कोणतही शिवकाव्य येथे शोधा

⚔️🚩 छावा 🚩⚔️ भाग २४

 शंभूबाळांसह गडपायथ्याशी आलेले राजे पालखीला सामोरे आले. मंबाजींनी राजांचा आणि बाळराजांचा मळवट भंडाऱ्याने भरला. जगदंबेचे ते दोन्ही फर्जंद चालत पालखीजवळ आले. ठाण झालेल्या पालखीतील शस्त्रसंभार उगारलेली, पायाखाली महिषासूर रगडणारी, कृष्णवर्णाची, वज्रलेपी मूर्ती डोळाभर बघताच राजांनी 'जगदंब जगदंब' म्हणत हात जोडून डोळे मिटले. पुढे होत राजांनी आणि शंभूने जगदंबेच्या पायाला हात लावून तो मस्तकाला भिडविला. राजांनी देवभोयांना इशारत करून आईच्या पालखीला आपला रिवाजी खासा खांदा दिला. ते बघताच भोवतीचे उभे मावळजन भक्तिभावाने उसळून उठले. “ उदं ग अंबे " उद!! हर हर महादेव" चा मावळ्यांनी पाऊसच पाऊस पाडला ! पालखो राजगड चढून आली, जिजाबाईंनी आणि राणीवशातील पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई अशा सर्व राज्यांनी जगदंबेची खणानारळांनी ओटी भरली. शुभमुहूर्तावर पालखी प्रतापगडाकडे जाण्यासाठी वाजतगाजत राजगड उतरू लागली. जगदंबेची मिळेल तेवढी कृपासोबत साधण्यासाठी राजे शंभूबाळांसह पालखीबरोबर गडमाचीपर्यंत आले. गड उतरणारी पाठमोरी पालखी बघत असताना राजांना फार फार जाणवून गेले, " ह्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आज सईबाई पाहिजे होत्या! " शंभूबाळांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, "ही जगदंबा साऱ्या जगाची आई आहे. तुमची आमची साऱ्यांची ! तिला हात जोडा बाळराजे!' राजे आणि शंभूबाळ यांनी हात जोडून डोळे मिटले. गडमाचीवर उन्हात मिसळत श्रावणसरी ते दृश्य बघत होत्या !


देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी राजे कुटुंबकबिल्यासह प्रतापगडावर आले. मुहूर्ताचे पात्र 'घुई घुई' करीत पंगाळात डुबले आणि राजांनी 'जय जगदंब' म्हणत आईच्या मूर्तीला हात लावले.


मंदिराच्या सुघड गाभाऱ्यातील चौथऱ्यावर जगदंबेची 'उदं ग अंबे उदं' च्या गजरात सुप्रतिष्ठापना झाली. मूर्तीसमोर मानाची बकरी पडली. प्रतापगड चैतन्यजोषात उजळून निघाला. जावळी आणि कोयना खोरीतील अवघा मावळा लोक जगदंबेच्या दर्शनासाठी गडावर लोटला होता.


रात्री आईच्या गोंधळासाठी प्रतापगडाची सदर मावळ माणसांनी खचाखच दाटून • गेली. सदर चौकात तांदळाचा चौक आखून जगदंबेच्या मानकरी भुत्यांनी त्यावर श्रीफल ठेवले होते.


पीळदार पगडी, घोळदार डौर आणि चुगीदार चोळणा असा पेहराव घातलेले गोंधळी मळवट भरून तयार झाले. कुणाच्या गळ्यात संबळ होता. कुणाच्या हातात चवंडकं, तुणतुणं. डोक्यावर करंजेल घेतलेले टेंभे सदरच्या कोनाड्याकोनाड्यांत फरफरत होते. राजे सदरदाखल होण्याची सारे उत्सुकतेने वाट बघत होते..

पदराचा काठ तर्जनीने सावरता घरीत प्रथम जिजाबाई सदरेवर आल्या. त्यांच्या पाठोपाठ राजे आणि शंभूबाळ सदरदाखल झाले. समोर उभे असलेले मावळे पगड्या उंचावून आक्षयनि राजांच्याकडे आणि बाळराजांच्याकडे बघू लागले. त्या दोघा पितापुत्रांनी जगदंबेच्या भुत्याचा वेष आज अंगावर धारण केला होता! ती रूपे मोठी गोमटी दिसत होती. त्यात राजेपण नव्हते. होते ते भाववेडे भक्तपण !


