कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग २६

 सगळ्या मराठमनाला जाणवून जाणारी एक दुर्घटना या वेळी घडली. जुने हिमती आणि हिकमती सरनोबत माणकोजी दहातोंडे यांनी शिवापुरात आपला देह ठेवला. स्वराज्यातील एक पराक्रमलाल इमानी 'माणिक' हरपले.


राजांनी आपल्या कारभारव्यवस्थेत थोडा बदल केला. अधिकाराची घालमेल करणाऱ्या शामराव रांझेकरांचे पेशवेपद काढून ती जिम्मेदारी त्यांनी नरहरी आनंदरावांच्यावर सोपविली. वाकेनविसीची वस्त्रे आण्णाजी दत्तोंना बहाल केली. राजांच्या कबिल्यात मात्र आणखी एक चोळीबांगडीचा मानकरी आला! सकवारबाई राणीसाहेबांना कन्यारत्न झाले. तिचे नाव कमळाबाई ठेवण्यात आले. 

नवरात्राचा सोनसुगीचा हंगाम आला. खांडेनवमीला पूजल्या हत्यारांसमोर बकऱ्यांचे खांडे पडले. विजयादशमीची पहाट उगवतीची कूस फोडून गडदाखल होऊ लागली.


राजांनी आणि शंभूबाळांनी खासेमहालाच्या हमामखान्यात पहाट स्नान आटोपले. अंगावर जगदंबेच्या भुत्येपणाची वस्त्रे पेहरून मस्तकावर डौलदार पगड्या चढविल्या. आबा आणि फर्जद शंभू जिजाबाईच्या महालात त्यांच्या दर्शनासाठी आले. दोघांनी जिजाऊंच्या पायावरची सोनधूळ मस्तकी घेतली. राजे प्रसन्नपणे म्हणाले, “आऊसाहेब, आज आम्ही गडावरच्या पाच उंबरठ्यांसमोर आईची परडी मागणार आहोत! आशीर्वाद द्यावा. कुणा-कुणाच्या उंबरठ्याचं दर्शन आम्ही करावं त्याचा सल्ला सांगावा.


"राजे, जे पोख्त, कदीम असतील त्यांच्यासमोर आईच्या भुत्येपणाचे हात पसरा.

थोरांचे पहाटदर्शन कार्यों लावणारं असतं!" जिजाबाई म्हणाल्या.

जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन राजे शंभूसह महालाबाहेर पडले.


आज राजांच्या संगती सरंजाम म्हणून कोणीच नव्हते. जगदंबेच्या वाटेवर कसला सरंजाम ? ही वाट फक्त भोसल्यांची होती. एक तळपता भोसला दुसऱ्या उगवत्या भोसल्याला घेऊन चालला ! एक धावतो पिढी दुसऱ्या चालत्या पिढीला घेऊन चालली ! जगदंबेची परडी मागण्यासाठी! दोघांच्या हातातील परड्यात हळदी-कुंकवाचा दिलजमाव केलेला भंडारा होता. गळ्यात कवड्यांच्या माळा होत्या.


राजांचे ते रूप कैलास पर्वतावरच्या जीवनविरक्त शिवासारखे दिसत होते! लाखो होनांची सोनरास ज्याच्या जामदारखान्यात दास्तानी पडली होती तो 'शिवराज' आज "योगिराज' झाला होता! उमद्या अरबी घोड्यावरून धावणी घेणारा, सुवर्णमंडित पालखीतून गढचढी करणारा तो सह्याद्रीचा कुबेर, मावळी गोपगोपाळांच्या रांगड मनावर राज्य करणारा तो भोसलेकुळीचा ' यादवराज' जगदंबेचे भुत्येपण मिरवत पायी चालला होता! त्याच्याबरोबर त्याच्या अग्रिवंत रक्ताचा वसा सांगणारा त्याचा फर्जद शंभू चालला होता. उगवतीच्या सूर्याला विशाल आकाश संगती घेऊन चालते करते तसे ते दृश्य होते.

हरएक 'भोसला' जगदंबेचा जन्मानेच नामजाद 'भुत्या' असतो! हातात उदराची परडी देऊन ती त्याला जन्मरूपी चौऱ्याऐंशी लक्ष दारादारांत फिरवते! एका हातात परडी आणि दुसऱ्या हातात पट्टा देऊनच भवानी त्याला जन्माला घालते! ही परडी मागितली की अंबा ती इमानी चाकरांच्या प्रसादाने शिगोशीग भरून देते! मरण गाठीशी बांधणारे, आपल्या वाहनाच्या वाघासारखे बेडर काळीज देते! भोसल्याने भुत्या म्हणून भवानीची परडी मागण्यात कसले शरमिंदेपण ?


