शंभूने शेरनजरेने एकदा पोताच्या पेटत्या ज्योतीकडे बघितले. डाव्या हातातील काठी पायागतीच्या फरसबंदीवर आपटीत तो शिवबाळ गर्जला "भवानी राजा उदं उदंs!" आणि त्या बालरुद्राच्या हातातील पाचपेडी पेटता पोत फरफरत नाचू लागला. त्याला उजवीकडून उजवीकडेच जायचे बंधन उरले नाही !! सर्व बंध तोडून बाळराजे जोशाने मनाजोगा हातचा पोत नाचवू लागले! मिटल्या जागत्या डोळ्यांनी स्वतःभोवती ठेक्यांत गरगर फिरू लागले.
त्यांच्या डोक्यावरची पगडी हिंदकळता हिंदकळता उडाली आणि फरसबंदीवर उतरली ! केस मोकळे सुटलेले शंभो चौफेर थयथय नाचत पोत घुमवू लागले. त्यांचे रसरशीत ओठ रोमांचक उदेकार घुमवीत होते, " भवानी राजा उदं उदं उदं उदं !! " - फरफरणाऱ्या पोताचे कडे बाळराजांच्या भोवती गरगरू लागले. संबळवाल्याने संबळीच्या टाळी चापांच्या काठ्या चढीला लावल्या.
बाळराजांचे ते बेभान रूप पाहून सदरबैठकीवर बसलेल्या जिजाऊंच्या हातांची बोटे नकळतच कानशिलाकडे चढली आणि कटाकट मोडली गेली! थरकून उठलेल्या सदरेवरच्या एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत किलकारी दिली, " हर 55 हर 55 हर महादेव! " भवतीच्या साऱ्यांनीच ती उचलून धरली.
किलकारीच्या त्या मोठ्या आवाजाने बाळराजे थांबले. त्यांचा पोतघरला हात थरथरू लागला ! अंगावरचा डौर घामाने डबडबून निघाला होता. आपण आता खाली कोसळू असे त्यांना वाटू लागले. त्यांनी जिजाऊंच्याकडे मूक नजर दिली. जिजाऊ लगबगीनं सदरपायऱ्या उतरून चौकात आल्या. त्यांनी बाळराजांचा पोत आपल्या हातात घेतला. क्षणभर त्याच्यावर नजर जोडून तो गोंधळ्याच्या हाती दिला. शंभूबाळांना सावरून घरीत जिजाऊ सदरबैठकीवर आल्या. शंभूबाळ थकल्या अंगाने राजांच्या उजव्या तर्फेला बसले. त्यांची मुद्रा अपार तेजाने कशी उजळून गेली होती. नकळतच राजांचा हात त्यांच्या पाठीवरच्या घामेजल्या डौरावरून फिरू लागला ! गोंधळ्यांचा म्होरक्या एक परडी हातात घेऊन सदरेजवळ राजांच्या सामने आला. परडीत कुंकू-हळदीचा गुंतवा केलेला लाल-पिवळा भंडारा होता. त्या भंडाऱ्यात माखून गेलेली चौसष्ट कवड्यांची माळ होती. गोंधळी कमरेत वाकून हातातली परडी पुढे करीत म्हणाला, "ह्यो आईचं वाण हाय धनी. आईचं भुत्येपन घेतलं की ही परडी कुलदेवतेच्या देव्हाऱ्यात पुजाय लागती. नवरात्रात आईची परडी पाच घरं मागाय लागती !!
" आम्ही आनंदानं जरूर मागू.” म्हणत राजांनी पुढे होत जगदंबेचे वाण स्वीकारले! गोंधळी मागे हटत मांडलेल्या तांदळाच्या चौकात आला. कानावर हात ठेवून संबळ, तुणतुण्याच्या तालावर त्याने गोंधळाचे नमन सुरू केले -
" गजवदना, गणराया गौरी-
मज तारी हो सुखसजना-
समरण तुझे पायी पद्मागौरी भुत्या विनवी हेरंबा मज तारी
गजवदना, गणराया, गौरी- "
नमन होताच गोंधळ्याने जगदंबेला बालेघाट पार करून गोंधळाला येण्यासाठी साकडे घालायला सुरुवात केली.
"या गोंधळासी माये लवकरी यावे !
अंबे लवकरी यावे चौक भरिला कोसरी लिंब, नारळ नानापरी उदबत्या लावून चारी महापूजा मांडिली साजरी या गोंधळासी माये लवकरी यावे!
कुठवर आई पाहू वाट ? माझ्या नेत्रा भरला ताट माये, लवकर चाला वाट- लवकर सोडा बालेघाट या गोंधळासी माये लवकरी यावे!
संबळ, तुणतुण्याचा नाद पोत पाजळला घालून साद आपुन यावं देऊन दाद अंबे, माये सोडून वाद या गोंधळासी माये लवकर यावे !
गोंधळास आलेल्या आदिशक्ती जगदंबेचा महिमा वर्णन करताना गोंधळी पोत उजवा उजवासा नाचवीत भान हरपून गेला. तो महिमा जिजाऊ, राजे, शंभूबाळ आणि सदरेवरचा हरेक मावळा असे सर्वच कानभर ऐकू लागले,
"आदिशक्तीचे कवतुक मोठे भुत्या मज केले!
पंच भूतांचा देह पोत हा, त्रिगुण गुणी वळला!
चैतन्याची ज्योत लावुनी,
प्रज्वलित केला!
चित्तस्नेहे प्राण वाहुनी, ज्याला स्थिर केले!
आदिशक्तीचे कवतुक मोठे, भुल्या मज केले!
उदर परडी देऊन हाती, ब्रह्मांडी फिरवी!
लक्ष चौऱ्याऐंशी घरची भिक्षा,
मागविली बरवी!
ज्या ज्या घरी मी भिक्षा केली, ते ते घर रुचले!
आदिशक्तीचे कवतुक मोठे, भुत्या मज केले !
सकाम कर्मे कवड्या यांची, माला मम कंठी !
कर्मफळाचा कुंकुम मळवट, माझ्या लल्लाटी!
पीडा बाधा शकुन सांगुनी, लोकां भुलविलें !
आदिशक्तीचे कवतुक मोठे,
भुत्या मज केले !!
गडावर रात्र चढीला लागली. सदरचौकात भवानीकथा चढीला लागली ! राजांच्याबरोबर सदरेवर बसलेल्या साया मावळ्यांना कळून चुकलेले 'भुत्येपण' पुन्हा एकदा उजाळा घेऊन उठले की, " आई जगदंबेसमोर रात्री गोंधळ घालणं पडतं आणि गनिमांच्या मुलखात दिवसरात्र गोंधळ माजविणं पडतं !!'