कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ४६

 कन्हेपठारावर पुरंधरच्या पायथ्याशी मिर्झा राजाचा केशरी रंगाचा, आलिशान, रजपुती शामियाना उभा होता. त्याच्या झालरीदार कनाती वाऱ्याने फडफडत होत्या. समोर तोफामाऱ्याने काळवंडलेला पुरंधर खडा होता. 

रजपुताच्या शामियान्यात हिंदुस्थानी तलम, नकसदार गालिच्यांची बैठक अंथरली होती. जरीबतूच्या झगझगीत खोळी घातलेले लोड मांडले होते. सोनेरी वेलबुट्टीचा एक उंच हुक्का नक्षीदार चौरंगावर ठेवला होता. त्याची पट्टेदार, काळीबाळी धूरनळी डाव्या हातात घेऊन मिर्झा राजा बैठकीच्या लोडाला रेलून बसला होता. एका कोपऱ्यात धूपदानातील कनोजी धूपाच्या धुराची वळी वर उठत होती.

मिर्झा राजासमोर खाली मान घातलेले राजे बैठकीवर मांडलेल्या शतरंजाच्या पटावरील, एकमेकांना लागून पसरलेल्या काळ्याबाळ्या चौकांकडे एकटक बघत बसले होते. ते चौक त्यांच्या जिवाची घालमेल निरखीत होते !

निकोलो मनुची हा गोरा साहेब आपल्या मांडीवर पिसे खोचलेली थोराड टोपी ठेवून तिथे आदबीने बसला होता. तो मिर्झा राजांच्या तोफखान्यावरचा अधिकारी होता. शतरंजच्या अक्कलबाज' खेळात त्याला चांगलाच रस होता.

राजांच्या पापणीकडा लालावल्या होत्या. रात्रभर जागून त्यांनी मिर्झा राजाचा मुन्शी उदयराज आणि सूरतसिंग कछवाह यांच्याशी तहाच्या वाटाघाटी केल्या होत्या. उत्तररात्रीला मिर्झा राजाचा पाच कलमी तह मान्य करून त्यावर दस्तखत केले होते! शेल्यात हात बांधून मिर्झा राजांची खालमानेने भेट घेतली होती.

या तहाने राजांनी औरंगजेबाला तेवीस किल्ले आणि चार लक्ष होनांचा मुलूख देऊ केला होता. हुकूम होईल तेव्हा औरंगजेवाच्या दक्षिण सुभेदाराबरोबर फौजेनिशी मोहिमेवर जायचे मान्य केले होते. तहाची तामिली होईपर्यंत शंभूराजांना रजपुताच्या गोटात ओलीस म्हणून ठेवण्यासाठी आणून पोचविण्याचे पत्करले होते.


कस्तुरी हरवलेल्या मृगावर रानदवन्याचा उग्रट वास शोधीत फिरण्याची पाळी यावी तशी राजांची स्थिती झाली होती! या अवस्थेत हा शतरंजचा पट मांडण्यात आला होता. मिर्झा राजांने पेश केलेल्या तबकातील शतरंजाची सफेद मोहरी राजे आपल्या सडक बोटांनी पटावर मांडू लागले. हत्ती, घोडे, उंट, वजीर पटावर चढले. वनगाईच्या काळ्या शिंगांची बनविलेली काळीशार प्यादी मोहरी मिर्झा राजाने आपल्या गरगरीत बोटांनी पटावर मांडली. दोन्ही बाजूंचे पट मांडून झाले तरी काही क्षण तसेच गेले. उत्तर हिंदुस्थानी बोलीत मिर्झा राजा संथपणे म्हणाला, “खोलिए चाल राजासाब.

त्याच्याकडे न बघताच राजे पटावर नजर ठेवून म्हणाले, "आप खोलिए राजाजी.


हक और दर्जा आपका है!


"नहीं." मिझनि पुन्हा एकदा धुराची वळी खोलवर चूस करून बाजूला फेकली. कपाळावरचा केशरी टिळा चढवीत तो म्हणाला, " शतरंजका एक दस्तुरी रिवाज है! सफेद प्यादे फर्जी जनाना होते हैं। और शतरंजमें पहली चाल रहती है जनाने की !! काले प्यादे फर्जी मर्दाना होते हैं! जवाब रहता है मदनिका!" मिर्झा राजे स्वतःवरच खूप झाले. मांडीवर थाप देऊन, मनुचीकडं बघत गडगडून हसले.


राजांनी चमकून मिर्झा राजाकडे पाहिले. त्यांच्या छातीवरची कवड्यांची माळ थरकून उठली. डोळे आगठिणग्या फेकू लागले. पण ते काही बोलू शकत नव्हते.


ती नजर बघून मिर्झा राजा चरकला. डाव्या हातातील नळी बाजूला ठेवून तो लगबगीने म्हणाला, "बुरा ना समझो राजासाब. हमने सिर्फ रिवाज बताया ! आप चाहते हो तो हम खोलते हैं पहली चाल ” मिर्झाने राजांच्या पटावरील सफेद प्याद्यांना आपल्याकडे घेण्यासाठी आपला हात पुढे केला.


