कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग २८

 राजगडावर कदरेच्या सदरेसाठी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळो सोनदेव, नेताजीराव, येसाजी अशी मंडळी जमली होती. सदरबैठकीवर राजे, जिजाऊ आणि शंभू सुखावले. राजांनी हाताने इशारत करताच सारी मंडळी बिछायतीवर बसली. भंडारा उधळून राजांनी मनसुबा खुला केला-

" आमच्या कारभाराच्या कानुजाबत्यात काही फेर करणे आहे. ही सदर आम्ही त्या कारणे बोलावली. शास्ताखान पुण्यात तळ टाकून दौलतीच्या उरावर असता कारभाराचा गाडा हरबाबीत सावधहुषार असणे हिसाबी आहे. आम्ही ज्या ज्या असामींचा कसकानोसा मनी धरला आहे त्यांचा मरातब करून त्यांना सल्ला म्हणून मनची बात बोलू. हे राज्य श्रींचे. आम्ही श्रींचे भुत्ये म्हणोन एका हाती पोत आणि दुसऱ्या हाती पट्टा घेतला आहे. जे अंगेजणीने अवघियांच्या पाठबळावर आम्ही पैदा केले ते आबादान करून त्याहून अधिक राज्याचा घेर कैसा वाढेल याची चिंता सान्यांनी करणे आहे.


ज्यांचा आम्ही आज मरातब करतो आहोत त्यांनी बरे ध्यानी घरावे की पाठीवर मायेची थाप भरली तर धावणीचे मुके जनावरसुद्धा इमानाची स्वारीसंगत देते! मायेचा एक बोल दिला तर आमचा मावळा उभं काळीज पायावर टाकण्यास रजानंद होतो.


नवे राज्य उभे करणे कठीण. त्याहून जतन करणे महाकठीण आणि वाढीला लावणे तर महामुश्किल! हे देवाधर्माचे राज्य साऱ्यांनी तोलून धरिले पाहिजे! या राज्यांसाठी जे कामी आले त्यांची याद जागती ठेवून त्यासाठी हिमतीने कस्त केली पाहिजे !


हाती सत्ता आली की माणूस बिघडणे बघतो. अधिक सत्ता आली की माणूस अधिक बिघडण्याचा खतरा असतो. अधिकार हे बंधन घालणान्या लगामासारखे असतात. त्याचा कोणाही अश्रापाच्या पाठीवर ओढणेचा कोरडा होणे वाजवी नाही !


- आम्ही तुमचे गुण पारखतो आहोत. तुम्ही आमच्या मावळलोकांचे गुण पारखले पाहिजेत! लहानथोर साऱ्यांनाच हातजोड देऊन, बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे! अवधियांस कार्यों लावून जाणते राजकारण उभे केले पाहिजे ! "


आबासाहेबांचे हे सारे बोल शंभूराजे एकचित्त होऊन ऐकत होते, मनी साठवीत होते. राजे बोलता बोलता उभे राहिले. त्यांनी आपल्या खाजगीच्या कारभाऱ्यावर नजर जोडून इशारत केली. एक मोठे तबक घेतलेल्या हुजऱ्यासह कारभारी राजांच्या तर्फेला पेश झाला.

मोरोपंत पिंगळ्यांच्यावर नजरेचा मोहरा धरून राजे बोलले- "मोरोपंत, सदरेसामने या!

मोरोपंत लगबगीने उठले. उपरणे सावरीत ते राजांच्या समोर आले. मुजरा घालून, हात बांधीत, खालगर्दनीने अदबीत राजांच्या समोर उभे राहिले. राजांनी हुजन्याच्या हातातील तबक तले जरीच्या नकसदार काठाचे सफेद उपरणे उचलले. मोरोपंतांच्या खांद्यावर ते चढवून सदरेकडे बघत राजे म्हणाले, " आजपासून मोरेश्वर निळकंठ पिंगळे श्रींच्या राज्याचे पेशवे! आम्ही राज्यावर चालून येणारा गनिम आमच्या डोळ्यांनी पारखू आणि त्यास नतिजा देऊ. राज्यातील " कारभार पंतांच्या जागरूक डोळ्यांनी बघू!'

मोरोपंत गहिवरून गेले. त्यांनी वाकून राजाच्या पायांना हात लावून तो आपल्या मस्तकाला टेकविला. त्यांना खांद्याला धरून वर उठवीत राजांनी त्याच्या छातीला छाती भिडवीत त्यांची ऊरभेट घेतली. पंतांनी जिजाऊंना आणि शंभूबाळांना मुजरा घातला.


