कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ३४

 किरणे कलतीला आली असताना फलटण नजरटण्यात आले. बजाजीराजांनी गाववेशीवरच भोयांना पालखी ठाण करण्याची आज्ञा दिली. एक स्वार पुढे धाडून चिरंजीव शंभूबाळ आल्याची वर्दी आपल्या वाड्याकडे पाठविली. निंबाळकरांचा निसूर असलेला वाडा ती खबर ऐकताच चैतन्याने जागून उठला..


बजाजींचे चिरंजीव महादजी, तुळोजी, कान्होजी आणि गोरखोजी खाजगीच्या कारभाऱ्यांना संगती घेऊन बाळराजांना सामोरे जाण्यासाठी गाववेशीवर आले. कारभाऱ्यांनी एक पायबांधलं जितं कोंबडं शंभूराजांच्यावरून उतरून दूर फेकून दिले. शंभूराजांनी आपल्या चारी मामेभावांची ऊरभेट घेतली.


आपले मामा बजाजीराजे आणि सारे मामेभाऊ यांच्यासमवेत बाळराजांनी बाणगंगा नदी ओलांडून फलटणात आपल्या मातुश्री आऊसाहेबांच्या गावठाणात प्रवेश केला.

आपला पडीव दगडांचा, चिरेबंदी वाडा नजरेत येताच बजाजी हात उंचावता करीत म्हणाले, “बाळराजे, पाहिलात तुमच्या आऊसाहेबांचा वाडा! " मामांचे ते बोल ऐकताना आपला उजवा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांना केव्हा नि कसा भिडला ते बाळराजांना कळलेच नाही !!


समोरच्या वाड्याची नजरेत साठवण करीत शंभूराजे साऱ्यांच्या बरोबर वाड्याच्या खिळेबंद, थोर दरवाज्यात आले. सुवासिनींनी आरती तबके फिरवून त्यांची ओवाळण केली. सोनमोहरांचा सतका त्यांच्यावरून उतरला. पायीच्या मोजड्या उतरून शंभूबाळांनी आपल्या आऊसाहेबांच्या वाड्यात पाऊल टाकले. त्यांची भिरभिरती नजर वाड्याचा कानाकोपरा टिपत होती. आपल्या छोटेखानी आत कोण प्रकारची घालमेल माजली आहे त्याची त्यांना नीटपणे उकल होत नव्हती.


"चला बाळराजे, प्रथम देवदर्शन करू.” बजाजी देवमहालाच्या रोखाने हात करीत म्हणाले. मामांच्या मागून देवमहालात जाऊन शंभूराजांनी देवदर्शन केले. बजाजींनी आपल्या कबिल्यातील साऱ्या स्त्रियांना देवमहालात बोलावून घेतले..


निंबाळकरांच्या त्या कबिल्यातील प्रत्येक स्त्रीच्या पायांना हात लावून वर उठताना शंभूराजे प्रत्येक चेहरा बारकाव्याने निरखत होते. तो सारा कबिला उजळ रंगाचा होता !! बाळराजांच्या कपाळी आठया चढल्या. त्यांना हवा असलेला 'सावळा रंग' कोठेच दिसत नव्हता. पाहिजे असलेल्या मनातील धूसर आठवणाऱ्या चेहऱ्याच्या माटाशी जुळता मिळता असा कुणाचाच चेहरा-मोहरा नव्हता!


हरवलेले काहीतरी मनोमन शोधू पाहणारे बाळराजे रात्रीच्या भोजनानंतर सुख व्हायच्या महालात आले. त्यांच्या संगती धाराऊ होती. तिने मंचकावरची बिछायत हात फिरवून ठीक केली. बाळराजांनी उतरून दिलेला मस्तकीचा टोप तिने चौरंगावरच्या सबकात ठेवला. बाळराजे मंचकावर लेटते झाले. पायगतीला येऊन धाराऊ त्यांचे पाय हलक्या हातांनी चेपू लागली. त्यांच्या डोळ्यास डोळा लागला आहे असे वाटताच धाराऊने त्यांच्या अंगावर शाल पांघरली आणि ती फरसबंदीवर अंथरलेल्या बिछायतीवर आडवी झाली. महालाच्या अंतरंगावर चिराखदानांच्या ज्योतींनी आपल्या मंद प्रकाशाची पिवळसर शाल पांघरती केली होती.


आपल्या गोंदल्या हाताची वळी करून ती उशासारखी डोक्याखाली घेतलेल्या धाराऊचा श्वास लयीत सुरू झाला; पण... पण मंचकावरचे बाळराजे तळमळत होते! जागेपाटामुळे त्यांना झोप येत नव्हती. ते सारखे कूस पालटत होते. त्यांच्या अंगावरची शाल केव्हाच बाजूला पडली होती! एकच एक विचाराचा बळजोर स्वार त्यांच्या मनाच्या तट्टावर मांड ठोकून बसला होता. चारी बाजूंनी तो कायदे आखडीत होता- लागणारी ओढ असह्य होत होती 'कशा... कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब ? " त्या एकाच सवालाच्या कैक घोडेटापा होऊन दौडू लागल्या" कशा कशा दिसत होत्या आऊसाहेब ? का का आठवत नाही त्यांचा चेहरा ? पाण्याबाहेरच्या बाळमाशासारखे शंभूबाळ तळमळू लागले. त्यांच्या काळजाची धडधड वाढू लागली. एकाएकी त्यांना पलीकडच्या दालनाच्या रोखाने कसलीतरी खडखड स्पष्ट ऐकू येऊ लागली. त्या दालनाच्या खिडक्यांच्या चौकटीची दारे थडथडत होती. बाणगंगा नदीच्या रोखाने दौडत आलेला वारेझोत सूंकार घुमवीत निंबाळकरांच्या वाड्यात बेरोख घुसला होता !!


