राजे काही बोलत नव्हते. बाळराजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत मागून येत होते. त्यांना हे भुयार संपणार केव्हा असे झाले होते. त्यांनी मागून चालता चालताच राजांना विचारले, "महाराजसाहेब, हे भुयार संपणार केव्हा ?" बाळराजांचा आवाज भोवतीच्या फरसबंदी घुमटात घुमून उठला, “महाराजसाहेब, हे भुयार संपणार केव्हा ऽऽ?
त्या घुमत्या आवाजाने राजे क्षणभर जागीच खिळल्यासारखे झाले. मागे न बघताच म्हणाले, "शंभूबाळ, आमच्या मागून चालते या !! भुयारं कधीच संपत नसतात. चाल कधीच थांबत नसते !!” राजांचे धीरगंभीर शिवबोल भोवतीच्या फरसबंदीच्या घुमटात तसेच घुमून उठले, “शंभूबाळ, आमच्या मागून चालते या !!... " आणि राजे समोर तडक चालू लागले. त्यांच्या पायाबरहुकूम त्यांचा भोसलाई फर्जंद शंभो मागून चालू लागला !!
राजे कर्नाटक मोहिमेवर निघून गेले. नेहमीप्रमाणे. बाळराजांना सराव देण्यासाठी फरीगदक्याच्या मैदानात, कमर कसलेले गोमाजीबाबा पवित्रा धरून खडे ठाकले होते. शिरा तटतटल्यामुळे त्यांच्या पोटऱ्यांवर मांडचोळणा कचला होता. बुरणूस भरलेली, चामड्याची खोळ असलेली थाळीएवढी फरी त्यांनी डाव्या हाताने पुढे सरशी धरली होती. उजव्या हातातील दीड हात लांबीचा गदका नाचवीत ते समोर उभ्या असलेल्या शंभूराजांना म्हणाले, "हां, धरा म्हवरा धाकलं राजं नदर माज्या पायावं आन गदक्यावर ठिवा." गोमाजींचे पांढरे कल्ले क्षणभर लकलकले. मोहरा धरलेले पाय चढाईसाठी जमिनीत रुपले.
फरीच्या परजात चढविलेली मूठ क्षणभर घट्ट आवळून शंभूराजांनी उजव्या हातातील गदका पेलला. डावा पाय आणि फरी धरलेला डावा हात पुढे टाकून कमरेला सावध बाक देत त्यांनी पवित्रा घेतला. गोमाजींनी पुढे केलेल्या गदक्याला आपला गदका भिडवीत ऐटबाज सलामी दिली.
"जय भवानी ! " गर्जत गोमाजींनी चढाईसाठी गदका मागे घेतला. म्हातार्याचे डोळे लकलकत फुलू लागले.
"जय भवानीऽ!” गर्जत शंभूराजांनी गोमाजींच्या वाराचा अंदाज घेण्यासाठी अंग चोरले. फरीगदक्याचा 'घाई' हा मारगिरीचा प्रकार सुरू झाला. गोमाजी लगीत चौक फिरू लागले. इशारत देऊन चढाईचे ठरीव बार टाकू लागले. गुबगुबीत फरी आडवी टाकून शंभूराजे ते बार तटवू लागले. त्यांचे चपळ शरीर नागफण्यासारखे डुलू लागले. त्या दोघांना भवानीच्या राजगडाचे भान उरले नव्हते. त्यांच्या तापल्या शरीरावर घामाचे थेंब उठू लागले. गदका फरीला भिडताच 'धप, धप्' असे आवाज मैदानात उठू लागले.
'घाईच्या' चढाईत शंभूराजांनी गदका जराही अंगाला लावून घेतला नव्हता. गोमाजी त्यांच्या सावध नजरेवर मनोमन खूष होते. सरावाचा पहिला टप्पा संपला. 'हो s!' म्हणत गोमाजींनी थांबण्याची इशारत केली. कपाळावर थबथबलेला घाम तर्जनीच्या पन्हाळीने निचरा करीत ते म्हणाले, " वय जालं आता धाकलं राजं. अंग लगी घामेजतं! हां, ध्या बघू आता 'छूट!"