मोरोपंतांची मुजुमदारी राजांनी निळो सोनदेवांना दिली. आण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांना सुरनिसीची वस्त्रे बहाल केली. 'पंडितराव' हे धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानासाठी नवे पद निर्माण करून ते रघुनाथभट्ट यांना दिले. कदरेची ही सदर उठण्यापूर्वी राजांनी नेताजी पालकरांना सुपे भागात धामाधूम घालणाऱ्या नामदारखानाचा बंदोबस्त करण्याची कामगिरी जोडून दिली. सदर उठली. " शास्ताखानास कोण हुत्रराने शास्त द्यावी" याचा विचार मनाशी झुंजवीत राजे आपल्या महालाकडे निघून गेले. जिजाऊंच्या संगती चालणारे शंभूराजे मात्र एकाच बाबीला मनात घोळवीत होते- “ आबासाहेब केवढे साजरे बोलतात! बसल्यास " उठता उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे !! "

हुकुमाप्रमाणे नेताजीराव फौजबंद होऊन सुप्याजवळ नामदारखानाच्या फौजेवर तुटून पडले. हातघाईची चकमक उडाली. जोरावर असलेल्या खानाबरोबर नेताजींच्या शिबंदीचा निभाव लागला नाही. या चकमकीत खासे नेताजीच वर्मी जखमी झाले. त्यांनी माघार घेतली. नामदारखान आणि सरफराजखान नेताजींच्या पाठलागावर पडले, पण त्यांना हूल भरून नेताजी राजगडाच्या वाटेला लागले.

जाया झालेले नेताजी राजगडावर आले. राजांनी स्वतः त्यांच्या जखमा जातीने पाहिल्या. तबीबांना नेताजींच्या जखमा औषधी भरून आवळण्यास सांगून राजांनी नेताजींना विश्रांतीचा सल्ला दिला.

राजांनी या पावसाळ्यात वाकेनविसीची वस्त्रे गंगाजी मंगाजी यांना बहाल केली. पुरे पाच महिने धुडगूस घालून पावसाळा पळाला. बारा मावळांतून खबरा येऊ लागल्या. नामदारखानाने पुन्हा उचल खाल्ली होती. तो टप्प्यात येतील तो गावठाणं तसनस करीत चालला होता. रोहिडखोऱ्यातून कान्होजी जेध्यांचे चिरंजीव बाजी जेधे यांचे खानाच्या मुलुखमारीचे बयाजवार वर्णन करणारे पत्र आले.त्याला उत्तर पाठविण्यासाठी राजे सदरेवर बसले होते. त्यांच्या शेजारी जिजाऊ आणि शंभू बसले होते. बाळाजी आवजी हे चिटणीस राजांच्या तोंडून फुलणाऱ्या मजकुराची फुले लेखणीने कागदावर रचीत होते. राजे एकसुरात मजकूर सांगू लागले. " बनाम सर्जाराऊ जेथे देशमुख तपे रोहिडखोरे प्रति राजश्री सिवाजीराजे-मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येताती म्हणोन जासुदांनी समाचार आणिला आहे. तरी तुम्ही तमाम आपले तपियात गावाचा गाव ताकिदी करून माणसे लेकरेबाळे समेत तमाम रयेति लोकांसि घाटाखाले बाका जागा असेल तेथे पाठविणे! जेथे गनिमाचा आजार पहुचेना ऐशा जागीयासि पाठविणे..


गनीम दुरून नजरेस पडताच त्याचे धावणीची वाट चुकउनु पलोनु जाणे! " बाळाजी आवजींनी पत्र पुरे केले. राजांचा दस्तुर घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले. पत्र थैलीत घालून तिचा फासबंद आवळला.


राजांच्या तोंडून पत्राचा मजकूर ऐकताना एका बोलाचे चांगलेच शिक्कामोर्तब शंभूबाळांच्या मनावर पक्के झाले होते. "गनीम दुरून नजरेस पडताच त्याचे धावणीची वाट चुकउनु फ्लोनु जाणे!"


सर्जेराव जेध्यांना रयतेच्या सुरक्षिततेसाठी 'पलोनु जाण्याचा सल्ला' जरी राजांनी दिला तरी स्वतःसाठी मात्र शास्ताखानाच्या पुण्याच्या सव्वालाखी सैतानी गोटात घुसोनु जाण्याचा बेत निवडला ! आता घुसणेच भाग होते. भाग होते पण सोपे नव्हते! राजे रात्रंदिवस त्याचाच विचार करीत होते.