राजांचा "घोडेशह" मिर्झा राजाला निखळून काढायला वावच उरला नव्हता! हार मान्य करून त्यासाठी आपल्या काळ्या प्याद्यांचे तबक पालथे घालीत मिर्झा म्हणाला, 'फतह आपकी हुई राजासाब. हमने शिकस्त ली ! ' दस्तुर म्हणून मिर्झा राजाने आपल्या डाव्या हातातील पुष्कराजाची अंगठी उतरवली आणि ती राजांच्या पटावर ठेवली! ती खेळातील 'फत्तेची ' रिवाजी शाही बक्षिशी होती.
लगबगीने ती उचलून पुन्हा मिर्झा राजाच्या हातात ठेवीत राजे म्हणाले, "हम हारजीत मामुली मानते हैं राजाजी! इजजत हो तो मनकी एक बात खोल देना चाहते
" हां. जरूर.” मिर्झा राजाला राजे काय बोलणार याचा काहीच अंदाज येईना. त्याच्या कपाळावरचा केशरी टिळा नकळत आक्रसला तबकातील आणि पटावरच्या पांढऱ्यासफेद प्याद्यांकडे राजांनी क्षणभर नजर दिली.
ते रंगसतेज उजळपण बघताना त्यांना आपल्या मासाहेबांची आठवण झाली.
क्षणात मिर्झा राजावर विव्यागत नजर रोखून त्यांच्या डोळ्यांत आपल्या बाकदार नाकाचा शेंडा खोल खोल रुतवीत नागफण्यागत ताठ मान ठेवून राजे शांतपणे म्हणाले, " राजाजी, मर्दाना कितना भी बढा हो, जनम लेता है जनाने की कोखमें!” आणि ते ऐकताना मिर्झा राजाच्या तोंडातली धुराची वळी घशात अडकली आणि हातातील हुक्कानळी त्याला नकळत घरंगळून बैठकीवर आडवी झाली !!
मिर्झा राजाच्या आग्रहावरून राजांनी पठाण दिलेरखानाची भेट घेतली. पुरंधरच्या आपल्या किल्लेदाराला गड खाली करून देण्याचा सांगावा धाडून राजे रजपुताच्या गोटातून यायला निघाले.
मागचा पुढचा दोन्ही पायखूर पायबंदांनी जखडून टाकलेले घोडे एकटेच हिरव्या कुरणातून रखडत चालावे तशी गत रजपुताच्या गोटात राजांची झाली होती! दुरून बघणाऱ्याला ते घोडे उमदे वाटते, भरारीचे वाटते पण रखडत रखडत चालताना त्याच्या शेपटीची होणारी चुळबूळ त्याची त्यालाच माहीत असते !
मिर्झा राजाने राजांच्याबरोबर पाठवायची आपली माणसे अगोदरच निवडून ठेवली होती. त्यांतील दोन असामी खाशा होत्या. एक खुद्द त्याचाच मुलगा कुँवर किरतसिंग आणि दुसरा उग्रसेन कछवाह ! किरतसिंग राजांच्या संगतीने जातीनिशी जाऊन कोंढाण्याचा कबजा घेणार होता आणि आणि उग्रसेन कछवाह राजांच्याबरोबर थेट - राजगडापर्यंत येऊन संभाजीराजांना ताब्यात घेऊन परतणार होता! तहाची तामिली होईपर्यंत, म्हणजे तेवीस गडकोट रीतसर मिर्झा राजाच्या ताब्यात पोचते होईपर्यंत संभाजीराजे रजपुताला ' श्रींच्या राज्याचे जामीन राहणार होते!
हा सगळा बनलेला मनसुबा बिलाकसुर पार पाडावा म्हणून धूर्त आणि मुरब्बी असलेल्या मिर्झा राजाने मध्यरात्री आपल्या शामियान्यात कुँवर किरतसिंग आणि उग्रसेन कछवाह यांना बोलावून घेऊन दोघांना दोन महत्त्वाच्या सूचना देऊन टाकल्या होत्या. आपल्या बच्च्याला कुँवर किरतला त्याने बजावले, "कुँवर, सम्हलके रहना! वो - सेवाजी है; पहाडका सेर!" "
उग्रसेनला त्याने फारच सावधगिरीची इशारत देऊन ठेवली, "उग्रभान, ठीक परख लेना कि सेवाजी आपकाही कुँवर तुम्हारे हवाले कर रहा है! गाफील मत रहना! हो सकता है सेवाजी किसीका भी बच्चा तुम्हारे हवाले कर देगा! "" मिर्झा राजाने असा सगळा मोर्चेबंद डाव आखला होता. त्याने यज्ञ केलेली रणचंडी त्याला जवळ जवळ पावल्यासारखीच होती. आपल्या शामियान्यात नकसदार तबकातील पानविडा उचलून मिर्झा राजाने राजांच्या हातात दिला. शामियान्याच्या कनती धरून केशरी साफे बांधलेले तरणेबांड किरत आणि उग्रसेन उभे होते.
