राजांचे घोडदळ 'हर हर महादेव' चा पाऊस पाडीत शृंगारपुरात घुसले. सुव्यांची गढी घेरली गेली. कमरेची भवानी उपसून राजे सुयांच्या गढीत शिरले. गढीतले सुयांचे सगळे धारकरी मावळ्यांनी दस्त करून त्यांच्या मुसक्या अगोदरच आवळल्या होत्या. पायातील बाकदार मोजडीने सुव्यांचे भुंडे सिंहासन त्वेषाने ठोकरीत राजे म्हणाले,
'बेइमानदारांच्या मसनदी मातीमोलाच्या असतात ! ते दृश्य समोर पाहत असताना एका बळजोर, कल्लेदार माणसाची छाती वरखाली होत होती. ते होते सुयांचे दिवाण पिलाजीराव शिर्के !
दोरखंडांनी दस्त केलेल्या पिलाजीरावांना राजांच्या सामने पेश करीत तान्हाजी मालुसरे म्हणाले, " हो बेईमानी धन्यांचे इमानी चाकर!' "
शांत पावलांनी पिलाजींच्याकडे जात राजांनी आपल्या हातांनी त्यांच्या काढण्या उतरल्या. राजे तानाजीला म्हणाले, “चुकलात तान्हाजीराव, इमानी नजरेला धन्याच्या चालीची खोट कधीच दिसत नाही. दिसली तरी पटत नाही. म्हणूनच तर ते कुलवंत 'इमान' असतं!'
मोकळे झालेले पिलाजीराव राजांच्या नजरेला निधड्या छातीने नजर भिडवून म्हणाले, " काढण्या कशापायी काढल्या ? ज्या गादीला आमी मुजरं केलं तिला ठोकरून वर ही आमची नावाजणी कशापायी ? त्यापरीस घोड्याच्या टापला जखडून आमच्याच गावात काढा की आमची धूळधिंड !'
पिलाजीरावांच्या खांद्यावर आपल्या डाव्या हाताचा तळवा चढवून कपाळावरचे शिवगंध आक्रशीत राजे म्हणाले, " पिलाजीराव, तुम्हीही चुकलात! आम्ही पागेचा एवढा घोडा पोसला तो काही इमानदार माणसं त्याच्या टापांखाली पडण्यासाठी नाही ! इमानी जनावरांकडून इमानी माणसं रगडणाऱ्या राज्याची आणभाक आम्ही घेतलेली नाही ! प्रसंग पडला तर आमच्या पागेचा घोड़ा इमानी माणसाच्या मांडेखालीच येईल !' - होईल ती मानहानी सोसायला मन बांधील झालेल्या पिलाजींना असले जिनगानी कुर्बान करून टाकावी असे बोल कधी ऐकायला मिळतील अशी अपेक्षाच नव्हती. घोटाळलेले पिलाजीराव राजांच्याकडे डोळे भरून बघत होते. त्यांच्या मनी चाललेली घालमेल राजांनी जाणली. त्यांच्या खांद्यावर तळहाताची एक थाप देऊन राजे म्हणाले, "घाबरू नका पिलाजीराव, आम्ही तुम्हाला आमच्या चाकरीत दाखल होण्याची भीड घालणार नाही! तुमच्या नेकजात बर्तावावर आम्ही निहाल आहोत. पण सल्ला म्हणून मनची एक बांत तुम्हाला जरूर बोलू. शिकल न लावलेलं हत्यार आणि मुजोर बेइमान धन्याची चाकरी सारखीच असते! दोन्हीचा असूनसुद्धा काहीच हिसाब लागत नाही! सुव्यांची संगत करण्यापेक्षा सेतपोतावर जाऊन कुणबावा केला तरी तो गोमटाच आहे! "
" तान्हाजीराव, पिलाजींना बाइजत मोकळं करा.” राजांनी आज्ञा करीत उजव्या हातातील भवानी म्यान केली. पिलाजीरावांचे कल्ले थरथरले. झटकन वाकून राजांच्या मोजड्यांना हात लावीत ते म्हणाले, "राजं, आजवर तुम्हांबद्दल लई ऐकून हुतो. आज त्येचा पडताळा नजरेला आला. त्याहून पाय धरलं. तोडायचं असंल तर टाका तोडून.'
त्यांना वरं उठवून गळाभेट देत राजे म्हणाले, "पिलाजीराव, आमची जिंदगी तोडण्यासाठी नाही. हयातभर आम्ही माणसं जोडतच आलो. तोडणं सोपं असतं. जोडणंच मुश्किल आहे!"
पिलाजींनी राजांना आपल्या वाड्यावर पायधूळ झाडण्यासाठी विनवणीचे मागणे घातले. निवडक धारकरी घेऊन राजे पिलाजीरावांच्या वाड्यात आले. वाड्याच्या सदरचौकात दोन भावंडे खेळत होती. साऱ्यांना पाहून ती दबकली. राजांनी पिलाजींना विचारले, "ही कुणाची घरशोभा पिलाजीराव ?
