जिजाबाईंच्या पायांना हात लावण्यासाठी शंभूराजे झुकते झाले. त्यांना उठते करीत जिजाबाई म्हणाल्या, “बाळराजे, जा हुडव्याला चूड देऊन या. होळकरी खोळंबलेत. ' “मासाहेब शंभूराजे काहीतरी बोलणार होते, पण संकोचले. शब्द ओठांत " ठेवून थांबले.
" का काय झालं ? " जिजाबाईंनी मायेने त्यांना विचारले. .1" शंभूराजे गप्पच होते.
बोला. मनी असलेलं साफ करावं.” जिजाऊंनी धीर दिला. जिजाबाईंच्याकडे आदराने बघत शंभूराजे म्हणाले, “तुम्ही... तुम्ही याल आमच्या संगती ? होळीचा हुडवा पेटतो. जळत्या हुडव्यातून खेळे नारळ बाहेर काढतात. खूप मजा येते! याल ?
ते ऐकताना जिजाबाईंचा ऊर भरून आला. मनात विचारांची कारंजी उसळली. "आम्हाला कधी कुणी 'बरोबर या' असा आग्रह केला नाही! आम्ही जातो म्हणून ठरविलेल्या वाटेनं आम्हास जाता आलं नाही ! "
जिजाबाईंना गप्पनिसूर बघून शंभूराजे वरमले. " चुकलं आमचं. मुजरा करीत करीत मागल्या पावली पाच कदम मागे हटू लागले. " म्हणत झुकता
जिजाबाई म्हणाल्या, “थांबा आम्ही येतो आहोत!" आणि ते ऐकत असताना संभूराजांच्या डोळ्यांत पुनवेचे दहीदाट चांदणे उत्तरले!
अंगाभोवती शालनामा लपेटून घेतलेल्या मासाहेब बरोबर शंभूराजांना घेऊन होळीचौकाकडे चालल्या. प्रतापगडची जगदंबाच आपल्या बालभुत्याला घेऊन चालावी तसे ते दृश्य दिसत होते! एक जाणता 'स्त्रीवसा' आपल्या नेणत्या 'बाळवशाला' घेऊन चालला होता.
" खाशा आऊसाहेबांची स्वारी बाळराजांच्यासह होळीचा मान राखण्यासाठी येते आहे." ही खंबर वाऱ्यासारखी होळीचौकात पोहोचली होती. हरखून गेलेल्या मावळ्यांच्या जमावात चैतन्याचे कसे उधाण उठले. रणहलग्यांनी टिपेच्या सुरांची तडतड घुमवायला सुरुवात केली.
निळो सोनदेव, प्रतापराव सिलीमकर, झुंजारराव मरळ, गोमाजीबाबा, सिदोजी थोपटे, अंतोजी आणि रायाजी अशा सरंजामात जिजाऊ आणि शंभूराजे होळीचौकात आले. मावळ्यांचा चंदेरी कालवा थांबला. रणहलग्यांच्या टिपऱ्यांची तडतड निसूर झाली. आभाळातून झिरपणारे चांदणेही खिनभर थिरावले!
शंभूराजाच्यासह जिजाऊ चौथऱ्याच्या खाशा बैठकीवर सुखावल्या. चौकातल्या हुडव्याचा मानकरी हाती पेटता चूड घेऊन मुजरा करीत मासाहेबांच्या सामने आला. अदबीने म्हणाला, “होळीचा मानाचा चूड धाकल्या राजांनी हुडव्याला द्यायला पायजे मासाव.'
जिजाऊंनी मान वळती करून शंभूराजांच्याकडे बघितले. शंभूराजे बैठकीवरून उठले. मासाहेबांच्या पायांना हात लावून ते चौकातल्या हुडव्याजवळ आले. मानकऱ्याने आपल्या हातातील चूड त्यांच्या हाती दिली. आपली नजर शंभूराजांनी हातातील चूडीच्या उसळत्या ज्वाळेवर क्षणभर रोखली. चूड अधिकच पेटून उठली!
'जय भवानी' गर्जत शंभूराजांनी होळीच्या लाकडी हुडव्याला चूड दिली. आगीची पाखरे आभाळाच्या रोखाने झेपावू लागली. हुडवा धडधडू लागला. तोंडाच्या हलग्यावर पालथ्या मनगटांच्या टिपऱ्या पडून घुमल्या! होळीने सूर धरला.
