प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंब्यावर खानाच्या भेटीसाठी ऐसपैस शामियाना आण्णाजी मलकन्यांनी उभा केला होता. षष्ठीच्या रात्री खानभेटीचा खल करण्यासाठी निवडक असामीसह राजांचे खलबत बसले. नेताजी पालकर, कान्होजी जेधे, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, बाबाजी भोसले, बाळाजी सिलीमकर, पंताजी गोपीनाथ अशा असामींनी राजांच्याभोवती बैठकीचा फेर धरला. साऱ्यांचे मळवट भंडाऱ्याने भरले होते.
निर्धाराच्या सावध घोगऱ्या आवाजात राजांनी खलबताला तोंड फोडले- " उदईक खानाचे भेटीसाठी आम्ही तिसऱ्या प्रहरी गड उतरणार आहोत. खानाच्या मनी आम्हास जिवे मारावे ऐसे कपट दबा धरून बसले आहे.
ये समयी समस्तांनी एकदिलाने हिंमत बांधली तर कुल फौजेसह खान बुडतोच आहे. आम्ही नेमून देतो आहोत ती कामगिरी अवघे कान देऊन चित्ती धरा. कार्यों कुसूर करू नका. मोरोपंत, तुमच्या पायदळानिशी तुम्ही पारघाटात किनेश्वराच्या खोऱ्यावर डोळ्यांत तेल ठेवून दव्यानं बसा.
कान्होजीबाबा, तुमच्या बांदलांचा जमाव आणि पासलकरांचे कोटबंद धारकरी घेऊन तुम्ही आण्णाजी दत्तोसमवेत खान येतो त्या वाटेभोवती अंगचोरीने जागा धर बाळाजी आणि हैबतराव, तुमचा हत्यारबंद मावळा खानाच्या पाराजवळच्या तळाला घेरून रातोरात गर्दाव्यात पेरा. बाबाजीराजे, तुमचा पाऊलोक वाई-जावळीच्या बगलेस खानाच्या फौजेच्या पिछाडीला परतीच्या वाटा रोखण्यासाठी जागता ठेवा. नेताजीराव, तुमचे खुरचलाख घोडदळ कुडसराच्या पठारावर जीनतैय्यार ठेवा. खानाचा वाईत ठाण झालेला चंदावलीच्या कुमकेचा तळ तुम्हास बुडविणे आहे. तान्हाजी, कृष्णाजी कंक तुम्ही निवडक, चखोट पटेकरी संगती घेऊन भेटीच्य शामियान्याजवळच्या दरडीला धरून खणलेल्या चरात उतरा.
संभाजी कावजी, जिऊ महाला, कोंडाजी आणि येसाजीकाका, संभाजी करवर, काताजी इंगळे, विसाजी मुरुंबकर, सुराजी काटके, सिद्दी इब्राहीम आणि कृष्णाजी गायकवाड हे दहा धारकरी आमच्या संगती गड उतरतील.
जगदंबेच्या आशीर्वाद आम्ही खानास जीवे घेतला तर तटमाचीवर इशारतीसाठी तोफांच्या भांड्यांचे तीन बार होतील. कमनशिबाने आम्हास दगा झालाच तर इशारतीची पाच भांडी वाजतील.
आम्ही सलामत आलो ना आलो तरी साज्यांनी हिंमत धरोन कोयनाखोरीच्या कैचीत फसलेला खान कुल फौजेसह बुडवावा! ये कामी कुचराई करेल, शकअंदेश मनी घरेल त्यास मळवटीच्या जगदंबेच्या भंडाऱ्याची आण !
एक आम्ही जातो म्हणोन दिल टाकू नका. हे श्रींचे देवाधर्माचे राज्य उभे करणे आहे. त्यासाठी प्रसंग पडला तर कैक सिवाजीराजे खर्ची घालावे लागतील.
आम्ही सलामत आलो नाहीच तर आमच्या शंभूबाळांना सामोरे घाला. आमच्या ठायी त्यांना समजोन नेताजीरावांच्या पोख्त मसलतीने अवघे मिळोन श्रींच्या राज्यासाठी कस्त करा! आशीर्वादासाठी मासाहेबांचे हातबळ तुमच्या पाठीशी आहेच!"
जिजाऊंच्या आणि शंभूबाळांच्या आठवणीने राजांचा आवाज घोगरा झाला. काळीज भरून आले. प्रतापगडावरचे खलबत उठले. टेंभ्यांच्या मंद प्रकाशात राजांनी साऱ्यांची गळाभेट घेतली. नेताजीरावांनी पुढे होत खलबतखान्याच्या आतून तोंडावरच्या दगडी धोंडेवर कमरेच्या तलवारीच्या मुठीने तीन ठोके दिले. बाहेरून धोंड हटविण्यात आली. राजांनी मुजरे करून सारे जोडून दिलेल्या कामगिरीचा विचार करीत गड उतरू लागले. त्यांना धीर द्यायला कपाळावर फक्त भवानीचा भंडारा होता. आभाळातील षष्ठीची 'चंद्रकोर' पांढऱ्या भुरक्या ढगांनी पार-पार झाकळून टाकली होती !!
राजे आपल्या खाजगीच्या महालात आले. तबकात टोप उतरून ते मंचकावरच्या बिछायतीवर आडवे झाले. शंकाकुशंकांनी त्यांच्या मनात फेर धरला. “खरोखरच खानानं या भेटीत काही दगा केला तर!... आमच्या या नव राज्याचं काय होईल ? मासाहेबांची कोण स्थिती होईल? आणि शंभूबाळ ? आपल्या आऊंना मुजरा करण्यासाठी आभाळाची दौड घेण्याची भाषा करणारा तो पोर आमच्यासाठी आऊसाहेबांना हैराण हैराण करील! आमचा ठावठिकाणा धुंडण्यासाठी एकटाच गड उतरोल. बाळशंभू, खरंच... खरंच तुम्ही आप्तगणांकडून फसले जाण्यासाठीच तर नाही आलात ?