त्याचा हात मध्येच थोपवून आपल्या पटावरचे एक प्यादे राजांनी पुढे सरकविले. खेळ सुरू झाला ! बराच वेळ खेळ चालला होता. राजांचे शतरंजात लक्ष नव्हते. पटाच्या चौकात त्यांना मिर्झा राजाने गिळलेले तेवीस गड दिसत होते! त्या चौकांनी जखडून टाकलेले शंभूराजे दिसत होते! रुजाम्यावर बसलेला निकोलो मनुची आपल्या लाल- नाकावर दाटणारे घामाचे थेंब अधून मधून रुमालाने टिपत राजे आणि मिर्झा राजे यांची प्यादीमार टक लावून बघत होता. राजांच्या चाली त्याला विचित्र वाटत होत्या.


जनाना आणि मर्दाना कितीतरी प्यादी आता पटावरून हटली होती. एका तबकात एकमेकांना बिलगून खेळ बघत पडली होती ! खेळ शेवटच्या भरडाव टप्प्यात आला. एकाएकी मिर्झा राजाने कौशल्याने आपला, वजीर पुढे घेत सफेद राजाला शह दिला ! एक मोहरे आडवे घालून राजांनी तो शह मोडून काढला. खेळ हातघाईला आला. आता प्रत्येक मोहरे विचाराने हलवायला पाहिजे होते.


पुढे काढलेल्या वजिराच्या पाठबळात मिर्झा राजाने आपला तिरक्या चालीचा उंट हलविला ! राजांच्या सफेद राजाला पुन्हा शह पडला! बराच विचार करून राजांनी अडीच घरे छलांग घेणारे, आपले दुडक्या चालीचे घोडे आडवे टाकून तो शह पुन्हा मोडून काढला! त्या घोड्याने मिर्झा राजाच्या काळ्या राजाला शह घातला!


मनुची एकटक खेळ बघत होता. राजांची घोड्याची चाल त्याला एकदम आवडली. आपल्या टोपीच्या पिसांवरून हाताची बोटे सरासर फिरवीत तो, राजे आता आपले घोड़े कसेकसे हलवतील याचा मनोमन अंदाज करू लागला. मिर्झाचा 'काळा' राजांच्या एकाच घोडेशहाने पुरा पुरा कोंडून टाकलेला त्याला स्पष्ट दिसू लागला ! राजा राजांनी पुढे टाकलेल्या पोडवाला सफे मारून काढण्यासाठी मिर्झा राजाने आपल्या बजिरावर हात ठेवला. ही एकच चाल खेळता येण्याजोगी उरली आहे असे त्याला वाटले. राजांनाही मिर्झा आता तीच खेळी खेळणार असे मनोमन वाटले. आपले घोड़े आपण फुका बळी दिले अशी चुटपुट लागली.


घुराच्या वळ्यांचा एक दमदार झुरका खेचून, "आपका घोडा छलांग मारके हमारे राजापर बेमुर्वतीसे आ गया! मगर हकनाक काम आया!" असे म्हणत मिर्झा राजाने पांढरे घोडे पटावरून पटकन उचलले आणि त्याच्या चौकात आपला काळा वजीर पुढे सारला! घोड़े तबकात टाकले.


ते बघताना, इतका वेळ शांतपणे शतरंज बघणारा निकोलो मनुची मात्र न राहवून पटकन आपल्या टोपीकर भाषेत म्हणाला, " ओ 5 नो ऽ इट कान्ट! ब्वो नहीं मॉर सकटा ! " मनुचीने, मिर्झा राजाने तबकात हटविलेले पांढरे घोडे पुन्हा उचलून होते त्या घरात बसविले! मिर्झा राजाचा काळा वजीर मागे हटवून त्याच्या पूर्वीच्या घरात बसविला !


पटावर दूर एका कोपऱ्यावरच्या घरत असलेल्या राजांच्या पांढऱ्या उंटाकडे बोट दाखवीत मनुचीने मिर्झा राजाला पटवून दिले की, त्या उंटामुळे काळा वजीर जखडबंद झालेला आहे! तो आपला चौक सोडून राजाला शहात टाकत घोड्यावर चाल घेऊच शकत नाही! राजांच्या हातून घोडे असे फेकले गेले होते की, त्यांचा एका कोपन्यात असलेला राजावर डोळा ठेवणारा उंट आपोआप मोकळा झाला होता! आपल्या तिरक्या मार्गाने मिर्झा राजाचा वजीर त्याने परस्पर जखडबंद करून दाबून टाकला होता ! आपल्या कमानबाक भुवया वर चढवीत मिर्झा राजा, राजांच्या त्या पांढऱ्या उंटाकडे क्षणभर डोळे ताणून बघतच राहिला । मग निकोलो मनुवी आणि राजांच्याकडे हताशपणे बघत आपल्या दोन्ही मांड्यांवर तळहातांची थाप देत मिर्झा राजे स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला, "बिलकुल दुरुस्त ! वो नहीं मर सकता !! '