राजे बाळशंभूसह सदरबैठकीवर सुखावले. गोंधळ्यांचा म्होरक्या सदरेसामने आला. मुजरा घालून म्हणाला, "आईचा मानाचा पोत पेटता करून आपुन त्यो नाचवाय पायजे धनी. "जशी जगदंबेची आज्ञा." म्हणत राजे पायऱ्या उतरून चौकात आले. म्होरक्याने दिलेला, पाच पेडांत घट्ट वळलेला भवानीचा पोत त्यांनी आपल्या हातात घेऊन तो मस्तकाला लावला. गोंधळ्याने बगलेतल्या बुधल्यातील करंजेल पोतावर सोडले. त्याच्या हातातील टेंभ्यावर धरून राजांनी जगदंबेचा पोत पेटता केला! गोंधळ्याने • आपल्या हातातील काठी राजांच्या हातात दिली. तिच्या ठेक्यावर पोत उजव्या हाताकडून उजवीकडेच कसा नाचवायचा याची राजांना टिगळ दिली. संबळ तडतडत घुमू लागला, चवंडकं, तुणतुण्याने साथ धरली. " आई राजा उदंऽऽ उदं!' म्हणतं पायाखालच्या फरसबंदीवर डाव्या हातातील काठीचा ठेका धरून राजे जगज्जननीचा पोत नाचवू लागले. पेटती ज्योत बघताना राजांचे डोळे कसल्यातरी दिव्य तेजाने पेटून उठले ! डीराखालचे त्यांचे अंग सरसरत गरम झाले. त्या पोताच्या फरफरत्या ज्योतीतच त्यांना शामियान्यासकट हात पसरलेला अफजलखान दिसू लागला! राजांच्या बाकदार नाकाच्या शेंड्यावर घामाचे थेंब तरारले! पाठकण्यातून पांढरीधोट घोडी सुसाट धावताहेत असे त्यांना क्षणभर वाटले. "हे असं असंच काहीतरी ज्या क्षणी आम्ही खानाला फोडला त्या क्षणी आम्हांस वाटलं होतं! या पेटत्या पोतासारखंच काहीतरी उसळतं पेटतं आमच्या नसानसांत दबा धरून आहे!" क्षणात राजांना पोतात दिसणारा अफजल दूर हटला. त्यांच्या निमुळत्या डोळ्यांतील ज्योती आणि फरफरता पोत एकजोड झाले. विलक्षण तेजाने आता राजांचे डोळे चमकू लागले. ते बेभान झाले ! 'आई राजा उदं उदंs!" म्हणत मिटल्या डोळ्यांनी राजे काठीच्या ठेक्यावर हातातील पोत फराफर नाचवीत स्वतःभोवती बेभान फेन्या घेऊ लागले. सदरबैठकीवर बसलेल्या शंभूबाळांचा पाठकणा तो फरफरता पोत पाहताना आपोआपच ताठ झाला! राजांच्या हातात थयथयत फरफरणाऱ्या पोताच्या प्रकाशरेषेवर त्यांची निर्भीड नजर एकटक जोडली गेली. आबांचे हे असले रूप काही त्यांना कधीच बघायला मिळाले नव्हते.


पोत नाचवून दमगीर झालेले राजे थांबले. आता त्यांच्या छातीवरचा डौर घामाने चिंब डबडबला होता. पोतधरला हात थरथरत होता. पोताच्या तांबड्या-पिवळ्या प्रकाशात राजांचे घामाने डवरलेले रूप नुकत्याच धुऊन काढलेल्या शिवलिंगासारखे दिसत होते. कपाळावरचा घाम तर्जनीने निचरता करून राजांनी एकदा पोताकडे पाहिले. मग सदर बैठकीकडे नजर जोडून म्हणाले, “बाळ शंभू, असे चौकात या ! " शंभूबाळ बैठकीवरून उठून राजांच्या सामने चौकात आले.


आपल्या हातातील पेटता पोत शंभूच्या हातात देत राजे त्यांचा छोटेखानी खांदा हळुवार थोपटीत म्हणाले, "तुम्हीही नाचवा आईचा पोत बाळराजे. आमच्यापेक्षा जोशानं ! " सारी सदर डोळे टवकारून बघू लागली.


गोंधळ्याने पुन्हा करंजेल देऊन बाळराजांच्या हातातील पोत ज्योततवाना केला. राजांनी आपल्या हातातील काठी बाळराजांच्या हातात दिली! आणि राजे सदरपायऱ्या चढून जिजाऊंच्या शेजारी बैठकीवर विसावले.