गोमाजींनी 'छूट' या चढाईचा पवित्रा घेतला! म्हाताऱ्याचे शरीर रानवाऱ्यासारखे झाले ! वार करायला ते आता सापडणार नव्हते. आणि ते कसे चालून येणार हे समोरच्या खेळ्याला कळणार नव्हते! 'छूट' हा चढाईचा प्रकारच 'बेछूट' मारगिरीचा होता ! गनिमाशी झुंज घेताना 'मारेन वा मरेन' या निधडेपणाने लढावे तसे हे हात होते. आता इशारत करून वार टाकायचे नव्हते. मन चाहेल तसे शत्रूला हूल देऊन त्याच्या ढिल्या अंगावर वार उतरायचे होते. त्यांच्या ढिलेपणाची गय करायची नव्हती. शंभूराजांनी फरी आडवी धरून गदका पेलला. आपल्या हातातील गदका उगाच डावा उजवा झुलवीत गोमाजी चपळ पायांनी इकडे तिकडे फिरू लागले. बाळराजांची गदक्यावरची नजर ढलती करण्यासाठी अंग लवते करून ते हूल भरू लागले. शंभूराजे गदक्यावर जोडलेली नजर हलवायला तयार नव्हते. तेही चाल हेरत सावध झुलू लागले.
" बाळराजं, वार कारीगर व्हनार हां! हुशार असा.” गोमाजी धीमेपणाने बोलले. नाही होणार! " नजर गोमाजींच्या हातातील गदक्यावरच जखडती ठेवून शंभूराजे निर्धाराने उत्तरले...
एकाएकी गोमाजींनी आपल्या हातातील गदका एकदम उंच उठविला आणि बाळराजांना गोंधळून टाकण्यासाठी नरड्याची घाटी फुलवीत 'हार हार 55 म्हादेव !" अशी अंगावर काटा उठविणारी जोरदम किलकारी दिली. त्या किलकारीने शंभूराजे बिचकले! त्यांची फरी आडवी टाकायची चुकली! वार डोक्यावर होणार म्हणून त्यांनी फरी डोक्यापर्यंत वर उचलली! आणि काय होतंय हे कळायच्या आतच गोमाजीच्या गदक्याचा जबरदस्त वार त्यांच्या छातीखाली आदळला !! त्या कळीसरशी सणकलेले बाळराजे कळवळून उठले.
एकदम हातातील गदका फेकून देऊन धावत जाऊन गोमाजींनी वार केल्या जागेवर आपला तळवा दाबून धरला. त्यांच्या थरथरत्या पांढऱ्या मिश्यांतून शब्द आले, 'तुम्हावं असा वार टाकताना जिवाला काय वाटतंया कसं सांगावं ? पर बेहुशार न्हाऊ नगा. हत्यार चालवायचं म्हंजी दिल तयार असाय लागतो. लढाईत ह्या परास लई मोटा गरादोळ उठतो. बाळराजं त्येनं कच खावून न्हाई भागायचं!" गोमाजींच्या इमानी डोळ्यांत पाणी उभे राहिले. त्यांचा हात बाजूला परता सारीत शंभूराजे कडवे बोलले, 'आम्ही कच खाणार नाही !! घ्या मोहरा गोमाजीबाबा !
पुन्हा 'छूट' ची मारगिरी करण्यासाठी पवित्रे घेण्यात आले. शंभूराजे छातीवरची कळ विसरून गेले. त्यांच्या डोक्यात डावपेचांच्या विचारांची घोडी दौडत होती. समोर गोमाजीबाबा आहेत याचा त्यांना विसर पडला. त्यांना फक्त गोमाजींच्या हातातील गदका आणि त्यांचे पाय दिसू लागले. सावध पाय टाकीत, गदका झुलवीत शंभूराजे गोमाजींना डावी-उजवी हूल देऊ लागले. समोरून त्यांच्यावर वार टाकणे अवघड आहे हे त्यांनी हेरले. ढिल्या अंगाने शंभूराजे क्षणभर डुलले आणि 'जय भवानीऽ' अशी बेभान किलकारी भरून ते डोळ्याचे पाते लवायच्या आत दोन छलांगीतच गोमाजीबाबांच्या थेट पाठीवर गेले. ओठ दाताखाली दाबून धरून त्यांनी गोमाजींच्या उघड्या पिंढरीवर गदक्याचा जोरदार वार उतरविला ! एक झरझरती कळ उठली. गोमाजींच्या पिंढरीकडून सर्रकन माथ्याकडे सरकली. आणि ओठांतून मात्र नकळत शब्द बाहेर पडले, "भले!" गोमाजींच्या पिंढरीतून कळ उठली होती आणि डोळ्यांत आनंदाचे अश्रू जमा झाले होते! गदका खाली टाकून ते बाळराजांच्या जवळ आले. कलकलत्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघून, त्यांचे खांदे मायेने थोपटीत म्हणाले, "आमची ही हाडं पार म्हातारी झाली बाळधनी, पर लई वार झेलल्यात आमी. चिवट झाल्यात आमची चमडी तुटता तुटायची नाही !! तुमचं धा वार अंगावं पडलं तर घा दागिनं चढलं अंगावं बाळराजं! " गोमाजी भरल्या नजरेने आपल्या धाकट्या राजांच्याकडे बघत होते.