तो सूंकार आणि त्याला धरून उठणारी दारांची थडथड पडल्या पडल्या ऐकताना बाळराजांच्या डोळ्यांसमोर एकामागोमाग एक स्त्रीमुद्रा गरगरत फिरू लागल्या. जिजाऊ, पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई, बजाजींच्या कबिल्यातील मामीसाहेब, पण. ... पण त्या साया मुद्रा सोनपुतळ वाणात उजळून निघालेल्या होत्या !! त्यांच्या तेजाने बाळराजे दिपून जात होते. आडोसा आसरा घ्यायला त्यांना 'सावळेपण' पाहिजे होते! मिटल्या डोळ्यांच्या हाताशी ते येत नव्हते म्हणून बाळराजांनी डोळे उघडले. सगळा महाल पिवळ्याधमक प्रकाशाने भरून गेला होता!


बाळराजांनी पुन्हा डोळे मिटले. त्यांच्या अंगचा जामा घामाने पुरता डबडबला होता. पलीकडच्या दालनातून वाढलेली थडथड आणि सूंकार येतच होते. घायाळ झालेले शंभूबाळ तळमळत होते. त्यांच्या अंगाखालची बिछायत सुरकुतली होती. 'आऊसाहेब ?' अशी मोठ्याने कंठ फोडून साद घालावी असे त्यांना वाटत होते. डोळे मिटून पालथे पडलेल्या त्यांच्या छातीखाली सापडलेल्या भवानीच्या माळेतील - कवड्यांचे श्वाससुद्धा घुसमटत होते! कोंडी-कोंडी दाटली होती. एकाएकी पाठीवर पडलेल्या हाताच्या स्पशनि ते केवढे तरी दचकले आणि खाडकन् मंचकावर उठून बसले. ती धाराऊ होती !! मूळची गौरवर्णी असली तरी हात, कपाळ, गळा गोंदलेला असल्यामुळे ती 'सावळीच दिसत होती !! तिला समोर पाहताच शंभूबाळ थरथरत बोलून गेले, 'धाराऊ 5, आऊसाहेब!' त्यांच्या दाट कुरळ्या केसांतून ममतेने आपली कुणबी बोटे फिरवीत धाराऊ म्हणाली, 'भिऊ नगा, म्या हाय न्हवं!' आणि तिने बाळराजांचे मस्तक आपल्या छातीजवळ बिलगते घेतले.


पलीकडच्या दालनातील दारांची थडथड आता निसूर झाली होती. वारेझोताचा सूंकार आल्या पावली निघून गेला होता. ते पलीकडचे दालन निंबाळकरांच्या वाड्यातील 'बाळंतिणीचे दालन' होते! कैक सालांपूर्वी त्याच दालनात सईबाईंचा जन्म झाला होता !! धाराऊला, शंभूबाळांना ते काही काही माहीत नव्हते. धाराऊ आपल्या पदराने बाळराजांच्या कपाळी दाटलेला घाम टिपू लागली.


 अंधारात निसूर झालेल्या फलटणला घेर धरलेली बाणगंगा नदी निराधार किनाऱ्याला आसरा देत संथपणे वाहत होती !

थोडे दिवस फलटणात मुक्काम करून बजाजीमामांच्यासह शंभूराजे राजगडावर परतले. या अवधीत कोंढाण्यावरून होणान्या तोफमारीने हैराण झालेल्या जसवंतसिंगाने कोंढाण्याचा वेढा हलवून हताशपणे औरंगाबादेची वाट धरली होती.


राजगड सोडून खासे राजे अहमदनगर-औरंगाबादेपर्यंतचा मोगलाई मुलूख जेर करून राजगडावर परतले होते. सुरत लूट जसवंतसिंगाची माघार, मोगलाई मुलखाची मावळ्यांनी केलेली मारझोड यांनी औरंगजेबाच्या दिल्ली दरबारची हवा तापू लागली. आपल्या या हालचालीचा नतिजा म्हणून औरंगजेब आता कोण मनसुब्याने पावले टाकील याचा विचार करीत राजे आपल्या महाली खिडकीच्या चौकटीजवळ पाठीवर हात बांधून उभे होते. त्यांची नजर गुंजवणीच्या वळणदार पात्रावर जखडली होती. हाताची सडक बोटे चळवळ करीत एकमेकांत पुन्हापुन्हा गुंतली जात होती. बजाजी भेटीला येत असल्याची मिळालेली वर्दीसुद्धा ते विसरून गेले होते !


राजांच्या महाली आलेले बजाजी राजांना पाठमोरे पाहून क्षणभर घोटाळले. त्यांना आपल्या येण्याचा सासूद लागावा म्हणून अदबीने म्हणाले, "आम्ही परतावं म्हणतो


राजे.' राजांच्या राजकारणी विचारांची धावणी तुटली. वळते होत ते बजाजींना म्हणाले,


'एवढ्या जरोरीनं निघणं करताहात बजाजी ? 'जायला पाहिजे राजे. मृग तोंडावर आहे. जाण्यापूर्वी एक बाब कानावर घालावी म्हणून तसदी दिली. ''तसदी कसली ? बोला.' राजे शांतपणे चालत बजाजींच्या जवळ आले.


'थोरले महाराज गेले ... ' म्हणत क्षणभर बजाजी शहाजीराजांच्या आठवणीने गप्प झाले