कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ३७

 ****भाग २****


रिवाजाप्रमाणे लमानंतर आईचा गोंधळ घातला गेला. मंगल कार्याची धुंदळ सरली. कार्याला आलेली मावळे मंडळी गावोगाव पांगली. भोसलेकुळीची 'ठेव' म्हणून पिवळ्या येसूबाईंना घेऊन पिलाजीराजे शिर्के शृंगारपुराकडे परतले.


पौष मासाची अमावास्या तोंडावर आली. या अमावास्येला सुर्व्याला गिन्हाए पडणार' अशी बोलवा मावळ मुलखात उठली. प्रभाकरभटांनी पंचांग मांडून तिची • खातरजमा करून घेतली. त्यांनी राजांना धर्मशास्त्राचा सल्ला दिला की, "तीर्थक्षेत्री जाऊन वस्त्रदान, धान्यदान, सुवर्णदान करून ग्रास पडणाऱ्या नारायणाची शांती करावी. '


राजांनी त्यासाठी तीर्थक्षेत्र महाबळेश्वर मनी धरले. फार दिवस मनी असलेली एक इच्छा या निमित्ताने राजे पूर्ण करणार होते. आपल्या मातुश्री आऊसाहेबांची आणि चंदनखोडासारख्या, स्वराज्यासाठी झीज घेतलेल्या वृद्ध सोनोप्त डबिरांची राजे सुवर्णतुला जोखणार होते. त्यांच्या भारंभाराएवढे सोने दान करून सूर्याला ग्रासणाऱ्या राहू-केतूंना 'गिन्हाण सोडीचं' साकडे घालणार होते !


राजांच्या आज्ञा सुटल्या. केसो नारायण सबनीस आणि मुजुमदार निळो सोनदेव यांनी सोनमोहरांचे पेटारे हत्यारबंद धारकन्यांच्या पहाऱ्यात महाबळेश्वराच्या वाटेला लावले. प्रतापगडावरचे अजॉजी यादव महाबळेश्वराच्या शिवालयासमोर सुवर्णतुलेचा सज्जा उभारण्यासाठी पुढे गेले.


शुभयोगावर राजांनी जिजाऊसाहेब, बाळ शंभूराजे, पुतळाबाई, सोनोपंत डबीर आणि निवडक धारकरी यांच्यासह राजगड सोडला.


जिजाऊंना आणि सोनोपंतांना तुलादनाची कल्पना राजांनी दिली नव्हती. हटत्या हिवाळ्याचे साजरेपण अंगी मिरविणाऱ्या, गर्द, निळ्या वनराईत दडलेल्या तीर्थक्षेत्र महाबळेश्वरावर खासे मेणे ठाण झाले. हे स्थान 'शिवाचे' होते. निसर्गाने आपले. अवघे ' शिवपण इथे मुक्त हस्ताने उधळले होते.


राजांनी पुढे होत हातजोड देऊन मासाहेबांना मेणाउतार केले. पाठोपाठ पुतळाबाई, शंभूराजे मेण्यातून उतरले. सूर्य मावळतीला लागला होता. त्याच्या लांबट किरण फेकीत भोवतीचा परिसर देखणा दिसत होता. शंभूराजे भोवतीच्या मुलखांचे सुरूरपण बघताच हरखून गेले. त्यांच्या उरात कसलीतरी घालमेल उसळून उठू बघत होती. गरगर नजर फेकीत ते मिळेल तेवढे सारे डोळ्यांत सामावून घेऊ पाहत होते.

बाळराजांच्या छातीवरची कवड्यांची माळ लयीत पण वाढत्या चालीने वर खाली होऊ लागली. कानांतले सोनचौकडे डुलू लागले. ही कसली उलघाल आहे त्यांचे त्यांनाच उमगेना. जखडत्या नजरेने ते सभोवती नुसते बघतच होते! त्यांना काही तरी जाणवत होते, पण ते नीट पारखता येत नव्हते! खांद्यावर पडलेल्या हाताने आणि 'शंभूबाऽळ!' या सांदेने ते भानावर आले. समोर आबासाहेब उभे होते. ते हसत म्हणाले, "एवढं रोखल्या नजरेनं काय बघता आहात बाळराजे ? आम्ही दोन वेळा साद घातली. तुमचं ध्यान नव्हतं!"


शंभूराजे हसले. शिवलिंगाच्या त्या अवघ्या मुलखाच्या रोखाने हात फिरवीत म्हणाले, "आम्ही हे सारं बघत होतो महाराजसाहेब. हे डोंगर, हे आभाळ, पक्षी, झाड़ आमच्याशी बोलू बघताहेत असं आम्हास वाटलं!' 

