एरव्ही ताठ मानेने घोड्यावर मांड घेणारे राजे ढासळत्या मानेने आणि मनाने पुढे झाले. जिजाऊंच्या समोर गुडघे टेकून त्यांनी आपले शिवगंधी कपाळ झटकन् त्यांच्या मांडीवर टेकविले. गद्गद हलत, टोपावरच्या मेतीलगाला डावे-उजवे हिंदोळून टाकीत राजे स्फुंदून म्हणाले, " नका आऊसाहेब, आम्हास एकटे टाकून नका जाऊ! शंभूबाळांची हातजोड नका तोडू! आम्ही रायरेश्वरावर घेतलेली श्रींच्या राज्याची आण पुरी करणार आहोत. ते कोण बघणार ? तुमच्या बाळराजांचे शंभूराजे झालेले कोण पाहणार ? आजवर आशीर्वादांसाठी पायांना हात लावले. आज ही एवढीच भिक्षा मागण्यासाठी आम्ही तेच हात परडी म्हणून पसरतो आहोत !! आम्हास परते सारू नका! " राजांनी गर्दन उचलली. ज्या हातांनी, पेटून उठलेल्या राजांनी कैकवेळा 'भवानी' उपसली होती त्याच हातांची ओंजळ जोडून राजांनी ती सरळ जिजाऊंच्या समोर पसरली ! त्यांचे पाणथरलेले, सूर्यपट निमुळते डोळे मासाहेबांच्या डोळ्यांना जोडले गेले. जिजाऊंच्या तुळजाई डोळ्यांतून सुटलेले अश्रू टपटपत राजांच्या ओंजळीत उतरू लागले. त्यांच्या उष्ण स्पर्शाबरोबर राजांना वाटत होते की, 'या हरएक अनुथेंबासाठी एक एक जिंदगी कुरवंडून टाकावी !!
राजे असे पेश येतील हे ध्यानीमनी नसलेल्या जिजाबाईंचा बांधला निर्धार डायाडौल झाला. त्या घोटाळल्या. राजांनी पसरलेली ओंजळ आपल्या चुडाभरल्या हातांनी आवेगाने बंद करीत त्या म्हणाल्या, "नाही- राजे, हात पसरू नका! तुमच्या हातांची परडी आई अंबेनेच आपल्या हातांनी भरली असता आम्ही तिच्यात काय घालावं ? - आम्ही - आम्ही थांबू... फुटल्या कपाळानेसुद्धा थांबू. या राज्यासाठी! तुमच्यासाठी ! बाळराजांच्यासाठी! तुमच्या पाठीवर पडणाऱ्या संकटात आमच्या जाण्याने आम्ही " आता भर नाही घालणार!" मासाहेबांनी डोळे पुसले आणि डाव्या हाताने सतीची वाणे परती सारली !!!
जिंकल्या गडाच्या नगारखान्यावरच्या चढत्या निशाणासारखे राजांचे मन उभारून आले! तरीही त्यांचे मन शहाजीराजांच्या आठवणीने तडफडत होते चढला निशाणाच्या तडफडीसारखे !!
हे सगळे दाटल्या कंठाने खाली मान घालून ऐकणाऱ्या पुतळाबाई एकाच विचाराने जखडबंद झाल्या होत्या, 'सती जायला निघालेल्या मासाहेबांना आपले मन बांधताना कोण कष्ट झाले असतील!'
हे सारे भरल्या उराने समोर बघताना बाळराजांना दोन गोष्टी कळून चुकल्या होत्या की, 'आबासाहेबांचे डोळेही पाणावतात! आणि आम्ही मानतो समजतो त्याहून थोरल्या आऊसाहेब केवढ्यातरी 'धोर थोर' आहेत !! '
शहाजीराजे गेले ही खबर मावळमुलखात पसरताच राजांच्या भावकीतील मंडळी राजगडावर आली. त्यात शंभूबाळांचे मामा फलटणकर बजाजीराजे निंबाळकर आले होते. नातेबंधातल्या सर्व मंडळींसमोर राजांच्या मस्तकाचे मुंडन झाले. उतरल्या केशसंभाराच्या मस्तकाने आणि जडावल्या मनाने राजांनी शहाजीराजांची दिवसक शास्त्रयुक्त विधींनी पार पाडली.
ते विधी समोर बघताना शंभूबाळांची एकच एक कोशिस चालली होती. कधीच न बघितलेल्या आपल्या थोरल्या महाराजसाहेबांची मूर्ती कल्पनेने ते मनोमन रेखू बघत होते! पण ते साधत नव्हते! कितीही कोशिस केली तरी त्यांच्या मनासमोर मूर्ती उभी ठाकत होती ती आबासाहेबांचीच !
शेवटी एके दिवशी जिजाऊंच्या महाली त्यांची पायधूळ मस्तकी घ्यायला आलेल्या शंभूबाळांनी त्यांना विचारले, 'कसे... कसे दिसत होते आमचे थोरले महाराजसाहेब थोरल्या आऊ ?'