शंभूराजे बैठकीच्या चौथऱ्यावर येऊन बसले. नारळाची फळे पेटत्या हुडव्यात धडाधड फेकली जाऊ लागली. ती बाहेर काढण्यासाठी आगवेड्या, धाडशी मावळ्यांनी हुडव्याभोवती रिंगण धरले. एकेक निधडा हात बेधडक रसरस लागला. होरपळून मागे हटू लागला..
रोखल्या नजरेने जिजाबाई हुडव्याच्या चटचटत्या, लालपिवळ्या ज्वाळांकडे बघत होत्या. त्यांच्या मनात शिवाजीराजांचे विचार रिंगण धरून फिरत होते- "कुठं असतील
राजे? काय करत असतील ?
'मासाहेब..." शंभूराजांच्या आवाजाने त्या भानावर आल्या.
" काय बाळराजे ? "
" अशाच एका होळीसणाला आम्ही आबासाहेबांना विचारलं होतं.
"काय ?" "आबा, तुम्ही काढाल काय हुडव्यातील नारळ बाहेर म्हणून ?' मग काय म्हणाले ते ? ” जिजाबाईंनी उत्सुकतेने विचारले. 'म्हणाले- कोशिस करू!” शंभूराजांनी उत्तर दिले.
ऐकताना डोकीवरचा पदरकाठ ठीक करीत जिजाबाईंनी एक लांब निःश्वास सोडला. बाळराजांच्याकड़े बघत त्या म्हणाल्या, “शंभूबाळ, प्रसंग ठाकलाच तर तुम्हासही आणि आम्हासही ती कोशिस करगे पडेल!'
होळी पुनवरात चांदणे पेरत गडावर चढत होती. मावळे निखाऱ्यातील नारळ फळे हुडव्यात हात घालून बाहेर काढीत होते. होळीच्या मानाची सोनकडी शंभूराजे मासाहेबांच्या साक्षीने मानकऱ्यांना बहाल करीत होते. त्यांना किंवा जिजाऊसाहेबांना काहीच कल्पना नव्हती की बसनूर लुटून, गोकर्ण महाबळेश्वरावर शिवलिंगाचे दर्शन घेऊन नेमके आजच राजे कारवार बंदरावर उतरले असतील.
कारवारात टोपीकर इंग्रजांच्या वखारी लुटण्याचा राजांचा मनसुबा होता, पण शेरखान हा आदिलशाही सरदार फौजेनिशी होळीच्याच दिवशी कारवारात घुसला होता. त्याने पाच हजार होनांची खंडणी राजांना देऊन कारवार वाचविले होते. त्यांच्याकडून आलेले खंडणीचे पाच हजार होन थैलीबंद करून कारवार सोडताना राजे सरलष्कर नेताजींना म्हणाले, " आज शेरखानाने आमच्या होळीची शिकार घालविली !! "
कर्नाटक प्रांतीची लूट घेऊन राजे कारवार, भीमगडमार्गे राजगडावर आले. गडावर येताच त्यांना खबर मिळाली की, औरंगाबादेत शाहजादा मुअज्जमची भेट घेऊन मिर्झाराजे जयसिंग आणि पठाण दिलेरखान पुण्याच्या रोखाने कूच झाले आहेत. पावसाळी नदी क्षणाक्षणाला फुगावी तशी मिर्झाराजांची फौज फुगून ऐंशी हजारांवर गेली आहे. जव्हारचा राजा, अफजलखानाचा मुलगा फाजलखान, जावळीकर मोरे, देसाई, दळवी ह्या राजांच्या शत्रूंना, मित्र मानून, त्यांच्या मिळतील तेवढ्या जमेती पोटात घेऊन, ऐशी हजारांची हिरवी वावटळ चालून येत होती. ती येती प्रचंड लाट परतविणे शक्य नव्हते. थोपवून धरणे अशक्य होते आणि नुसते बघत राहणे तर केवळ असह्यच होते!..
