कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ३६

 रात्री सजल्या घोड्यावरून दोन्हो नवरदेवांची वाजतगाजत वरात निघाली. रणहलग्यांच्या तालावर कसबी पट्टेकरी हात फिरवीत वरातीसमोर चौक करू लागले. लेझमाचे ताफे खेळी करत नाचत चालले. वधूवरांवर सोनमोहरांचा सतका उधळला जाऊ लागला. उखळ्यांचे बार दणदणू लागले.


मध्यरात्रीनंतर देवदर्शन करून वराती परतल्या. गृहप्रवेश करणाऱ्या शंभूराजांची वाट, हात पसरते करून सखूबाईनी रोखून धरली ! आपल्या बंधुराजांना त्यांनी रक्ताची आठवण ठेवण्यासाठी सवाल टाकला, “बोला, तुमची मुलगी आमच्या घरी द्याल?

शंभूराजे गोंधळले! नेताजींनी त्यांच्या कानांशी तोंड नेऊन कुजबुजत त्यांना तोड सांगितली.


शंभूराजे हसत सखूबाईंना म्हणाले, " आली आमच्या घरी तर देऊ तुमच्या दारी ! " सखूबाईंनी वाट सोडली. शंभूराजांनी उंबरठा पार केला. त्यांच्यामागून खालच्या मानेने चालणाऱ्या राजाऊंनी डावा पाय पुढे सरसा करीत उंबरठ्यावरचे शीगभरले मावळी तांदळाचे माप लवंडते केले. भोसल्यांच्या उंबरठ्यात दाणेरास पसरली. सूनबाई म्हणून सुलक्षणी लक्ष्मीच्या पायांनी राजाऊंनी गृहप्रवेश केला.


कुलदेवतेचे दर्शन घेऊन वधू-वरांनी गणपतिपूजन केले. तांदूळ पसरलेले एक सुवर्गी तबक शंभूराजांच्या सामने आणण्यात आले. नव्या सूनबाईंचे नाव काय ठेवावे याची चर्चा झाली. जिजाबाईच्या महालातून वर्दी आली की, "आमच्या नातसूनबाईंचं नाव 'यशोदा' ठेवा. "


प्रभाकरभट्ट राजोपाध्यांनी शंभूराजांच्या बोटातील अंगठी उतरून ती त्यांच्याच हाताच्या चिमटीत दिली. आणि त्यांचा हात आपल्या हातांत धरून तबकातील तांदूळाच्या समृद्ध पडद्यावर अंगठीने नाव रेखले 'यशोदा'.


सारे लग्नविधी आटोपलेले शंभूराजे आपल्या संगती राजाऊंना घेऊन जिजाबाईंच्या महाली दर्शनासाठी आले. जिजाबाईच्या पाठीशी धाराऊ उभी होती.


भरल्या डोळ्यांनी जिजाऊ आपला लग्नसाज घेतलेल्या बाळराजांच्याकडे नजर जोड बघतच राहिल्या. पुढे होऊन शंभूबाळांनी थोरल्या आऊसाहेबांच्या पायांवर मस्तक टेकविले ! राजाऊंनी आपल्या मळवटीचे आडवे कुंकू आईसाहेबांच्या पायांना भिडविले. बाळराजे आणि राजाऊंना वर उठते करून आवेगाने बिलगते घेताना जिजाऊंना आपल्या स्वारींची याद आली. राजाऊची हनुवटी वर उचलून जिजाबाई जबानभर मायेने म्हणाल्या, “येसूS”. राजाऊंनी मान उचलून आऊसाहेबांच्याकडे बघितले. केवढी तरी अमाप माया त्यांना जिजाऊंच्या शांत डोळ्यांत दिसत होती.


बाळराजांच्या पाठीवरून हात फिरवीत जिजाबाई म्हणाल्या, “शंभूबाळ, धाराबाईचे पाय शिवा. ' ते ऐकताना गलबलून गेलेली धाराऊ बोलून गेली, “माजं कशाला जी ?'


तरीही पुढे होऊन बाळराजे-राजाऊंनी धाराऊच्या पायांना हात लावून तिला नमस्कार केला. त्यांना वर उठवून त्यांच्या कानशिलावरून बोटं फिरवून ती आपल्या कानशिलाजवळ नेत कटकन् मोडताना धाराऊने आशीर्वाद दिला. "ब्येस न्हावो माज्या वासरांनू ! "


शिर्क्याच्या राजस राजाऊ आता भोसल्यांच्या यशवंत 'यशोदा' झाल्या होत्या. जिजाऊसाहेबांनी मायेने 'येसू' म्हणून हाक घालताच ' यशोदेच्या' 'येसूबाई' झाल्या होत्या !

दर्शन घेऊन महालाबाहेर पडणाऱ्या शंभूराजांना डोळाभर बघताना शहाजी राजांच्या आठवणीने जिजाबाईंच्या मनी एक विचार येऊन गेलाच. 'बाळराजे, तुम्ही तुमच्या थोरल्या महाराजसाहेबांच्या सारखे दिसता. पण पण ते जसे आपल्या कबिल्याला- - आम्हाला पाठमोरे झाले तसे तुम्ही कधी पाठमोरे होऊ नका ! आमच्या येसूबाईंना कधीच अंतर देऊ नका ! गडावरच्या टाक्यात पोहणीस पडणे सोपे आहे पण पण संसाराच्या भवसागरात तरते राहणे कोण दमछाकीचे आहे! आई अंबा त्यासाठी तुमच्या हाती बळ देईल. श्रीसांब त्यासाठी तुम्हाला हिमतबंद करील!"

******