कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ४१

 बाहेर ऊन तावत होते. उभा राजगड आत पोळून निघत होता. संभाजीराजांच्या महालात, आपल्या गोंदल्या हाताने माठातील थंडगार पाण्याचा पेला शंभूराजांच्या हाती देताना धाराऊ म्हणाली, "कायली व्हतीया जिवाची निस्ती!” आणि तिने आपल्या कपाळावर दाटी केलेला घाम डाव्या हाती पदर घेऊन निपटला. इतक्यात जिजाबाई महालात आल्या.


घाम पुसलेला अंगावरचा पदर धाराऊने लगबगीने ठाकेठीक केला. शंभूराजे आऊसाहेबांना बघताच कमरेत वाकले. पेला डाव्या हाती घेत त्यांनी मुजरा केला.


घ्या" म्हणत जिजाऊंनी पुढे होत पेला त्यांच्या ओठांना भिडविला. पाणी पिताना वाळराजांना पापण्या क्षणभर मिटल्या गेल्या. जिजाऊंची नजर त्यांच्या कपाळीच्या दोनदळी शिवगंधावर गेली. सकाळी त्यांनीच ते बाळराजांच्या कपाळी रेखले होते. गडावर अनेक दासदासी होत्या, राजांचा सात राण्यांचा राणीवसा होता पण बाळराजांच्या कपाळी शिवगंध रेखण्याचे काम जिजाबाईंनी कुणाच्याही हाती आजवर जाऊ दिले नव्हते. त्यांचे ते समाधान होते. कसले होते ? कसे होते? हे कुणालाही सांगता येणार नव्हते.


हातचा रिता पेला बाळराजांनी चौरंगावर ठेवला. जिजाबाई त्यांना काही बोलणार होत्या इतक्यात पाली दरवाज्यावरची गडचढीची दुडदुडणारी नौबत सर्वांच्या कानांवर आली. जिजाऊंचा चिंताक्रांत, आक्रसलेला चेहरा क्षणभर त्यामुळे उजळल्यागत झाला. "चला बाळ शंभू राजे गड चढताहेत. सदरेवर जाऊ.”


जिजाबाईंनी बाळराजांचा हात आपल्या हाती घेतला आणि त्या सदरेच्या रोखाने चालू लागल्या. तोरणा, प्रतापगड, चंदन-वंदन, रोहिडा, पुरंदर अशा बारा मावळांतील आपल्या साऱ्या किल्ल्यांची नाकेबंदी नजरेखाली घालून राजे राजगडाकडे परतत होते.


पद्मावती माचीवर राजांची पालखी ठाण झाली. माचीमागून निघणाऱ्या भुयारमार्गानि राजे बालेकिल्ला चढून वर आले. सदरप्रवेश करणाऱ्या राजांना जिजाबाई डोळे जोडून बघत होत्या. राजांचे कपाळ घामाने डबडबून गेले होते. दोनदळांचे शिवगंध त्यामुळे चौकाठाने ओघळले होते! ते बघताना जिजाबाईंच्या जिवाची नुसती काहिली होत होती !!


राजे राजगडावर आल्याला आठ दिवस लोटले नसतील तोच दिलेर-मिर्झाची प्रचंड शाही फौज मुळामुठेचे पाणी घुसळून टाकीत पुण्यात घुसली. गौर, हाडा, बुंदेला, राठोड, कछवाह, चंद्रावत अशा राजबंधा राजपुतांच्या केशरी डेऱ्या राहुट्यांची प्रतिबिंबे मुळामुठेच्या पाण्यावर तरंगत हिंदोळू लागली. दिलेरखानाच्या दिमतीखाली सगळ्या जातीचा 'खान' पुण्यात ठाण झाला. हत्ती, घोडे, उंट यांच्या कालव्याने प्रांत पुणे सुन्न झाला. अब्दुल्लाखान, फत्तेलष्कर, महेली या अगडबंब तोफांची भांडी तोफखान्याचा प्रमुख मीर अतिशखान याने रांगेत आखून ठेवली.


पाठीकडे झुकते झालेले किमॉश डोक्यावर घेऊन, चुनीदार विजारीचे, डगल जाम्यावर झगमगीत जाकिटे चढविलेले दिलेरचे पठाणी आणि बहलिया हशम घोडे फेकीत पुण्यात धुमाकूळ घालू लागले. डोक्यावर केशरी साफे बांधलेले, हनुवट्यांजवळ दाढ्या पिळलेले मिर्झाराजांचे 'कुँवर, सिंग आणि ठाकुर' राजांच्या खबरा उचलण्यासाठी बारा मावळांत घुमू लागले.


आले! दिल्ली दरबारचे सगळ्यांत ताकदवर आक्रमण मराठी दौलतीवर चालून आले. प्रभू रामचंद्राच्या रघुकुलाचा वारसा सांगणारा मिर्झा राजा, राजांचे 'श्री'चे राज्य तसनस करण्यासाठी स्वामिनिष्ठेच्या खिल्लती, काबे पांघरून आला. येताना तो रणचंडीचा कोटियज्ञ पेटवून आला होता. त्यात काही कमी पडायला नको म्हणून तो आता मराठी मुलखाची होळी पेटविणार होता. त्याची उमर साठ वर्षांची होती. साठीला बुद्धी नुसती नाठीच होत नाही तर खोटीसुद्धा होऊ शकते. कारण आजवर जे कधीच घडले नव्हते ते आता घडणार होते. मराठे-रजपूत एकमेकांवर उभे हत्यार धरणार होते ! सूर्यवंशजाकडून लवकरच एक साक्षात सर्जा सूर्यच ग्रासला जाणार होता.