बाराभावळाचे आघाडीचे गडकिल्ले आता बंदिस्त राखणे भाग होते. बालेकिल्ल्याच्या सदरेवर राजे चिटणीस बाळाजी आवजींना खलित्याचे मायने - मजकूर सांगू लागले. त्यांच्या उजव्या हाताच्या तर्फेला संभाजीराजे बसले होते. सदरबगल धरून मोरोपंत, कुडतोजी गुजर, येसाजी कंक, मानाजी भोसले, मुरारबाजी, नागोजी आणि बहिर्जी फर्जद, निराजीपंत, आण्णाजी दत्तो अशा मंडळींनी बैठकीचा फेर धरला होता... कुणीच काही बोलत नव्हते. राजे मजकूर सांगू लागले. बाळाजींच्या हातचे शहामृगपीस कुरकुरू लागले - अक्षरांचे मोती उमटू लागले.
" प्रस्तुत जासुदांनी समाचार आणिला की मिरजा राजा जयसिंग रजपूत बरोबरी दिलेरखान पठाण ऐशी हजार बाकी फौज घेवोन चालोन येतो आहे. तरी तुम्ही जेवढे जेवढे कदीम, जाणते असाल ते ते बरे सावध हुशारीने जागचे जागी असणे, पहारेकरी-मेटकरी जेवढे म्हणोन असाल ते रात्रीचा दिवस समजोन चखोट हत्यार बंद राहणे. दाणागोटा, गवतकाडी, बारुदगोळा यावरी बरे ध्यान राखणे. आम्ही खासे तुरंतच गडदाखल होत आहोत...
बाळाजींनी थैल्यांचे फासबंद आवळून त्या सिद्ध केल्या. राजांनी आपल्या प्रत्येक सरदाराला जरुरीच्या सूचना दिल्या. ते धीराने प्रत्येकाशी बोलत होते. पण त्यांच्या मुद्रेवरची चिंतेची काजळी प्रत्येकाला खोल कुठंतरी जाणवत होती. उभा राजगड जखडल्यागत झाला होता. महाराज सरदारांना देत असलेल्या सावध सूचना संभाजीराजे विस्मित मनाने ऐकत होते.
संभाजीराजांना घेऊन राजे सदरेवरून आपल्या महालात आले. मिझां राजा कोण प्रकारची चाल घेईल याचा विचार करण्यात ते हरवले होते. संध्याकाळची लांबट किरणे अजून बालेकिल्ल्यावर रेंगाळत होती. मंचकावर बसलेले बाळराजे अस्वस्थ फेन्या घेणाच्या राजांकडे एकनजर बघत होते. शेवटी न राहवून त्यांनी राजांना विचारले, "महाराजसाहेब, रजपूत म्हणजे काय ? "
राजांचे फेन्या घेणारे पाय तो प्रश्न ऐकताच जखडल्यासारखे झाले. तो प्रश्न राजांचे काळीज पार चिरत गेला होता. क्षणभर ते बाळराजांच्याकडे बघतच राहिले. मग धिम्या पावलांनी ते मंचकाजवळ आले. शंभूराजांच्या डोळ्यांत आपले डोळे खोल रुतवून दाटल्यासारख्या घोगरट आवाजात त्यांना म्हणाले, " रजपूत म्हणजे राजाचे पुत्र ! राजाचे फर्जद ! राज्य करणारे. पण ही फार जुन्या काळची बाब झाली! आता 'रजपूत' 'राजनंदे' झाले. नमकहिलाल चाकर झाले ! तुम्ही रजपूत आहात, आम्ही रजपूत आहोत आणि मिर्झा राजाही रजपूतच आहे!" आणि मग राजे कितीतरी वेळ शंभूराजांना रजपूत, राजपुताना, मिर्झा राजे, औरंगजेब, मोगलशाही याबद्दल बरेच काही सांगत राहिले. एक दीर्घ निःश्वास फेकता सोडून ते मंचकाजवळ गवाक्षाच्या महिरपीजवळ आले. महालाच्या रोपणनाईकाने अजून बैठकीत पेटते टेंभे चढविले नव्हते. राजांना उगाच आपली राजमुद्रा आठवली, "प्रतिपच्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता...'
मंचक उतरून राजांच्या पाठीशी देऊन संभाजीराजे उभे राहिले. त्या दोघा पितापुत्रांना परशूचा आकार घेत डुबतीला लागलेले सूर्यबिंब दिसत होते. शंभूराजांच्या मनात विचार घोळत होते, "आम्ही रजपूत आहोत. मिर्झा राजाही रजपूतच! कसा असेल तो मिर्झा राजा ? आबासाहेबांच्या सारखा ? छे! मग महाराजसाहेब त्याच्यासाठी एवढे चिंतेत पडलेच नसते !!'