बाळराजांच्या आठवणीने राजांच्या डोळ्यांसमोर सईबाईंची सावळी मुद्रा उभी ठाकली. त्यांचे काळीजकैची पालणारे अखेरीचे बोल याद आले- “आमचे शंभूबाळ - एकला जीव ! आज स्वारींच्या पदरी घातला!'
राजे पुरते बेचैन झाले. त्यांना काही काही सुचत नव्हते. कूस पालटली तरी विचार काही बदलत नव्हते. छातीवरच्या माळेतील कवड्या डोंगराएवढा आकार घेऊन छाती दडपून टाकताहेत असे वाटत होते.
"श्रींचे राज्य! देवाधर्माचे राज्य. त्यासाठी खर्ची पडलेले इमानबंद जीव ! हयातीची होलपट हसतमुखाने सोशीत आलेल्या आऊसाहेब! जिंदगीच्या उंबरठ्यावरच निखाऱ्यांचा टोप मस्तकी बसलेले शंभूबाळ !! "
घायाळ घायाळ झालेले राजे कसल्यातरी विचाराने टाच भरल्यासारखे तडक उठून मंचकावर बसले. महालाच्या दरवाज्यापर्यंत जाऊन त्यांनी पहारेकऱ्याला साद घातली - 'कोण आहे?
"जी" म्हणत पहारेकरी महालात आला आणि कमरेत वाकला. "हिरोजीला याद फर्माव." राजांनी त्याला तसाच परतविला. त्याने धावत जाऊन हिरोजीला वर्दी दिली.
हिरोजी फर्जद राजांच्यासमोर मुजरा करून आदबीने उभा राहिला. " हिरोजी, डोळ्यास डोळा लागत नाही. केदारेश्वराचं दर्शन घ्यावं म्हणतो. आमच्या संगती चल.
" जी' म्हणत हिरोजी महालाबाहेर पडला. पुढे जाऊन त्याने केदारेश्वराच्या पुजाऱ्याला उठविले.
राजांनी अंगाभोवती शाल लपेटून घेतली. टॅभे घरलेले दोन धारकरी, बेलपत्राचे तबक घेतलेला केदारेश्वराचा पुजारी आणि हिरोजी फर्जंद यांच्यासह राजे केदारेश्वराच्या दर्शनाला चालले.
मध्यरात्र जवळ आली होती. चंद्रकोरीने फेकलेले धूसर चांदणे गडावर उतरले होते. दूरवर खानाच्या गोटात पेटलेल्या आगट्या कोयनाखोरीत दिसत होत्या.
सारेजण केदारेश्वराच्या मंदिरासमोर आले. मंदिराच्या गाभान्यात ठाणवयांच्या शांत प्रकाश पहाच्यात शिवलिंग तळपत होते. राजांनी पायीच्या मोजड्या उतरल्या. मंदिरात. प्रवेश करण्यापूर्वी दरवाज्याच्या उंबरठ्याला हात लावण्यासाठी राजे खाली वाकले. त्या दगडी उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना नऊ पाकळ्यांची दोन डौलदार धर्मचक्रे कोरली होती ! त्या दोन धर्मचक्रांच्या थेट मधोमध येईल असे जबडा पसरलेल्या वाघाचे चैतन्यमय मुख कोरले होते !! राजे हरपल्या भानाने ते व्याघ्रमुख एकनजर पाहू लागले. आपल्या पाठकण्यात काहीतरी सळसळते आहे, उरात काहीतरी ठासून भरले जाते आहे असा त्यांना भास झाला ! राजांच्या मस्तकाची पागा खुलली. क्षणभरात विचारांची कैक पांढरधोट घोडी धावणी धरून गेली.
व्याघ्रमुख ! व्याघ्रासनी रणमर्दिनी जगदंबा ! एक एक पंजा पुढं पुढं टाकीत येणारं, रोखल्या नजरेचं व्याघ्रवाहन! त्याच्या पाठीवर आरूढ झालेली, शस्त्रसंभार उगारलेली, आरक्त नेत्रांची, रणदेवता भवानी! वाघाच्या उगारलेल्या पंजाबरोबर गरगर फिरणारं धर्मचक्र !! व्याघ्रमुख, उगारलेला पंजा, शस्त्रं रोखलेली भवानी, गरगर फिरणारं धर्मचक्र आणि आणि ते रोखण्यासाठी दातओठ खाऊन, बाह्या सरसावत येणारा खान ! खान! खान! राजांची गर्दन क्षणात नागफण्यासारखी ताठ झाली! त्यांचे विस्फारलेले सूर्यपट डोळे पुरते पेटून उठले ! डोळ्यांसमोर वाघाचा उगारलेला पंजा नाचत होता. झपाझप चालत राजे मंदिर गाभाऱ्यात गेले. पुजाऱ्याने पुढे केलेल्या तबकातील बेलपत्रांची ओंजळ त्यांनी आकाशाने तारका उधळव्यात तशी शिवलिंगावर उधळली ! हात जोडून डोळे मिटून ते गाभारा घुमवीत बोलले- "जय शंभो ऽऽ हर हर ! जय भवानी !” राजांना कसला तरी ठेवणीचा कौल मिळाला होता! शिवलिंगावरचे अभिषेकपात्र एकसरीत जलवर्षाव करीतच होते !!