राजगडावरच्या झाडापेडांवरच्या पक्षीलोकांचा जमाव किलबिलत जागा होऊन आभाळात झेपा घेऊ लागला. पहाटवाऱ्यावर नौबतीची दुडदुड स्वार झाली.. बालेकिल्ल्याच्या तर्फेला असलेल्या सोनोपंत डबिरांच्या वाड्यासमोर सडासंमार्जित अंगणात श्रींच्या राज्याचा आणभाक बांधील 'श्रीमंतयोगी' आपल्या बच्च्यासह उभा ठाकला! परडी सावरून राजांनी उदेकार केला- “आईचा 55 उदे SS! " शंभूबाळांनी तो उचलून धरला, “भवानीचा ऽऽ उदे ss !


डबीरांच्या वाड्यावरच्या देवडीवाल्याने घावत जाऊन खासे राजे बाळराजांच्यासह आल्याची वर्दी सोनोपंतांना दिली. पंत लगबगीने वाड्याच्या हमचौकात आले. सामने राजांना बघून ते गडबडून गेले. अदबमुजरा घालून ते खालगर्दनीने कसेतरी म्हणाले, 'आज्ञा झाली असती तर सेवक सदरेवर रुजू झाला असता. राजांनी आत यावं." 'नाही पंत, आम्ही आज या क्षणी राजे नाही. आईचे भक्त म्हणून तुमच्या जाणत्या उंबरठ्यासमोर परडी मागायला आलेले भुत्ये आहोत. आजची मर्यादा उंबरठ्यापर्यंतच ! शिधा वाढा.” राजांनी एक हात शंभूच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने परडी पुढे केली. शंभूंनी आपल्या दोन्ही हातांतील परडी पुढे सरशी केली. सोनोपंतांचे मन ते बोल ऐकून भरून आले. त्यांनी पायगतीची नजर उठवून राजांच्यावर जोडली. समोरचे थोर शिवपण' आणि धाकुटे 'शंभूपण' बघताना त्यांच्या उतार डोळ्यांत पाणकळा तरळली. पंतांना क्षणभर वाटले तडक समोर जावे आणि राजांच्या अनवाणी पायाची सडक, रक्तजागती, सतेज बोटे त्यांवर मस्तक ठेवून डोळ्यांतील पाणकळ्याने साफ साफ धुऊन काढावीत.


पंतांनी वाड्यात जाऊन तांदूळभरले तबक आणले. ते दगडी उंबरठ्यावर ठेवून एक ओंजळ भरून घेतली. राजांच्या शांत मुद्रेकडे, तलवारीच्या पात्यासारख्या बाकदार नाकाकडे भरल्या नजरेने पाहत सोनोपंतांनी ओंजळ राजांच्या हातातील परडीत उतरविली. उगवतीला सूर्योदय झाला होता. आभाळ तळपत्या सूर्याच्या ओंजळीने सोनकिरणांचे वाण मावळमुलखाच्या परडीत घालू लागले होते!

पंतांनी वाकून शंभूबाळांची परडी ऑजळीने भरली. त्यांच्या मळवटावर परडीतील भंडाऱ्याची बोटे पुसत बाळराजे म्हणाले, "भवानी आईचा 55 उदं ! " राजे आणि शंभूबाळ सोनोपंतांच्या वाड्याच्या अंगणातूनच परतले. त्या दोन भक्तांना पाठमोरे बघताना पंतांचे डोळे एवढे भरून आले होते की, त्यांना त्यांच्या आकृती दिसतच नव्हत्या. दिसत होता तो फक्त गड उजळणारा प्रकाश !


नेताजीराव पालकर, मोरोपंत, येसाजी कंक, आण्णाजी दत्तो अशा ओखी चार जाणत्यांच्या वाड्यांसमोर परडी मागून राजे आपल्या खाजगीच्या महालाकडे परतत होते. त्यांना शंभूबाळांसह भुत्याच्या वेषात परतताना पाहून उन्हात उजळून निघालेला, राजगडाला ऐटदार फेर भरलेली 'गडमाची' स्वत:लाच म्हणत होती "आदिशक्तीचे हे कवतुक बघायला आज सईबाई पाहिजे होत्या! "