" होणारं चुकत नाही राजे. माणसाच्या हयातीचं माणसाच्या हातात काहीच राहत नाही. बाळराजांना फलटणात समोर बघताना आम्हाला कैकवेळा महाराजांची याद आली आणि एक गोष्ट मनाला भिडून गेली. आता बाळराजांचे हात पिवळे करायला पाहिजेत! घरात मर्तिक घडलं असता एक वर्षाच्या आतच ते व्हायला पाहिजे. नाहीतर शास्त्राप्रमाणं तीन वर्षं काही शुभकार्याला हात नाही घालता यायचा !! '
बजाजींचे बोल ऐकताना राजांचे मन खोल तळवटातून घुसळून उठले. ते बजाजी बोलत नव्हते. सईबाईच्यावरचा त्यांचा प्रेमा बोलत होता. राजांनी पडत्या काळात दिलेल्या थोर मनाच्या आधाराची जाण बोलत होती.
राजे क्षणभर बजाजींच्याकडे नुसते बघतच राहिले. 'शंभूबाळांचा विवाह !' ही नुसती कल्पना ऐकतानाही त्यांच्या राजकारणी देहातील 'आबासाहेब' मोहरून उठले होते. क्षणभर राजे औरंगजेब, त्याचे डाव, त्यावरचे प्रतिडाव हे सारे विसरूनच गेले ! त्यांच्या शिवसतेज डोळ्यांसमोर मुंडावळ्या बांधलेल्या शंभूबाळांची मूर्ती उभी ठाकली!
शांतपणे हसत राजे बजाजींना म्हणाले, “बरी बात काढलीत बजाजी या निमित्तानं तरी आमच्या मासाहेबांचं दुःख थोडं हलकं होईल. गड उतरण्यापूर्वी तुम्हीच ही गोष्ट जातीनिशी त्यांच्या कानावर घाला. "
ते ऐकताना बजाजीमामांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला, समाधानाने ते निरोप घेऊन राजांच्या महालाबाहेर पडले. त्यांच्याकडे बघताना राजांच्या हाताची सड़क बोटे अत्यंत हळुवारपणे छातीवरच्या जगदंबेच्या माळेतील कवड्यांवरून फिरू लागली. विचारात हरवलेल्या राजांच्या जागत्या, निमुळत्या डोळ्यांसमोर आंबराईचा रसवंत घेर असलेले शृंगारपूर उभे ठाकले! स्थांना दोनच मूर्ती दिसू लागल्या शृंगारपूरकर शिक्यांची कुलदेवता भावेश्वरी आणि आणि पिलाजी शिर्क्याची ईश्वरी भावांची राजस कन्या रोजाऊ जिऊ !!
राजांनी शृंगारपूरला थैलीस्वार पाठवून पिलाजी शिक्यांना गणोजी आणि राजाऊ- यांच्यासह टाकोटाक येण्यासाठी बलावू धाडलं. पिलाजीराव आपला कविला घेऊन दोन्ही मुलांच्यासह राजगडावर आले.
राजांनी वडिलधान्या जाणत्यांच्या साक्षीने सदर बोलावली. सदरेच्या एका तर्फेला चिकाच्या पडद्याआड राजांचा राणीवसा बसला. भरल्या सदरेत जिजाबाईंच्या तर्फेस बसलेल्या राजांनी पिलाजीराव शिक्यांना शब्द टाकला, “आमचे महाराज साहेब गेले... त्यांना एक वर्ष होण्याच्या आत धर्मशास्त्राप्रमाणे आम्हास आमच्या बाळराजांच शुभकार्य करणं आहे. तुमच्या घरची शोभा असलेल्या राजाऊंना आम्ही आमच्या सूनबाई म्हणून बघाव्या म्हणतो. त्यासाठी आम्ही सदरसाक्षीनं मागणं घालतो आहोत. तुमचा जो मनसुबा असेल तो साफ बोला.