" गोमाजीबाबा ऽऽ!" एकाएकी मैदानाच्या दरवाज्याच्या रोखाने साद धावत आली. गाड्याचा अंतोजी धापावत येत होता. गोमाजींच्या मनात पाल चुकचुकली. काळजात मासळी सरकली. अंतोजीची सादर कातरी होती. ऊर खालीवर होणाऱ्या, समोर उभ्या राहिलेल्या अंतोजीला त्यांनी हटकले, “का- काय जालं रं अंता ?'
"मासायबांनी बाळराजांस्नी घिऊन यायला धाडलं. आपलं... आपलं पंतकाका म्येलं !! "
" औं ऽ कोन ? " म्हणून टाळा वासताना गोमाजीबाबांच्या गलमिश्या थरथरल्या. ते अंतोजीकडे डोळे फाडून बघतच राहिले.
"डबीरकाका!" अंतोजी खालच्या मानेने पडल्या आवाजात म्हणाला.
अंतोजीने आणलेली खबर ऐकताना शंभूराजे फरी गदक्याचे घाई, छूटचे हात पार विसरून गेले. त्यांच्या हातातील गदका केव्हा घरंगळून पडला ते त्यांचे त्यांनाच कळले नाही. त्यांच्या भावुक डोळ्यांसमोर महाबळेश्वराच्या माथ्यावरचा तुलेचा सज्जा उभा ठाकला होता. अंगथोर रुपेरी पारड्यात बसलेले थरथरत्या मानेचे सोनोपंत डबीर त्यांना दिसत होते! दुसऱ्या पारड्यात झुकते झालेले आबासाहेब खणखणत्या सोनमोहरा ऑजळी ऑजळींनी सोडताना त्यांना दिसू लागले! पंतकाका बसलेले पारडे फरसबंदी सोडून आस्ते आस्ते वर उठताना दिसू लागले.
गोमाजीबाबांचे बोल शंभूराजांना, पारड्यात बसलेल्या डबीरकाकांच्या तोंडातून बाहेर पडल्यासारखा भास होत होता "आमची ही हाडं पार म्हातारी जाली पर लई लई वार झेलल्यात आमी!'
राजे बसनूरस्वारीवर गेल्याला एक महिना लोटला. खेळीपुनवेचा दिवस राजगडावर उजाडला! गडावरच्या मानकरी मावळ्यांनी कानंदखोरीत शोधतपास घेऊन ऐनाची सरळसोट, चखोट होळी तोडून ती वाजतगाजत गडावर आणली. होळी चौकात आंबवतीने नटलेली होळी खडी ठाकली.
पुनवेचा थाळ्याएवढा चंद्र बारा मावळाचे कातळकडे पार करून उगवतीबाहेर आला. झोपडाखोपटांत पोळी नि कटाच्या आमटीवर ताव मारलेले मावळे, मस्तकावर.. कंगणीदारं लाल पिळाच्या पगड्या चढवून होळीचौकात जमाव करू लागले. चौकात होळीचा लाकडी हुडवा रचण्यात आला होता. खाशा स्वाऱ्यांसाठी बैठकीचा चौथरा सिद्ध ठेवला होता. लोखंडी धावकड्यांना थरारून टाकीत रणहलग्यांची कातडी तडतडू लागली! ती रोमांचक तडतड गडावरून उतरून कानंदखोऱ्यात पसरून घुमू लागली. गडमाथ्यावर चांदण्याच्या दाट चंद्ररसाचे पाट वाहू लागले. अंगी निळाशार जामा घेतलेले, मस्तकी केशरी टोप चढविलेले शंभूराजे कमरेला आवळलेल्या जमदाडीच्या मुठीवर डाव्या हाताचा तळवा रुतवीत जिजाऊसाहेबांच्या खासेमहालात आले. होळीचौकातून वर्दी आली होती "खाशा स्वारीनं चूड - दिल्याशिवाय होळी पेटती होणार नव्हती. होळीचे खेळे खोळंबले होते!