केवड्याच्या कणसाभोवती पीळ धरून बिलगलेल्या असंख्य पात्यांपैकी एकाच पाकळीपात्याने, बाहेर डोकावून पिवळ्याधमक उन्हात अंगभर तळपावे तसे त्यांचे सतेज 'दिसणे' या साऱ्या बाबींचा शंभूराजांच्या मनावर एक खोल ठसा, त्यांना नकळतच उमटून गेला होता. मायाळू स्त्रीला आपल्या मायेची दवंडी पिटावी लागत नाही हेच खरे! "


आपल्या महालात गवाक्षाच्या महिरपीजवळ पुतळाबाई उभ्या होत्या. बाहेरच्या आभाळात दाटलेल्या अभ्रामध्ये आपली चिंतावली नजर त्या हरवून बसल्या होत्या. मध्येच भान येताच त्यांच्या डोळ्यांची टपोरी पाखरे फडफडत होती. दाटल्या आभाळाखालून सरसर घावत दूरवर होऊन पुन्हा माघारी फिरत होती.


त्यांनी पूजा बांधलेल्या अष्टभुजा जगदंबेकडे बघत संभाजीराजे त्यांच्या पाठीशी उभे होते. मध्येच वळून गवाक्षातून डोकावत होते. दूरवर दिसणाऱ्या गुंजवणी नदीची धुरकट वळणे बघत होते.


"सरकार, धोरल्या महालानं याद केलीय. " सोयराबाईच्या खाजगीकडच्या चंद्रा या कुणबी दासीने महालात येऊन अदबीने वर्दी दिली.


ती ऐकताच पुतळाबाई मागे वळल्या. एकवार त्यांनी संभाजीराजांच्याकडे बघितले. पदरकाठ ठीक जमवून घेतला. चंद्रा कुणबीण आली तशी निघून गेली.


" चला बाळराजे, थोरल्या महालाची वर्दी आहे." म्हणत पुतळाबाईंनी जगदंबेच्या मूर्तीकडे नकळतच एकदा नजर दिली. आणि शंभूराजांच्या खांद्यावर आपला सुवर्णकंकणे भरलेला हात ठेवून त्या थोरल्या महालाकडे चालू लागल्या.


आपल्या महालात, निळ्याशार पदरपोताचा शालू नसलेल्या देखण्या सोयराबाई आपल्या कन्याराजे बाळीबाई ह्यांच्याशी काहीतरी बोलत होत्या. दगडबंद भिंती धरून चार कुणबिणी अदबीने उभ्या होत्या.


'दोन महालाचा उंबरठा ओलांडताच पुढे होत शंभूराजांनी मासाहेब सोयराबाईंच्या पायांना हात लावले. सोयराबाईंनी त्यांना वर उठवून घेतले..


बाळीबाई ह्या सोयराबाईच्या कन्याराजे पुतळाबाईंना बघताच धावत येऊन त्यांना बिलगल्या. त्यांचे दोन्ही दंड मायेने धरीत पुतळाबाईंनी सोयराबाईंना विचारले, “का वर्दी देणं झालं आम्हास ? स्वारीची गोटातून काही खबर.... "बहिर्जी आणि नागोजी रजपुताच्या गोटातून आत्ताच गडावर आलेत. त्यासाठीच तर वर्दी दिली धाकल्या बाईंना.'


"काय झालं. तहबंदाच्या आड असलेले पुतळाबाईंचे काळीज फडफडले. " स्वारीनं सुलूख मान्य केला ! पुरंधर, कोंढाणा, रोहिडा, माहुली, लोहगड असे तेवीस किल्ले आणि त्यांच्या तर्फेचा चार लक्ष होनांचा मुलूख रजपुतास देऊ केला ! ...


आता स्वारीकडं कुल बारा किल्ले आणि अवघा एक लक्ष होनांचा मुलूख राहील!' " स्वारी कशी आहे? " पुतळाबाईंनी त्यांच्या लालसर सरळ नाककळीकडे बघत शांतपणे विचारले. " ठीक आहे. उद्या कोंढाणा रजपुताच्या माणसांच्या हवाली करून मासाहेबांच्यासह गडावर येत आहे." सोयराबाई तुटक बोलल्या. त्यांच्या बिब्बेवाणाच्या काळ्याशार डोळ्यांत कसली तरी चिंता तरळत होती. ती गडकिल्ल्यांची होती की राजांची ते कळत नव्हते !