राजांचे अदबशीर बोलणे ऐकून पिलाजींचे रांगडे काळीज भरून आले. एवढ्या जरोरीने राजांनी कशासाठी बलावू धाडले याचा त्यांना आता उलगडा झाला! पाणावल्या डोळ्यांनी पिलाजी जिजाबाई आणि राजे यांच्याकडे बघत बोलून गेले, "राजं, ही वळचनीची गंगा पार आड्याला न्यायची गोस्ट काडलीसा. तुमच्या पायाजवळ हुब न्हायाची लायकी न्हाई आमची! बाळराजांच्या साठनं लयाला पोर पायजे असा कवाबी हुकूम क्येला असतासा तर आनून पायावर घातली असती. या परास काय सोनं व्हनार हाय तिच्या जल्माचं ? " पिलाजी, राजांचे थोरपण नजरेआड न करता, कळवळून मनचे बोलले होते.
" नाही पिलाजीराव, तुमच्या आमच्याच घरची काय पण कुणाच्याच घरची मुलगी हे' घरधन' आहे. ते त्याच इतमामानं आणावं लागतं. तुमची मुलगी लयासाठी नव्हे तर आमच्या सूनबाई म्हणून आणण्यासाठी आम्ही शब्द टाकला आहे. तुमची गंगा वळचणीची नाही पिलाजीराव. ती इमानी रक्ताची स्वर्गाची गंगा आहे म्हणूनच आमच्या कविल्याकडची आमची कन्या नानीबाई तुमच्या गणोजीरावांच्यासाठी पदरी घ्या असं मागणी आम्ही आत्ताच घालतो आहोत! बोला. हा साटेलोट्याचा रिश्ता तुम्हास कसा वाटतो?" राजांनी हसून पिलाजींना सवाल केला.
जाणत्यांनी भरलेली सदर जाणत्या राजाकडे भारावून बघू लागली. ध्यानीमनी नसलेला दुसरा धक्का बसलेल्या पिलाजींनी काही न बोलता जी' म्हणून पगडी डोलाविली.
वर्दी पाठवून शंभूराजे गणोबी आणि राजाऊ नानीबाई यांना सदरेवर बोलावून घेण्यात आले. त्या चौघांनी भरल्या सदरेला मुजरा नमस्कार रुजू केले.
सदरबैठकीवरून उठून राजे शांत चालीने छोट्या राजाऊजवळ आले. हुजऱ्याने समोर पेश केलेल्या तबकातील साखर मुठीत घेऊन त्यांनी खाली मान घातलेल्या राजाऊची हनुवटी डाव्या तर्जनीने वर करून क्षणभर तिच्याकडे पाहिले. राजाऊच्या डोळ्यांत समोरचे राजे मावत नव्हते! सदरेकडे बघत राजे म्हणाले, "शृंगारपूरकर पिलाजीराजे शिर्के यांची कन्या राजाऊ आमचे फर्जद शंभूराजे यांच्यासाठी आम्ही सदरसाक्षीनं आणि मासाहेबांच्या आशीर्वादानं पक्की करतो आहोत.” राजांनी मुठीतील साखर राजाऊच्या तोंडात भरली. उपाध्यायांनी पुढे केलेल्या तबकातील कुंकू घेऊन त्याची आडवी चिरी राजाऊच्या कपाळी रेखली आणि राणीवशाच्या रोखाने एक निसटती नजर चिकाच्या पडद्याकडे दिली. राजाऊने वाकून राजांचे पाय शिवले.
पडद्याआडच्या राणीवशात क्षणभर कुजबुज उठली. राजाऊच्या तोंडी साखर भरण्यासाठी कुणी जावे यासाठी नजरेनेच जाबसाल झाले. सदर खोळंबली होती... चिकाचा आडपडदा दूर सारून सोनपुतळ रंगाच्या आणि तशाच काळजाच्या पुतळाबाई पदर सरसा धरीत सदरेवर आल्या. मासाहेबांना नमस्कार करून त्यांनी पुढे होत राजाऊंच्या तोंडी साखर भरली. वाकून नमस्कार करणाऱ्या राजाऊला औक्षवंत व्हा!" असा तोंडभर आशीर्वाद दिला ! पिलाजींनी आपल्या पत्नीसह नानीबाईंच्या तोंडी साखर सोडून त्यांचा मळवट कुंकवाने भरला. भोसले- शिर्के रक्तसंबंध पक्का झाला. दोन्ही मुली जिजाऊंना आणि सदरेला नमस्कार करून आत गेल्या. शंभूराजे आणि गणोजी जिजाऊंच्या शेजारी सदरबैठकीवर अदबीने बसले.