भरल्या डोळ्यांनी बाळराजांकडे बघताना कधी नव्हे ते जिजाबाईंना आज प्रथम भावून गेले की, 'शंभूबाळांचा तोंडवळा थेट आमच्या स्वारीसारखाच आहे !! नाक-भुवयांची तशीच ठेवण, कपाळाची तशीच भरदार आडवी मांडण आणि आतबाहेर सारख्याच साफ असलेल्या, रानभेरी डोळ्यांच्या बाहुल्यांचे तसेच साफ दर्पण ! "
बाळराजांना आवेगाने जवळ घेताना जिजाऊंना म्हणावेसे वाटले की, 'शंभूबाळ, तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराजसाहेबांच्या सारखेच दिसता.' पण त्या काहीच बोलल्या नाहीत. प्रेमभराने त्यांनी बाळराजांचे खांदे पकडले आणि त्यांच्या नितळ डोळ्यांत बघताना जिजाबाईंना आपल्या हयातीच्या हरवलेल्या कैक पायवाटा त्यात दिसू लागल्या!!
बजाजीमामा फलटणला परतण्यापूर्वी मनची एक इच्छा राजांना बोलावी म्हणून • त्यांच्या महाली भेटीसाठी आले. भेट-मुजरा रुजू करून ते राजांना म्हणाले, "आम्ही फलटणला परतावे म्हणतो राजे. इजाजत होईल तर संगती बाळराजांना घेऊ. त्यांना तेवढाच कुटुंबपालट होईल. कसं करता ?
बजाजींच्याकडे बघताना राजांना सईबाईंची आठवण झाली आणि जाणवून गेले की, 'शंभूबाळांनी आपले आजोळ पाहिलेच नाही. आम्ही आमच्या आजोळाला- सिंदखेडला पारखे झालो. बाळराजांचं तसंच व्हायला नको!' क्षणभर विचारात हरवल्यागत थांबून राजे बजाजींना म्हणाले, " जरूर घेऊन चला बाळराजांना बजाजी. पण मासाहेब काय म्हणतात ते बघा. गड सोडताना बरोबर धाराऊ आणि अंतोजी रायाजीला घ्या. हत्यारबंद धारकन्यांची शिबंदी संगती ठेवा. तुम्ही घरची माणसं. तुमचा काळीजगुंतवा आम्ही जाणतो. पण बाळाराजांना परते पाठवताना तुम्ही जातीनिशी बरोबर असा."
* त्याची फिकीर नसावी राजे. उरात रक्ताची जाग आणि डोळ्यांत तेल ठेवून खासे आम्ही हमेशा त्यांच्या बरोबर राहू.' राजांनी होकार दिल्याने बजाजींना फार समाधान वाटले. फलटणचा आपला कबिला शंभूबाळांना बघताच कसा खुषनिहाल होईल याचे चित्र मनाशी रेखीतच ते राजांच्या महालाबाहेर पडले.
जिजाबाईंची संमती मिळताच बाळराजांच्या जाण्याची सगळी तयारी झाली. शुभदिवशी वाटचालीची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध झाली. जिजाऊंचा, राजांचा आणि राणीवशातील सगळ्या मासाहेबांचा निरोप आशीर्वाद घेतलेले बाळराजे राजगडाच्या सदरमहालाबाहेर पडले. त्यांच्याबरोबर धाराऊ आणि तिचे दोन मुलगे अंतोजी-रायाजी चालले. बाळराजांना निरोपाची पायसोबत देण्यासाठी खुद्द राजे त्यांचा हात हातात धरून पद्मावती माचीपर्यंत आले. राजांच्या पायांना हात लावून बाळराजांनी एकदा त्यांच्याकडे पाहिले. "या. सांभाळून असा.” बाळराजांचे खांदे थोपटीत राजे म्हणाले.
शंभूबाळ पालखीत बसले. पाठोपाठ धाराऊ पालखीत चढली. भोयांनी खांद्यावरचे भोईपट हातांनी ठाकेदीक करून पालखीला खांदे दिले. पालखी राजगड उतरू लागली. तिच्या दोन्ही तर्फेने हातात तळपते नंगे तेगे पेलून तरणेबांड रायाजी अंतोजी चालले. शेकडो निवडक पटेकरी कमरेच्या हत्यारांच्या मुठीवर आपली दमदार बोटे रुतती धरून पालखीमागून चालले. आदिलशाही बाकदार किमॉश डोक्यावर असलेल्या. बजाजीमामांनी राजांची छातीला छाती भिडवून भेट घेतली. डोळ्यांनीच राजांना 'फिकीर नसावी' असा भरोसा दिला आणि तेही पालखीमागून चालले. पालखी नजरेआड होईपर्यंत राजे स्वतःला हरवल्यागत तिच्याकडे एकनजर बघतच राहिले. सईबाईची आठवण देणाऱ्या बाळराजांच्या आजोळी चाललेल्या पालखीकडे बघताना राजे मनातील सईबाईना म्हणत होते, 'आमच्या मुलखात आलेल्या जगदंबेच्या मूर्तीचं दर्शन घेणं तुम्हास घडलं नाही. कधी शंभूबाळांना घेऊन तुम्हास आपल्या माहेरगावी - फलटणला जाणं साधलं नाही. तुमच्या अंतसमयी तुमची आमची भेटी झाली नाही. नेहमी दूर देशी असलेले आमचे महाराजसाहेब असेच शिकारीचे निमित्त करून कायमचे दूर निघून गेले. सई माणसांचा हा गुंता उकल होण्यासारखा नाही. तरीही एकला जीव पदरी घातला!' म्हणून तुम्ही शंभूबाळांना आमच्या हवाली केलंत! जेवढं साध्य होईल तेवढं आम्ही त्यांच्यासाठी करतो आहोत, करणार आहोत. पण पण या दुनियेत - आलेला हरएक जीव एकलाच असतो. स्वतःच्या आजोळास तो कायमचा पारखाच झालेला असतो!