मिर्झा राजाने राजांचा निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा मूळ विषयाला खुबीने हात घातला, "राजासाब, हम आपको बिदा दे रहे हैं लेकिन बिदा देना हमारा सुभाव नहीं! हमें अच्छा लगता है आगवानी करना! आप कुँवर शंभू को भेज देना। हम शाही ढंगसे उनकी आगवानी करेंगे !! "
तळहातात निरोपाचा विडा घेऊन राजे मिर्झा राजाच्या गोऱ्यापान चेहऱ्याकडे बघतच राहिले. त्यांना मिर्झाची कीव वाटत होती. त्याहून स्वतःची वाटत होती त्यांच्या निर्विकार बघण्याने मिर्झा राजा गोंधळला. लगबगीने राजांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, " डरना मत राजासाब! बेशक, बिनाहर्ज कुँवर को भेज देना! उनका बाल तक बांका नहीं होगा ! इतबार करो! हम कसम उठाते हैं! " मिर्झाने शामियान्याच्या दरवाज्याकडे बघत सरदारी हंगाची टाळी दिली. मुन्शी उदयराजाला बोलावून घेतले. त्याच्याकडून आपल्या पूजेतील शंकरावरची बेलपत्रे एका तबकातून आणून घेतली त्यांतील दोन पाने उचलून ती राजांच्या हातातील शाही निरोपविड्यावर ठेवून मिर्झा राजा शांतपणे म्हणाला, 'हम शिवजीकी कसम उठाते हैं, जबतक हम जिंदा हैं तबतक आपके कुँवरका यहाँ बाल भी बांका नहीं होगा !'
मिर्झाच्या शामियान्यातून राजे बाहेर पडले. सिद्ध ठेवलेल्या पालखीत चढले. आपल्या निवडक रजपूत धारकऱ्यांबरोबर किरतसिंग आणि उग्रसेन यांचे घोडदळ राजांच्या पालखीबरोबर कदमबाज चालीने चालू लागले.
कोंढाणा किरतसिंगाच्या हवाली करून राजवाड्यावर मासाहेबांच्यासह परतलेले राजे आपल्या महालात अस्वस्थ फेऱ्या घेत होते. महालीची चिराखदाने ऊरभर जळत होती. जिजाबाईच्या महालाकडून आलेली 'थाळ्याची' वर्दी त्यांनी 'भूक नाही' अशी फेरवर्दी पाठवून परतवली होती. जिजाऊंना तोंड दाखविण्याचे धाडस काही त्यांना होत नव्हते. रजपूत मराठी मुलखात आल्यापासून गाठवणीचा धागा तुटावा आणि कंठ्याचा एकएक मणी ओघळत जावा तसे राजांचे मन ओघळत आले होते. आता तर हे ओघळणे मध्यभागीच्या पदकापर्यंत येऊन ठेपले होते! प्रत्यक्ष फर्जद संभाजी राजांना रजपुताच्या गोटात धाडावे लागणार होते! जामीन म्हणून !!
राजांच्या मनाच्या खलबतखान्यात एक ताजा आवाज मसलत देत घुमत होता, "एकला जीव पदरी घातला! स्वारीच त्यांच्या आऊ आणि आबा !! " त्या आवाजात मिर्झा राजाचे हिंदोस्तानी बोल मिसळत होते- "बेशक बिनाहर्ज भेज देना आपके कुँवरको ! हम कसम उठाते हैं. राजकारण नात्याचा गुंतवा जाणत नसते. डोळ्यांवर पट्टी बांधून ते माणसाला एकाच. वेळी लुसलुसत्या हिरवळीवरून रणरणत्या वाळवंटात उतरवीत असते. राजांना रक्ताची नाती नसतात! असी तरी ती मनाच्या जामदारखान्यात मोहरबंद करून ठेवावी लागतात!
राजे निर्णयाला आले होते, पण त्यांच्यासमोर एक पेच होता ह्या निर्णयाची समज शंभूराजांना कशी पडावी ? आऊसाहेबांना त्यासाठी हिंमतबंद कसे करावे ? पुन: पुन्हा त्यांना वाटत होते की तडक जिजाऊंच्या महाली जावे, मनी दाटलेले मोकळ्या ओठी बोलावे. पण पाय महालाच्या उंबरठ्यातच अडखळत होते. हाताची बोटे छातीवरच्या कवड्यांवर चाळवली जात होती. चिंतावल्या मनाबरोबर पाय फेन्या घेत होते.
" आऊसाहेबांची खाशी स्वारी येतीया संगती बाळधनी हाईत.” राजांच्या महालावर पहारा देणाऱ्या धरकल्याने आत येऊन मुजरा देत वर्दी दिली. कायदे आखडलेले दौडते घोडे थांबावे तशा राजांच्या फेल्या गपकन थांबल्या.
" थाळ्यास नाही आलात ? गडकोटांची चिंता करता ? " महालात शंभूराजांच्यासह आलेल्या जिजाऊ संथपणे राजांना म्हणाल्या. शंभूराजांनी पुढे होत आपल्या . महाराजसाहेबांच्या पायांवर कपाळ ठेवले. त्यांना उठवून घेऊन राजे क्षणभर त्यांच्या कपाळावरच्या दोनदळी शिवगंधाकडे तसेच बघत राहिले. ते बघताना संभाजीराजांची कुंडली मांडणाऱ्या हरभट ज्योतिष्यांची जबान त्यांना आठवली- साक्षात रुद्र पुराणांतरी रुद्र जन्मास आला आहे! उंच गडकोटावरल राहील ... प्रलय माजवील... पण. पण! जसा आप्तगणांकडून नाडला गेला तसाच योग या कुंडलीत दिसतो !!! त्या आठवणीने राजे घायाळ झाले. नको ते विचार त्यांच्या राजमनात घुसवा करून गेले.