सोयराबाईच्या तोंडून जिजाबाई आणि राजे येणार हे ऐकताच संभाजीराजांचा चेहरा पोतासारखा उजळून गेला. पुतळाबाई आणि सोयराबाई यांच्याकडे बराच वेळ आलटूनपालटून बघताना शंभूराजे विचार करीत होते "ह्या दोन्ही मासाहेब उजळ आहेत. पण मग एवढा फरक का वाटतो यांच्यात ? " त्या दोघी मासाहेबांचे बोलणे थांबलेले बघून शंभूराजांनी सोयराबाईंना विचारले, 'मासाहेब, तुम्ही... तुम्ही केला आहे कधी कुणाशी सुलूख ?' त्या प्रश्नाने पुतळाबाई चमकल्या. शंभूराजांच्याकडे बघतच राहिल्या. सोयराबाईंचे बिब्बेवाणाचे काळेशार डोळे कसल्यातरी विचित्र तेजाने उजळल्यासारखे झाले. नाकाचा लालसर शेंडा थोडासा अधिक लालावला. त्या पटकन बोलून गेल्या- "नाही !! सुलूख आम्हास कधीच पसंत नव्हता! आता स्वारीनंच तो मान्य केल्यावर इलाज कुणाचा ?'

थोरल्या बाईसाहेब काय बोलतील हे ऐकण्यासाठी पुतळाबाईंनी त्यांच्या कपाळाच्या कुंकमपट्ट्यावर नजर जोडली होती. त्यांचे बोलणे ऐकताच ती तिथून सुटली आणि सोयराबाईच्या पायाच्या बोटांत घातलेल्या चंदेरी जोडव्यांवर येऊन पडली !


शंभूराजांना जवळ घेत सोयराबाई त्यांना म्हणाल्या, “तुमचं मात्र ठीक झालं. कसलाच सुलूख न करता रजपुतानं तुम्हास पंचहजारी मनसब देऊ केलीय! तुम्हाला ती घेण्यासाठी रजपुताच्या गोटात जावं लागणार एवढंच वाईट चिंता वाटते तुमची. ही जिम्मेदारी तुम्ही कशी पेलणार ?' शंभूराजे काहीच उत्तरले नाहीत. कारण इतके किल्ले देऊन आबासाहेबांनी पंचहजारी मनसब का घेतली या गोंधळात शंभूराजे गुंतले होते.


सोयराबाईंचे बोलणे पुतळाबाईंना नीट कळलेच नाही. त्या सादिलवारीने बोलाव्या तशाच बोलल्या होत्या. नेहमीच बोलत होत्या. पदरकाठच्या जरतारी वीणेत गळ्यातले मंगळसूत्र अडकले की जसे वाटेल तसेच पुतळाबाईंना सोयराबाईंचे बोलणे ऐकताना नेहमी वाटत आले होते! काही न बोलताच मग त्या शंभूराजांना म्हणाल्या, "चला बाळराजे, कालेश्वरीचं दर्शन घेऊ." 


पुतळाबाईसाहेबांनी कालेश्वरीला फूलपसी चढविली. तिच्या रुद्रमंगल रूपाकडे क्षणभर बघून डोळे मिटून हात जोडले - "आई, काळाचा किल्ला तुझ्या हाती असता कसला फितवा केलास हा ? तहाचा विपरीत काळ आणलास ! बाळराजांना पंचहजारी सरदारकीचं दान देववलंस!" मनोमन असे म्हणताना पुतळाबाईंचे जोडलेले हात थरथरले. कपाळीच्या कुंकवाचा जोडपट्टा आक्रसला. कालेश्वरीचे दर्शन घेऊन पुतळाबाई आणि शंभूराजे परतले. दिवस मावळतीला कलाटणी घेत होता.