कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग ३२

 जी पावले सदा डोळ्यांआडच राहिली त्यांचा माग घेत जाण्याचा निर्धार जिजाबाईंनी केला. मातुश्री आऊसाहेब सती जाण्याची तयारी करू लागल्या! उभा राजगड गडबडून गेला. आपल्या खाजगीच्या कारभाऱ्याला जिजाबाईंनी सतीची सूपवाणे सिद्ध करण्याची आज्ञा दिली. राजांच्या राणीवशात कल्लोळ माजला. एकाही राणीत जिजाबाईना रोखण्याची हिंमत नव्हती. आपल्या महालाच्या बंद दरवाज्याआड हिरवे नेसवाण अंगावर चढविलेल्या, हिरवा चुडा हातभर भरलेल्या, मळवटावर भरगच्च आडवे कुंकू घेतलेल्या जिजाबाई फरसबंदीवर बसल्या होत्या. मोकळ्या झालेल्या माठासारख्या ! त्यांची नजर शून्यात हरवून गेली होती. राजे सुरत लुटून परतीच्या वाटेवर होते.


राजगडावर एकच स्त्रीमन जीवघेण्या अस्वस्थतेने पुरते पुरते सैरभैर झाले होते. पुतळाबाईंचे. शंभूबाळांना संगती घेऊन त्या जिजाबाईंच्या महालाच्या मिटल्या दरवाज्यासमोर आल्या आणि त्यांनी बाळराजांना हाताने इशारत केली. 'थोरल्या आऊसाहेब 5' पुढे होत मिटल्या दरवाज्यावर हाताने हलकेच थाप देत बाळराजांनी साद घातली.


'आम्ही आहोत- शंभूबाळ. दरवाजा खोलता ?” शंभूबाळांनी दरवाज्याजवळ तोंड नेत जिजाऊंना दिललगाव बोलात विचारले. ते थोडा वेळ थांबले पण आतून दाद आली नाही.


'थोरल्या आऊ 5, दरवाजा खोला. नाहीतर डोकं आपटू आम्ही दरवाज्यावर ! खोला, आऊ 5 दरवाजा खोला.' बाळराजे दरवाज्यावर थडाधड थापा देऊ लागले.


जिजाबाई थरारल्या. 'खरंच बाळराजे दरवाज्यावर डोकं आपटायलाही अनमान करणार नाहीत!' या विचाराने त्यांचा सारा बांधला निर्धार डायाडौल झाला. कसंबसं उठतं होत त्यांनी दरवाजा खोलला. हिरव्यागर्द रानात वाट धुंडाळताना दमगीर झालेल्या आणि शेवटी थकल्या पायांनी एका खोल कड्याच्या तोंडावर आलेल्या गायीगत त्यांची स्थिती झाली होती !!


झटक्याने पुढे होत त्यांना मिठी घालत बाळराजांनी मान वर उचलली. त्यांच्या टोपातील मोतीलग मागे ओळंबली. डोळ्यांतून मोती ओघळत असताना ते बोलले. बालभुत्याने जगदंबेला बोलावे तसे! 'तुम्ही तुम्ही आम्हास सोडून जाणार थोरल्या आऊसाहेब ? आम्ही आम्ही येणार तुमच्या संगती !! ' -ते ऐकताच जिजाबाईंचा ऊरबंद केलेला सारा कढ फुटून- उमळून आला. वाकून बाळराजांना मिठीत घेत जिजाऊ गद्गद हलत स्कंदू लागल्या. त्यांच्या डोळ्यांतून उतरणारे अश्रुथेंब बाळराजांच्या टोपातील मोतीलगावरून ओघळत त्यांच्या जाम्यात मिसळू लागले.


" आऊसाहेब, आमचे आबासाहेब येईपर्यंत कुठकुठंच जाऊ नका!" बाळराजांनी साकडे घातले. ओसरते हुंदके आवरताना जिजाबाईंनी मान डोलावली. सती जायला निघालेल्या आऊसाहेबांना राजांची स्वारी येईपर्यंत रोखते करण्यात येश घेतलेल्या बाळराजांच्याकडे ममतेने बघत पुतळाबाईंनी आपल्या पापणीकडा पदराने फुलल्या केल्या! 