पुण्यात येताच मिर्झा राजाने तळाचा कबजा आपल्या हाती घेऊन राजा जसवंतसिंगाला रिहा केले. जसवंतसिंग दिल्लीच्या रोखाने कूच झाला. आपल्या डेऱ्यात बसून हुक्क्याच्या नळीतून धुराचे फव्वारेच फव्वारे फेकीत दिलेरखान शिवाजीच्या कुठल्या किल्ल्यावर आग ओकावी या खयालात डुबून गेला होता. मुहम्मद तर्खान, रसूलबेग रोझमानी, कुवतखान, सैयद बुखारी, तुर्कताझखान, झबरदस्तखान, धैरत आणि समोर खडे होते. मुजफ्फर, मीर अतिशखान हे शाही बंदे हात बांधून त्याच्या आपल्या आलिशान शामियान्यात खुशबूदार सरबताचे घोट घशाखाली सोडीत मिर्झा राजा शिवाजीवर किती ढंगाच्या चाली रचाव्यात याचा विचार करीत होता. उन्हाच्या तलखीने त्याचे पातळ ओठ पुन्हा पुन्हा सुकत होते. सरबत कामी येत नव्हते. अफजलखानाला ऊरभेटीत फोडणारा, शास्ताखानाची बोटे छाटणारा, शाही सुरतेची शान लुटणारा 'सेवा' त्याच्या डोळ्यांसमोरून हलत नव्हता.


मध्येच त्याच्या कपाळावरचा केशरी कुलटिळा आक्रसत होता. चढत्या उन्हाबरोबर त्याच्या जिवाची नुसती काहिली होत होती !!


नेहमीच्या पूजेतील स्फटिक शिवलिंगावर राजांनी आपल्या सडक बोटांनी बेलपत्रे वाहिली. क्षणभर आपल्या दळदार पापण्या मिटत त्यांनी हात जोडले. हे शिवलिंग कैकवेळा त्यांच्याशी न सांगता येणाऱ्या बोलीत, बोलत आले होते. काजळणाऱ्या त्यांच्या मनाला हे स्फटिकस्वच्छ करीत आले होते. आज मात्र कधी नव्हे ती निळ्याशार कंठाची, भस्ममंडित अशी साक्षात शिवाची मुद्राच त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर खडी ठाकली! तिचा दाट निळा कंठ बघताना राजांचे उभे राजेपणाचे भान धरकून उठले. त्यांनी 'डोळे उघडले. समोरचे स्वच्छ शिवलिंग अंगभर तळपतच होते. शेजारी उभ्या असलेल्या संभाजीराजांना राजांनी नजरेने शिवलिंगावर बिल्वदले वाहण्याची इशारत केली. शंभूराजांनी तबकातील दोन बेलपत्रे स्फटिकसुंदर शिवलिंगावर वाहिली. राजांनी मिटले तसेच त्यांनी हात जोडून आपले डोळे मिटले. त्यांच्या मिटलेल्या छोटेखानी डोळ्यांसमोर मात्र महाबळेश्वरच्या माथ्यावर, कृष्णेच्या पात्रात गळाभर पाण्यात उतरलेल्या आबासाहेबांची शिवपिंडीसारखी दिसणारी मुद्राच क्षणात उभी - ठाकली!! ती दिसताच त्यांनी जोडलेले हात उचलून आपल्या कपाळाला नेऊन मिठवले.

" चला.” राजे त्यांच्या खांद्यावर हात चढवीत म्हणाले आणि शंभूराजांच्यासह राजे जिजाबाईच्या महालाकडे निघाले.

जिजाबाईंना वंदन करून ते त्यांच्या सोबतीने राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदरेवर आले, सदरेवर सरलष्कर नेताजी, आनंदरराव, कुडतोजी, येसाजी, मोरोपंत, निराजी रावजी, कर्माजी, आण्णाजी दत्तो, सिदोजी, रघुनाथपंत कोरडे अशी मंडळी हात बांधून उभी होती. कुणाचीच मान वर नव्हती.


अदबमुजरे झडले. राजे, जिजाबाई आणि बाळराजे सदरबैठकीवर बसले. वर्मी वाण लागलेले पाखरू, चीत्कारण्याची ताकद नसल्याने तसेच फडफडत जावे तसे काही क्षण गेले. एक सेवक जगदंबेच्या भंडाऱ्याची परडी घेऊन सदरेवर राजांच्यासमोर आला. काही न बोलता त्याने हातची परडी राजांच्यासमोर पेश केली.


'भंडाऱ्याची पहिली चिमट सदरेच्या देवतेला उधळून राजांनी दुसरी चिमट आपल्या कपाळीच्या शिवगंधावर घेतली. भंडाऱ्याची परडी सदरभर फिरली. इमानी कपाळे भंडाऱ्याने भरली. राजांच्या हात इशारतीवर सगळी मंडळी बसती झाली. भयाण शांतता पसरली.