"जी. ती माजीच हाईत. हो थोरलं गणोजीराव आन ही धाकली राजसबाई सम्दी हिला राजाऊ' म्हनत्यात. आम्ही जिऊ म्हन्तो." पिलाजींनी आपल्या मुलांची नावे सांगितली.
थोरला गणोजी तरतरीत दिसत होता पण तोरेबाज उभा होता. राजाऊ मात्र मोठी राजस आणि चलाख दिसत होती. तिच्या डोळ्यांत भीतीचा वारासुद्धा नव्हता. त्याहून राजांना तिला बघताक्षणीच जाणवले की तिचा तोंडावळा जिजाऊंच्या तोंडावळ्याशी बराच जुळता आहे! पुढे जात राजांनी दोन्ही मुलांच्या खांद्यावर हात ठेवले. ते पिलाजींना म्हणाले, ""तुमच्या या जोडीने आम्हास आमच्या बछड्यांची याद दिली!"
पिलाजीरावांनी राजांची इतमामाने सरबराई केली. शृंगारपूर आणि प्रभानवल्लीचा सुभा त्र्यंबक भास्करांना सांगून त्यांनी त्यांच्या दिमतीला पिलाजीराव शिर्के ठेवले. शृंगारपूर सोडण्यासाठी राजे गाववेशीवर आले. वेशीच्या तर्फेला कसलेतरी एक मंदिर होते.
" हे कसले देवस्थान ?” राजांनी निरोप द्यायला आलेल्या पिलाजींना विचारले.
" ते आमच्या कुलदैवताचं- भावेश्वरीचं हाय." पिलाजी म्हणाले "अस्सं! चला दर्शन घेऊ." म्हणत राजे पायउतार झाले. मंदिरात जाऊन त्यांनी भावेश्वरीचे दर्शन घेतले. बाहेर पडताना ते पिलाजींना म्हणाले, "तुमच्या या कुलदैवताचा संबंध आमच्या जगदंबेशी असावा! ही मूर्ती जगदंबेसारखीच दिसते! " शृंगारपूर सोडून राजांच्या घोडेतुकडीने चिम्या चालीची धावणी धरली. राजांच्या मनात दोन गोष्टी धावणी घेत होत्या एक 'राजाऊ उर्फ जिऊ', दुसरी भावेश्वरी! राजे राजगडावर आले आणि मृगाने आपली झोड उठविली. गडावरच्या झाडी आवळण्यात आल्या. गड उतरंडीवरचा झाडझडोरा पाणधारांत न्हाऊन निघू लागला. शंभूबाळांना संगती घेऊन राजे दफ्तरखान्याचा जाबता जातीनिशी नजरेखाली घालू लागले. लोहारमेटावर भाल्यांच्या इंगळांवर तावून निघणारी आणि घणठोक्यांखाली घडणारी तलवारींची पाती आपल्या सडक बोटांच्या मुठीत पकडून तोलून पाहू लागले. वरून पाऊसधारा कोसळत होत्या. राजांच्या मनात एका विचाराचा पाणलोट घोंघावत होता लालमहालात शिरलेला हिरवा सर्प शास्ताखान !
आषाढ हटला. श्रावणाचे सरते दिवस आले. ऊन-पाऊस एकमेकांच्या पाठलागावर पडले! वहने पावसाच्या तुरळक सरी खाली उतरत असतानाच राजगडाच्या पायथ्याजवळ "उदं ग अंबे उदं! "च्या बेभान, रोमांचक किलकाऱ्या आभाळाकडे वर चढत होत्या! रणहलग्यांवर लेझमांचे ताफे नाचत खेळी करत होते. टाळी चापाच्या काठचा संबळी घुमवीत होत्या. रणशिंगांच्या ललकाऱ्या पाऊस सरींवर काटा फुलवीत चीत्कारत धावत होत्या. भंडाऱ्याच्या मुठी उधळल्या जात होत्या. ऊर भक्तीच्या इरेसरीने भरून आले होते. उदेकार उसळत होते. "उदे ग अंबेउदं !
मंबाजी नाईक भवानो जगदंबेची गंडकी शिळेची घडीव मूर्ती पालखीत स्थापून राजगडाच्या पाली दरवाज्याकडे येत होते. बुतशिकनी करणाऱ्या औरंगजेबाच्या हिरव्या मुलखातून भगवती जगदंबेची मूर्ती मंबाजींनी मराठी मुलखात सिताब आणली होती. मराठी मुलखात अवतरण्यापूर्वीच सरहद्दीवर भवानीसमोर बकरी पडली होती. रक्ताच्या पायघड्यांवरून जगदंबा श्रींच्या राज्यात प्रवेशली.
मुर्दाडांना मातीमोल करणारी! मदांच्या मनगटात निघडपणाचा चेवताव चढविणारी ! जोषाला जय देणारी जयंती ! कडव्या भक्तांना कृपाकडे बहाल करणारी भद्रकाली ! महिषासुराचे मर्दन माजविलेली मत्तमर्दिनी ! भंडासुराचे भंजन केलेली भगवती भवानी ! बिडालाला बुडविलेली बलशाली बिहडिनी ! न्यायी जगाला जागणारी जगवणारी - जयवंती जगत्जननी भवानी राजांच्या राज्यात उतरली ॥