राजे ते ऐकून गंभीर झाले. बाळराजांचा खांदा थोपटीत म्हणाले, "भाग्यवान आहात! झाडापेडांची बोलीभाषा कळायला योग्याचं किंवा कवीचं मन लागतं! फार थोड्यांना ते मिळतं! "


शंभूराजांनी आबासाहेबांच्या कपाळावरच्या आडव्या शिवगंधाकडे क्षणभर बघितले. राजे बाळराजांना घेऊन तुलादानाची सिद्धता नजरेखाली घालण्यासाठी सज्ज्याकडे जालले. महाबळेश्वरचा पुराणा डोंगरमाथा आपली कैक सालांची समाधी भंगवून त्या दोघांचे डोळाभर दर्शन घेत होता. त्याला एक 'शिवयोगी' आणि महाटबोलीच 'पहिला राजकवी' दिसत होता !! सूर्यग्रहणाचा तळमळता दिवस उगवण्याच्या खटपटीला लागला. पहाटस्नान घेतलेले राजे, पुतळाबाई, मातुश्री आऊसाहेब, सोनोपंत डबीर आणि बाळराजे यांच्यासह सुवर्णतुलेसाठी सजलेल्या सज्ज्याजवळ आले. पहाटमुहूर्तावर उपाध्यायांनी तुलेच्या अंगथोर, रुपेरी पारड्यांची सविध पूजा बांधली. मंत्रघोष उठू लागले.


जिजाबाईच्या शिवचरणांना हात लावून राजे अदबीने म्हणाले, "मासाहेब, चलावं.तुलादानासाठी पारड्यात बैठक घ्यावी.' जिजाबाईंनी क्षणभर राजांच्या डोळ्यांत पाहिले आणि त्या गहिवरल्या शब्दाने बोलून गेल्या, "आमची तुला कशापायी जोखता राजे ?"


त्यांच्या सतेज पायांवर जोडलेली नजर तशीच ठेवून राजे म्हणाले, “साक्षात सूर्यनारायणास पडणारं साकडं खुलं करण्यासाठी आपली नाही तर कुणाची तुला आम्ही जोखावी ? मासाहेब आमची ही इच्छा आहे. चलावं. " राजांनी हात आधार देत जिजाबाईंना तुलेजवळ आणले. आऊसाहेबांनी पारड्यावर कुंकू-हळदीची चिमटी सोडली. 'जगदंबे' असे हलकेच पुटपुटत मासाहेबांनी रुपेरी पारड्यात आपले उजवे सोनपुतळ पाऊल ठेवले! पारडे सज्ज्याच्या फरसबंदीला चिकटले. सदरेवर घ्यावी तशी बैठक मासाहेबांनी पारड्यात घेतली. मंत्रघोषांच्या गजरात तुलादानास प्रारंभ झाला. ओंजळी ओंजळींनी राजे आणि पुतळाबाई, झळझळीत सोनमोहरा रित्या पारड्यात सोडू लागले.

थोरल्या मासाहेबांचे पारड्यात बैठक घेतलेले आगळे रूप पाहून बाळराजांना मनोमन वाटत होते, "थोरल्या आऊसाहेब अशाच एका पारड्यात बसून राहाव्यात! छातीवरची कवड्यांची माळ ओळंबती सोडीत झुकणारे आबासाहेब असेच मासाहेबांच्या जोडीने मोहरांच्या ऑजळी दुसऱ्या पारड्यात सोडीत राहावेत! भोवतीचा पक्ष्यांचा चिवचिवाट आणि मंत्रांचा पवित्र घोष असाच जागता राहावा !! " मोहरा सोडीत असलेले पारडे हळहळू दबतीला लागले. मासाहेबांनी बैठक घेतलेले पारडे सज्ज्याची फरसबंदी सोडून आस्ते आस्ते चढतीला लागले. ते बघताना कृतार्थ झालेल्या राजांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू त्यांच्या दाढीवर केव्हा उतरले ते त्यांचे त्यांनाही कळले नाही. उगवती पार करून आलेला 'सूर्या' आपल्या कुलाची शान राखण्यासाठी आपल्या सोन-सतेज किरणांची ओंजळ मोहरांच्या पारड्यात सोडून मोकळा झाला ! मातुश्री आऊसाहेबांची तुला सर्वार्थानि सिद्ध झाली..

देहझीज सोसलेल्या सोनोपंत डबिरांचीही सुवर्णतुला राजांनी नंतर जोखली. राजांनी हस्तस्पर्श केलेली, जोखल्या तुलांच्या मोहरांची तबके दान म्हणून वाटली जात होती. ते दान स्वीकारून संतुष्ट झालेला लोकसमुदाय मुक्त कंठाने गर्जत होता- " दे दान सुटे गिऱ्हाण! दे दाऽन, सुटे गिऱ्हा ऽऽण !!"

तो संतोषल्या मनामनांचा घोष-गजर कानांवर घेत घेत राजे, शंभूबाळ आणि उपाध्याय यांच्यासह कृष्णा नदीच्या काठावर आले. मस्तकीचा टोप आणि अंगचा जामा त्यांनी एक तबकात उतरून ठेवला. कृष्णामाईच्या पात्राची पूजा करून कमरेला मांडचोळणा असलेले उघडे सतेज राजे पात्रात उतरले. गळ्याच्या घाटीएवढ्या पाण्यात येताच त्यांनी आपले निमुळते डोळे मिटले. तो सूर्यवंशी पुरुषश्रेष्ठ, ग्रास पडू घातलेल्या सूर्याला, कृष्णेच्या नितळ पाण्याने भावओंजळी अर्पू लागला. कृष्णा काठाला बसलेले शंभूराजे महाराजसाहेबांच्या सूर्यफुलासारख्या दिसणाऱ्या मस्तकाकडे एकनजर पाहत होते.