लग्नाच्या याद्या बाळाजी आवजींनी आपल्या गोमट्या हस्तलेखात पुऱ्या केल्या. कार्यासाठी मार्गशीर्षातील मुहूर्त धरावेत असे सर्वांच्या सल्ल्याने ठरविण्यात आले. सदरभर खारीक खोबऱ्याचे वाटप झाले. भोसले - शिर्क्याच्या रक्तसंबंधाचे साखरपुडे बांधले गेले. रात्री गडावर साखरपुड्याच्या सुग्रास जेवणाची पाने उठली.
" पिलाजी शिर्के राजाऊसह शृंगारपुराकडे परतले. मृगाने आपल्या पाणथेंबाच्या अक्षता मावळ मुलखावर उधळायला सुरुवात केली! मळवट भरलेल्या लाल नद्या दर्याच्या दर्शनासाठी दौडू लागल्या! आता चार-पाच महिने राजांचा मुक्काम राजगडावरच पडणार होता. शंभूबाळांच्या शुभमंगलाची सारी तयारी राजे जातीनिशी करवून घेऊ लागले. पुतळाबाईंच्या उत्साहाला उधाण आले होते. धाराऊचे गोंदले हात कुठले काम पडू देत नव्हते. प्रत्येक कारखान्यात फेरफटका टाकून जिजाबाई हर चीज नजरेखालून घालीत होत्या.
जरीशेल्याच्या गाठीने जखडबंद झालेल्या राजाऊंना पाठीशी घेऊन शंभूराजे आवासाहेबांच्या आशीर्वादासाठी खाली वाकले. राजांच्या रक्तसतेज पायांच्या सडक बोटांना हात लावून तो शंभूराजांनी आपल्या टोपावरून मागे नेला. आपले मुंडावळ्या मंडित कपाळ शंभूराजांनी आबासाहेबांच्या पायावर टेकविले. त्या स्पशनि राजांचे उभे अंग मोहरून उठले. पायधूळ घेणाऱ्या बाळराजांच्या आणि सूनबाईच्या मस्तकावर तळहात ठेवून राजे हलकेच पुटपुटले, "औक्षवंत व्हा ! येशवंत व्हा ! "
'झुकते होऊन राजांनी त्या दोघांना हळुवार उठते केले. लग्नसाज घेतलेल्या, टोपाच्या बळीत निसटत्या अक्षता अडकलेल्या शंभूराजांच्याकडे राजे दर्पणात बघितल्यासारखे बघू लागले. त्यांच्या मनाच्या तळवटातून सईबाईंची सावळी मुद्रा उसळून वर आली. त्यांचे शेवटचे बोल राजांच्या कानात घुमून उठले, “आमचे शंभूबाळ ... एकला जीव- पदरी घातला. आणि राजे क्षणभर स्वत:ला हरवल्यासारखे नवरदेव शंभूबाळांना " बघतच राहिले. खाली मान घातलेल्या राजाऊंच्याकडे बघताना राजांच्या मनात विचार येऊन गेला, " सई, एकला जीव म्हणून बाळराजांना आमच्या हवाली करताना ना तुमच्या ध्यानीमनी आले ना आमच्या की, एकट्या जीवाचा पावमाग घेत आणखी ऋणानुबंध असलेले जीव यायचे असतात !! आता यांना मनभर उदंड आशीर्वाद द्या.' जेवढ्या हलक्या हाताने ते छातीवरच्या कवड्यांना कुरवाळीत आले होते तेवढ्याच हलक्या हातांनी त्यांनी शंभूराजे आणि राजाऊ यांचे खांदे थोपटले !!