सुरत लुटून राजे राजगडाच्या पायथ्याशी आले. सोने, चांदी, रत्ने, मोती त्यांच्या गोणी लादलेले विजयी घोडदळ त्यांच्या पाठीशी होते. पण नेहमीसारखे त्यांना सामोरे -येण्यासाठी कुणीच गड उतरून आले नव्हते. राजांची उजवी भुवई कमानबाक घेत राजसंतापाने वर चढली. घोड्यावरूनच त्यांनी आपली नजर उचलून राजगडाला जोडली. पद्मावतीच्या निशाण चौथऱ्यावरची निशाणकाठी भुंडी बघताना मात्र त्यांचा राजसंताप कुठच्या कुठे गेला. चढली भुवई क्षणात पडली. त्यांच्या विजयी मनाच्या उभार घोड्याला शंकांच्या असंख्य लगामांनी क्षणात जखडून टाकले. त्यांच्या धीराच्या, निधडेपणाच्या गोणी कुणीतरी आपल्या काळ्या केसाळ हातांनी क्षणात आवळून टाकल्या. कपाळीचे शिवगंध आक्रशीत राजे पायउतार झाले. पालखीत बसून राजगड चढू लागले. पालखी पाली दरवाज्यापार होताना कधी नव्हे ती गडचढीची नौबत खामोश झालेली त्यांना जाणवली. मनात कुशंकाच कुशंका घर करू लागल्या. सारे महाल मागे टाकीत राजे जिजाबाईंच्या महालासमोर आले. सुरतेच्या कैक अन्यायी मुजोर धनिकांच्या वाड्याहुड्यांचे दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या राजांनी जिजाऊंच्या महालाचा बंद दरवाजा लोटला. अत्यंत थरथरत्या हाताने ! आत फरसबंदीवरच्या बिछायतीवर सतीवेष घेतलेल्या जिजाबाई बसल्या होत्या. त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बाळराजे बसले होते.


दरवाज्याच्या कुरकुरीमुळे मान वर केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसताच उभ्या राजगडाचेही काळीज पिळवटून निघावे असा कंठ फोडला- 'शिवबा!! आमचं कपाळ फुटलं !! तुमचे महाराजसाहेब गेले !!' भूकंपाने सर्वोदार सोशिक भुई थरथरते. तशा जिजाबाई थरथरू लागल्या.

राजांना उभ्या अंगावर आपल्या शिसाचा रस ओतल्यासारखे झाले. दरवाज्यातच पाय जखडबंद झालेल्या राजांनी डोळे मिटत आपल्या बाकदार नाकाचा गड्डा उजव्या हाताच्या चिमटीत धरला. त्यांच्या मिटल्या डोळ्यांत शहाजीराजांची मूर्ती उभी ठाकली. तिचे पाय धूत त्यांच्या उरातले दुर्मिळ राजअश्रू दाढीवरून घसरून छातीवरच्या कवड्यांना जाब विचारीत जाम्यावर उतरू लागले. त्या वीरपुरुषाचे भोसलाई राजमन पाझरत होते. ओघळणारे अश्रुलोट महाराजसाहेब शहाजीराजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या ठशांचा माग घेत धावत होते. भरल्या नजरेने राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. अश्रूंच्या सफेद आडपडद्यातून त्यांना एक पुसट हिरवा उभा रंगपट्टा दिसू लागला ! त्यांच्या उभ्या अंगावर सर्रकन काटाच उठला.

कधी नव्हे ते हिरवे नेसवाण आऊसाहेव का नेसल्या?' हा शक उराच्या तळवटातून उसळून येताच, चारी पायांना दातेरी आकडेचाप लावलेला ताकदजोर हत्ती कळवळून उठावा तसे राजे कळवळून उठले. तर्जनीने आपल्या पापणीकडा झटकन् निपटत्या करीत राजे पुढे सरसे झाले. सूपवाणांकडे हात करीत त्यांनी जिजाबाईंना थरथरत विचारले, "मासाहेब, हे काय करताहात् ? "

"जिथं स्वारी तिथं आम्ही! आम्ही जाणार राजे- चितेच्या आगभरल्या मेण्यातून आम्ही तुमच्या महाराजसाहेबांच्या पायांशी जाणार!! आमच्या फुटक्या हातांनी आम्ही सतीवाणे देणार!" उभ्या हयातीत कधी बोलल्या नाहीत अशा जिजाऊ पिळवटून बोलल्या. निर्धाराने बोलल्या .

ते ऐकताना आपले सारे दौडते राजेपणच कुणीतरी उचलून चितेवर चढवीत आहे असे. राजांना वाटले. पडल्या गडाच्या नगारखान्यावरचे निशाण उतरावे तसे राजांचे राजेपण क्षणात उतरले गेले. उरला फक्त जिजाऊंशी रक्तसंबंध आणि काळीज गुंतवा असलेला 'फर्जद शिवबा'! बंगरूळ सोडून मेण्यातून पुण्याच्या बरड जहागिरीत आऊसाहेबांच्या संगती आलेला, त्यांचा मायाभरला हात पाठीवर घेत पुण्यात नांगराच्या खुंटाळीला आपला हात घालणारा, त्यांच्या शिवसतेज हाताने आपल्या कपाळी शिवगंध रेखून घेणारा 'शिवबा ! केवळ शिवबा !