उन्हतापीचे दिवस आले. राजे वर्धनगडाकडे आयला निघाले. मासाहेब आणि शंभूबाळांचा निरोप घेऊन त्यांनी राजगड सोडला. शंभूबाळांना आता घोड्याचा लळा लागला होता. रायाची आणि अंतोजी गाडे बाळराजांना स्वतःसंगती घोड्याच्या पाठीवर घेऊन रपेटीचा सराव होण्यासाठी त्यांची मांड तयार करून घेत होते. महमद सैस हा घोडेपारखी अरब त्यांना घोड्याच्या लकबीची पछान करून देत होता. कायदे केव्हा आखडावेत, केव्हा ढिले टाकावेत याची जानकारी देत होता. राजांची कृष्णा, कबुतरी, तुरंग, विश्वास, बिजली ही घोडी शंभूबाळ आपल्या हातांनी कायदे ओढीत खेचून नेऊन ती पागेत ठाण्ट करू लागले. घोडा हे जनावर बाळराजांना प्यारे झाले. त्याच्या रंगचमक खुब्याजवळ थाप मारताच त्याच्या सतेज कातड्याची होणारी थरथर पाहून बाळराजांचे बालमन थरकून उठू लागले. वायाच्या झकमकीबरोबर टाकोटाक कान टवकारणारा घोडा, स्वाराने टाच भरताच आघाडीचे दोन्ही खूर उंच उठवून अंगभर खिंकाळणारा घोडा, गडउतार होताना सावध चालीने जपून एक एक खूर उचलून तोल सावरणारा चतुर घोडा, मान तिरकस वाकडी करून खाली घालत चौपाट सुसाट धावगी धरणारा घोडा, पागेत ठाणबंद असताना डोळे मिटून चंदी चघळत ध्यान धरणारा घोडा अशी घोड्यांची कितीतरी रूपे शंभूबाळांच्या राजमनावर टांकसाळीतल्या सोनेरी होनावर उमटणाऱ्या मुद्रेसारखी खोल रुजून बसली. गोमाजीबाबा पानसंबळ 'धाकल्या राजांना तलवारीची मूठ कशी पेलावी, हाती पट्टा कसा चढवावा, भालाफेकीचा धावता मोहरा अचूक कसा साधावा, पट्ट्याचा चौक फिरताना ढाल आडवी टाकून वार कसा तटवावा, विट्याचे पाते दूर फेकून लगीतच पुन्हा मागे कसे घ्यावे यांची जुजबी टिगळ देऊ लागले.
जिजाऊ आपल्या बाळराजांना रामायण-महाभारतातील भुजबळ, निधड्या असामींच्या कथा सांगू लागल्या. बाळराजांच्या चौकस सवालांना मायाभरले जाब देऊन त्याचे समाधान करू लागल्या. चक्रव्यूहात एकाकी लढत खेळणारा अभिमन्यू, उमर कवळी असता बळजोर कंसाच्या छातीवर मांड ठोकून बसणारा श्रीकृष्ण, बकासुराची पीठ तिंबून त्याला ताराज करणार हत्तीजोड ताकदीचा भीम. मत्स्यभेद करणारा धनुर्धारी अर्जुन, धरतीने फितवा करून फसविलेले रथचक्र उठविण्याच्या खटपटीत असलेला कर्ण, पंख तुटेपर्यंत रावणाशी झुंज घेणारा इमानबंद जटायू, पादुकांचा प्रसाद घेऊन रामचंद्रांकडून परतलेला भरत, कैकयीच्या कारस्थानी मनसुब्याने अयोध्येच्या मुलखाला परागंदा झालेला राम, लक्ष्मण, सीता या साऱ्या असामी बाळशंभूच्या मनाच्या सदरेवर दाखल होत होत्या!
थंडीचे दिवस सरतीला लागले. राजे मोहिमेवरून राजगडावर येत असल्याची वर्दी आली. पेणभागात मिया डोंगराजवळ राजांची आणि शास्ताखानाचा सरदार नामदारखान याची गाठ पडली होती. लढाईच्या चकमकीत राजांचे कृष्णाजी बाबाजी हे सुभेदार कामी आले. वाघोजी तुपे जाया झाले होते..
त्यांचा विचार मनात घोळत असतानाच राजे राजगडावर आले. आणि याच दरम्यान बरेच दिवस मनात घोळत असलेली एक पुरानी ख्वाइश औरंगजेबाने दिल्लीत बसून पुरी करून घेतली !
ग्वाल्हेरच्या अदवखान्यात असलेल्या आपल्या कैदी भावाला मुरादला मुल्लामौलवींच्याकडून खुनी उरवून त्याला कुराणे शरीफच्या कौलाने 'सजा-ए-मौत' बहाल केली. तुरुंगात खितपत पडलेल्या मुरादला दोन जल्लादांनी साखळदंडासकट बाहेर काढला. त्याच्यावर मौलवींनी अहमदाबादच्या 'अलि नकी' या इस्लामी बंद्यांचा खून लादला होता. दिल्लीचा बादशहा' होण्यासाठी गुजराथ- सुभा सोडून औरंगजेबाला सामील झालेला मुराद, 'खुनी' म्हणून ग्वाल्हेरच्या रयतेला साखळदंडासह दाखविण्यात आला! मयूर सिंहासनाचे स्वप्न पाहण्याचा मूर्खपणा करणाऱ्या मुरादला .. ग्वाल्हेरच्या ' कत्तलीच्या चबुतऱ्यावर चढविण्यात आले.
बकरी ईदचे बकरे जेवढ्या जाहीर शांतपणाने तोडण्यात येते तेवढ्या ठंडपणाने औरंगजेबाच्या जल्लादांनी मुरादची गर्दन ग्वाल्हेरच्या भर चौकात धडावेगळी केली !! + 'शहजादा मुराद्रचे प्रेत 'बागींच्या' म्हणजे 'बंडखोरांच्या' कब्रस्तानात दफन करण्यात आले!
दाराला पूर्वीच दफा करण्यात आले होते, आता मुरादला मारण्यात आले; पण या नाचिज बाबींचा परिणाम 'अबुल मुझफ्फर मुहिउद्दिन मुहम्मद औरंगजेब बहादुर आलमगीर पातशहा गाझी' ही किताबत लावणाऱ्या औरंगजेबाच्या खाजगी जिंदगीवर व्हायचे काहीच कारण नव्हते. मुरादला कत्ल केल्यापासून तीन महिन्यांच्या आतच त्याने आपला बच्चा मुहम्मद अकबर याचा औरंगाबादेत शाही थाटात दावत घालून 'सुंता' साजरा केला!
'औरंग' म्हणजे 'सिंहासन'! 'जेब' म्हणजे त्याची 'शोभा वाढविणारा' हेच खरं!! आपल्या नावाचा असा और मतलब फक्त औरंगजेबाच्या खानदानी शाही रक्तालाच सुचणारा होता! शिवाजीसारखे 'काफर' सिंहासनाला 'गादी' म्हणत होते. त्या गादीची शोभा वाढविणाऱ्या गुणाला 'इमान' म्हणत होते! असला 'गावंढळ ' मतलब औरंगजेबाला मात्र मुळीच मान्य नव्हता!